भीमा कोरेगाव आणि “जातीय इतिहास” : ऐशी की तैशी सत्याची!- संजय सोनवणी
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
===
लेखक – संजय सोनवणी
===
कोरेगांव भीमा प्रकरणाने आम्हाला इतिहासावर नव्याने चिंतन करण्याची गरज निर्माण झाली आहे. राष्ट्रीय, धार्मिक आणि जातीय अस्मितेसाठी काही मिथके बनवावी लागतात हे सत्य आहे. किंबहुना लोकांवर सत्यापेक्षा मिथकांचाच प्रभाव अधिक असतो हेही खरे आहे. युरोपियनांनी आपला इतिहास मागे नेण्यासाठी आर्य नांवाचे मिथक निर्माण केले व एक अनर्थकारी वांशिक द्वेषाची परंपरा निर्माण केली हे आपण मागील लेखात पाहिले. भारतीय जातीसंस्थेच्या उगमाचा इतिहास हेही आता एक मिथकच सिद्ध होत आहे.
जातीसंस्था हे वास्तव असले तरी त्याबाबतचे आपले आकलन मिथकात्मकच आहे, सत्यात्मक नाही. आणि त्यातुन भले भले विद्वानही सुटले नाहीत.
भारत हे “राष्ट्र मिथकांचे” असे म्हणावे लागेल एवढ्या मिथकांचा सागर येथे हेलकावतो आहे आणि त्यात इतिहास हरवून बसला आहे. बरे, इतिहास म्हणून जोही काही आपल्याकडे आहे त्यालाही अनेक पुर्वग्रहांचे कंगोरे असल्याने इतिहासही मिथकांच्या धुक्यात हरवून जातो असे आपल्याला दिसते.
याचा अर्थ इतिहास नसतो वा नसावा असे नसून आपल्याला इतिहासाचे तत्वज्ञानच नसल्याने ही मिथकीय दु:स्थिती निर्माण होते हे आपल्या लक्षात येईल. त्यातुन निर्माण होणारे सामाजिक संघर्ष, परस्परांशी युद्धायमान राहण्यासाठी त्या मिथकांना पुन्हा पुन्हा धार लावली जाते.
सत्यान्वेशीपणाचा अभावच असल्याने इतिहासाची ऐशी-तैशी होणे स्वाभाविक आहे.
इतिहास हा मानवी मनावर प्रभाव गाजवणारा फार महत्त्वाचा घटक असतो. इतिहास हा कसा सांगितला गेला आहे, यावर समाजाचे त्याबाबतचे आकलन अवलंबून असले तरी सामान्य माणसांवर प्रत्यक्ष घडलेल्या इतिहासापेक्षा वदंतांचा अधिक प्रभाव असतो. इतिहास हा जेत्यांचा वा समाजवर्चस्ववादी घटकांच्या वा वर्चस्ववादी होवू पाहणाऱ्यांच्या मानसिक तुष्टीकरणासाठी लिहिला जात असल्याने तो तटस्थ व निरपेक्ष असतोच असे नाही. दुसरे असे की,
इतिहासकार हा सुद्धा एक मनुष्यच असल्याने त्याच्या लेखनावर त्याच्या समजुती, पूर्वग्रह आणि त्यानुरुप असलेल्या त्याच्या व्यक्तिगत आकलनाचा प्रभाव पडत असतो.
अनेकदा एकाच पुराव्याचे आकलन/विश्लेषण इतिहासकारपरत्वे बदलत असते. या नियमाला अपवाद नसतात असे नाही. परंतु मग त्यांनाही त्यांच्या नव्या संशोधनामुळे सामाजिक पूर्वग्रहांना, रुढ समजुतींना धक्का बसत असल्याने लोकांच्या रोषाला तोंड द्यावे लागते आणि त्यातून जी वादळे निर्माण होतात त्यामुळे पूर्वग्रहविरहित, संपूर्ण ज्ञान-चिकित्सात्मक इतिहाससंशोधनास खीळ बसते. “आमचा किंवा आम्ही सांगू तोच इतिहास खरा…बाकी सारी बकवास” हा आपल्या समाजातील काही घटकांचा अहंभाव तर पदोपदी झळकतांना दिसतो.
खरे तर सातत्याने इतिहास संशोधने यासाठीच व्हायला हवीत की कोणावरही अकारण अन्याय होऊ नये, तसेच कोणाचे अकारण उदात्तीकरण झाले असेल तर तेही लोकांसमोर यावे. जर असलीच तर इतिहास-लेखनाची वर्चस्ववादी भूमिका हटवत पुढील मांडणी करावी पण आपल्याकडे कोणाचे उदात्तीकरण करायचे, कोणाला बदनाम करून ठेवायचे आणि कोणाला इतिहासाच्या पानांवरुइन गडप करून टाकायचे ही एका अर्थाने तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी म्हणत त्याप्रमाणे ‘इतिहासविघातक प्रवृत्ती’ फोफावली आहे.
