आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
===
मागील भागाची लिंक : देह आणि आत्मा हे कधी दुरावत नाहीत : जाऊ तुकोबांच्या गावा (४८)
===
आहे ऐसा देव वदवावी वाणी । नाही ऐसा मनीं अनुभवावा ॥
ह्या अत्यंत अवघड अशा अभंगाचा उलगडा रामभटांनी करून दिल्यावर नारायण म्हणाला, “काका, हा अभंग आपल्याला कधी पुरता लागेल असे वाटले नव्हते. पण आता समाधान झाले. मात्र, इतके झाले तरी आबाने त्या आधी विचारलेली शंका तशीच राहिली.
आबांचे म्हणणे होते की, तुकोबा दगडाच्या बनविलेल्या विठ्ठलाची किंवा रामकृष्णहरी म्हणताना रामकृष्णादी मर्त्य मानवांची उपासना का करायला सांगतात? काका, मला आबांची ही शंका रास्त वाटते. तुकोबा पंढरीच्या विठोबाच्या किती प्रेमात असतात! त्या पांडुरंगाचे कुणी करणार नाही असे वर्णन ते करतात.
सुंदर ते ध्यान उभें विटेवरी ।
कर कटावरी ठेवोनिया ॥
तुळशीहार गळां कासे पितांबर ।
आवडे निरंतर तें चि रूप ॥
मकरकुंडले तळपती श्रवणी ।
कंठी कौस्तुभमणि विराजित ॥
तुका ह्मणे माझें हें चि सर्व सुख ।
पाहीन श्रीमुख आवडीने ॥
काका, मला तुकोबांचे हे अभंग फार आवडतात. ते गाताना मी कीर्तनात खूप रंगून जातो. त्यांचा अर्थ ऐकताना श्रोतेही खूप छान प्रतिसाद देतात. असाच दुसरा एक आहे, तो ही लोकांना आवडतो.
राजस सुकुमार मदनाचा पुतळा । रविशशिकळा लोपलिया ॥
कस्तुरीमळवट चंदनाचा उटी । रूळे माळ कंठी वैजयंती ॥
मुगुट कुंडले श्रीमुख शोभले । सुखाचे ओतले सकळ ही ॥
कासे सोनसळा पांघरे पाटोळा । घननीळ सावळा बाईयानो ॥
सकळ ही तुह्मी व्हा गे एकीसवा । तुका ह्मणे जीवा धीर नाही ॥
काका, तुकोबा हे अद्वैती आहेत हे आता तुम्ही आमच्या मनावर इतके ठसविले आहे की मला आता प्रश्न पडला आहे की जर मी कीर्तनाला पुन्हा उभा राहिलो तर हे अभंग घ्यायचे की नाही? मनात निर्गुणी अद्वैत आणि मुखात सगुण विठ्ठल अशी कसरत मी कशी करणार? तुकोबा असे दोन्हीकडे कसे वावरतात ते काही मला कळत नाही.”
रामभटांना प्रश्न आवडला. ते म्हणाले, “तुमची अभ्यासाची आता सुरुवात झालेली आहे. अद्वैत म्हणजे नेमके काय? तर ती एका क्षणाची गोष्ट होती. त्या क्षणभराच्या अवस्थेनंतर ही बहुविध सृष्टी निर्माण झालेली आहे. ती सगुण आहे. हा नेमका प्रकार काय व कसा झाला हे व्यवस्थित समजून घ्यायचे असेल तर तुम्हाला ज्ञानदेवी आणि अमृतानुभव मन लावून अभ्यासले पाहिजेत. ह्या शिवाय आदि शंकराचार्यांचे गीताभाष्य, ब्रह्मसूत्रावरील भाष्य हे ही अभ्यासले पाहिजेत. शक्य झाल्यास द्वैती मंडळी आपला मुद्दा कसा सिद्ध करू पाहतात ते ही तुम्ही जाणून घेतले पाहिजे. हे न कराल तर केवळ आता सांगितलेस ते तुकोबांचे रूपाचे अभंगच नव्हे तर अन्य अनेक अभंगही तुम्हाला मोठी अडचण करतील. एक अभंग असा आहे –
