Site icon InMarathi

भीमा कोरेगावबद्दल, नाण्याच्या “दोन्ही” बाजू

Bhima_Koregaon-inmarathi

news18.com

आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page

===

एखाद्या ऐतिहासिक घटनेतून “काय शिकायचं नाही” हे जर पाहायचे असेल तर भीमा-कोरेगावच्या लढाईबद्दल सुरु असलेला कोलाहल पाहावा. घटनेच्या ऐतिहासिक सत्यतेच्या वादात मी शिरत नाही तो तज्ज्ञांचा प्रांत झाला. “एक समाज” म्हणून आपण याकडे कसे पाहतोय ते पाहू.

एकीकडे या विजयाला (दलितांच्या तुकडीचा संख्येने मोठ्या पेशवाई सैन्यावर विजय म्हणून) एक सामाजिक क्रांतीच झाली असावी जणू असं पाहणे हे एक टोक.

तर उलट बाजूने, महार तुकडी इंग्लिश ईस्ट इंडिया कंपनीकडून लढली म्हणजे हे लोक देशाविरुद्ध लढले असा विचार करणे हे दुसरे टोक…!

 

esakal.com

दोन्ही तर्कांमधील हवा काढून टाकूया.

१. एकतर पेशव्याचे (कितीही वाईट पेशवा असला तरीही) सैन्य हे मराठा साम्राज्याचे सैन्य होते ज्याला ब्राम्हणी वर्चस्वाचे प्रतीक मानले तर अडचण अशी होते की मग महादजी शिंदे, यशवंतराव होळकर वगैरे इस्ट इंडिया कंपनीचे शत्रू जे जरीपटका घेऊनच लढले ते सगळेच वाईट ठरतात.

थोरल्या बाजीराव पेशव्यांच्या काळातच मराठेशाहीचा विस्तार झाला आणि या कालावधीत शिंदे, होळकर, पवार, भोसले, गायकवाड ही घराणी पुढे आली. कान्होजी आंग्रे आणि थोरले बाजीराव हे स्वतंत्र प्रवृत्तीचे लोक कितीही स्वतंत्र वागले तरीही छत्रपती शिवाजी महाराजांनी उभ्या केलेल्या स्वराज्याचेच ते पाईक!

पेशवाई कोसळली ही आपल्या इतिहासातील शोकांतिका आहे…यात “भारतीय” म्हणून साजरे करण्यासारखे काहीच नाही.

फुले-आंबेडकर-शाहूंचा सगळा संघर्ष नंतरच झाला तेव्हा सामाजिक दृष्टीने यातून काहीच बदललं नाही. आणि इंग्लिश सत्तेचा पुळका येत असेल तर हे लक्षात घ्या की, बाकी अनेक समाजांतील लढाऊ गुणांना मान्यता देऊन अनेक रेजिमेंट प्रस्थापित झाल्या.

पण महार रेजिमेंट निर्माण झाली स्वातंत्र्याच्या काही वर्षे आधी १९४१ साली!

२. छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्यात महार होते. भीमा कोरेगावला पेशवाई सैन्य हरले तर मग महारांच्या तुकडीचा जो विजय झाला. तो “राजकीय दृष्ट्या” जरी इंग्लिशांचा विजय असला त्या समाजाच्या दृष्टीने तो एक अभिमानाचा क्षण आहेच. आजही महार रेजिमेंटच्या इतिहासातील एक महत्त्वाची लढाई म्हणून तिची नोंद आहेच.

 

forwardpress.in

त्यामुळे – भीमा-कोरेगावची लढाई ही अतुलनीय पराक्रमाची कहाणी म्हणून साजरी करण्यात दुःख कसले?

मराठा लाईट इन्फन्ट्री उत्तर आफ्रिकेतील आपले पराक्रम साजरे करतेच की…जे ब्रिटिशांसाठी लढतानाच झाले आहेत…!

महार रेजिमेंटच्या (जी भारतीय सैन्यातील एक रेजिमेंट आहे) बोधचिन्हात पूर्वी हा भीमा-कोरेगावचा स्तंभ होता तिथं आता एक खंजीर आलाय. एक परमवीर चक्र, सहा महावीर चक्र, २९ वीर चक्र आणि अनेक इतर शौर्य पुरस्कार या रेजिमेंटने मिळवले आहेत. भारत-पाक व चीन विरुद्ध लढाईतही महार रेजिमेंटची भरीव कामगिरी आहे. “आज” महार रेजिमेंट तिरंग्यासाठी लढते आहे आणि “बोलो हिंदुस्तान की जय” असा तिचा नारा आहे.

 

 

forwardpress.in

जाता जाता – “सामाजिक एकता” शिकायला भारतीय सैन्य एक उत्तम उदाहरण आहे. उगाच त्यासाठी जिग्नेश मेवानी, उमर खालिद छाप लोकांना तसदी देण्याची गरज नाही…! महार रेजिमेंटचे परमवीर चक्र विजेते मेजर रामस्वामी परमेश्वरन जातीने कोण होते? महार रेजिमेंटमधून पुढे आलेले व पुढे लष्करप्रमुख झालेले जनरल के वी कृष्णराव आणि जनरल सुंदरजी कोणत्या जातीचे होते?

कोणत्याही जातीचा अधिकारी अभिमानाने महार रेजिमेंटमध्ये कमिशन घेऊन जातो यात सगळं आलं…

माझ्यासाठी, तिरंग्यासाठी लढणारी महार रेजिमेंट ही अभिमानाची बाब आहे.

===

InMarathi.com वर विविध लेखकांनी व्यक्त केलेले विचार ही त्यांची वैयक्तिक मतं असतात. InMarathi.com त्या मतांशी सहमत असेलच असं नाही. | आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page । Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version