”मी एक मुलगी, ‘जाड’ आहे म्हणून खूप हेटाळली गेलेली…”
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
===
लेखिका – अंजली झरकर
—
विविध भारती वर आज सुद्धा सर्वच काळातल्या प्रसिद्ध हस्तींचे आवाज ऐकायला मिळतात. मग ती मधुबाला असेल जी तिच्या लाडिक आवाजात जगप्रसिद्ध हास्य करत बोलते “तब मैने उनसे कहा मेरी हर फिल्म के लिये सिर्फ लता मंगेशकर ही मेरे लिये गायेगी”. दिलीप कुमार बोलतात, किशोर कुमार बोलतो, अमिताभ बच्चन साब बोलतात.
“मेरी ७ वी फिल्म फ्लॉप होने के बाद मुझे बम्बई छोडने के लिये कहा गया. लेकीन उस वक्त सबसे ज्यादा विश्वास मुझे खुद पर था, और आज ये मेरा विश्वास रंग लाया है!”
हे शेवटचं वाक्य बोलताना अमिताभ च्या आवाजात जी काही गहिरी डूब आणि आर्तता येते त्यावरून त्याच्या मनातल्या या संघर्षाच्या आठवणी जगल्याची कल्पना यावी.
—
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
—
“तुम्हाला जर आयुष्यामध्ये एखादी गोष्ट नाकारली गेली असेल तर निराश होवू नका. कारण नाकारल्या गेल्या गोष्टीपेक्षा ही अधिक चांगली गोष्ट त्यानंतर तुमच्या कडे येणार असते” ह्या असल्या Quotes मी आत्तापर्यंतच्या माझ्या आयुष्यात काळात वाचली, ऐकली आणि स्वतःची भर टाकून लिहिली देखील आहेत.
परंतु जोपर्यंत माझ्या खांद्यावर जबाबदारी घेवून समर्थपणे पुढे जाण्याचा प्रयत्न मी केला नाही तोपर्यंत अशा वाक्यांचा कसलाही अर्थ मनाच्या गाभ्यापर्यंत पोहोचला नाही. याचं कारण मी जबाबदाऱ्याना झटकून दूर पळण्याच्या माझ्या मधल्या “मांजर” पणाला देईल.
कुठलंही यश त्याच्याबरोबर अधिकाधिक मोठी जबाबदारी घेवून येतं आणि ती जबाबदारी पेलण्याची ताकद केवळ त्या व्यक्तीने सोसलेल्या संघर्षाच्या परिमाणावर अवलंबून असते.
प्रत्येकाच्या आयुष्यात संघर्ष असतात आणि त्या संघर्षाची प्रमाणके ही वेगवेगळी असतात प्रत्येक व्यक्तीसाठी तिचा लढा सर्वश्रेष्ठ असतो. तरीही प्रत्येकच संघर्ष लाखो लोकांसाठी प्रेरणादायी जीवनदायी बनू शकत नाही.
संघर्ष कथा दुसऱ्यासाठी दीपस्तंभ बनतात कारण तो संघर्ष लढलेली व्यक्ती त्या लढया कडे संघर्ष म्हणून पाहत नाही आयुष्य वाटेवरच्या चिरंतन प्रवासा मध्ये जगायला मिळालेल्या क्षणांची शिदोरी म्हणून ती त्यांची आठवण ठेवते.
त्याबद्दल चीड, अपमान, राग, धगधगता सूड अशा कुठल्याही हीन प्रकारांच्या आरी न राहता त्याला निर्भयपणे स्वतःमधल्या आदिम योद्ध्याच्या व्यक्तीमत्व प्रेरणेचा भाग बनवते आणि पुढे चालत राहते.
अर्थात आजपर्यंत स्वतः अनुभवलेल्या भल्या बुऱ्या अनुभवांचा विचार केला तर इतकी स्थितप्रज्ञता बाळगण अजूनही शक्य होत नाही. व्यक्ती म्हणून झालेल्या मान अपमानांचा, “मुलगी” म्हणून वावरताना लागणाऱ्या कसोट्यांचा मिळणाऱ्या सापत्नभावांचा तटस्थतेने विचार करण शक्य होत नाही. तरीही एक मात्र नक्की.
