आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
===
लेखक – उदय सप्रे
===
इन्सान की औलाद है इन्सान बनेगा!
मंडळी, अापण अनेकदा वाचलंय की अमुक तमुक व्यक्तीला अमुक तमुक संन्यासी बाबांनी वा बुवांनी अाशीर्वाद दिला की “जा बाळ , तू मोठ्ठा कलाकार होशील!” अाणि मग तो अमुक तमुक इसम खरंच तसा घडतो!
पचवायला जड असतात अशा गोष्टी. पण अाज मी तुम्हाला एक अशी हकिगत सांगणार आहे की जी वाचल्यावर तुमच्या लक्षात येईल की या हकीगतीमधला हा बालक, जो मोठेपणी एक अद्वितीय कलाकार व एक उत्कृष्ट माणूस म्हणून नावारूपाला अाला.
अाणि ज्याचं संपूर्ण श्रेय हे केवळ त्याला अाशीर्वाद देणार्या त्या अनामिक गुमनाम फकिराचं नसून त्या बालकाच्या स्वत:च्या वेडात अाणि त्या वेडापायी एकेकाळी सर्व त्याग करून घेतलेल्या अविश्रांत मेहनतीचं अधिक अाहे!
चला तर मग, सुरुवात करतो…..
पंजाबमधल्या अमृतसरमधे कोटला २५ कि.मी. वर मजिठा तालुक्यात सुलतानसिंग नावाचं एक खेडेगांव (याला पंजाबी भाषेत पिंड म्हणतात.). तिथे मोहम्मद हाजी अली नावाचे एक गृहस्थ रहात — त्यांना अपत्य होती— ६ मुलगे व २ मुली. ६ मुलांपैकी ५ व्या क्रमांकाचा मुलगा होता फिको. जो जन्मला २४ डिसेंबर १९२४ रोजी.
कालांतराने मोहम्मद हाजी अली यांनी लाहोरला स्थलांतर केलं अाणि तिथे ते भाटीगेट येथील नूर मोहल्ल्यात एका माणसाचं सलून चालवत. फिको एव्हाना ६ वर्षांचा झाला होता. गल्लीमधे येणारे एक फकीर गाणं गाऊन खैरात मागायचे. अापल्या महाराष्ट्रात याला वासुदेव म्हणतात!
फिकोला त्यांचा अावाज प्रचंड अावडायचा.त्यामुळे फिको त्यांच्या मागेमागे फिरायचा. फकीर दमून कुठेतरी अारामासाठी टेकायचा अाणि त्या वेळात हा चिमुरडा फिको त्या फकिराच्या गाण्यांचा सराव करायचा.
यापैकी एक गझल होती “खेदन दे दिन चार”. हळुहळु फिकोच्या जीवनातला हा एक नित्यक्रमच होऊन गेला होता.एक दिवस त्या फकिराने फिकोला आपली गाणी म्हणताना ऐकलं. तो प्रसन्न झाला व फिकोला कडेवर घेतलं! { हल्लीच्या ६ वर्षाच्या मुलाला कडे ला घ्यावं लागतं ! } फकीर फिकोला म्हणाला,
“बाळ, तू एक दिवस खूप मोठा गायक होशील!” तेंव्हा फिको अवघ्या ६ वर्षांचा होता!
फिकोचा मोठा भाऊ मोहम्मद दीन याचा एक मित्र होता — अब्दुल हमीद.
या फकीरबाबा घटनेनंतरंच काही दिवसांनी फिको हमीदबरोबर एका दुकानात गेला होता.फिको पंजाबी गाणं गुणगुणंत होता.संगीतातील कुणी उस्ताद काहि खरेदीसाठी तिथे आले होते. फिकोचं गाणं ऐकून प्रभावित होत त्यांनी हमीदला सांगितलं’
“या लहान वयात इतका गोडवा असलेला हा मुलगा मोठेपणी महान गायक झाल्याशिवाय रहाणार नाही!”
