' “बचेंगे तो और भी लडेंगे” अशी डरकाळी फोडणाऱ्या दत्ताजी शिंदेंच्या अतुलनीय शौर्याची कहाणी – InMarathi

“बचेंगे तो और भी लडेंगे” अशी डरकाळी फोडणाऱ्या दत्ताजी शिंदेंच्या अतुलनीय शौर्याची कहाणी

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

इसवी सन १७६०! मराठ्यांच्या दिग्विजयी फौजांनी नुकताच अफगाणिस्तानातल्या खैबरखिंडीत राहणाऱ्या कडव्या पठाणांचा समाचार घेतला होता.

लाहोरचा बंदोबस्त केल्यानंतर तर मराठ्यांचा राजा दिल्लीवर राज्य करणार हे जवळजवळ पक्के होते.

आशिया खंडातल्या मुस्लिमांच्या सार्वभौम सत्तेचे केंद्र असणारी दिल्लीची गादी आता मराठ्यांच्या वर्चस्वाखाली येणार हे ओळखून नाजीबखान रोहिल्याने दुराणी बादशहा अहमदशहा अब्दाली सकट इतर सर्व मुस्लिम राजांना इस्लामी सत्तेच्या रक्षणासाठी एकत्र येण्यासाठी खलिते पाठवून विनंत्यांचा रतीब घातला होता.

येत्या काही काळात दिल्लीच्या क्षितिजावर युद्धासाठी सज्ज झालेल्या घोड्यांच्या टापांच्या धुळीचे लोळ पाहायला मिळणार हे आता जवळजवळ पक्के होते.

 

maratha empire inmarathi
change.org

 

याच काळात उत्तरेत ग्वाल्हेर येथे शिंदे तर इंदौर येथे होळकर या मराठ्यांच्या दोन वतनदार सरदारांनी संपूर्ण उत्तर भारताचा प्रदेश आपल्या टाचेखाली ठेवला होता.

दत्ताजी शिंदे हे शिंदे घराण्याचे कर्ते पुरुष राणोजी यांचा दुसरा मुलगा. जयाप्पा शिंद्यांचा सख्खा आणि महादजी शिंदे यांचा सावत्र भाऊ.

१७५५ साली शिंदे घराण्याची सरदारकी जयाप्पाचा पुत्र जनकोजी याच्या हाती गेली, पण जनकोजी लहान असल्याने दत्ताजी त्याच्या वतीने कारभार पाहत होता.

दत्ताजी आणि जनकोजी या काकापुतण्याची जोडी तर कुकडीच्या लढाईमध्ये निजामाच्या विरोधात केलेल्या पराक्रमामुळे आलम हिंदुस्तानात गाजली.

५६ साली दत्ताजीने मारवाडचे संपूर्ण राज्य जिंकले. आणि त्याचा तिसरा हिस्सा मराठी साम्राज्यात दाखल करून घेतला. तब्बल पाच कोट रुपयांची खंडणी मिळवली. १७५८ साली दत्ताजीने स्वतचे लग्न उरकले आणि पुतण्यासह उज्जैन येथे आला.

तिथे मल्हारबाबा होळकरांनी त्याचा भोळा स्वभाव ओळखून त्याला नजीबचे पारिपत्य करण्यापासून परावृत्त केले. तो सल्ला दत्ताजीच्याही गळी उतरला.

पण लहान असून मुत्सद्दी असलेल्या जनकोजीने होळकरांचा हा सल्ला मानला नाही. दत्ताजीचा नाईलाज झाला.

 

malhar rao holkar inmarathi

हे ही वाचा – रामायण, महाभारतापुर्वी इतिहासातील हे पहिलं महायुद्ध भारतभूमीवर लढलं गेलं होतं!

शेवटी नजीबचे पारिपत्य करण्याच्या आणि लाहोर सोडवण्याच्या पेशव्यांनी सोपविलेल्या कामगिरी पार पडण्यासाठी दोघे काका-पुतणे उज्जैनहून निघून दिल्लीस आले.

