गुजरात, हिमाचल निवडणूक निकाल : “जे गांडो थयो?” – नेमकं वेडं कोण झालंय?
आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page
===
खरंच नक्की कोण वेडा झालंय? राहुल म्हणतात तसा विकास, काँग्रेसी प्रवक्ते, हार्दिक म्हणतात तसा EVM की सलग पाचव्यांदा भाजपला जिंकुन देणारे मतदार..?? ह्याचं छान गर्भित उत्तर काँग्रेस नेत्या रेणुका चौधरींनी संसद भवन परिसरात NDTV च्या पत्रकाराला दिलं. पत्रकाराने विचारल्यावर त्या काय म्हणतात बघा.
प्रश्न: तुम्हाला काय वाटतं की गुजरातची हार ही राहुल गांधींची हार आहे?
रेणुका चौधरी : अख्ख केंद्रीय, राज्य मंत्रिमंडळ, विविध मुख्यमंत्री, स्वतः पंतप्रधान जेंव्हा ९ दिवस तळ ठोकुन बसतात तेंव्हा कुठे त्यांच्या गुजरातमध्ये जेमतेम बहुमताच्या जागा येतात. आणि आमच्याकडे राहुलजींनी एकट्याने प्रचाराची सूत्र सांभाळली, हार्दिक सारख्या युवा नेतृत्वाला बरोबर घेऊन त्यांनी सर्वसमावेशक राजनीतीचा प्रयत्न केला, भाजप सारखं नाही की दोन व्यक्तीच निर्णय घेणार आणि बाकीचे माना डोलावणार.
प्रश्न: मग हिमाचलचं काय..?? तिकडे तुम्ही का हरलात..?? तिकडे तर भाजपचा संपूर्ण फौजफाटा सुद्धा नव्हता, मग तुमच्या तर्कशास्राने काँग्रेस तिकडे जिंकायला हवी होती की नाही..??
रेणुका चौधरी: तिकडे anti incumbency factor खुप मोठा होता. सलग ‘५’ वर्ष (एक टर्म) सत्तेत राहिल्यावर तो असणारच ना. तो होता म्हणुन हरलो, राहुलजींचा ह्यात काय दोष? उलट दोष घ्यायचाच असेल तर मोदीजींना द्या. त्यांच्या प्रचारसभांमुळे, सारख्या गुजरात दौऱ्यांमुळे संसदेच्या कामात व्यत्यय येत होता. संसदेचा बहुमूल्य वेळ आणि पैसा मोदींमुळे वाया गेला ह्याचा हिशेब मोदीजी देणार का?
===
ज्या पक्षाची एक ज्येष्ठ सदस्या अशी वक्तव्य करत असेल, प्रवक्ते सकाळी ९ वाजता (जेंव्हा ट्रेंड ८८ काँग्रेस आणि ७८ भाजप दाखवत होते) म्हणत असतील की आम्ही EVM वर कधीच संशय घेतला नाही आणि त्याच पक्षाचे प्रवक्ते शकील अहमद दुपारी १ ला म्हणत होते की सुरत मध्ये मोदी-शहांच्या सभेत खुर्च्या रिकाम्या, अमित शहाला हुसकवण्यात आलं त्या सुरत-सौराष्ट्रमध्ये भाजप इतक्या जागा निवडुन आणते म्हणजेच EVM घोटाळा झाला आहे. त्याच बरोबर अनेक तथाकथित उच्च पुरोगामी देखील हाच सूर आवळतात तेव्हा हा सगळा कारभार बघितला की, उत्तर सापडतं नक्की कोण वेडा झालाय.
एक गोष्ट सगळ्यात आधी भाजप समर्थक/मोदी भक्त आणि काँग्रेस समर्थक/राहुल भक्त, शिवसेना, केजरीवाल, असंख्य पुरोगामी ह्या सगळ्यांनी ध्यानात घ्यावी ती म्हणजे मोदी-शहा हे कुणी जादुगार किंवा अजेय नाहीत की, ज्यांना परास्त करणं अशक्य आहे. ह्यांना परास्त करणं शक्य आहे आणि त्याचा फॉर्म्युला आहे ते म्हणजे जीवतोड मेहनत आणि अत्यंत संघटित, शिस्तबद्ध नियोजन.
मोदी-शहा ह्या जोडगोळीला गुजरातच्या ह्या निकालांची अपेक्षा असावी म्हणुनच उत्तर प्रदेश निकालांनंतर शहा केरळ, त्रिपुरा ह्यांच्या दौऱ्यानंतर सरळ गुजरातला गेले. स्वतःचा बालेकिल्ला वाचविणे हे ध्येय तर होतंच पण GST आणि नोटबंदीमुळे दुरावलेल्या पक्के व्यापारी असणाऱ्या गुजराती समुदायाच्या मतांची बेगमी करणं हे आव्हान देखील होतं. ही बाब वाटते तितकी सोपी नाही. आणि २२ वर्षांच्या सलग सत्तेच्या anti incumbency आणि पाटीदार-पटेल व ओबीसी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर केक वॉक तर नक्कीच नाही आणि म्हणुन मोदी-शाह ह्यांना ही पक्की खात्री होती की, गुजरात म्हणजे उत्तर प्रदेश नाही. आज सुद्धा अमित शाह ह्यांनी पुढचं लक्ष्य स्पष्ट केलंय. ह्यावरून त्या माणसाच्या तयारीची कल्पना करा.
