आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
===
सरत्या वर्षातला शेवटचा आठवडा भारतासाठी वेदनादायक होता असे म्हटल्यास वावगे ठरू नये. या एका आठवड्यात “पापस्थान” (पाकिस्तान!) कडून केलेले शस्त्रसंधी उल्लंघन आणि अतिरेकी हल्ला यांत आपल्या देशाचे नऊ जवान धारातीर्थी पडले. त्यातही शस्त्रसंधीच्या उल्लंघनामागे विशेष कारण होते; ते म्हणजे याच आठवड्यात कुलभूषण जाधव यांच्या कुटुंबाची पाकिस्तान भेट. जणूकाही त्यांचे स्वागत (?) करण्यासाठीच पाकिस्तानकडून हे नीच कृत्य केले गेले. या गोळीबारात महाराष्ट्राचे सुपुत्र मेजर प्रफुल्ल मोहोरकर यांच्यासह अन्य तीन जवानांनी हौतात्म्य पत्करले.
खरंतर कुलभूषण यांच्या प्रकरणात पाकिस्तानने आजवर यथेच्छ कांगावा करून झाला आहे. त्यांचे खोटे हॉस्पिटल रिपोर्ट सादर करणे, त्यांच्यावर जबरदस्ती करून कबुलीजवाबाच्या खोट्या टेप्स बनवणे इतक्यावरच न थांबता कोणत्याही बचावाची संधी न देताच त्यांना थेट मृत्यूदंडही सुनावला.
भारताने याविरोधात वारंवार अपील करूनही पाकिस्तानने जुमानले नाही आणि अखेरीस सरबजीत प्रकरणाचा अनुभव गाठीशी असल्याने भारताला आंतरराष्ट्रीय न्यायालयाचे द्वार ठोठवावे लागले.
आंतरराष्ट्रीय न्यायालयात कुलभूषण यांची बाजू समर्थपणे मांडून ऍड. हरीश साळवे यांनी या शिक्षेला स्थगिती मिळवून दिली मात्र मुजोर पाकिस्तानने आपण या निर्णयास बांधील नसल्याचे सांगत हा निर्णय धुडकावून लावला. “पाकिस्तानला आंतरराष्ट्रीय स्तरावर एकटे पाडण्यात भारताने यश मिळवले” अशा आशयाच्या चर्चा या कालावधीत घडून आल्या असल्या, तरी प्रत्यक्षात मात्र हे प्रकरण जागतिक पातळीवर नेल्याने फायदा नव्हे तर नुकसानच झाले; असे या क्षेत्रातील जाणकार मंडळींचे मत आहे.
त्यांच्यामते; हे प्रकरण आपण आंतरराष्ट्रीय न्यायालयासमोर नेल्याने उद्या पाकिस्तानला काश्मीर प्रकरण तिथे नेण्याचा मार्गच एक प्रकारे खुला करून दिल्यासारखे झाले. शिवाय हा निकाल त्यांनी नाकारल्यामुळे “भारतासारख्या बलाढ्य देशाला पाकिस्तान जुमानत नाही” अशीच काहीशी प्रतिमा तयार झाली. जाणकारांच्या या मतांकडे दुर्लक्ष करून चालणार नाही.
विशेषतः यातील दुसरे मत नोंद घेण्यासारखे का आहे; याचा पुनर्प्रत्यय पाकिस्तानने जाधव कुटुंबियांच्या दौऱ्याच्या वेळेस दिला.
कुलभूषण आणि त्यांचे कुटुंबीय यांच्या भेटीसाठी ठरवण्यात आलेल्या सगळ्या अटी व संकेतांची पाकिस्तान सरकारने पायमल्ली केली. जाधव यांची आई आणि पत्नी भेटीसाठी पोहचल्यावर आपल्या संस्कृतीनुसार दोघींनीही उपस्थितांना हात जोडून अभिवादन केले. याचवेळी पाकिस्तानने आपली विकृती दाखवली आणि या दोन्ही माऊलींना नेसती वस्त्रे बदलण्यास भाग पाडले गेले.
दोन्ही सवाष्णींचे मंगळसूत्र आणि टिकलीदेखील काढून घेण्यात आली. भेटीची वेळ जेमतेम काही मिनिटांची ठरवत असतानाच ही भेट काचेच्या अडसरासह आणि इंटरकॉमच्या साहाय्याने देण्यात आली. संपूर्णवेळ कॅमेरात बंदिस्त अशा या भेटीच्या वेळेस मराठी या मातृभाषेचा उपयोग जाधव कुटुंबियांना नाकारण्यात आला. ते मराठीत काहीही बोलले तर इंटरकॉम बंद केला जात होता. ही भेटदेखील भारतीय राजदूतांना न कळवताच सुरू करण्यात आली. हे सारे इथेच न थांबता कुलभूषण यांच्या पत्नीच्या चपला आपल्याकडे ठेवायला लावून आधी त्यात कॅमेरा होता असे सांगत नंतर मग कसलीशी चिप होती असे सांगून पाकड्यांनी कांगावा केला.