‘दत्ताजी मनावर घेतलेले काम पाडील’ असा पेशव्यांचा आढळ विश्वास होता. १७५८ साली दत्ताजीने लाहोर घेतले आणि नाजीबाचा बिमोड करण्यासाठी यमुनाकाठी रामघाट येथे दाखल झाला.

यमुना नदीचे पात्र म्हणजे मराठ्यांच्या सैन्यासाठी जवळजवळ प्रतीसमुद्र. नजीबाने ही परिस्थिती ओळखली आणि कावा केला. पात्र ओलांडून येण्यासाठी दत्ताजीला नावांचा पूल बांधून देण्याचे वचन दिले आणि घोळत घेतले.

जनकोजीच्या मर्जीच्या बाहेर जात दत्ताजीने नजीबच्या वाचनावर विश्वास ठेवला. पूल बांधून देण्याच्या थापेवर नजीबाने दत्ताजीले सहा महिने नुसते झुलवत ठेवले.

एप्रिल ते ऑक्टोबर हा काळ मराठा सैन्याने नावांच्या पुलाची वात पाहण्यात घालवला.

 

map_of_buradi_inmarathi

 

तोवर नजीबाने दत्ताजीच्या विरोधात सर्व बाजूंनी कडेकोट मोर्चेबांधणी केली. आतून सर्व मुस्लिम राजाशी संधान बांधले. १७५९ च्या नोव्हेंबरात नजीबच्या सांगण्यावरून अब्दाली मागच्या बाजूने दत्ताजीवर चाल करून आला.

दत्ताजी पुरता कात्रीत सापडला. समोर नावांचा पूल तर नजीबच्या ताब्यात आणि मागून अब्दाली! अशा बिकट प्रसंगीही दत्ताजीने नजीबावर थेट चाल करून त्याला शुक्रतालहून हुसकावून लावत  गंगेच्या पलीकडे रेटले.

ही लढाई जिंकली परंतु त्यात जनकोजी आणि दत्ताजी दोघेही जखमी झाले. यावेळी नाजीबाने दत्ताजीशी तात्पुरता तह केला.

डिसेंबरात अब्दालीने कुरुक्षेत्रात ठाण मांडले. सुजानेही एक कोटी खंडणीची थाप मारून दत्ताजीला अब्दाली येईपर्यंत कुरुक्षेत्रास अडकवून ठेवले.

आता तर रोहिले पुढे आणि अहमदशहा मागे, दोघांच्या मध्ये दत्ताजी! अशा पक्क्या कात्रीत दत्ताजी सापडला. माघार घेणे तर त्या बाजीन्द्या वीराच्या मनातही नव्हते.

शेवटी त्याने कबिल्यासह जन्कोजीला दिल्लीला पाठवले आणि स्वतः कुंजपुरा येथे अहमदशहा अब्दालीची गाठ घेतली आणि त्याच दिवशी त्याचा पराभव केला.

हा दिवस म्हणजे २४ डिसेंबर १७५९.

हार पत्करून लागलीस अब्दाली यमुनापार उतरला आणि नजीब, सुजा व मोहम्मद बंगश यांना जाऊन मिळाला. सर्व मुसलमान एक झाले. दत्ताजी एकटा पडला.

पेशव्यांकडून मदत मिळाली नाही तरी शेवटच्या श्वासापर्यंत लढायचे दत्ताजीने ठरवले. मराठ्यांचे सैन्य घेऊन तो थेट दिल्लीत जनकोजीला जाऊन मिळाला.

जनकोजी आणि दत्ताजी आता समोरासमोरचे युद्ध टाळता येणार नाही हे पुरते ओळखून होते. युद्धाची आखणी करायला सुरुवात केली. १७६० सालच्या मकरसंक्रांतीचा दिवस.

१० जानेवारी. सकाळचे स्नान आटोपून मराठी फौज तयारीनिशी उभी होती. सेनापती युद्धाचा मुकाबला निश्चीत करण्यासाठी यमुनेचा ठाव घेऊ लागले पण तो काही लागेना.

