झगमगत्या चंदेरी दुनियेत स्वतःचं वेगळेपण जपणारा खिलाडी अक्षय कुमारवर आक्षेप घेणाऱ्यांनी हे वाचाच
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम
===
एअरलिफ्ट, रुस्तम, बेबी, हॉलिडे, गब्बर, नाम शबाना, जॉली एल एल बी-2, टॉयलेट एक प्रेमकथा, आणि पॅड मॅन.
‘टिप टिप बरसा पानी’ गाणं आठवतंय का? त्यातली रविना नाही हो, अक्षय कुमार बद्दल बोलतोय आपण.
कुठलाही वशिला नसताना स्वतःच्या कष्टावर 100 पेक्षा जास्त सिनेमे करून प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण करणाऱ्या, पैसा आणि राष्ट्रीय पुरस्कार मिळवणाऱ्या अक्षयचा प्रवास भारावून टाकणारा आहे.
त्याची इमानदारी, चारित्र्यसंपन्नता, शिस्त, मनमोकळेपणा, नम्रपणा, स्वतःच्या मूळ ओळखीला न विसरण्याची कला यांमुळे तो आदर्श आहेच.
सध्या मात्र त्याला सातत्याने सामाजिक विषय आणि राष्ट्रभक्तीने ओतप्रोत असलेल्या सिनेमांची गर्दी करण्याचं श्रेय द्यावं लागेल. पहिल्यांदा तर अक्षयचं तोंडभरून इमामदारीने कुठल्याही टोमण्याच्या नाही तर प्रचंड आदराच्या सुरात कौतुक करायचंय.
कारण खान नावाची घाण त्याच्यामुळे बरीच आटोक्यात आली आहे.
दाक्षिणात्य सिनेमांची कहाणी घेऊन जास्तीचा पैसा टाकणे आणि अत्यंत सुमार दर्जाचं काम करून सुमार प्रेक्षकांना आणखीच सुमार बनवण्याचं महाफालतू काम हे बॉलिवूड आणि खान त्रिकुट सातत्याने करतंय.
पण अक्षय कुमार ज्या प्रकारचे सिनेमे घेतो, त्यात किमान दमदार कथा असते, व्यावहारिक/ तार्किक गोष्टी असतात, आशयप्रधान असतो, बळच हिरोला मोठं करणारा नसतो, कथेत बाकीच्या पात्रांनाही महत्वाचं स्थान असते, अक्षय सोडून बाकीच्याही अनेक गोष्टीत नवे नवे प्रयोग केलेले असतात.
‘खानछाप’ सिनेमांपेक्षा आता प्रेक्षक या सिनेमांकडे वळताना दिसत आहेत, याचं क्रेडिट अक्षय ला द्यावंच लागेल.
देशात राष्ट्रीय तत्वांना वेळोवेळी आव्हान देणाऱ्या असामाजिक तत्वांची वाढ होताना आपण बघतोय, अशा परिस्थितीत अक्षय ने राष्ट्रभक्ती आणि सामाजिक विषयांना महत्व देणं ही गोष्ट वाखण्याजोगी आहे.
अर्थकेंद्री न राहता त्याने स्वतःच केंद्र बदललंय, याबद्दल कौतुक. आता त्या बदललेल्या केंद्राबद्दलच्या समस्या बघुयात.
बऱ्याच मुलाखतीतून अक्षयने हे बिनशर्त मान्य केलय की त्याला चित्रपटात मिळालेली संधी हा नशिबाचा भाग आहे. अभिनय तो अनुभवातूनच शिकलाय. त्याने कसलंही प्रशिक्षण घेतलेलं नाही.
एखाद्या भागात जास्त मेहनत करून तयारीने काम केलं तर तोच भाग बिघडतो आणि याउलट कालसुसंगत ओघाने केलेला अभिनय जास्त चांगला होतो. यामुळे अक्षय कडून जास्त चांगलं काम करून घेण्यात दिग्दर्शकाचं कौशल्य दिसतं.
