' जातीय/वांशिक/सांस्कृतिक अस्मितांचा गोंधळ : मिथकांच्या सोसात हरवलेला इतिहास! – InMarathi

जातीय/वांशिक/सांस्कृतिक अस्मितांचा गोंधळ : मिथकांच्या सोसात हरवलेला इतिहास!

आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page

===

प्रत्यक्ष इतिहासापेक्षा मिथकांवरच लोकांचा भरवसा जास्त असतो. हे केवळ भारताबाबतच खरे नाही तर काही जागतीक अनर्थही केवळ मिथके बनवण्याच्या हव्यासापायी झालेले आहेत. किंबहुना मिथके बनवत बसणे हा मानवाचा छंद आहे आणि त्यामागे निखळ सर्जकताच असते असे नाही.

 

creation of myth inmarathi

 

भिमा कोरेगांवच्या युद्धाबाबत निर्माण केले गेलेले मिथक सामाजिक विद्वेषाचे कारण झाल्याचे आपण नुकतेच पाहिले. एका शोषित/वंचित समाजाला “तुम्हीच अन्याय्य सत्तेच्या पराजयाला कारण आहात…” असे कोरेगांव भिमा युद्धातील काही योगायोग, समज आणि काही सत्ये याची मिसळ करत त्यांच्या हरपलेल्या आत्मबलाला उभारी देण्यासाठी एक विजयी मिथक तयार केले गेले. जसजसा काळ गेला, तसतसे या मिथकाची गरज संपून ते कधीच कालबाह्य व्हायला हवे होते. पण तसे झाले नाही. उलट मिथक-अभिमानाचे रुपांतर कट्टरतेत होत गेले. दुसरी बाजुही गप्प बसणार नव्हती. सामाजिक संघर्ष अपरिहार्य झाला तो त्यातुनच!

पद्मावती हेही एक एका कवीच्या कल्पनेतुन निर्माण झालेले आणि सत्याचा विशेष आधार नसलेले मिथक! पण त्यानेही देश ढवळून काढला. “राम” या अजरामर मिथकाने तर भारतीयांच्या मनावर राज्य केले. या मिथकाच्या लोकप्रियतेचा उपयोग सर्जनासाठी जेवढा झाला तेवढाच भारतीय राजकारणाची दिशा बदलण्यासाठी, देशातील हिंसाचाराचे स्वरुप पुर्णतया बदलण्यासाठी कसा केला गेला हेही आपण पाहिले आहे. भारत हा मिथकांचा देश आहे. काही मिथकांनी समाज कधी टिकवला तर कधी ढवळून काढला आहे.

मिथक निर्मिती आणि तिचा वापर भारतीयच करतात असे नाही. युरोपनेही प्रबोधन काळत एक मिथक बनवले. ते म्हणजे वंशवादी आर्य मिथक. आणि ते का निर्माण केले तर केवळ युरोपियनांचा तुलनेने अर्वाचीन असलेला इतिहास पार मागे नेण्यासाठी आणि आम्ही संस्कृतीचे निर्माते आहोत हे जगावर बजावण्यासाठी!

या कार्यासाठी युरोपियन विद्वानांच्या पिढ्यामागून पिढ्या खपल्या. आर्य सिद्धांत वांशिक आधारावर नसला तरी भाषिक आधारावर जीवंत ठेवलेला आहे तो आहेच. या वंशिक आणि श्रेष्ठतावादात भारतातीलही तथाकथित “आर्य” अतिउत्साहाने उतरले होते आणि त्या वैदिक आर्यांचे मूळ पार आर्क्टिक प्रदेशात शोधू लागले होते. त्यातुनच मग द्रविड वंश/भाषा गट आणि मुलनिवासी हे नवी मिथके जन्माला घातली गेली. हेतू अर्थात एकच… – श्रेष्ठत्वतावाद आणि वर्चस्ववाद! त्यासाठी सत्याचा आणि वैश्विक सौहार्दाचा बळी दिला जाणे स्वाभाविक होते. या विध्वंसक मिथकीय सिद्धांताचा प्रवास मनोरंजक आहे!

प्रबोधनकाळाने जगाला अद्वितीय गोष्टी दिल्या. ज्ञान, विज्ञान व अभिव्यक्तीची क्षितीजे अमर्याद विस्तारली पण याच काळाला एक काळीकुट्ट किनार आहे व ती म्हणजे आर्यवंश श्रेष्ठत्वता वादाचा जन्म. हिटलरने याच सिद्धांताचा गैरफायदा घेत लक्षावधी ज्युंची कत्तल केल्यानंतर हाच वाद नव्या नावाने आणला गेला व तो म्हणजे पुरा-इंडो-युरोपियन भाषा बोलणाऱ्यांचा गट व त्यांची विस्थापने. केवळ नांव बदलले तरी अर्थ तोच राहिला.