संपुर्ण निवडणुक प्रक्रिया तुम्ही बघितली तर भाजपचा भर कमीतकमी चुका करण्यावर होता – नव्हे तर काँग्रेसला चुका करण्यास भाग पाडण्यावर होता. शहांनी त्यांच्यापरीने डॅमेज कंट्रोल करण्यावर भर दिला होता पण जरा नीट बघितलं तर हा युपी प्रमाणे अमित शाह स्टाईल डॅमेज कंट्रोल नव्हता. जर तो असता तर आनंदीबेन प्रमाणे अनेक ज्येष्ठ नेत्यांना अमित शाह ह्यांनी तिकीट कापुन घरी बसविले असते, पण त्याचं प्रमाण फार कमी होतं.
निवडणुकीचे निकाल बघा म्हणजे मी काय म्हणतोय ते कळेल. पहिल्या ४ फेऱ्यांपर्यंत मुख्यमंत्री विजय रूपाणी हे प.राजकोट ह्या भाजपच्या बालेकिल्यातुन पिछाडीवर होते,उपमुख्यमंत्री नितीन पटेल मेहसणा सीटवरून पिछाडीवर होते,मणीनगर ही मोदींची परंपरागत जागा पिछाडीवर होती. कित्येक आजी मंत्री पराभूत झाले आहेत.ह्याचा डॅमेज कंट्रोल मोठया प्रमाणात नवीन चेहऱ्यांना तिकीट देऊन करता आला असता पण तितका धोका सुद्धा शहांनी का घेतला नसावा..?? कदाचित भाजपचा परंपरागत मतदार असलेल्या पटेलांच्या आंदोलनाच्या धसक्यामुळे? पन्नाप्रमुख,बुथप्रमुख संघटन प्रमुख अशी बलाढ्य यंत्रणा असुन सुद्धा जर अगदी परंपरागत खात्रीलायक जागा जिंकतांना भाजपची दमछाक होणार असेल, नोटा ह्या पर्यायाचा शेअर २.५% असेल तर ह्याचा विचार मोदी-शहांना करणं भाग आहे. ३-४ दिवसांपूर्वी रिपब्लिक वाहिनीवर यशवंत देशमुख ह्यांनी भाकीत केलं होतं की नवमतदार हा आंदोलनामुळे का असेनात पण भाजपपासुन दूर जात आहे, त्याचाच परिपाक हा नोटा हया पर्यायात वाढ होण्यात झाला असावा का? बुथ लेव्हलचं मायक्रो म्यानेजमेंट केलेलं असल्यामुळे एक निष्कर्ष मी काढू शकतो की पन्नाप्रमुखाने त्याच्या यादीतील मतदाराला बाहेर काढुन सुद्धा १-२ परंपरागत मतं ही नोटाला गेली असावीत.
राहिला प्रश्न राहुल गांधींचा. तर सुरुवात त्यांनी झकास केली होती.
पहिल्यांदा राहुल गांधी इतके प्रॉमिसिंगली प्रचारात भाग घेत होते. हार्दिक,जिग्नेस,अल्पेश ची भट्टी देखील जुळुन आली होती पण राहुल गांधींची एक चुक त्यांना महागात पडली ती म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसशी युती न करणं. कदाचित अहमद पटेलांचा ह्यामागे हात असेल (निदान पटेलांच्या निकटवर्तीय आणि NCP च्या सुत्रांकडून तरी तसंच समजतंय). पण त्यामुळे निदान ५-६ फार थोड्या मताने गमावलेल्या जागांमध्ये ह्याचा फरक पडला असता तर आज भाजपसाठी ९२ कठीण झालं असतं.
बाकी सिब्बल,अय्यर ह्यांच्या वक्तव्यांवर मी लिहिणार नाही कारण ह्या आधी बरंच लिहुन झालं आहे. पण काँग्रेस साठी ह्या निकालांचा USP राहुल गांधीच आहेत हे मात्र वादातीत आहे. राहुल ह्यांनी ज्या प्रकारे फ्रंट फुटवर बॅटिंग केली त्याबद्दल त्यांना नक्कीच श्रेय जातं. बहुदा काँग्रेसनी देखील त्यांना इतक्या जागा मिळतील ह्याचा विचार केला नसावा. त्यामुळे बऱ्यापैकी असंतोष असुन सुद्धा काँग्रेस त्याचा फायदा जागांमध्ये परिवर्तित करून घेण्यात अपयशी ठरली किंवा त्यासाठी स्वतः प्रयत्न न करता हार्दिक-जिग्नेश वर अवलंबुन राहिली.