पण तरीही तो मला आवडतो याच कारण की तो या सगळ्या गोष्टी मान्य करून त्यांच्या चौकटीत राहतो. (याऊलट भाईंचा तोरा सर्वश्रुत आहे) अशाप्रकारे अक्षय कडून अद्वितीय अभिनयाची अपेक्षाच ठेवता येत नाही.
असं समजलं जातं की चित्रपटाची, पात्राची निवड एका नटाच कौशल्य दर्शवते. उदा. सलमान नेहमीच न रडणारे, मजबूत, वचक असलेले, तात्विक उंची असणारे एकाच पठडीतले पात्र निवडतो.
याउलट नवाजउद्दीन कधी अट्टल गुन्हेगार होतो तर कधी गुंडांच्या टोळीचा म्होरक्या, तर कधी CBI चा अधिकारी, तर कधी इमानदार पोलीस अधिकारी तर कधी म्हातारा मांझी.
यातून कळतं की नट आपल्या निवडीतून आपले कम्फर्ट झोन तोडून प्रयोगशील राहत कौशल्य वाढवत असतो.
सलमान एवढं वाईट नसलं तरी अक्षय ही थोड्या अधिक फरकाने तेच करतोय. देशभक्त, आर्मीचा अधिकारी, गुप्त हस्तक, अन्याया विरुद्ध लढणारा लढवय्या, समाजसेवक, सुधारणावादी, भोळा, निरापराध, वगैरे वगैरे सगळं चांगलं चांगलं.
यांमुळे त्याने स्वतःचा एक कम्फर्ट झोन बनवलाय आणि त्यातच राहून थोड्या अधिक फरकाने वेगळं असणारं कथानक घेऊन चित्रपट बनवतोय.
हे सूत्र पैसाही कमावून देतंय आणि वर वेगळे सामाजिक चित्रपट बनवण्याची प्रतिष्ठा बोनस म्हणून मिळतीए. यात मुळात त्याचं क्रेडिट या गोष्टीत आहे की नट म्हणून स्वतःला शेवटच्या मर्यादेपर्यंत वापरून घेण्याची मुभा त्याने दिग्दर्शकाला दिली आहे.
बरं ही समस्या आपल्याकडे बऱ्याच नटांची आहे. अक्षयलाच धारेवर धरण्यासाठी पुढचा मुद्दा जास्त कारणीभूत आहे. “सामाजिक चित्रपट” याची व्याख्याच समजलेली दिसत नाहीए.
म्हणजे समाजातल्या “सामाजिक समस्या” या प्रकारात येणाऱ्या समस्यांवर चित्रपट बनवला की झाला सामाजिक चित्रपट, काही विशिष्ठ पुणेरीछाप प्रेक्षक आणि प्रतिष्ठा.
कुटुंबाच्या विकेंद्रीकरणातून निर्माण झालेला भावनिक दुरावा, स्वतःला शोधण्याच्या प्रक्रियेत येणारे अडथळे, प्रेमात असलेली गुंतागुंत, वैयक्तिक भीती, एकटेपणा, तत्वांच्या अहंकारातुन ताणलेली परिस्थिती, लैंगिकतेचा कल न ओळखता आल्याने होणारी घुसमट इ. समस्यांवर कित्येक चित्रपट बनलेत आणि त्याचा लोकांच्या बोलण्यातून उल्लेख ही येतो.
पण या चित्रपटांचा समावेश “सामाजिक विषयवार भाष्य करणारा चित्रपट” असा कधीच होत नाही.
मुळात प्रत्येकच चित्रपट समाजाच प्रतिबिंब असत. पण फक्त एकाच चौकटीबदद्ध समस्यांशी निगडित समाजाच चित्रण करण्याचा अट्टहास कशाला?
अजूनही बऱ्याच लोकांना वाटत की फँड्री ने अस्पृश्यतेविषयी भाष्य केलं म्हणून तो सिनेमा भारी आहे. फँड्री जर कौशल्यपूर्ण बनवला नसता एक हफ्ता ही चालला नसता.