अगदी तरुण वयात एक स्वतंत्र महिला वकील म्हणून काम करताना स्वतःमधल्या कमतरतांना स्वतःचा सर्वात बलवान भाग बनवून पुढे जा या एका सूत्रावर माझ्या संघर्षाच सार मी माझ्यापुरत शोधलेलं आहे.
माझ्यासाठी खरं तर संघर्ष कधी सुरूही झाला नव्हता आणि म्हणून कधी संपलाही नाही.
मी एक Child Obesity ची शिकार असलेली मुलगी (होते). वजन अगदी लहानपणापासून अचानक वाढायला सुरुवात झालेली. शाळेत ५-६ वी ला शिकत असताना वजनाचा काटा ७५ किलो वर जावून पोहोचलेला.
वयात आल्यानंतर pcod चा त्रास सुरु झाला. त्यामुळे तो कॉलेज जीवनामध्ये पार ८५ किलो वर जावून पोहोचलेला. त्यात भर म्हणून सबंध चेहऱ्यावर मुरुमाच्या गाठी उठून चेहरा काळवंडलेला.
मातोश्री च्या कडक निगराणी खाली रोज केसांना तेल लावून लावून घट्ट वेण्या बांधत असल्यामुळे केस आणि पर्यायाने चेहरा प्रचंड तेलकट. शिवाय मुलीच्या जातीला घट्ट कपडे शोभत नाहीत…कपडे कसे “घळघळीत” असावेत या मातोश्रीच्या बरहुकूम ८५ किलोच्या महाकाय देहावर तसेच भले थोरले सैल घळघळीत कपडे.
त्यामुळे शाळा कॉलेज मध्ये माझी संभावना जोकरपेक्षा ही खालच्या पातळी ला व्हावी यात आश्चर्य नव्हते. परंतु या लठ्ठपणा आणि पर्यायाने त्याबरोबर आलेल्या कुरूपते मुळे जो अतोनात मानसिक छळ झाला त्याला सीमा नाही.
आपल्या समाजामध्ये सौंदर्याच्या व्याख्या ठरलेल्या आहेत. सुंदर म्हणजे गोरी गोरी, नितळ डागविरहीत त्वचा. सुंदर म्हणजे सडपातळ. सुंदर म्हणजे स्लिम-ट्रीम. सुंदर म्हणजे कर्व्हज…या निकषामध्ये ज्या मुली बसतात अर्थात त्याच सुंदर असतात. बाकीच्याना मुलगी म्हणून अशीही फारशी किंमत दिली जात नाही. त्यात “जाड असणं” हा मुलीचा सामाजिक गुन्हाच ठरतो.
माझं वक्तृत्व, माझं लिखाण, माझी Power Lifting , Boxing सारख्या खेळामधली बक्षिसे, माझ्या कविता, माझा स्वभाव, माझं चारित्र्य – या साऱ्या गोष्टी याच्यामुळेच गौण ठरल्या.
माझी चामडी, माझे मेजरमेंट, माझा लठ्ठपणा यावरून माझी ओळख मला या समाजाने दिली. ती, अर्थातच, मी नाकारते. जर मी गप्प बसून राहिले तर तो माझ्यावरच नाही तर याच समाजात माझ्याबरोबर राहणाऱ्या आणि माझ्यासारखीच अवहेलना सहन करणाऱ्या लाखो संवेदनशील मुलींचा अपमान ठरतो.
अर्थात इतकं सगळं होत होतं तरी ही मी कधीही माझ्या शरीराबद्दल राग अथवा तिरस्कार बाळगल्याचं मला आठवत नाही. अगदी घरात कुणी नसताना आरशासमोर उभी राहून मी मोठमोठ्याने “मी सुंदर आहे”, “माझी Body पण सुंदर आहे”, “ I am beautiful because my soul and heart is pretty so that I” अशी अनेक वाक्ये म्हणायचे.
आज जगात दर सहा मुलीमागे एक मुलगी लठ्ठ् असते. हा विळखा भारतासारख्या देशालाही मोठ्या प्रमाणात ग्रासतो आहे. बहुसंख्य मुली या केवळ त्यांच्या hormone problems ला तोंड देत देत लठ्ठ झालेल्या असतात.
