Site icon InMarathi

ज्यू कत्तलीचा बदला: इस्त्राईलच्या गुप्तचरांचा रोमांचक इतिहास

israel inmarathi

wallpaper cave

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

रात्रीचे 8 वाजले होते. नेहमीप्रमाणे रिकार्डो क्लेमेन्ट आपला स्टॉप आला म्हणून बसमधून उतरला. दिवसभर काम करून दमून भागून तो आता घरी चालला होता.

ह्या अंधाऱ्या आणि निर्मनुष्य रस्त्यावरून रोज तो चालत घरी जाई. रोज 7.40 ला पोचणारी त्याच्या कंपनीची बस आज उशिरा त्याच्या स्टॉपवर पोचली होती. गारठलेला वारा अंगावर घेत खिशात हात घालून निवांतपणे चालता चालता अचानक रिकार्डोला कोणाची तरी चाहूल लागली.

अंधारात कोणीतरी चोर पावलांनी आपला पाठलाग करतंय हे त्याला जाणवलं आणि काही कळायच्या आत त्याच्या चेहऱ्यावर काळा कपडा टाकला गेला.

३-४ जणांनी त्याच्या अंगावर झेप घेतली आणि त्याला जबरदस्ती पकडून बाजूला उभ्या असलेल्या कारमध्ये कोंबलं. रिकार्डोने सुटण्यासाठी जिवाच्या आकांताने बरीच धडपड केली पण व्यर्थ.

चुपचाप पडून राहा नाहीतर तुझा भेजा उडवीन!

: कारमध्ये घातल्यावर रिकार्डोचे हात पाय बांधता बांधता त्यांच्यापैकी एकजण गुरगुरला.

त्याची काही गरज नाही. माझं भवितव्य मी स्वीकारलंय

: रिकार्डो खिन्न स्वरात म्हणाला.

ते लोक कोण होते ते त्याला कळलं होतं. आणि येणारं त्याचं भवितव्य देखील.

 

रिकार्डो क्लेमेंट

===

लोथार हरमन ज्यू होता. १९३८ साली नाझी हुकुमतीकडून ज्यूंचा होणारा जाच आणि छळाला घाबरून लोथार सहकुटुंब अर्जेंटिनामध्ये शरणार्थी बनून आला.

राजधानी ब्युनोस एरिजमध्ये छोटा मोठा कामधंदा करत तिथेच स्थायिक झाला. त्याची मुलगी सिल्व्हिया कोणत्यातरी क्लाऊज नावाच्या तरुणासोबत गुंतली आहे हे पाहून त्याने क्लाऊजला भेटायला बोलावलं. हे साल होतं 1956.

क्लाऊज सोबत बराच वेळ लोथारच्या गप्पा गोष्टी झाल्या. बोलत असताना लोथारला क्लाऊज कुठेतरी खटकायला लागला. क्लाऊजच्या बोलण्यात उडवाउडवीची उत्तरे येऊ लागली.

स्वतःच्या परिवाराबद्दल तो स्पष्ट बोलायला कचरू लागला. हे सगळं जाणवून देखील उघड काही शंका नं मांडता लोथार गप्प राहिला.

ही भेट घडून आल्यानंतर क्लाऊज त्याच्या परिवारासकट दुसरीकडे राहायला निघून गेला. काही दिवसात लोथारच्या नजरेला वर्तमानपत्रातली एक बातमी पडली.

जर्मनीतल्या फ्रँकफर्ट शहरात दुसऱ्या महायुद्धात ज्यूंवर केल्या गेल्या अत्याचारासाठी “युद्ध गुन्हेगारांवर” खटले भरले जात होते. त्यातल्या एका युद्ध गुन्हेगाराचं नाव वाचून लोथारची ट्यूब पेटली…!

 

लोथार हरमन

 

लोथारने अजिबात वेळ नं दवडता फ्रँकफर्टच्या न्यायिक अधिकाऱ्यांना पत्र पाठवलं. अधिकाऱ्यांनी लगोलग ती खबर एटोर्नी जनरल फ्रित्ज ब्युएरना दिली.

ब्युएर स्वतः नाझी काँसंट्रेशन कॅम्पमध्ये यातना भोगणारे इसम होते. नाझी हुकुमतीच्या काळात ते कसेबसे स्वीडनला पळाले होते.

ब्युएरनी आतली खबर तत्काळ इजराईलच्या परराष्ट्र मंत्रालयाला पाठवली आणि खबर मिळताच इजराईलचे परराष्ट्र मंत्री, वॉल्टर आयतान ह्यांनी आयसर हॅरेल ना तलब केलं.

आयसर हॅरेल एका गुप्तहेर संघटनेचे डायरेक्टर होते…ज्या गुप्त संघटनेचे ते डायरेक्टर होते, तिचं नाव होतं – “मोसाद”

 

archives.gov.il

 

तेल अवीव, १९५८ – हालचाली जोरात सुरु झाल्या.

इजराईलचे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष यिझाक बेंझवीच्या सरकारने आयसर हॅरेल सोबत चर्चा केली. काय करावं? माणूस महत्वाचा आहे. त्याला संपवणेच न्यायसंगत आहे.

असंख्य ज्यूंचा संहार करणाऱ्याला शिक्षा तर झालीच पाहिजे. पण कशी? एक तर दक्षिण अमेरिकेत नाझी समर्थक मोठ्या प्रमाणात स्थानांतरित झालेले.

देश आपला नाही, एका माणसाला हस्तांतरीत करण्याला अर्जेंटिना सरकार सहमत होईल? शिवाय हवा असलेला आरोपी सावध होऊन निसटला तर?!

ह्या सगळ्या गोष्टींवर आयसर हॅरेल आणि इजराईल सरकार ह्यांच्यात बराच खल झाला आणि शेवटी एका गोष्टीवर एकमत झालं.

त्या माणसाला अपहृत करून इजराईलमध्ये आणून रीतसर खटला चालवायचा!

क्रमशः

भाग दुसरा: ज्यू कत्तलीचा बदला: इजराईलच्या गुप्तचरांचा रोमांचक इतिहास – भाग २

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

 

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version