एका अर्थी हे बरेच झाले.
अटकेपार भगवा फडकवणाऱ्या आम्हा मराठ्यांच्या चपला सांभाळण्याचीच आपली लायकी असल्याचे पाकिस्तानने संपूर्ण जगासमोर जाहीरपणे दाखवून दिले! भेट संपवून बाहेर आलेल्या या दोघींवर पाकिस्तान प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधीनी प्रश्नांची सरबत्ती सुरू केली. कुलभूषण यांना उद्देशून ‘कातील’ आणि ‘आतंकवादी’ अशी विशेषणे वापरून या दोघींना अपमानित केले गेले.
आमच्याकडे सर्व पुरावे असूनही कसाबसारख्या अतिरेक्यावर खटला दाखल करून त्याला त्याची बाजू मांडण्याची संधी देण्यात आली होती; कोणतीही अमानुष वागणूक न देता योग्य प्रक्रियेद्वारे न्याय केला गेला. कुलभूषण यांच्याबाबत मात्र सगळ्या संकेतांना पाकिस्तानने झुगारून लावले.
खरं तर या संपूर्ण घटनेत पाकिस्तानने काही “अनपेक्षित” कृत्य केले असेही म्हणता येणार नाही.
१९६५, १९७१, कारगिल, २६/११, काश्मीरमध्ये अशांतता निर्माण करण्याचे सातत्याने करण्यात येणारे प्रयत्न या धर्तीवर त्यांच्याकडून वेगळी अपेक्षाच काय करता येईल? मात्र या साऱ्या पार्श्वभूमीवर आता भारतानेदेखील पाकिस्तानविषयक धोरणाचा पुनर्विचार करण्याची आणि कणखर भूमिका घेण्याची गरज अधोरेखित झाली आहे. Most favorite nation चा दर्जा आणि वैद्यकीय मदतीसाठी दिले जाणारे व्हिसा या दोन आघाड्यांवर हे बदल प्रकर्षाने करणे आवश्यक झाले आहे.
शत्रूलाही वैद्यकीय मदत लागल्यास ती पुरवावी असे वैद्यकीय नीतिमत्ता सांगते. याच तत्वाला जागत भारतानेही आजवर गरजू सामान्य पाकिस्तानी नागरिकांना वेळोवेळी मेडिकल व्हिसा पुरवले आहेत. विद्यमान परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी तर दिवाळी, नववर्ष इत्यादी प्रसंगानुरूपदेखील ही मदत देऊ केली. Directorate-General of Commercial Intelligence and Statistics of India यांच्या २०१७ सालच्या अहवालानुसार २०१५-१६ सालात १,९२१ पाकिस्तानी नागरिकांना भारताकडून मेडिकल व्हिसा देण्यात आले.
२०१२ सालच्या व्हिसा करारानुसार ही प्रक्रिया सुरु असली तरी; आमच्या नागरिकाला व त्याच्या कुटुंबियांना अपमानास्पद वागणूक देणार असाल तर आम्हीही या नाड्या आवळू शकतो हे भारताने दाखवण्याची गरज आहे. त्यासाठी हीच योग्य संधी आहे असे म्हटल्यासही वावगे ठरू नये. कारण नुकतीच नवीन वर्षातली पहिली भेट म्हणून अमेरिकन अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ‘No more’ म्हणत पाकिस्तान सातत्याने अतिरेक्यांना मदत करत असल्याने त्यांना अमेरिकेकडून मिळणारी तब्बल २५५ दशलक्ष डॉलर्सची मदत यापुढे मिळणार नसल्याचे जाहीर केले.
आपल्या मातीत जन्माला आलेले आयुर्वेदासारखे शास्त्र सांगते की; राजद्रोह्यांना वैद्यकीय मदत करू नये. काहीजणांना हे मत माणुसकीला धरून नसल्याचे वाटू शकते. मात्र आदर्शवाद एका बाजूला आणि व्यवहार दुसऱ्या बाजूला. टिकून राहायचे असल्यास ‘जशास तसे’ याच न्यायाने रहावे लागते.
निवडून येण्यापूर्वी मोदी यांनीही ‘हमने पाकिस्तान को लव्ह लेटर लिखना बंद कर देना चाहिये|’ असे मत व्यक्त केले होते.
आता हेच मत प्रत्यक्षात उतरवून पाकिस्तानला वैद्यकीय मदत वा अन्य कोणत्याही प्रकारच्या खैराती वाटणे ताबडतोब थांबवायला हवे!!
—
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
–
===
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
–
शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.