आई वडीलांच्या, शिक्षकांच्या, मित्र- मैत्रिणीच्या सततच्या टोमण्यामुळे हे जीव एका भयानक न्यूनगंडाखाली जगतात. खाणं-पिणं सोडून देतात. Dream Figure मिळावी म्हणून मर मर कष्ट करतात.
या सावटाखालीच बालपण, तारुण्य आणि अख्ख आयुष्य निघून जातं. यावेळी फक्त थोडा पाठींबा, थोडं प्रेम, थोडं उत्तेजन जर मिळण्याची अपेक्षा या मुलींनी ठेवली तर त्यात गैर काय आहे? फक्त प्रश्न असा की ऐकणार कोण?!
मला मिळालेला हा लठ्ठपणा मी वरदान समजते. कारण त्यामुळेच मी स्वतःचं आयुष्य एका शिस्तीत बसवून घ्यायला शिकले. अर्थात जे निसर्गाने दिलय तेच स्वीकार करून आयुष्य जगा हा फंडा मला अमान्य होता. अखिल विश्वामध्ये आपली मानव जात अशी एकमेव आहे जिच्या इच्छाशक्तीला अंत नाही.
संघर्षाला प्रमाण नाही. जे आत्मबल तिच्यात आहे तिच्या जोरावर प्राप्त परिस्थिती बदलण्याचे साहस फक्त मानवच करू शकतो. त्यामुळे लठ्ठपणाशी लढा देवून त्याच्यावर मात करणं – ही कठीण गोष्ट जरूर होती – पण अशक्य नाही.
लठ्ठपणावर विजय मिळवण्याच्या या प्रवासामध्ये सगळ्यात पहिला मिळालेला धडा होता – स्वतःच्या अस्तित्वावर, स्वतःच्या शरीरावर प्रेम करण्याचा.
लोक कितीही टाकून बोलले, चिडून बोलले तरी स्वतःचं मानसिक खच्चीकरण होवू न देता स्वत:बद्दल कायम आदरभाव बाळगणे – हे सगळ्यात अवघड होतं. परंतु स्वत:विषयी प्रेम बाळगणं ही कुठल्याही परिवर्तनाची सुरुवात ठरते हे मी अनुभवावरून शिकलेय. शिवाय लठ्ठपणा एका चक्रव्युहा सारखा असतो, जिथे अनेक गोष्टी एकमेकांवर अवलंबून असतात.
माझे Periods, (ज्याच्याबद्दल उघड बोलणं ही पाप समजल जातं), त्यामुळे निर्माण झालेल्या शारीरिक समस्या, त्या दूर करण्यासाठी योग्य औषधोपचार, काट्यावरचं Diet, व्यायाम, स्वत:वर नियंत्रण आणि इतकं करून तिळातिळाने कमी होत जाणारं वजन…!
हे सर्व असं असताना सकारात्मक दृष्टीकोन ठेवण्यात अनेक वर्षे निघून जातात. माझी ही गेली. परंतु काहीही नं करता लोकांच्या निंदेला बळी पडून स्वतःला कोसत राहण्यापेक्षा इतक्या वर्षाचा एकाकीपणाने लढलेला संघर्ष खूप काही शिकवणारा ठरला.
In Fact, आयुष्यामध्ये जो काही संघर्ष करण्याचा, जिद्द बाळगण्याचा attitude माझ्यामध्ये निर्माण झाला त्याच श्रेय माझ्या लठ्ठपणाला जातं.
लठ्ठपणा होता म्हणून जाणीवपूर्वक मैदानी खेळाची आवड जोपासली गेली. आरोग्याबाबत जागरूक दृष्टीकोन निर्माण झाला. ईर्षा ही निर्माण झाली…! बालपणाचा एक मोठा काळ जो लठ्ठपणा, त्याच्यामुळे आलेल्या शारीरिक आजारपणाला तोंड देण्यात गेला – त्यामुळे मला परीस्थिती बदलायला हवी असा एक कठीण निर्धार स्वतःमध्ये निर्माण झाला.
