Site icon InMarathi

रेशनकार्ड वर “कुटुंबप्रमुख” म्हणून असलेला उल्लेख पाहून समाधान मानायचं! एक आत्मवृत्त

Indian Father InMarathi

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

लेखिका – सौ. वैशाली पराडकर जोग

“बापाची चप्पल मुलाच्या पायाला येऊ लागली की त्याला मित्रासारखा वागवावा” असं संस्कृत सुभाषित आहे. हल्ली बापाची चप्पल मुलाच्या पायाला येते आणि नंतर ती त्याला लहानही होऊ लागते. त्यामुळे मुलगा आधी आपला मित्र होतो मग आपण त्याला ज्युनियर होतो.

पुढे कॉम्प्लान नामक एका भुकटीचा शोध लागून मुले इतकी जलद वाढणार आहेत याची बिचार्‍या संस्कृत सुभाषितकारांना काय कल्पना असणार? याचा एक फायदा मात्र होतो. मुलगा आपल्यापेक्षा उंच झाला की आपण मान वर करून मुलाकडे पाहू शकतो.

 

 

हे सांगायचं कारण असं की आपण कुटुंबप्रमुख आहोत म्हणजे ते प्रमुखपण नेमकं कुठे दाखवायचं असतं या शोधात आहे मी सध्या. मला काही करायचं की ते पाहून मुलांच्या मनावर त्याचा काय परिणाम होईल याचा विचार करावा लागतो. अन्यथा मुलं अनुकरणातून शिकतात वगैरे आधुनिक बालमानसशास्त्राचे बाळकडू पाजले जाते.

लहानपणी क्रिकेट खेळताना मी शिवी दिली. ही गोष्ट चाळीतल्या कुणीतरी तत्परतेनं बाबांपर्यंत पोचवली. त्यावरून यथेच्छ कोरडी धुलाई झाल्यावर बाबा सुरक्षित अंतरावर गेल्याची खात्री करून मी आईजवळ जोरात “मी शिवी दिली म्हणून मला तेवढं मारलं आणि ते स्वत: नाही का नेहमी… ” एवढं म्हणतो तो पुढचं म्हणूही न देता आईने मला “ते मोठे आहेत ना?” असं म्हणून दटावलं आणि खाऊ दिला.

 

प्रश्न वर्तणुकीचा नसून वयाचा आहे अशी खूणगाठ बांधून मी पुन्हा खेळायला गेलो.

त्याकाळी घरोघरी अशी धुलाई उघडपणे होत असल्याने मित्रांसमोर अपमान झाल्याने मनावर परिणाम वगैरे भानगड नसायची. “वश्याला धुतला आज बापानं” म्हणून वश्यासकट सगळे फिदीफिदी हसायचे.

पण मी असं काही सांगायला लागलो की बायको माझ्याकडे असं काही पाहते की जणू काही मीच एकटा जुन्या पिढीतला आहे आणि ती मात्र जवळजवळ मुलांच्या पिढीतली आहे.

घरातला एखादा निर्णय घेताना तरी हे कुटुंबप्रमुखपद वापरायला मिळायला हवं की नको? तर ते ही नाही. आता मागच्याच महिन्यातलं उदाहरण सांगतो.

मी मुलीला म्हटलं परवा आत्या येणार आहे. तेव्हा संध्याकाळनंतर घरीच थांब. “माझं शिवानीकडे स्लीपओव्हरला जायचं ठरलंय आधीच.” मुलगी नाक उडवत म्हणाली…!

“अगं मग हे आधी सांगायला नको का आम्हाला?” मी.

“मम्माला माहीताय.” मुलगी.

“अग तुला माहीत होतं ना ताई येणार आहे ते? तू हो कसं म्हणालीस?”

“ताईंनी कळवायच्या आधीच ठरलं होत तिचं.” बायको.

“नंतर केव्हातरी जा मैत्रिणीकडे. आत्या काय रोज येणारे का?” मी.