हमीदनं हे फिकोचं कौतुक फिकोच्या अब्बूंपर्यंत पोचवलं अाणि फिकोचं शास्त्रीय संगीताचं शिक्षण सुरू झालं — उस्ताद अब्दुल वाहिद खान, उस्ताद छोटे गुलाम अली खाँ, पंडित जीवनलाल मुट्टो चे चिरंजीव जवाहरलाल यांच्याकडे!
फकीरबाबाचा आशीर्वाद फळला…
बोलाफुलाला गाठ पडते कधी कधी.. फिकोच्या बाबत ते लवकरंच घडायचं होतं. त्याचं असं झालं, हमीदला फिकोचा गाण्याबद्धलचा लळा ठाऊक होता. इंग्लंडमधे सहाव्या जाॅर्जचा वाढदिवस होता.
त्यानिमित्त १४ डिसेंबर १९३८ रोजी लाहोरमधे एका मोठ्या प्रथितयश गायकाचा कार्यक्रम होता. फिकोच्या मोठ्या भावाचा मित्र —अब्दुल हमीद फिकोला घेऊन त्या कार्यक्रमाला गेला.
खच्चून गर्दी जमलेली. गायक महाशय माईकसमोर येऊन गायला लागले आणि काही सेकंदांतंच माईकची तांंत्रिक व्यवस्था फेल झाली. त्यामुळे गायक महाशयांचं गाणं काहि श्रोत्यांपर्यंत पोचेना. श्रोत्यांचा आरडाओरडा सुरु झाला. आयोजक हवालदिल! तेंव्हा हमीदनं मौकेपे चौका मारायचं ठरवलं.
तो फिकोला घेऊन आयोजकांकडे गेला व माईकशिवाय फिकोला रंगमंचावर गायला संधी द्यायची विनंती केली! बारकुड्या १४ वर्षांच्या फिकोला बघून आयोजकांना खात्री वाटणं शक्यंच नव्हतं.
तसं तर काय १९८९ ला कराचीमधे क्रिकेट कसोटिमधे भारताच्या ४१ ला ४ बाद अशा दयनीय अवस्थेत असताना ६ व्या क्रमांकावर खेळायला आलेल्या बारकुड्या १६ वर्षांच्या सचिन तेंडुलकरविषयी पण कुणाला खात्री होती म्हणा!
पण पहिला बाऊन्सर व दुसरा बीट झालेला गुड लेंग्थ चेंडू विसरत सचिननं लाँग ऑनला सणसणीत चौकार ठोकून — बाळाचे पाय पाळण्यात दिसतात या धर्तीवर आपली बॅट मैदानात दाखवून दिलीच की महाराजा!
पण आता हा बारकुडा फिको पण आयोजकांना देवदूतासारखा भासला व त्यांनी फिकोला गायला परवानगी दिली! त्यादिवशी माईकशिवाय आपल्या खणखणीत आवाजात फिको असा काही गायला की जनता खुश व गायक महाशय पण एकदम प्रभावित! त्यांनी फिकोला आशीर्वाद दिला :
“एक दिवस तू मोठ्ठा गायक होशील!”
माईकशिवाय शेवटच्या रांगेपर्यंत अावाज पोचवणार्या फिकोवर खूश होत पुढे त्या महान गायकाने लाहोर रेडिओकडे त्याची शिफारस केली आणि त्यामुळे फिकोला रेडिओ लाहोरवर गायची संधी मिळाली!