विठोबाचे पायी जीव म्यां ठेविला । भक्तिभावे केला देव ऋणी ॥
देव माझा ऋणी आहे सहाकारी । परस्परे वारी भवभय ॥
भवभयडोही बुडों नेदी पाहीं । धरूनियां बाही तारी मज ॥
तारियेले दास पडिल्या संकटीं । विष केले पोटीं अमृतमय ॥
अमृतातें सेवीतसे नामरसा । तोडियेला फासा बंधनाचा ॥
बंधनाचा फासा आह्मी काही नेणों । पाय तुझे जाणों पद्मनाभा ॥
पद्मनाभा नाभिकमळी ब्रह्मादिक । त्रैलोक्यनायक म्हणविसी ॥
ह्मणविसी देवा दासाचा अंकित । मनाचा संकेत पाहोनिया ॥
पाहोनिया दृढ निश्चय तयाचा । तो चि दास साचा जवळीक ॥
जवळीक आली ब्रह्मीं सुखावले । मार्ग दाखविले मूढा जना ॥
मूढा जनामाजी दास तुझा मूढ । कास तुझी दृढ धरियेली ॥
धरियेले तुझे पाय रे विठ्ठला । तुका सुखी जाला तुझ्या नामे ॥
आबा, नारायणा, हा अभंग तुम्ही पाहाल तर प्रथमतः सगुणोपासना केलेली आहे असेच वाटेल. विठोबाचे पायी जीव म्यां ठेविला, धरियेले तुझे पाय रे विठ्ठला ही वाक्ये तसाच भाव निर्माण करणारी आहेत. परंतु, मागील अभंगाचा अर्थ लावताना मी तुम्हाला एक महत्त्वाचा नियम सांगितला होता, तो विसरू नका. तो असा की अभंगातील विशेष चरण आधी शोधायचा. बऱ्याचदा आपले लक्ष दुसरीकडेच जाते. तसे होऊ द्यायचे नाही.
नारायणा, रूपाचे वर्णन करणारा राजस सुकुमार हा अभंग आताच तू ऐकवलास. ते विठ्ठ्लाचे वर्णन इतके लोभस आहे की त्यात कुणीही अडकेल. पण त्या अभंगाची शेवटची दोन कडवी पाहा –
कासे सोनसळा पांघरे पाटोळा । घननीळ सावळा बाईयानो ॥
सकळ ही तुह्मी व्हा गे एकीसवा । तुका ह्मणे जीवा धीर नाही ॥
आता मला सांगा रूपाचे वर्णन करणारे तुकोबा ह्यांत कुठे जाऊन पोहोचले आहेत? तुकोबा बाईयांनो हे कुणाला उद्देशून म्हणत आहेत? तुकोबांच्या जीवाला धीर का नाही?
असे प्रश्न आपल्याला पडू लागले की उत्तरे सापडतात. आबा, सारखे लक्षात ठेवा, जिथून प्रश्न येतात तिथूनच उत्तरे येत असतात. मात्र ती मिळण्यासाठी एक विशिष्ट प्रकारचे कष्ट करावे लागतात. त्याची एक युक्ती मी तुम्हाला सांगत आहे की त्या अभंगातील विशेष चरण आधी शोधायचा. आत्ता तुम्हाला मी जो अभंग ऐकविला त्यात –
देव माझा ऋणी आहे सहाकारी । परस्परे वारी भवभय ॥
असे म्हटलेले आहे. ह्याचा आधी अन्वय केला पाहिजे, फोड केली पाहिजे. ती अशी होते –
देव माझा ऋणी आहे
आहे परस्परे सहाकारी
देव माझा वारी भवभय
आता आपल्याला प्रश्न पडेल की पाय तर तुकोबा विठ्ठलाचे धरीत आहेत, मग देव ह्यांचा ऋणी कसा होतो?
तुकोबांनी त्याचे पाय धरल्याने ते एकमेकांचे सहाकारी म्हणजे एकमेकांना सहाय्य करणारे कसे होतात?
आणि हे जीवन जगताना मनात सतत उद्भवणाऱ्या भयाचे निराकारण तो कसे करतो?