त्यामुळे अनेक जाती व धर्मही आपापला इतिहास स्वतंत्रपणे लिहिण्याच्या उद्योगाला कधीच लागले आहेत आणि त्यातून एक प्रकारचा नवा अभिनिवेशी आणि प्रती-मिथकीय इतिहास लिहिला जातो आहे.
भारतात इतिहासाबाबतची समजुतींतील सर्वात मोठे मिथके आपण येथे थोडक्यात पाहू.
पहिले मिथक हे आहे की जन्माधारित जातिव्यवस्था ही गेली किमान पाच हजार वर्षांपासून (किंवा हजारो वर्षांपासुन) आहे आणि ती सुरुवातीपासुन अन्याय्य आणि विषमता आधारित होती.
जातीसंस्था जशी होती तशीच हजारो वर्ष राहिली या मताला कसलाही आधार मात्र नाही. या मिथकाला जोडुनच येणारे प्रिय मिथक हे की ही व्यवस्था आक्रमक आर्यांनी अथवा ब्राह्मणांनी आपल्या स्वार्थासाठी लादली. अर्थात येथे एकतर आर्य आक्रमण सिद्धांताचे तरी मिथक वापरण्यात येते किंवा ऋग्वेदातील पुरुषसुक्ताचे मिथक तरी वापरले जाते.
अर्थात ही मिथके ब्रिटिश काळात जन्माला आली हे मात्र सहसा लक्षात घेतले जात नाही. मनुस्मृतीचा हिंदु कायद्यांशी संबंध जोडला गेला तो १७७२ साली ब्रिटिशांमुळेच. तत्पुर्वी वर्णव्यवस्था व व्यवसायनिष्ठ जातव्यवस्था या दोन वेगळ्या बाबी आहेत याचे चांगलेच भान होते. प्रत्येक जातीचे सामाजिक कायदे स्वतंत्र होते आणि त्यावर वैदिक सोडले तर मनुस्मृतीचा प्रभाव नव्हता. मनुस्मृती (आणि अन्य वैदिक स्मृत्या) यांचा संबंध फक्त देशतील वैदिक समाजघटकांशी येई.
परंतू ब्रिटिशांनी हा घोळ घालत जे भारतीय धर्म-संस्कृतीचे त्यांच्या दृष्टीकोनातुन आकलन केले त्याचा प्रभाव तत्कलीन एतद्देशिय नवशिक्षितांवर एवढा पडला की पाहत पाहता नव्या मिथकांचा डोंगर निर्माण झाला. त्यात उपलब्ध सामाजिक व आर्थिक इतिहासाकडे सपशेल दुर्लक्ष केले गेले. अर्थात हे सांगणेसुद्धा दोन्ही गटांना दुखावणारेच असते.
खरे तर जातीबदल दहाव्या शतकापर्यंत मुक्त तर नंतरही, अगदी एकोणिसाव्या शतकापर्यंत तरी, तुरळक प्रमाणात का होईना होत होता याचीही प्रमाणे आहेत. मग जातीव्यवस्था बंदिस्त होती हे मिथक कोठून आले? अस्पृश्यतेबाबतही असेच आहे. अस्पृश्यता वैदिक साहित्यात दिसते ती फक्त दोन जातींबद्दल (श्वपच व चांडाळ) व त्या जातीही नष्ट होऊन किमान दोनेक हजार वर्ष झालीत.
मध्ययुगात ज्या जाती अस्पृष्य मानल्या जात होत्या त्यांची नांवे कोठेही आणि कोणत्याही , अगदी मध्ययुगीन वैदिक स्मृतींतही येत नाही. शिवाय इतिहास पहावा तर त्या अस्पृश्यतेचे मानदंडही गोंधळात टाकनारे आहेत. उदा. महार हे किल्लेदार, पाटील व वतनदारही होते. मातंग, महार, बेरड या अस्पृश्य मानल्या गेलेल्या जातींची छोटी का होईना राज्येही होती याचेही पुरावे आहेत. महर्षि वि. रा. शिंदेंनीही यावर प्रकाश टाकला होता. एका प्रांतात जी जात अस्पृश्य आहे तीच जात दुस-या प्रांतात स्पृश्य आहे हाही विचित्र प्रकार दिसतो. धोबी जात हे याचे एक उदाहरण आहे.
“असे का?” याचे समाधानकारक उत्तर नाही. ही सारी प्रत्यक्ष उदाहरणे घेतली तर एक ग्रंथ होईल. ही उदाहरणे इतिहासकारांना माहित नाहीत असेही नाही. पण असे असुनही जातीसंस्थेची निर्मिती व वर्तमानातील जातीव्यवस्था, अस्पृश्यता यांच्य मुळांबाबत प्रचंड संभ्रम आहे.