याचे कारण म्हणजे युरोपियनांना सेमेटिक वंश गटाशीची सांस्कृतीक मुळे तोडायची होती.

 

semetic religions europe inmarathi
“सेमेटिक धर्मांनी युरोपचं नुकसान केलं आहे” असा प्रचार करणारं रेखाटन । boards.4chan.org

जर्मनांना जर्मनांच्या सांस्कृतीक एकीकरणासाठी “जर्मननेस” शोधायची गरज होती. डेव्हीड ह्युमसारख्या अठराव्या शतकातील श्रेष्ठ तत्वज्ञाने “गोरेतर सारेच हीन आहेत” असे स्पष्ट प्रतिपादित केले. काहींची मजल तर “काळे हे युरोपियन व एप्सच्या संकरातून निर्माण झालेले निर्बुद्ध आहेत” अशी मांडणी करण्यापर्यंत मजल गाठली. यात सेमिटिक नाळ तोडण्याचे प्रयत्न सुरु होतेच.

“भारत हीच आर्यांची मुळभुमी आहे” असे मानण्याकडे या काळात कल होता. त्यासाठी व्होल्तेयरसारख्या तत्ववेत्त्याने तर चक्क भारतीय ब्रह्म आणि अब्राहमात साधर्म्य शोधत बाप्पा अब्राहम हा भारतीय होता अशी मांडणी केली. (वर्तक अथवा ओक भारतातच नसतात!) रेनान या फ्रेंच विद्वानाने येशु ख्रिस्त हा सेमिटिक नव्हे तर “आर्य” होता असे प्रतिपादित केले.

थोडक्यात येनकेनप्रकारेण, युरोपातील धर्म-संस्कृतीचे मुळ मुळात सेमिटिक नाही हे त्यांना सिद्ध करायचे होते व आर्य सिद्धांत त्यासाठी आणला गेला.

पण पुढे भारत ही आर्यांची मुळभुमी हे अमान्य करण्याची लाट आली. याला कारण ठरला आर्य संकल्पनेला वंश सिद्धांताची जोड देणारा मॅक्समुल्लर. त्याने कलकत्त्यातील रिक्षा ओढणारे आणि बंडातील शिपाई हे आर्य कसे असु शकतील असा प्रश्न उपस्थित केला. युरोपियन विद्वानांनी लगेच आर्यांचे मुळस्थान युरेशियात शोधायची मोहिम सुरु केली. हिटलरनंतर “आर्य” हाच शब्द धोकेदायक वाटु लागल्याने आर्यभाषा गट किंवा पुरा-इंडो-युरोपियन भाषा बोलणारे, त्यांचे मुलस्थान आणि त्यांची विस्थापने याकडे मांडणीची दिशा वळाली. भारतात टिळकांसारख्या विद्वानांनीही आर्यांना उत्तर ध्रुवाच्या निकट शोधले. आर्य सिद्धांतामुळे भारतातही मोठी उलथापालथ झाली.

उत्तरेतील आर्य व दक्षीणेतील द्रविड अशी सरळ विभागणी होत त्याचे सांस्कृतीक व राजकीय पडसाद उमटले. प्रसंगी हिंसा तर विभाजनवादाचा डोंबही उसळला. आजही त्याचे निराकरण झाले नाही. याच सिद्धांतातुन मुलनिवासीवाद ही जन्माला आला.

मुळात आर्य नावाचा वंश पृथ्वीवर कधीही अस्तित्वात नव्हता. किंबहुना वंश सिद्धांतच अशास्त्रीय आहे असे जगातील सर्वच मानव आनुवांशिकी शास्त्रज्ञ मानतात.

इंडो-युरोपियन भाषागट सिद्धांत हा विसाव्या शतकातील सर्वात मोठा फ्रॉड आहे. भाषांच्या वितरणासाठी मानवी स्थलांतरांचीच आवश्यकता नसते तर भुशास्त्रीय कारणेही समान भाषा निर्मितीचे कारण असू शकतात. तरीही स्टीव्ह फार्मरसारखे विद्वान आजही आर्य स्थलांतर सिद्धांताचा पाठपुरावा करीत असतात. भारतीय सांस्कृतीक/सामाजिक/राजकीय इतिहासाची मांडणीही त्याच आधारे झाली. थोडक्यात ती खोटी व दिशाभुल करणारी मांडणी झाली.

