एक सफर ताडोबाची…
आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page
===
काल रात्रीपासून ताडोब्यात अचानक चिल वेव्ह सुरु झाली आहे. एकाएकी पारा घसरला आणि सगळे गारेगार झाले. पायाच्या अंगठ्यातून घुसणारी थंडी हळूच स्पाईन मार्गे जावून मेंदूला झिणझिण्या आणायला लागली आहे. थंडी हा प्रकार मला काही नवीन नाही, आइसलँडच्या मायनस तापमानात आणि लडाखच्या हाड गोठवणाऱ्या तापमानात मी भटकलो आहे.
पण माणूस तिथे मेंटली प्रिपेयर्ड असतो.
ताडोबाला अशी थंडी असु शकते ही गोष्ट मेंदू आज रजीस्टर करायला तयारच नव्हता. पार्कमध्ये शिरल्यावर आजचा दिवस “खाडेवार” आहे असा मला फील यायला लागला. तेलीया तलावावर चक्कर मारून जामनी आणि पांढरपौनी करून यावे असे काहीसे माझ्या डोक्यात आले होते. आमची गाडी तेलीया तलावाच्या दिशेनी निघाली आणि मी जरा स्वतःला अनकम्फर्टेबल फील करायला लागलो.
असे वातावरण असले की जंगल भयाण शांत होते. जंगलातले सर्व जीव या थंडीत शक्य असेल तिथे ऊब मिळवायचा प्रयत्न करतात. जणू काही सर्व जंगलाने गोधडी ओढली आहे. याला मात्र बऱ्याचवेळा अपवाद वाघ ठरलेला आहे. जवळपास फ्रीझिंग तापमानात मी बांधवगढला वाघाला पाण्यात बसलेला बघीतला आहे तर याच वेड्या थंडीत कान्हाला मेल टायगर आरामात रस्त्यावर भटकतांना.
आज मात्र का ते माहीत नाही पण वाघ दिसेल याची शाश्वती वाटत नव्हती. वाघाच्या दर्शनाला खरं तर कशाचाच मुहूर्त लागत नाही, ना ऋतू ना वेळ, पण आज गेटवरच असे निगेटिव्ह विचार मनात या भयाण चिल वेव्हमुळे येत होते.
तेलीया तलावाची चक्कर मारत असतांनाच आम्हला पंधराव्या मिनिटाला बांबूच्या बेटात एका मोठ्या झाडाच्या पायथ्याशी बसलेला मोठा मेल टायगर दिसला. वाघाच्या त्या दर्शनानेच क्षणार्धात सगळी मरगळ धुवून निघाली,पॉझीटीव्ह विचार डोक्यात धावायला लागले.
त्या सिंहासनावर बसलेला तो सम्राट कसला देखणा दिसत होता. थोडीशी वाढलेली दाढी, स्वछ पांढरा आणि टावनी कोट, एक खांदा थोडासा समोर आणून आपले बाहुबल दाखवायची त्याची स्टाइल आणि सर्वांकडे रोखून बघणारी त्याची नजर. सगळे दृश्य कसे नजरबंदी करणारे. बांबूच्या बेटाशी सम्राटांना फोटोग्राफ करण्याची विशेष संधी नव्हती. आम्ही त्यांच्या प्रतिमा डोळ्यात साठवून घेत पुढे निघालो.
तेलीया तलाव पार करून मेन रोडवर आलो तर ढोल ( ढोबळ भाषेत जंगली कुत्रा ) दिसला. एकवेळ वाघाला नाही घाबरले तर चालेल पण जंगली कुत्र्यांपासून समस्त जीवांनी दूर रहावे. अतिशय क्रूर असा हा शिकारी प्राणी आहे. वाघ किंवा सिंहांनी केलेले हंटींग हे प्रे साठी पेनलेस असते.
फाशी जशी पेनलेस असते तसे.
ढोल मात्र समोरच्या प्राण्याला जवळपास प्रत्येक शिकारीत तो जिवंत असतांनाच खायला लागतो. लचके तोडून खाणे म्हणतात न तसे. या प्राण्यांपासून वाघ देखील थोडासा दूरच असतो. शक्तीशाली प्लस पॅकमध्ये राहणारा हा जीव दिसायला मात्र देखणा आहे. ढोल रस्ता क्रॉस करून गेला आणि आम्ही पुढील सफारीस निघालो.
फिमेल बार्किंग डियर समोरच एका झाडाच्या पायथ्याशी चरत होते. अतिशय लाजाळू असेलेले हे हरीण वाईल्डलाईफ फोटोग्राफरसाठी डबल ऑप्युरचीनिटी असते. त्यांचे कॉलींग म्हणजे लेपर्ड किंवा वाघ असल्याची खात्री आणि दुसरे म्हणजे दिसायला अतिशय देखणे. लाजाळू फिमेलनी मात्र आज बरेच फोटो दिले.
थोड्याच पुढे गेल्यावर बार्किंग डियरचा मेल देखील मिळाला. छोटीशी शिंगे असलेला हा देखणा जीव. एखाद्या नर्तकीने एक एक पाऊल टाकत स्टेजवर प्रवेश घ्यावा तसा हा एक एक पाऊल टाकत, वेगवेगळे मुद्रा अविष्कार दाखवत अँटी एंट्री घेतली आणि मग बरेच सारे फोटो काढू दिले.
गवा मात्र आजच बिग अट्रक्शन ठरला . कोसेकोनारला काहीही न मिळाल्यामुळे आम्ही पांढरपौनी मार्गे परतत होतो. वाटेतच आम्हाला गव्यांचा मोठा कळप दिसला, अल्फा मेल, दोन तीन फिमेल्स आणि चार छोटी पिल्ले. पायात पांढरे सॉक्स घातलेला हा प्रचंड फोटोजेनिक आहे. शांतपणे बघत आणि निरीक्षण करत आम्ही पुढे निघालो.
सफारी तशी छानच झाली. गंमत कशी असते न, आपल्याला आता वाघ दिसत नाही आहे म्हंटले की आपण दुसरे काही तरी शोधायला लागतो आणि मग अनेक छोटी मोठी रत्ने माणके गवसतात. आज चक्क रिंग टेल्ड कॅट दिसली, कारण शांतपणे जात होतो.
ही मांजर रेयरेस्ट ऑफ रेयर्स आहेत. टूर ऑपरेटर म्हणून मला तरी नेहमी वाटते की वाघ ८ पैकी ४ च सफारीत दिसावा, म्हणजे लोक बाकी सर्व बघायला लागतील. पण मला ………….!!!
===
InMarathi.com वर विविध लेखकांनी व्यक्त केलेले विचार ही त्यांची वैयक्तिक मतं असतात. InMarathi.com त्या मतांशी सहमत असेलच असं नाही. | आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page । Copyright (c) 2017 InMarathi.com | All rights reserved.