हा संभ्रम निर्माण केला गेलेला आहे.
म्हणजे ती सामाजिक वास्तवे असुनही त्याची मुळे नेमके काय आहेत याचे वास्तवदर्शी आकलन अस्तित्वात नसणे ही मोठी समस्या आहे. आणि गंमत म्हणजे हा संभ्रम सर्वांना हवाच आहे. नवीन प्रकाश कोणत्याही गटाला सहन होत नाही हे माझे व्यक्तीगत निरिक्षण आहे. कारण या भ्रमांत अनेकांचे स्वार्थ लपलेले आहेत.
कोरेगांव भीमा युद्धात भाग घेतलेल्या ब्रिटिश सैन्यात किमान ४०% सैनिक महार होते हे वास्तव आहेच. ब्रिटिश सैन्यात भाग घेऊन एतद्देशियांशी लढणारे ब्राह्मणांसहित असंख्य जातीचे “देशद्रोही” म्हणता येतील असे सैनिक होतेच. कोरेगांव भिमा येथील लढाई अस्पृश्यांचा तथाकथित सवर्ण पेशव्याविरुद्धचा एल्गार होता असे मानणे काहींना सुखावणारे असले तरी ते वास्तव नाही, तसेच त्यांना “देशद्रोही” म्हणणारे जे भगवे आहेत त्यांच्या पुर्वजांचा इतिहासही मग काही वेगळा नाही.
तोही मग देशद्रोहाने ओतप्रोतच भरलेला आहे. पण मुळात या युद्धाच हेतू जातीअंत नव्हता, या युद्धात विजयही मिळाला नाही, या युद्धाने जातीयता अथवा अस्पृश्यतेच्या प्रथेवर कसलाही परिणाम झाला नाही. उलट ब्रिटिशांनी नंतर अस्पृश्यांना सैन्यात घेणेच बंद करुन टाकले…!
–
हे ही वाचा – कोरेगाव भीमा लढाई – इंग्रजांचा जातिवाद आणि डॉ बाबासाहेब आंबेडकर…
–
त्याचे कारण महर्षि वि. रा. शिंदे सांगतात ते असे-
“…पुढे जसजसे इंग्रजांचे बस्तान येथे बसत चालले तसतसे लष्करात एतद्देशीय लोकांची भरती करण्याचे बादशाही धोरण बदलत चालले आणि तशी लष्करातून ह्या अस्पृश्यांना हळूहळू बेमालूम बंदी होऊ लागली. मग इंग्रजांना येथील जातीचा लष्करी दृष्टीने अस्सल अथवा कमअस्सल हा भेदभाव सुचू लागला आणि हिंदी लष्कराचे ‘अस्सलीकरण’ सुरू झाले. सदर ग्रंथकाराने ह्या निवडानिवडीला आपल्या नवव्या प्रकरणात Brahmanization of the Army – असे न समजता म्हटले आहे.
–
सन १८५७ सालाच्या शिपायांच्या बंडापर्यंत बंगाली पलटणीत एकजात लखनौकडील रजपूत आणि पुरभय्ये ब्राह्मण शिपायांचीच भरती होत असे. ह्या मोठया बंडात ह्या दोन जातींनी पुढाकार घेतला म्हणून पुढे ह्यांची भरती बंद झाली. ह्यापुढे हिंदी लष्करासाठी नव्या दृष्टीने निवड होऊ लागली. जातिवंत इभ्रतदार, वतनदार जातींतून ही भरती व्हावी असे वळण पडत चालले.” (संदर्भ-समग्र साहित्य- विठ्ठल रामजी शिंदे)
याचा अर्थ एवढाच की कोरेगांव भीमाचे युद्ध आणि जातीयता/अस्पृश्यता याचा संबंध नाही.
याचा अर्थ असा नाही की अस्पृश्यता अथवा त्यांच्यावर अन्याय नव्हतेच. किंबहुना अस्पृश्यतेच्या जन्माचा तथ्यात्मक व पुर्वग्रहरहित इतिहास अजून लिहिलाच जायचा आहे. जो जाती व अस्पृश्यतेचा इतिहास उपलब्ध आहे तो मिथकांचा इतिहास आहे. त्यात वास्तव अभावानेच व एखाददुसऱ्या मुद्द्यापुरतेच आढळेल.
आजचे सामाजिक व राजकीय जीवन जातीसंस्थेच्या भ्रामक समजुती अथवा इतिहासाने झाकोळून गेले आहे. आणि त्याला महामानव मानले जाणारे काही संशोधकही अपवाद नाहीत असे आपल्यास दिसुन येईल. वैदिक मनुस्मृती हिंदुंवर लागु होती म्हणावे तर मध्ययुगातच अहिल्याबाई, ताराराणी अशा विधवा महिला सत्ताधारी तर होतातच पण महादजी शिंदेंच्या विधवांच्या रुपाने वारसा हक्काची युद्धेही लढतांना दिसतात आणि काही केल्या त्यांचे वर्तन “स्मृती”मान्य नाही.