त्याची लाहोर रेडिओवरची गाणी ऐकून संगीतकार शामसुंदर प्रभावित झाले व त्यांनी फिकोच्या कामगिरीवर खुश होऊन लवकरंच गुलबलोच नामक अापल्या संगीत दिग्दर्शनाखाली फिकोकडून ‘सोणिये नी हीरिये नी’ हे झीनत बेगम बरोबरचं युगुल गीत गाऊन घेतलं व अशा प्रकारे १९४१ साली रिलीज झालेल्या पंजाबी गाण्याद्वारे आपल्या सिनेजगतातील पार्श्वगायक म्हणून फिकोनं वयाच्या १७ व्या वर्षी पदार्पण केलं! मंडळी,
ज्या प्रथितयश गायकानं फिकोचं कौतुक करंत आशीर्वाद दिला तो महान गायक म्हणजे कुंदनलाल ऊर्फ के.एल्.सेहगल आणि हिंदी—उर्दू मातृभाषा असून ज्यानं पंजाबी गाण्यानं अापल्या पार्श्वगायनाची सुरुवात करत पुढे ३९ वर्षं हिंदी सिनेजगतात आपलं ध्रुवपद निर्माण केलं, तो हा फिको म्हणजेच २४ डिसेंबर १९२४ रोजी जन्मलेला अाणि वयाच्या अवघ्या ५६ व्या वर्षी ३१ जुलै १९८० रोजी रात्री १०.२५ ला अल्लाला प्यारा झाला, तो फिको म्हणजे मोहम्मद रफी!
मंडळी रफी हा एक शब्दातीत विषय अाहे ! अहो , त्याच्या करिअरच्या सुरुवातीपर्यंतची ही हकीगत! रफी आपल्यासाठी इतकी बेशकिमती सुरेल गाणी गाऊन गेलाय की नुसते मुखडे ऐकायचे हटलं तरी आठवडा सरेल! रफी आपणास तुम मुझे यूँ भुला न पाओगे हे सार्थ आव्हान देऊन गेलाय!
मंडळी, गाणी आणि संगीत बाजूला केल्यावरंच जे शिल्लक उरतं ते रफीचं एक माणूसपण आणि हे माणूसपणंच रफीला देवमाणूस या सार्थ पदवीपर्यंत घेऊन जातं.
रफी माणूस म्हणून इतरांपेक्षा कसा आणि किती वेगळा होता हे कळल्याशिवाय त्याच्या आजन्म निर्व्याज हसर्या चेहेर्याचं आणि सच्चा सुरांचं रहस्य कधीही जाणून घेता येणं अशक्य आहे. हे आणि हे एवढंच सांगायचा माझा उद्देश असेल आजच्या लेखाचा.
रफी जाणून घेण्यासाठी तुम्हाला रफीच्या माणुसकीचे आणि इतर पण काहि हकिगतमय किस्से सांगतो ….
रफीच्या मोठ्या मुलाने सांगितल्याप्रमाणे, रफीला बॅडमिंटन खेळायला खूप अावडायचं. घरी अाल्यावर थोडासा वेळ असला की रफी लगेच बॅडमिंटन खेळायचा. ती बॅट अजूनही जपून ठेवली अाहे. रफीचा हात लागल्यावर त्या रॅकेटला किंबहुना या खेळालांच आता BAD minton न म्हणता GOOD minton म्हणून सरकारनं जाहिर करावं असं मला मनापासून वाटतं.
रफीला दुसरा अावडता छंद होता कपड्यांचा. चांगलं रहाणीमान अाणि टापटिप कपडे रफीला खूप अावडायचे. म्हणून तर तो Mr.Clean होता ना महाराजा! रफीला कुठलंहि व्यसन नव्हतं.
रफींबद्दल असं म्हटलं जायचं की गाण्याचं कागद त्यांच्या पुढे सरकवायचा आणि नजर फिरवताच सूर तयार.. ही रफीसाहेंबाची विशेष शैली होती.. तसंच नायक बघून ते गाण्याचा सूर आणि मूड तयार करायचे… हाच मूड त्यांचा घरी आल्यावरही असायचा.