तो आज सगळ्याच क्षेत्रात काम करत असताना साथ देतो. वर्षे गेली. मी मैदानावर धावत राहिले. पहिल्यांदा फिदीफिदी हसणारे लोक नंतर दुर्लक्ष करू लागली. तीच नजर परत कौतुकात बदलली. कुणाच्याही हसण्याने, रडण्याने माझा व्यायाम मी थांबवला नाही.
मी माझं २३ किलो वजन उतरवलंय.
Power Lifting परत सुरु केलंय.
Dance class लावलाय.
ज्या गोष्टींचा आनंद घेण्याची संधी बालपणी हिरावून घेतली गेली त्या गोष्टी परत करताना प्रचंड आनंद होतो. वर्षानुवर्षे जिम आणि मैदानावर घाम गाळून, अनेक पदार्थांचा कायमचा त्याग करून, प्रचंड इच्छाशक्ती पणाला लावून शेवटी स्लिम बनल्यानंतर आज या वळणावर उभी असताना, मला अशा असंख्य मुली दिसतात ज्या हतबल आहेत. लठ्ठपणा ने आयुष्य ग्रासलेल्या आहेत.
Regular medical check up साठी कधी मेडिकल सेंटर मध्ये गेले तर १५- १६ वर्षे वयाच्या मुली लठ्ठपणा आणि त्याच्याशी सबंधित बाबींनी ग्रस्त झालेल्या बघायला मिळतात… त्यांना बघून वाटतं की आयुष्यात कितीही अनमोल गोष्टी मिळाल्या तरी निरोगी आयुष्य जगण्यासारखी अनमोल अमुल्य गोष्ट दुसरी कुठलीच नाही.
ते मिळवण्यासाठी संघर्ष करावा लागत असेल तर जरून करायला हवा. त्यासाठी बाकी काही नाही पण वेळ आणि खूप सारा संयम लागेल. पण तो द्यायला हवा. कारण हातात परिस्थिती असताना त्याकडे दुर्लक्ष करून स्वता:ला कोसत बसणं हा कधीच पर्याय होवू शकत नाही.
माझा संघर्ष अर्थात आजही संपलेला नाही. एका बाबतीत संपला असेल, तर आयुष्याच्या दुसऱ्या क्षेत्रात परत अगदी बेसिक लेवल पासून सुरु झाला आहे. त्याला “प्रोफेशनल स्ट्रगल” असं नाव देता येईल. Stability struggle चं नाव देता येईल. पण त्याने काय फरक पडतो?! जर हा संघर्ष असेल तर तो लढायला मी सज्ज आहे.
आयुष्यातली अशी कुठलीही गोष्ट असू द्या – जी आपल्याला स्वतःची शरम बाळगायला लावते, दु:ख देते, त्रास, वेदना,अपमान देते – तीच आपल्या हातातली खरी तलवार असते. कारण तीच गोष्ट आपणास आपली सर्वसमावेशक ताकद ओळखायला लावते. संघर्षासाठी सज्ज करते.
याला मी संघर्ष म्हणतच नाही. हा चिरंतन चालणारा प्रवास आहे. पण तो कल्याणकारी असावा. त्याचं स्वरूप “माझे मान अपमान”, “माझा सूड” इतका क्षुल्लक नं रहाता “चांगल्या परिवर्तनाचं कारण” असं असावं!
“Count of Monte Christo” या माझ्या सर्वात आवडत्या कादंबरीचा नायक एडमंड डांटे म्हणतो त्याप्रमाणे –
या जगात सुख ही नाही आणि दु:ख ही नाही. फक्त एका परिस्थितीची दुसऱ्याबरोबर तुलना होत राहते. आणि ज्याने या जीवनातली प्रगाढ वेदना अनुभवली आहे केवळ तोच दैवी आनंदाच वरदान लाभण्यास पात्र ठरतो!
लेखिका व्यवसायाने वकील आहेत. त्या स्वतःची ओळख “खेळाडू, वक्ता, कलेची विद्यार्थीनी, कायद्याची अभ्यासक, अध्यात्माची व्यासंगी, ललित लिखाण आवडीने लिहिणारी लेखिका” अशी करून देतात.
—
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
—
===
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
–
इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.