मुळात मनुस्मृती ही कोणासाठी आहे हे मनुस्मृतीच कंठशोष करुन सांगत असतांनाही जातीव्यवस्था व त्यांच्या अवनतीला मनुस्मृतीलाच जबाबदार धरत मनुस्मृती हेच एक मिथक बनवले आहे. तिला दरवर्षी जाळण्याचे कर्मकांड नियमित पार पाडले जात आहे. वैदिक आणि हिंदू या दोन स्वतंत्र धारा आहेत आहेत याचेच आकलन नसल्याने या ज्या विसंगती दिसतात त्यांचे निराकरण होत नाही. पण हे वास्तव मानणेही दोन्ही घटकांना एकतर अडचणीचे तरी वाटते किंवा समजुतींबाहेर येण्याचा त्यांचा प्रयत्न नसतो.
म्हणजे जातीसंस्था नको, अस्पृश्यता नको म्हणणारेही या मिथकांनी एवढे घट्ट लपेटले गेले आहेत की आता ते गुदमरत असले तरी त्यांना मोकळा श्वास घ्यायची इच्छा होत नाही.
इतिहासकार हे पक्षपाती राहिले आहेत हे वास्तव आहेच. त्यांनी सर्व समाजघटकांना धार्मिक विभाजित दृष्टीनेच पाहिले. त्याला इतिहास लेखन म्हणता येणार नाही. स्वधर्म अथवा स्वजातीचे प्रेम स्वाभाविक असले तरी तर्कनिष्ठतेला घटस्फोट द्यायची गरज नव्हती. आजचे असंख्य सामाजिक समस्यांचे मुळ कारण इतिहासकारांनी घेतलेल्या अन्याय्य दृष्टीकोनात आहे. त्यांची री अन्य जातींनी मग ओढत नवा खोटा इतिहास रचायचे ठरवले असेल तर मग काय करणार हा खरा प्रश्न आहे.
पण समजा कोणी जातीसंस्थेची तथ्यात्मक (१००% सत्यात्मक इतिहास कशाचाही सापडू शकत नाही हे मान्य करुन) मांडणी केली तर त्याला ब्राह्मणांचा पक्षपाती किंवा ब्राह्मण द्वेष्टा ठरवण्याची नवपरंपरा आहेच. पण हा संघर्ष जातीय कमी आणि धार्मिक अधिक आहे या वास्तवाचे काय करायचे हा प्रश्न आहेच! याचे निराकरण होत नाही तोवर ही समस्या संपणार नाही हे उघड आहेच. त्यामुळे इतिहास हवा आहे पण तो आमच्या भावनांचे तुष्टीकरण करणारा इतिहास!
आमचे नागडेपण दाखवत असलेल्या विद्रुपतेला सौंदर्यात बदलवण्याची प्रेरणा देणारा इतिहास नकोच आहे शिवाय आमच्या अवनतीला कोणी एक दुसराच घटक जबाबदार आहे हे सांगण्यात आम्हाला आनंद होतो. ज्या घटकाला अवनतीचे कारण मानले जाते त्याच्याही अहंभावाची तुष्टी होत असल्याने तोही या समजाचे नीटशा शक्तीने निराकरण करत नाही.
खरे तर अभिमानास्पद इतिहास नाही अशी भारतात एकही जात/जमात नाही. काहीही वाईट केले नाही असाही एकही समाज नाही. सर्व जाती/जमातींच्या विविध काळातील भल्या-बुऱ्याचा इतिहास मिळून आपल्या राष्ट्राचा इतिहास बनतो.
आपल्या इतिहासकारांनी त्याचे भान ठेवले नाही. उलट इतिहासकारांनीच इतिहास-विद्रुपतेचा इतिहास घडवला. त्यातुनच जातीबाबतची समस्या असो की धर्माबाबतची…आजतागायत निराकरण झालेले नाही. कोरेगांव भीमा या आपल्या “ऐतिहासिक” अपयशाचे एक ज्वलंत उदाहरण आहे. आता तरी आम्हाला इतिहासाचे नवे तथ्यात्मक आकलन करुन घेत नवी सामाजिक फेरमांडणी करावी लागेल. थोडक्यात मिथकांना तिलांजली द्यावी लागेल!
===
हे ही वाचा – कोरेगाव भीमा ग्राऊंड रिपोर्ट : पडद्यामागचे सूत्रधार आणि घटनाक्रम (भाग १)
—
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
–
===
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
–
शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.