रफींच्या कुटुंबातला प्रत्येक जण आजही त्यांच्या आठवणींनं भावूक होतो. एफ एम असो वा रेडिओ तसंच टीव्ही : असा एकही तास रफींनी गायलेल्या गीताशिवाय जात नाही.
त्यामुळे कुटुंबाला आजही रफी घरातच वावरत असल्याचा भास होतो. रफींचे ज्येष्ठ चिरंजीव बाबांची आठवणी सांगताना खुपच भावूक होतात. शाहीद रफी म्हणतात, “बाबा आमच्यात नाहीत असं अजुनही आम्हाला वाटत नाही.
ते सदैव कुटुंबासोबत असतात. बाबांचं मधाळ आवाज दिवसभरातून किमान चार-पाच वेळा तरी आम्ही ऐकतो. त्यामुळे बाबा सतत आमच्यात आहेत असंच आम्ही समजतो.
कधी हॉटेलमध्ये , कधी सिग्नलला, कधी लोकलमध्ये तर कधी टॅक्सीत सतत बाबांची गाणी वाजत असतात. त्यामुळे आम्हाला बरं वाटतं, तर कधी हेवा वाटून विचार येतो बाबा आपल्यात असायला हवे होते.”
फावल्या वेळेत बाबांसोबत आम्ही मनसोक्त हिंडायचो.. असंही शाहीद सांगतात.. रफींना सुट्टीचा दिवस आपल्या कुटुंबासोबत घालवायला आवडायचा. तसंच त्यांना नातवंडासोबत खेळायलाही खूप आवडायचं.
‘बाबूल..’ बद्दल रफी यांचा मुलगा शाहीद रफींबद्दल अविस्मरणीय प्रसंग सांगतात, “हमारी बडी बाजी { म्हणजे रफीची मोठी मुलगी } अब्बू के बहुत लगाव और प्यार था. बाजी के विदाई समय अब्बू बडे उदास थें.
बाजी के जाने के बाद अब्बू बहुत देर अकेले बैठे रहे. इसके दो दिन बाद ही नीलकमल की रेकॉर्डींग थी. और अब्बू ने वह बेशकिमती गाना गाया.” या गाण्याबद्दल रफी बीबीसीच्या एका मुलाखतीत म्हणतात,
“हे गाणं मी गायलं खरं, पण ज्यावेळी नीलकमल पाहिला व गाणं आणि बिदाईचा प्रसंग बघून मी खूप भावनिक झालो आणि मला रडू कोसळलं.. मुलगी बिदा झाली त्यावेळी मी रडलो नाही पण, हे गाणं पडद्यावर बघून मी खूप रडलो.”
मोहम्मद रफी व्यवहारात मितभाषी होते. त्यांचं आणि लता मंगेशकरांचं गाण्यांच्या रॉयल्टीवरून मोठा वाद झाला होता. रफी रॉयल्टीच्या विरोधात होते. गाण्याचे पैसे निर्माते देतात मग रॉयल्टी का घ्यायची अशी रफींची भूमिका होती.
लता दिदी मात्र उलट विचाराच्या होत्या. तसंच आशा भोसले यांच्यासोबत रफींचे अनेकदा वाद झाले. हे वाद मात्र स्टुडिओ माईकवर आल्यास शमायचा. याव्यतिरिक्त रफींचा कुठलाही, कुणाहीसोबत वाद झाल्याची नोंद आढळत नाही.
===
भाग २ : “सामने शेर है, डटे रहीयो!” : मोहम्मद रफी जीवन प्रवास (भाग २)
===
भाग ३ : ज्वारीच्या भाकऱ्या आणि मिरचीचा ठेचा: मोहम्मद रफी जीवन प्रवास (भाग ३)
—
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
===
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
–
इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
InMarathi.com वर विविध लेखकांनी व्यक्त केलेले विचार ही त्यांची वैयक्तिक मतं असतात. InMarathi.com त्या मतांशी सहमत असेलच असं नाही. | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर । इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.