आबा, नारायणा, हे मी पुन्हा पुन्हा सांगतो की दगडाचा देव काहीही करू शकत नाही. तो काहीही करू शकत नाही हे तुकोबांना पक्के कळते. ज्या आपल्याला कळतात त्या साध्या सोप्या गोष्टी तुकोबांना कळत नाहीत असे कधीही समजू नका. उलट, ते काय सांगत आहेत ते आपल्याला कळत नाही हेच मनात धरा. राजस सुकुमार म्हणता म्हणता तुकोबा पंढरपुराहून निघाले ते कोठे पोहोचले हा प्रश्न आपल्याला पडायला हवा.
आता तुम्हाला एक अजून अभंग ऐकवतो. ते म्हणतात –
विश्वाचा जनिता । ह्मणें यशोदेसी माता ।।
ऐसा भक्तांचा अंकित । लागे तैसी लावी प्रीत ।
निष्काम निराळा । गोपीं लावियेला चाळा ।।
तुका ह्मणे अद्वैत । चांगले आले रूपा ।।
ह्या अभंगात तुम्हाला काय दिसते? तुकोबांनी कृष्ण कोण कसा ते येथे मोठ्या अलंकारिक पद्धतीने सांगितले आहे. ते म्हणतात, कृष्णरूपाने अद्वैतच छानपैकी जन्माला आले आणि यशोदेला माता म्हणू लागले. म्हटला तर भक्तांचा असा अंकित, की लावावे तसे प्रेम लावून घेतो. गोपींशी चाळेही करतो. पण तुकोबा पुढे म्हणतात, असा तो कृष्ण आपल्यासारखा दिसला तरी मूळ तो निराळा आहे! तो अगदी निष्काम आहे! आणि तो अगदी स्वाभाविक तसा आहे, कारण शेवटी तो अवघ्या विश्वाचा जनिता आहे!
विश्वाचा जनिता म्हणजेच ब्रह्म! तुकोबा रामकृष्णहरि ह्या मंत्राचा पुरस्कार करतात, पांडुरंगाचे नामरूप गातात – त्यातील त्यांचा परमेश्वर हा असा आहे! अद्वैतालाच ते विठ्ठल, पांडुरंग, रामकृष्णहरि आदि नामांनी संबोधीत असतात.
मी आधी सांगितल्या अभंगात त्यांनी आपला जीव विठ्ठलाच्या म्हणजेच ब्रह्माच्या चरणी ठेविला असे म्हटले आहे हे ध्यानी घ्या. आता ते ब्रह्म कुठे सापडावे? पंढरपुरात? नाही! तर ते आपल्याच अंतरंगात जीवरूपाने आहे! आधीच्या अभंगातील आवडीआवडी हे शब्द आठवा. त्या जीवाला देहरूपी तुकोबांची आणि तुकोबांना जीवाची ओढ आहे. ती भेट झाली की भयाचे निवारण होत असते. त्या भेटीमागीस सायास आणि तो प्रसंग तुकोबांनी या अभंगात वर्णिलेला आहे. येथे ते एक असून दोन दिसतात, एक दुसऱ्याची उपासना करतो असेही दिसते पण प्रत्यक्षात ते दोघेही एकरूप होण्यासाठी धडपडत आहेत. अशा स्थितीत म्हणूनच ते दोघे एकमेकांचे सहाय्यकारी होऊन ऋणीही होत आहेत!
ह्या अभंगाचा अर्थ स्पष्टपणे सांगायचा तर असा की शरण जायचे असेल तर स्वतःलाच शरण जा. जीव ब्रह्मासारखा निर्मल आहे. त्याचे ध्यान धरलेत, की विचारशुद्धी, चित्तशुद्धी, आचारशुद्धी होईल. मग मनातील भय जाईल. तेव्हा म्हणा की अंतरीचा प्रकटला!
तुकोबांचा अंतर्भाग असा निर्मल शुद्ध झालेला आहे. त्यालाच निरंजन असाही शब्द आहे. तुकोबांचा म्हणून मनोमन वास तिथे असतो. ते म्हणतात –
निरंजनीं आह्मी बांधियेले घर । निराकारीं निरंतर राहिलों आह्मी ।।
निराभासीं पूर्ण जालों समरस । अखंड ऐक्यास पावलों आह्मी ।।
तुका ह्मणे आता नाही अहंकार । जालों तदाकार नित्य शुद्ध ।।
—
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
===
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
–
शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.