 

dattaji shinde inmarathi

 

हे चालू असतानाच शत्रूचे सैन्य नदी उतरून अलीकडे येऊन थेट हल्ले करू लागले. हे पाहून दत्ताजी चिडला. त्याच्या डोळ्यात युद्धाचा अंगार फुलू लागला. जणूकाही तो याच क्षणाची वात पाहत होतं.

क्षणाचाही विलंब न करता दत्ताजीने आपल्या सैन्याच्या तीन तुकड्या केल्या. आणि एका तुकडीच्या सोबत त्याने आपल्या सजवलेल्या लाल्मानी घोड्यावर मजबूत मंद टाकत रणांगण जवळ केले.

मागचे मराठी सैन्यही त्वेषाने रणांगणाच्या दिशेने झेप घेऊ लागले. नजीब आणि गीलच्यांच्या नरडीचा घोट घेण्यासाठी मराठी सैन्य आसुसले होते.

हर हर महादेव ची गगनभेदी गर्जना करत मराठी सैन्य शत्रूला भिडले. रणांगणावर तलवारीच्या खणाखनीने, घोड्यांच्या खिकाळ्यानी आणि वीरांच्या घोषणांनी नुसता हाहाकार माजवला.

एका प्रहारापुर्वी निपचित पडलेल्या घाटाचे रूप पार पालटून गेले. मराठ्यांकडे बंदुका नव्हत्याच. त्यात अब्दालीचे सैन्य म्हणजे ताज्या दमाचे अफगाण पठाण.

त्यांच्या बंदुकीच्या माऱ्यापुढे तलवारीने लढणारे मराठे किती काल तग धरणार? एक एक मराठा सैनिक बंदुकीच्या गोळ्यांनी जायबंदी होऊ लागला. मराठ्यांच्या प्रेतांचा नुसता खच घाटात पसरलेला दिसू लागला.

पण दत्ताजीला तर फक्त समोर येणारा अफगाण आणि त्याची मुंडी दिसत होती. त्याची तलवार विजेसारखी चालत होती.

ही पड कमी होती की काय म्हणून दोन धक्कादायक खबरी घेऊन शिपाई दत्ताजींकडे धावत आला. मालोजी फौजेसह मराठ्यांच्या मुडद्यांच्या राशीत दिसेनासा झाला होता आणि गनिमांनी एकाच वेळी  तिन्ही बाजूंनी हल्ला केला होता.

रणमदाने बेहोष झालेल्या दत्ताजीने पुन्हा लालमणीला टाच दिली. हातात तळपती तलवार, पाठीवर ढाल आणि शिरावर शिरस्त्राण घेतलेल्या दत्ताजीचा रणमर्द अवतार पाहून मराठी सैन्यात पुन्हा नवे स्फुरण चढले.

तलवारीच्या प्रत्येक घावासरशी यवनाचे मुंडके धडावेगळे होत होते. शीर नसलेल्या धडातून रक्ताच्या धारा बरसत होत्या. दत्ताजीची तलवार गनिमांना मराठ्यांच्या शौर्याची ओळख पटवून देत होती.

 

dattaji shinde 2 inmarathi

हे ही वाचा – या योध्याने तीन महिने चिवट झुंज दिली आणि वसईचं बंदर मराठ्यांच्या ताब्यात आलं!

बऱ्याच वेळापासून जरीपटक्याजवळ निकराने गिलच्याना पाणी पाजत असलेल्या जनकोजीच्या दंडावर गोळी लागली आणि तो घोड्यावरून खाली कोसळला. ही बातमी दत्ताजीला पोचवण्यात आली.

हे ऐकून सुडाने लाल झालेला दत्ताजी दिसेल त्या आफ्गानाच्या बरगडीत तलवार खुपसू लागला. जय भवानी जय जगदंब च्या नावाचा जयघोष करत रणांगणात त्याने मृत्यूचे तांडव माजवले.