मायलेकींनी कुठल्यातरी सांकेतिक भाषेत एकीमेकींकडे पाहिले. आई दारआडून माझ्याकडे पहात होती. मी तिची नजर चुकवली. बाबांचा बहिरेपणा माझ्या पथ्यावर पडला.

मावशी अचानक येते तेव्हा नेमके महत्वाचे लेक्चर्स कसे रद्द होतात? मग कसा सिनेमाला शॉपिंगला जायला वेळ मिळतो? असं काहीही मी विचारलं नाही.

“आमच्यावेळी…” चं माझं तुणतुणं ऐकण्यात कुणालाही स्वारस्य नव्हतं. मग आसपासच्या शांततेवरून बिनआवाजी मतदानाने माझा प्रस्ताव फेटाळला जाणार असल्याचं माझ्या लक्षात आलं. तणाव टाळण्यासाठी मी लॅपटॉपवर गेम खेळायला घेतला तेव्हा त्यातही मुलाला गेम खेळण्यावरून ओरडण्याचा माझा अधिकार हिरावून घेतला जाण्याचा धोका मी पत्करला होता.

 

माझ्या या “नामधारी” कुटुंबप्रमुखपदाला सर्वात जर का कोण जबाबदार असेल तर हे *****चे जाहीरातवाले.

या जाहिरातींमधे टूथपेस्टपासून वॉशिंग मशीनपर्यंतची खरेदी ह्या घरोघरच्या सुपर वुमन त्यांच्या अद्भूत बुद्धीच्या मुलांच्या सल्ल्याने करत असतात.

विशिष्ट मीठ वापरून मुलीला कलेक्टर बनवणार्‍या आईपासून ते नातवाला कंपेअर करून पॉलिसी घ्यायला शिकवणार्‍या आजीपर्यंत. आणि भिंतीला अमुक पुट्टी लावली नाही म्हणून बापावर डाफरणार्‍य‍ा नखभर कार्ट्यापासून ते लांबून आलेल्या मामामामीची नुसत्या शीतपेयावर बोळवण करणार्‍या भाचीपर्यंत, या जाहीरातदारांनी खरेदीची मक्तेदारी या बायकापोरांवर सोपवलेली आहे. आपली सुपर मॉमच सगळे निर्णय घेऊ शकते अशी बालंबाल खात्री झाल्यानं ही पोरं बापाकडे दयाबुद्धीने पहात असतात.

सिनेमातला सुपर मॅनही फक्त काही नैसर्गिक सामाजिक आपत्ती कोसळली तरच येतो. स्वत:च्या कौटुंबिक बाबींमधे तो ही ढवळाढवळ करत नाही.

ते सगळं जाऊ देत. साधं टी.व्ही.चं उदाहरण घ्या. हे उपकरणही आपल्या वाट्याला फारसे येत नाही. एच.डी. टी.व्ही. वर बायको राष्ट्रभाषेतल्या सासूसुनांच्या मालिका पहात असते.

जुन्या छोट्या टी. व्ही. वर आई प्रादेशिक भाषेतल्या सासूसुनांच्या मालिका बघत असते. त्या फारशा आवडत नसल्याचा आव आणून बाबाही पहात असतात. मी दोन दोन टी.व्ही. घेऊन किमान घरातला भाषावाद मिटवण्यात यशस्वी होण्यातच समाधान मानून घेतो.

 

नवरा कामावरून येईस्तोवर सासूसुना मिळून जुना फ्रीज अॉनलाईन विकून लगोलग नवा टी.व्ही. घेऊन टाकल्याची जाहीरात माझी आई आणि बायको अगदी मजेत पाहतात. तो नवरा ते गोड सरप्राईज पाहून बायकोच्या चातुर्याचं कौतुक करतो. असं सरप्राईज बायकोला देण्याचा प्रयत्न धाडसी नवर्‍यांनी करून पहावा.