याउलट अक्षय कुमारच्या ब्रॅंडवर त्याचे चित्रपट चालतात. टॉयलेट एक प्रेम कथेत नवीन कलाकार असते तर? बर काही तर्क असे असतात की “ते काहीतरी करताय ना समाजासाठी?
त्याचा फायदा होतो, नका चिकित्सा करू” तर त्यांना माझा प्रश्न आहे की काय फायदा होतो? सिनेमांचे व्यावहारिक फायदे नसतातच पण असा कुठला भावविश्वाचा कोपरा उजळून निघतो हो?
क्लायमॅक्सला झेंडा फडकवला की 30 सेकंद एड्रेनलिन नसात वाहून शहारे आले असा फायदा सांगायचा असेल तर रोज बॉर्डर चित्रपट बघा. नवीन सिनेमांचा कचरा का वाढवताय?
नंदिता दास चा “फिराक” बघा. तुम्ही कट्टर हिंदुत्ववादी असला तरीही पुढचे कित्येक दिवस झालेल्या हानीचा, वाढलेल्या धार्मिक फुटीचा तुम्ही निषेध करत खिन्न असता.
त्या घटनेत लोकांच्या वैयक्तिक आयुष्यावर आणि परिणामस्वरूप सामाजिक बांधिलकीवर होणाऱ्या परिणामांच चित्रण एवढं सहाजिक प्रकारे दाखवलेलं असत ती ते स्वतःशी जोडून बघता येतं. “ये ऐसा कैसे हो गया? अब हम क्या करेंगे?” सारखे कृत्रिम संवाद नसतात.
यातले पात्र तुमच्या आमच्या सारखे दुट्टपी, स्वार्थी, हळवे असतात. पेटीबंद भावनेत बामधलेले टोकाचे इमानदार समाजसुधारक नसतात.
यामुळे या प्रकारात बनलेल्या चित्रपटांना समजण्यासाठी लागणारी चित्रपट साक्षरता आपल्याकडे नसली तरी दूरगामी परिणाम हवे असतील तर सामाजिक विषय एवढ्या संवेदनशीलतेने हाताळावे लागतात.
प्रसिद्ध उदाहरणं सांगायचे तर “लिपस्टिक अंडर माय बुरखा”, “शुभ मंगल सावधान”, “न्यूटन” या चित्रपटांनी ही तेवढ्याच संवेदनशीलतेने प्रश्न हाताळलेत. यांचा दूरगामी परिणामही असेल, कारण यांच्या आशयात दम आहे.
अक्षयच्या नावाला वापरून काम कमी करणे, कचरा वाढवणे, “सामाजिक” टॅग मिळवुन पैसे कमावणे या प्रकारामुळे चित्रपट सक्षरतेला मोठा अडसर येणाऱ्या काळात निर्माण होणार आहे.
समीक्षकही जेव्हा अशा चित्रपटांना सामाजिक टॅग लावून आधार देतात, कदाचित त्यांनाही समाज मान्यतेची भीती असावी.
पुढचा आक्षेप हा की, अक्षयने अशा चित्रपटांची वारंवारिता एवढीच वाढवली आहे की त्याच्या हेतुवर शंका निर्माण व्हावी. “हागणदारीमुक्त गाव” या योजनेच्या काळातच टॉयलेट सिनेमा आला.
सतत राष्ट्रभक्तीचा टिमका मिरवण्यातुन राजकारणात भाग किंवा पुरस्कार प्राप्तीसाठी प्रयत्न असा हेत्वारोप करणं शक्य आहे.
म्हणून अक्षय आता चांगले चित्रपट करतोय किंवा सामाजिक चित्रपट बघावेत असा तर्क लावून सुज्ञ प्रेक्षकांनी पैसे वाया घालू नयेत. ज्यांना अजूनही त्यात काही मनोरंजनपर वाटत असेल त्यांनी खान त्रिकूटाची जागा अक्षयला द्यायला हरकत नाही.
===
InMarathi.com वर विविध लेखकांनी व्यक्त केलेले विचार ही त्यांची वैयक्तिक मतं असतात. InMarathi.com त्या मतांशी सहमत असेलच असं नाही. आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम Copyright © InMarathi.com | All rights reserved.