' अनोखा रहमान : ए आर रहमानच्या जन्मदिनी, आपण एका महत्वाच्या गोष्टीवर विचार करायला हवा – InMarathi

अनोखा रहमान : ए आर रहमानच्या जन्मदिनी, आपण एका महत्वाच्या गोष्टीवर विचार करायला हवा

आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page

===

लेखक चित्रपट विश्लेषक, तसेच विविध ऐतिहासिक घडामोडींचे अभ्यासक व व्याख्याते आहेत.

===

अद्वितीय साऊंड इंजिनियर कै. श्री. एच. श्रीधर रहमानसोबत एका गाण्यावर काम करत होते. मनाजोगते मुद्रण झाल्यावर रहमान काही वेळासाठी बाहेर गेला. तो परत आल्यावर त्याने पुन्हा एकवार ते मुद्रण ऐकले आणि ताबडतोब श्रीधरना म्हणाला की, “यात काहीतरी कमी वाटतेय. काय केले तुम्ही”? श्रीधर म्हणाले, “काहीच नाही. नेहमीसारखी डर्ट साफ केलीये मी”. डर्ट म्हणजे नकोसे आवाज, गायकाचा श्वास वगैरे!

रहमान म्हणाला,

“नाही नाही, श्वासाचा आवाज ठेवा. ते पाहिजेय मला”.

श्रीधरांना कळेना, हा बाबा असं का म्हणतोय. शेवटी त्यांनी रहमान सांगतो तसे केले आणि गाणे रिलिज झाल्यावर त्यांना रहमानचे म्हणणे पटले! श्वासाचा आवाज ठेवल्यामुळे त्या गाण्याला जे व्यक्तिमत्त्व प्राप्त झाले होते, तोच त्या गाण्याचा आत्मा होता.

ते गाणे होते मणिरत्नमच्या “बॉम्बे”मधील (१९९५) “उयिरे”/”तू ही रे”!!

 

tu hi re bombay inmarathi

 

ही रहमानची जगाची नाडी ओळखणारी जगावेगळी समज आहे. आणि तीच समज त्याला रहमान बनवते.

इतिहासातील कोणताही संगीतकार घ्या, त्याचं संगीत तुम्ही वारंवार ऐकलं की त्याचा पॅटर्न लक्षात येतो. त्याची गाणी ओळखता येऊ लागतात. किंबहूना त्या संगीतकाराची स्वतःची अशी शैली विकसित होते आणि तीच त्याची ओळख बनते. रहमानच्या बाबतीत नेमके तसेच होत नाही! “ही त्याची शैली आहे” असे वाटेवाटेपर्यंत तो नवीनच काहीतरी घेऊन येतो आणि सबंध पॅटर्नच बदलून चकित करुन सोडतो.

रहमानचे कोणतेही नवीन गाणे रिलिज झाले की सगळ्यांच्या तोंडी एक वाक्य हमखास येतं की, “हे रहमानचं नाही वाटत राव” किंवा “पूर्वीचा रहमान राहिला नाही” ते यामुळेच! खरं तर तो पूर्वीचा रहमान राहात नाही हे त्याचं केवढं तरी मोठं यश आहे. याच कारणामुळे तर तो सतत नवा, उत्फूल्ल आणि ताजा वाटतो. शंकरच्या “बॉईज”ची (२००३) गाणी आठवा. खरेखुरे तरुणाईचे संगीत. पण त्यावेळी रहमान स्वतःच तिशीत होता. तेच संगीत तो रिपिट करु शकेल का? रिपिट? अहो त्याच रहमानने पुन्हा एकवार तरुणाईची नस पकडणारा “ओ काधल कन्मणी” (२०१५) दिलाय. तोही “बॉईज”च्या चार पावले पुढे जाऊन! आणि त्यावेळी त्याचे वय ४८ होते!! ही काहीतरी दैवी गोष्ट आहे.

लक्षात घ्या, हल्लीच्या काळात ४८ वर्षांचे होईपर्यंत भलेभले संगीतकार गार पडलेले असतात, त्यांच्यात स्तब्धता, शैथिल्य आलेले असते. पण ज्या ऊर्जेच्या, आवेगाच्या लाटा ९०च्या दशकात तरुण असलेल्यांच्या मनात “रंगीला” (१९९५) ऐकताना उसळतात; त्याच अगदी त्याच लाटा या दशकात तरुण असलेल्यांच्या मनात “ओके कन्मणी” ऐकताना उसळतात. दोन्हींच्या मध्ये तब्बल २० वर्षांचा फरक असूनही!

याचं जबरदस्त उदाहरण सांगायचं झालं तर, “ओके जानू”मधील (“ओके कन्मणी”चा रिमेक) “एन्ना सोणा” हे गाणं.

हे मूळच्या साऊंडट्रॅकमध्ये नाही. हिंदीसाठी नव्याने केलेले गाणे आहे हे. प्रथमदर्शनी प्रीतम, जीत गांगुली वगैरेंच्या दर्जाचे अतिसामान्य गाणे वाटते ते. रहमानपणा अजिबातच नाही त्यात, असे वाटते. पण शांतपणे ते गाणे पचू द्या. काय सापडते? त्याचे कपडे, त्याचं स्ट्रक्चर आजकाल हिंदीत चलती असलेल्या कोणत्याही इतर गाण्यासारखंच आहे. पण ते कम्पोझिशन त्या तथाकथित गाण्यांसारखं साधं नाही. अतिशय गुंतागुंतीचं कम्पोझिशन आहे ते. गाताना समेवर यायला अतिशय अवघड! त्याची स्केल वेगळी आहे, त्यातलं वाद्यसंयोजन कमीत कमी आहे असं वाटत असलं तरीही त्यात लपलेल्या अनेक साऊंड्सची रेलचेल आहे. हा नेहमीचा सहजसोपा अरिजित सिंग नाही, हे तयार कानाच्या लोकांना तत्क्षणी जाणवतं.