इतक्यात हाकेच्या अंतरावर लढत असलेला नजीब त्याला दिसला. कानाच्या पाळ्या तप्त झाल्या. छातीवरची बाराबंदी ताठ झाली. बाहू स्फुरण पावू लागले. वाटेत दिसेल त्या अफगानाचे शीर धडावेगळे करत दत्ताजी नाजीबाकडे झेपावला.

इतक्यात कुठूनतरी जम्बुरक्याचा गोळा धडधडत येऊन दत्ताजीच्या बरगडीला छेदत लालमनीच्या पाठीवर पडला तसा दत्ताजी घोड्यावरून जमिनीवर कोसळला.

हे दृश्य पाहताच नजीब आणि कुतुबशहा सैतानासारखे दत्ताजीकडे झेपावले. दत्ताजी तलवार उचलण्यासाठी धडपडत असल्याचे पाहून कुतुबशहाने त्याचे डोके हातात घेतले. डोळ्यासमोर भला नाचवत म्हणाला,

“क्यू पाटील, और लडोगे?”

हे ऐकताच उरलेली ताकद ऐकवतात रणशूर दत्ताजीने वाघासारखी डरकाळी फोडली,

“क्यो नही, बचेंगे तो और भी लडेंगे!”

दक्षिणेत निजामाला आणि उत्तरेत अब्दालीला पाणी पाजणार्या मराठा वीराची ती डरकाळी कानावर पडताच कुतुबशहा दत्ताजीच्या जखमी शरीरावर मांड ठोकून बसला आणि त्याच्या छातीची नुसती चाळण करू लागला.

अंगात भूत शिरल्याप्रमाणे नजीबाने हातातला जमदाडा दत्ताजीच्या मानेवर घातला आणि त्याचे शीर धडावेगळे केले.

 

dattaji dialogue inmarathi

 

दत्ताजीचा देह हळूहळू रक्ताने माखत थंड पडू लागला. एका गिलच्याच्या हातातला भाला हिसकावून घेत नजीबाने त्यावर दत्ताजीचे शीर खोवले आणि बेभान होऊन मैदानात नाचवू लागला.

दत्ताजीची अवस्था पाहणाऱ्या मराठा सैन्याला अभय द्यायचे सोडून त्यांच्या कत्तलींचा आदेश देऊन तसाच नाचत अब्दालीकडे निघून गेला.

दत्ताजी पडले! मराठ्यांच्या त्रिखंडात गाजलेल्या दिग्विजयी सैन्याचा हारीचा मोहरा निखळला. बुराडी घाटातल्या धरणीला काळजाचा ठोका चुकल्यासारखे वाटू लागले.

यमुनेच्या प्रवाहाला क्षणभर थांबल्यासारखे वाटले. हे विद्रूप दृश्य पाहत असलेले अफगाणी देखील स्तब्ध झाले.

शेवटच्या श्वासापर्यंत लढण्याचा निश्चय तिळमात्र ढळू न देता बुराडी घाटाला दत्ताजीने रक्ताचा अभिषेक घातला. तो दिवस म्हणजे १० जानेवारी १७६०.

पानिपतच्या युद्धात मराठे हरले हा इतिहास आहे. पण ताज्या दमाच्या अफगाणी फौजांपुढे परमुलखात जाऊन मराठी फौजांनी अतुलनीय शोर्य गाजवले आणि मराठी माणसाच्या लढवय्या बाण्याचे दर्शन शत्रूला घडवले हे नाकारून चालणार नाही.

म्हणूनच कित्येक इतिहासकारांनी पानिपतचे वर्णन “पराजयातला असामान्य विजय” असे केले आहे.

काळ मागे पडत राहील, पण इतिहासात पाहिलं तर मराठी माणसाने प्रतिकूल परिस्थितीवर मात करत दाखवलेलं असामान्य धैर्य नव्या पिढीला कायम प्रेरणा देत राहील…

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?