आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page
===
आज बॉलीवूड चे ‘शो मॅन’ म्हणून प्रसिद्ध असलेले स्वर्गीय अभिनेते आणि आदिग्दर्शक राज कपूर यांचा जन्मदिवस. त्यांचा जन्म १४ डिसेंबर १९२४ साली पेशावर (पाकिस्तान) मध्ये झाला होता. राज कपूर यांनी नक्कीच बॉलीवूडच्या सर्वात प्रसिद्ध घराण्यात जन्म घेतला पण त्यांनी जे कमावलं ते केवळ त्यांच्या मेहेनत आणि त्यांच्यातील कलागुणांच्या जोरावर.
राज कपूर याचं पूर्ण नाव ‘रणबीर राज कपूर’ होते. आता रणबीर ला म्हणजेच ऋषी आणि नीतू कपूरच्या मुलाला हे नाव देण्यात आले. आपल्या आजोबांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवत आज रणबीर देखील सिनेसृष्टीत आपल्या अभिनयाकरिता गाजतो आहे.
राज कपूर यांच्या जन्मानंतर त्यांचे कुटुंब पेशावरहून पंजाब येथे येऊन वसले. त्यांचे शिक्षण हे देहरादून येथे झाले. पण अभ्यासात त्यांचे मन कधी नव्हतेच, त्यामुळे १० व्या वर्गातच त्यांनी शाळा सोडली.
राज कपूर जेव्हा त्यांचे पिता पृथ्वीराज कपूर यांच्यासोबत मुंबई ला येऊन राहायला लागले. तेव्हा त्यांच्या वडिलांनी त्यांना एक कानमंत्र दिला, त्यांनी राज कपूर यांना सांगितले की,
‘राजू छोट्या कामापासून सुरवात करशील, तरच मोठा होशील!’
वडिलांच्या या सल्ल्यानेच ते पुढे एवढे यशस्वी झाले. १७ वर्षांच्या वयात त्यांनी ‘रंजीत मूवीकॉम’ आणि ‘बॉम्बे टॉकीज’ यांसारख्या फिल्म प्रोडक्शन कंपनींमध्ये स्पॉटबॉयचे काम करण्यास सुरवात केली. पृथ्वीराज कपूर यांच्या सारख्या ख्यातनाम व्यक्तीच्या घरी जन्माला येऊन देखील राज यांना बॉलीवूडमध्ये खूप मेहेनत घ्यावी लागली.
त्या काळचे ख्यातनाम निर्देशक केदार शर्माच्या एका चित्रपटात राज ‘क्लॅपर बॉय’ म्हणून काम करत होते, एकदा राज यांनी एवढ्या जोरात क्लॅप केले की, हिरोची नकली दाढीच त्या क्लॅपमध्ये अडकून बाहेर आली. यावर केदार यांना एवढा राग आला की, त्यांनी राज यांच्या कानशिलात लगावली. पुढे जाऊन केदार यांनीच राज यांना त्यांच्या ‘नीलकमल’ या चित्रपटात मुख्य भूमिकेत घेतले.
राज कपूर यांना अभिनय त्यांच्या वडिलांकडून मिळाला, जे एक प्रसिद्ध अभिनेते होते. राज यांच्या अभिनयाचा प्रवास पृथ्वीराज थियेटर येथूनच सुरु झाला. १९३५ साली केवळ १० वर्षांच्या वयात त्यांनी ‘इंकलाब’ या चित्रपटात त्यांनी एक छोटासा रोल केला होता. त्यानंतर १२ वर्षानंतर राज कपूर यांनी मधुबाला यांच्या सोबत ‘नीलकमल’ या चित्रपटात मुख्य भूमिका निभावली.
राज यांच्या चित्रपटांतील अनेक गाणी लोकप्रिय झाली ती आजही आहेत. ‘मेरा जूता है जापानी’ (श्री 420), ‘आवारा हूं’ (आवारा) , ‘ए भाई जरा देख के चलो’ और ‘जीना इसी का नाम है’ (मेरा नाम जोकर) ही गाणी तेव्हा खूप गाजली आणि ती आजही लोकप्रिय आहेत. राज कपूर यांच्या चित्रपटांत ‘मेरा नाम जोकर’, ‘श्री 420’, ‘आवारा’, ‘बेवफा’, ‘आशियाना’, ‘अंबर’, ‘अनहोनी’, ‘पापी’, ‘आह’, ‘धुन’, ‘बूट पॉलिश’ हे प्रमुख चित्रपट ठरले.
राज कपूर यांनी २४ वर्षांच्या वयात स्वतःचे प्रोडक्शन स्टुडीओ ‘आर के फिल्म्स’ सुरु केले आणि यामुळे ते चित्रपट सृष्टीतील सर्वात तरुण दिग्दर्शक बनले. त्यांच्या प्रोडक्शनचा पहिला चित्रपट ‘आग’ यामध्ये राज यांनी मधुबाला, कामिनी कौशल आणि प्रेम नाथ यांच्यासोबत काम केले.
राज कपूर यांना पांढरी साडी खूप आवडायची. जेव्हा ते लहान होते तेव्हा त्यांनी पांढऱ्या साडीत एका महिलेला बघितले. ती त्यांना एवढी भावली की, त्या घटनेनंतर त्यांना पांढऱ्या साडी विषयी एक वेगळेच आकर्षण झाले. त्यांनी त्यांच्या प्रत्येक चित्रपटात काम करणाऱ्या अभिनेत्रीला- नरगिस, पद्मिनी, वैजयंतीमाला, जीनत अमान आणि मंदाकिनी यांना पांढरी साडी घालायला लावली. एवढचं काय तर त्यांच्या पत्नी कृष्णा या देखील नेहेमी पांढरी साडीच नेसायच्या.
भारत सरकारने राज यांना मनोरंजन जगतात त्यांच्या अभूतपूर्व कामगीरीकरिता १९७१ साली ‘पद्मभूषण’ देऊन सन्मानित केले. १९८७ साली त्यांना चित्रपट सृष्टीचा सर्वात मोठा सन्मान म्हणजेच ‘दादा साहेब फाळके पुरस्कार’ प्रदान करण्यात आला. १९६० साली ‘अनाडी’ आणि १९६२ साली ‘जिस देश में गंगा बेहेती है’ करिता उत्कृष्ट अभिनेता म्हणून फिम्लफेअर पुरस्कार देखील देण्यात आला. त्याव्यतिरीक्त १९६५ साली ‘संगम’, १९७० साली ‘मेरा नाम जोकर’ आणि १९८३ साली ‘प्रेम रोग’ या चित्रपटांकरिता त्यांना उत्कृष्ट दिग्दर्शक म्हणून पुरस्कृत करण्यात आले.
राज कपूर यांना एका अवॉर्ड शो दरम्यानच हार्ट अटॅक आला होता, ज्यानंतर ते एक महिन्यापर्यंत रुग्णालयात होते. शेवटी २ जून १९८८ साली त्यांनी या जगाचा निरोप घेतला आणि ‘शो मॅन’ चा प्रवास थांबला. पण त्यांनी चित्रपट सृष्टीला आणि जगाला एक अविस्मरणीय अशी आठवण आपल्या चित्रपटांच्या रुपात दिली.
प्रत्येक भारतीय चित्रपट प्रेमीच्या मनात वसणाऱ्या राज कपूर यांच्या जन्मदिनी त्यांना आमचा मानाचा मुजरा…
===
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page । Copyright (c) 2017 InMarathi.com | All rights reserved.