आता हिमाचल बद्दल थोडंसं
माझे तीन खास मित्र हे हिमाचली आहेत, एक अभाविप वाला, एक काँग्रेसवाला आणि एक पूर्णपणे पाश्चात्य जीवनशैली जगणारा मलाना क्रीम ओढणारा. पण तिघांचंही धुमल ह्या व्यक्तीबद्दल मत एकच होत “यार इतनी गंद मचाके रखी है बंदे ने पुछ मत भाई. भाई वीरभद्र राजा है तो थोडा अब्रू रखके गंद मचाता है. पर ये धुमल तो भाई हदे पार है…”
धुमल ह्यांच्याबद्दल मी बऱ्याच लोकांकडुन अगदी भाजपवाल्यांकडुन सुद्धा हेच ऐकलं आहे. त्यामुळे २/३ बहुमत मिळुन सुद्धा धुमल का पराभुत झाले असावे ह्याचं उत्तर कदाचित ह्या गंद मध्ये दडलं असावं. बाकी हिमाचली जनता ही पहाडी तऱ्हेवाईक त्यामुळे दर टर्मला ते सरकार बदल करतात. भाजपचं संघटन तिथे मजबुत आहे त्यामुळे अनुराग ठाकुर ह्यांच्या यंग ब्रिगेडची मेहनत फळाला आली. काँग्रेसला निदान आतातरी वीरभद्र ह्यांना पर्याय शोधावा लागेल – कारण वीरभद्र ह्यांचं वय. अनुराग समोर कुणीतरी तरुण चेहरा नक्की हवा. हिमाचल मध्ये हा शिफ्ट अपेक्षित होता त्यामुळे २/३ असुन सुद्धा त्याचं कोडकौतुक नाही पण कौतुक नक्कीच आहे.
नेमका धडा
ह्या निवडणुकीचा नेमका धडा काय..?? भाजप आणि काँग्रेस दोहोंसाठी काही धडे आहे.
भाजप
१: अमित शाह ह्यांनी प्रेस कॉन्फरेन्स मध्ये एक धडा सांगितला आणि नशिबाने त्यांना त्याची जाणीव आहे. तो म्हणजे जातीयवादी वणवा पेटविला गेला तर त्यापुढे विकासाचं घोडं फारसं दामटवता येत नाही आणि त्यामुळे व्होट शेअर वाढला तरी जागा मात्र घटतात. हा धडा लिंगायत-वोक्कलिग्गा ह्या जातीयवादी आंदोलनाची ठिणगी पडु शकणाऱ्या कर्नाटकसाठी नक्कीच महत्वाचा आहे.
२: सुब्रमण्यम स्वामी ह्यांनी एक बिनतोड मुद्दा मांडला तो म्हणजे जर सिब्बल ह्यांच्या प्रतिक्रियेनंतर राम मंदिर हा मुद्दा भाजप न पकडला असता तर १२० च्या आसपास भाजप सहज पोहचला असता. हा मुद्दा हे खरं तर भाजपचं ब्रह्मास्त्र आहे. आशिष चांदोरकरांसारख्या फार थोड्या विश्लेषकांनी हा मांडला होता की जेंव्हा जेंव्हा हिंदु अस्मितेचा मुद्दा उठतो तेंव्हा तेंव्हा हिंदु मतदार हा सरळ सरळ भाजपकडे एक संघटित ताकद म्हणुन वळतो. त्यात ग्रामीण भागातील लोकांचा सहभाग जास्त असतो. त्या एकमेव कारणासाठी सिब्बल ह्यांचा राम मंदिर प्रकरणाची सुनावणी सुप्रीम कोर्टाने २०१९ नंतर करावी हा अर्ज आला होता. ह्या मुद्द्याकडे भाजपचे चाणक्य कसे बघतात हे बघावं लागेल.
काँग्रेस
१: राहुल गांधींनी पहिले काँग्रेसच्या संघटनेकडे लक्ष देण्याची गरज आहे. आता अध्यक्ष झाल्यावर तरी ते ह्यातुन पळ काढु शकत नाहीत. राज्य स्तरावर काही स्पार्क असणाऱ्या नेत्यांना त्यांनी फ्री हँड द्यावा, जेणेकरून स्थानिक नेतृत्व बळकट होईल.
२: दुसरा आणि महत्वाचा मुद्दा की जागांची गोळाबेरीज आणि आघाड्यांचं राजकारण ह्यात राहुल गांधींना लवचिक राहावं लागेल आणि त्यासाठी घरंदाज सरंजामशाहीतुन बाहेर पडावं लागेल. त्यांच्यासाठी हे तितकं सोपी नाही इतकं निश्चित.
===
InMarathi.com वर विविध लेखकांनी व्यक्त केलेले विचार ही त्यांची वैयक्तिक मतं असतात. InMarathi.com त्या मतांशी सहमत असेलच असं नाही. | आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page । Copyright (c) 2017 InMarathi.com | All rights reserved.