आमच्यावेळी काही नवीन वस्तू घ्यायची की आई गरम थालीपीठाव ; खरं तर डोक्यावरही; लोण्याचा गोळा घालून मग चाचपडत प्रस्ताव मांडायची. मग अगदी ती वस्तू तांदूळाच्या डब्याच्या तळात ठेवलेल्या भिशीच्या पैशातून का आणायची असेना!

सहलीला जायचं तरी आईच्या मध्यस्थीने बाबांची परवानगी काढायची. आईची डाळ न शिजल्यास काकू आजी अशी मोर्चेबांधणी केली जायची. बाकीची सगळी मुलं येणार आहेत ही थाप प्रत्येकाने आपापल्या घरी मारलेली असायची.

तर हे सगळं आठवायचं कारण आता कशासाठीही माझी परवानगी कुणालाही लागत नाही. माझी आईसुद्धा काही हवं असलं की; त्रिफळा चूर्ण ओवा अर्क वगैरे; आपल्या खरेदीत चतुर असलेल्या सुनेलाच सांगते. वरती “त्याला सांगून काही उपयोग नाही. त्याच्या काऽही लक्षात रहात नाही.” असंही म्हणते. (आई, यू टू? 🙁 )

 

वार्‍याची दिशा ओळखून आईने योग्य वेळी पक्षांतर केलेलं असतं. बाबांची “कोणता झेंडा घेऊ हाती?” अशी स्थिती झालेली असते. वयामुळे घरगुती पातळीवर त्यांना आदराने सत्ताहीन केलेलं असतं. नमस्कार करून घेणे आणि आणीबाणीचा प्रसंग आल्यास सल्ला द्यायला मिळण्याच्या शक्यतेवर समाधान मानून घेण्याशिवाय त्यांना पर्याय नसतो.

आमच्याकडे सासूसुनेत फारसे गंभीर वाद नसल्याने मी आणि बाबा मिळून विरोधी पक्ष म्हणून देखील मान्यता मिळण्याइतके संख्याबळ नसते आणि ऐनवेळी बाबा तटस्थ रहाण्याची जोखीम असल्याने मी डिपॉझिट जप्त झालेल्या अपक्ष उमेदवारासारखे फक्त चिंतन करत असतो.

आता हिंदू पर्सनल लॉ आणि रेशनकार्ड यावरचा आपला कुटुंबप्रमुख म्हणून असलेला उल्लेख पाहून समाधान मानायचं असं मी ठरवलेलं आहे. त्यामुळे मी माझी मौलिक मतं फक्त उच्च अशा राजकीय सामाजिक सांस्कृतिक पातळ्यांवरच देत असतो. वेगवेगळ्या निवडणूका ओपिनिअन पोल पब्लिक सर्व्हे रिअॅलिटी शोज इत्यादी.

सिलेंडर जोडणे फ्यूज बदलणे पार्किंगमधून कार बाहेर काढून देणे आणि आल्यावर रिव्हर्समधे लावणे टू व्हीलर बटण स्टार्ट न झाल्यास किक स्टार्ट करून देणे लॉफ्टवरून जड वस्तू काढणे आणि ठेवणे अपरात्री गाडीत इंधन भरून आणणे अशा काही कौटुंबिक गोष्टींमधे सहभागी होण्याची संधी मला अधूनमधून मिळत असते त्यातच आता मी समाधान मानून घेतो !!

एका पुरूषाच्या दृष्टीकोनातून विभक्त कुटुंबपद्धतीत बदललेल्या कुटुंबप्रमुखाच्या स्थानाचा विचार करणारा, सौ वैशाली पराडकर जोग ह्यांचा लेख.

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

InMarathi.com |वर विविध लेखकांनी व्यक्त केलेले विचार ही त्यांची वैयक्तिक मतं असतात. InMarathi.com | त्या मतांशी सहमत असेलच असं नाही. आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्रामशेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version