 

indian cultural diaspora inmarathi

 

याची मिथकीय प्रतिक्रिया म्हणजे आधी “आक्रमक आर्य” म्हणवत गौरवाने स्वत:कडे पाहणारे वैदिक लोक युरोपियनांच्या पुढे पाऊल टाकत वैदिक आर्य भारतातुनच (हरियाणातून) पश्चिमेकडे गेले व युरोपपर्यंत जात भाषा-संस्कृती पसरवली असे सिद्धांत मांडु लागले. आधीचा धार्मिक श्रेष्ठत्ववाद होताच…त्याला युरोपियन सिद्धांतनाने त्यांना बळ दिले. याही मिथकाला कोणताही शास्त्रीय आधार नव्हता तर जे पुरावे आक्रमण सिद्धांतासाठी वापरले जात होते तेच पुरावे प्रसंगी तोडमोड करत अथवा त्या पुराव्यांनाच नवा अर्थ देत “भारताबाहेर” हा सिद्धांत बनवण्यात आला.

या आर्य सिद्धांताच्या झटापटीत साहजिकच अनार्यांना हीन लेखण्याचा प्रयत्न होत होता. आर्यांनीच आपले मुळ स्थान शोधावे, आपणच सर्व संस्कृती/भाषेचे जब्नक आहोत हे बजावून व तेही अशास्त्रीय सिद्धांतांच्या आधारे सांगावे आणि अनार्यांनी (म्हणजेच अवैदिकांनी) गप्प बसावे असे तर होऊ शकणार नव्हते. तसे झालेही नाही. मुलनिवासी सिद्धांताचा जन्म होणेही मग अपरिहार्यच होते!

एका मिथकातून किती मिथके निर्माण होतात त्याची ही फार छोटी झलक आहे. यात ज्ञान, विज्ञान, इतिहासाचे अन्वेषन व त्या आधारित मांडनीची आवश्यकता नसते हे उघड आहे. किंबहुना छद्म विज्ञानाचाच उद्रेक यात होत जातो.

मिथके मानवी भावनांना कुरवालण्यासाठे सहायक ठरली तरी त्यांचा अतिरेक विनाशकच असतो याचे भान मानवी समाजाला आलेले आहे असे नाही. भिमा कोरेगांव सारख्या मिथकांतून आत्मभान मिळवून देणे हा हेतू असला तरी आत्मभानाची जागा सामाजिक तिढ्याने व विद्वेषाने घेतली असल्याचे आपल्याला दिसेल. मानवी वंशाचा इतिहास अर्थातच या अभिनिवेषी मिथकांतच हरवला जाने स्वाभाविक होते!

भारतात आजही अगणित विनाशक अथवा अशास्त्रीय/अनैतिहासिक मिथके अस्तित्वात आहेत. जातीसंस्थेचे जन्मदाते, संस्कृतची निर्मिती, भारतीय संस्कृतीचे मुलस्त्रोत वगैरे महत्वाच्या बाबीच मुळात मिथकांच्या गडद धुक्यात हरवलेल्या आहेत आणि त्यामुळे अज्ञानमुलक वादांची आपल्याकडे कमतरता नाही. खोटे भ्रम, खोटे वर्चस्ववाद आणि खोटे न्युनगंड यांचीच आपल्या समाजव्यवस्थेत चलती असल्याने आपण आधुनिक काळात एकाही सामाजिक समस्येचे खऱ्या अर्थाने निर्दालन करू शकलेलो नाही. मिथकप्रियता आपली वैरी झालेली आहे. अश्यावेळी समाजातील काही घटकांत क्षत्रीय/राजपूत मुळे शोधण्याची मुढ परंपरा सुरु होते तशीच नागवंशी/सोमवंशी अशा मुळांशे गळामिठे घालण्याची परंपरांही सुरु होते. प्रत्येक जात आपली आधुनिक पुराणे लिहिण्यात व्यस्त होते आणि मिथकांचा पाऊस पडू लागतो.

यात इतिहासाचे स्थान उरलेले नसते हे उघड आहे. येथे “आम्ही तेवढे शहाणे, सर्व भल्या-बु-याचे निर्माते आणि आम्हालाच इतिहास” हा वर्चस्वतावाद्यांचा अशास्त्रीय अहंकार जसा कामाला येत नाही तसाच या खोटेपणाला उत्तरे देण्यासाठी अजुन खोट्या मिथककथा बनवणेही कामाला येत नाही.

कोठेतरी दोन खोटी तत्वे परस्परांशी टक्करतात आणि त्यातुन सामाजिक अनर्थच होतो हे आम्हाला समजायला हवे. मिथकांशी नव्हे तर हाती आलेल्या आणि येत असलेल्या तथ्यांशी इमान ठेवावे लागते याचे भान हवे!

===

InMarathi.com वर विविध लेखकांनी व्यक्त केलेले विचार ही त्यांची वैयक्तिक मतं असतात. InMarathi.com त्या मतांशी सहमत असेलच असं नाही. | आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page । Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?