चांगली चाल वगैरे तर अनेक लोक करतात, रहमान त्या चालीच्या पुढे जाऊन जी गोष्ट करतो ते फार महत्त्वाचं.

 

a r rahman inmarathi
qmedia.qyuki.com

पण हे सारं समजून घेण्याइतका आमच्याकडे वेळ आहे का? आपण जेव्हा सहजपणे “मोहेंजो दारो”च्या (२०१६) संगीतावर फ्लॉपचा शिक्का मारुन मोकळे होतो तेव्हा आपण खरं तर “व्हिस्पर्स ऑफ द माईण्ड”, “व्हिस्पर्स ऑफ द हार्ट”, “शिमर ऑफ सिंधू”सारखी कम्पोझिशन्स नशिबी येण्याची आपली लायकी नाही, हेच सिद्ध करत असतो.

रहमान तमिळमध्ये सहजपणे “मेई नीगरा” (“२४” – २०१६), “तल्ली पोगादे” (“अच्चम येन्बदऽ मेडमय्याऽडऽ” – २०१६), “तीरा उला” (“ओके कन्मणी”) देतो. तो इंग्रजीत “जिंगा”सारखे (“पेले” – २०१६) बोसानोव्हा देतो. ते सारं तिथे स्वीकारलं जातं यापेक्षाही त्या लोकांची सांगितिक समज ते समजून घेते.

हिंदीत मात्र “तू कोई और है” (“तमाशा” – २०१५), “बेक़सूर” (“लेकर हम दिवाना दिल” – २०१५) समजून घेणारे, किंबहूना गेल्या पाच-एक वर्षांतल्या त्याच्या सर्वच साऊंडट्रॅकचं सौंदर्य पचवू शकणारे किती जण आहेत?

आमची सांगितिक समज एका बाजूला “आशिक़ी २”च (२०१३) रिपिट करणारी गाणी आणि दुसऱ्या बाजूला स्त्री-पुरुष दोघांचेही वस्तुकरण करणारे आयटमसाँग्स याच्यापलिकडे जातच नाही!

बादशाहने नासवलेले “द हम्मा साँग” (“ओके जानू”) किती वाईट आहे, याबद्दल सगळेच बोलतात. परंतु मूळ चित्रपटात त्याच प्रसंगी असलेले “परंदऽ सेल्लऽ वाऽ” ऐकण्या इतके, समजून घेण्याइतके आपण तयार आहोत का? ते पचविण्याइतका आपला सांगितिक कोठा मजबूत आहे का? हा विचार कुणी करायचा?

रहमान आज एक्कावन्न वर्षांचा होतोय. संगीत आवडतं पण रहमान ठाऊक नाही, असा जगाच्या पाठीवर आजघडीला क्वचितच कुणीतरी असेल. तो पुढे पुढेच चाललाय. पण त्याचे “अक्षय्य संगीत” हा खास आपला, भारतीयांचा ठेवा आहे. आधुनिक जगाला भारतीयांनी काय दिले, याची यादी करायला गेलात तर त्यात रहमानचे नाव प्रत्येकाच्या आवडीप्रमाणे मागे-पुढे का होईना, पण कुठे ना कुठे येणार! ही फारच अनमोल गोष्ट आहे.

a r rehman recording marathipizza

सगळ्यांपेक्षा; किंबहूना आज असलेल्या, काल होऊन गेलेल्या आणि उद्या होऊ पाहाणाऱ्या संगीतकारांच्या सर्वच पिढ्यांपेक्षा वेगळी, स्वतंत्र!!

तीचं मूल्य कणश: जरी समजून घ्यायचं असेल, तर आपली सांगितिक समज वाढवायलाच हवी. जगात आजघडीला होणारं लाखप्रकारचं संगीत, एवढंच कश्याला आपल्याच देशात वेगवेगळ्या प्रदेशांत आज होणारं अगणित प्रकारचं संगीत ऐकण्याची, समजून घेण्याची सवय केली, त्यातलं काही टक्के जरी पचवता आलं तरीही रहमानच्या संगीताकडे पाहाण्याची एक वेगळीच आदरयुक्त दृष्टी विकसित होते.

हल्ली फारच जास्त धावतो आपण. करिअरच्या पाठी, पैश्यांच्या पाठी, पोकळ अस्मितांच्या पाठी. परवा माझे एक स्नेही अपघातात गेले, आज अचानकच ओम पुरींसारखे अभिनयाचे विद्यापीठ गेले. अगदी चालता-बोलता गेलेली ही माणसे! आयुष्य किती लिहून ठेवलंय आणि काळ कधी झडप घालेल, कुणीच सांगू शकत नाही. मग कसला माज करतो आपण? कश्यासाठी धावतो आणि का एकमेकांच्या जीवावर उठतो? असंच नासवत राहिलो तर आयुष्याचा आस्वाद घेण्याआधीच संपून जाईल की ते!

जरासा विचार करा.

रहमानच्याच कश्याला, सामान्यतःच संगीतासारख्या मंगल गोष्टी आहेत आयुष्यात आपल्या. त्या समजून घ्या, त्याचा स्वाद घ्या. संगीताच्या देवासाठी वाढदिवसाचं यापेक्षा मोठं गिफ्ट काय असू शकेल?

===

InMarathi.com वर विविध लेखकांनी व्यक्त केलेले विचार ही त्यांची वैयक्तिक मतं असतात. InMarathi.com त्या मतांशी सहमत असेलच असं नाही. | आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page । Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?