Site icon InMarathi

तुका जडला संतापायी, दुजेपणा ठाव नाही : जाऊ तुकोबांच्या गावा ४६

 

आमच्या इतर लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page

===

मागील भागाची लिंक : देहाचे कोड पुरविणाऱ्याला नारायणाची भेट कधी घडायची नाही : जाऊ तुकोबांच्या गावा भाग : ४५

===

अंग आणि छाया तशी ब्रह्म आणि माया, ह्या उपमेवर आबा सारखा विचार करीत राहिला आणि दुसऱ्या दिवशी रामभटांनी शिकवणीला सुरुवात करायच्या आधीच त्याने विचारले, “गुरुजी, येक इचारतो. आपले आंग तसेच आसते पन छाया ल्हान मोठी हुते. आन येका येळी नाहीशी बी हुते. दुपारच्या येळी लोटांगण न घातले तरी बी दिसंनाशी हुते. तसं मग मायेचं ही हुतं काय? म्हंजी मायाच राह्यली न्हाई आसं बी हुतं काय?”

हा प्रश्न ऐकताच रामभटांना खात्रीच पटली की तुकोबांनी ह्याला उगाच आपल्याकडे धाडलेला नाही. हा प्रश्न ज्याच्या मनात आला त्याला आता फार सांगाशिकवायची गरज नाही. हे जाणून ते सांगू लागले –

आबा, तुमचा प्रश्न अतिशय उचित असाच आहे. आपण आपली सावली आपल्यातच सामावली गेल्याचा अनुभव जसा रोज माध्यान्हीला घेतो तशीच गोष्ट विश्वाच्या बाबतीतही घडते. मी ब्रह्मसभेत तुकोबांसंबंधी झालेली वादावादी तुम्हाला सांगितली होती. त्यावेळी गोविंदभटांनी तुकोबांची थोरवी सांगणारा जो अभंग ऐकविला होता तोच तुम्हाला आता पुन्हा सांगतो. तुकोबा म्हणतात,

नभोमय जालें जळ । एकीं सकळ हरपलें ।।
आतां काय सारासारी । त्याच्या लहरी तयांत ।।
कैचा तेथ यावा सांडी । आपण कोंडी आपणा ।।
तुका ह्मणे कल्प जाला । अस्त गेला उदय ।।

ह्या विश्वाच्या आयुष्यात एक क्षण असा येतो की एकात सारे हरपून जाते! वास्तविक नदीसमुद्रातले पाणी आणि आकाश ह्या किती अंतरावरच्या अन् वेगळ्या गोष्टी? पण पाणी नभासारखे होते किंवा म्हणा अवकाश पाण्यासारखे! जे काही होते त्याचे स्वरूप सारखे असते हा मुख्य मुद्दा. आकाश आणि पाण्याचा तुकोबांनी उल्लेख केला आहे, आपण समजून घ्यायचे की सारी पंचमहाभूतेच त्या क्षणी एकरूप होतात. त्या अवस्थेलाच कल्प झाला असे म्हणतात. अशा अवस्थेत कशाचा उदय आणि कशाचा अस्त? ह्या विश्वाने आपण आपल्याला आपल्यातच कोंडले असे म्हणायचे!

आबा, नारायणा, हा अभंग म्हणजे ऋग्वेदातील नासदीय सूक्ताचे मराठी रूपच आहे!

नासदीय सूक्त म्हणते –

—-
आज जशी व्यक्त सृष्टी आपण पाहतो तशी त्यावेळी नव्हती पण म्हणून काहीच नव्हते असे नाही.

त्यावेळी अंधार नव्हता की प्रकाश नव्हता, रात्र की दिवस हे कळण्यास कोणतेही साधन नव्हते . (किंबहुना रात्र आणि दिवस असा भेदच नव्हता.)

वायू नव्हता, पाणी नव्हते. अग्नी, पृथ्वी वा आकाश नव्हते. कोणी झाकणारे नव्हते व काही झाकलेलेही नव्हते.

त्यातून जर एक किरणशलाका गेली असती तर ती कशाच्या खाली नसती वा कशाच्या वर नसती.

(जेथे दोन वस्तूच नव्हत्या त्याचे वर्णन कोण कसे करणार?)

तेव्हा ज्याचा मृत्यू होऊ शकतो असे काही नव्हते आणि म्हणून जे मरणार नाही असेही काही नव्हते.

जे काही होते ते आपल्याच शक्तीने ‘वायूशिवाय’ श्वासोच्छ्वास करीत होते, म्हणजेच ते स्फुरत होते.

याखेरीज वेगळे तेथे काही नव्हते.
——

हे ऐकून नारायण म्हणाला, “काका, तुम्ही तुकोबांची थोरवी आणि कहाणी गेले काही दिवस सांगितलीत त्यामुळे आताचे तुमचे हे बोलणे ऐकून मला फार आश्चर्य वाटले नाही. आता वाटते, तुकोबांसारखे जीव हे समजावून सांगण्यासाठीच जन्म घेत असले पाहिजेत.”

काका, तुमच्या त्या ब्रह्मसभेत गोविंदभटांनी तुकोबांचा अजून एक अभंग सांगितला होता. तुम्ही सांगितल्यावर मी लिहून ठेवला होता तो. त्याचा अर्थ सांगा ना. तो ही ह्याच विषयावरचा आहे ना? तो अभंग असा होता,

अग्निमाजी गेले । अग्नी होऊन तें च ठेलें ॥
काय उरलें तया पण । मागील तें नाम गुण ॥
लोह लागे परिसा अंगीं । तो ही भूषण जाला जगीं ॥
सरिता ओहळा ओघा । गंगे मिळोनि जाल्या गंगा ॥
चंदनाच्या वासें । तरू चंदन जाले स्पर्शे ॥
तुका जडला संतापायी । दुजेपणा ठाव नाही ॥

नारायणाने हा अभंग ऐकविताच रामभटांनी त्यावरील निरूपण सुरू केले. ते सांगू लागले –

असे समजा की आधीचा अभंग ज्या प्रसंगाचे विवरण करीत होता त्याचाच हा अजून विस्तार आहे. आधीचा अभंग म्हणत होता की एका क्षणी सारे एक झाले. ह्या अभंगात एखादा पदार्थ अग्नीत गेला की तो अग्नीरूपच कसा होतो त्याचा दाखला दिला आहे. समजा एखादे लाकूड अग्नीत गेले तर त्याचा अग्नी झाला म्हणजे त्याचे लाकूडपण ते काय राहिले? त्याचे रूप गेले आणि म्हणून नामही गेले! परिसाचा स्पर्श झाला की लोखंडाचे असेच होते. छोट्या नद्या, ओढे, ओहोळ गंगेला जाऊन मिळाले की सारी गंगाच काय ती राहते. चंदनाचा वास लागला की ते झाडच चंदन बनते.

अशी उदाहरणे देऊन तुकोबा स्वतःबद्दल म्हणतात, संतसंगतीमुळे ह्या तुक्याचे तसेच झाले, काही दुजेपण म्हणून उरले नाही, तो अगदी एकसारखा झाला!

रामभटांचे हे विवेचन ऐकून आबा म्हणतो, “गुरुजी, ह्ये श्येवट काय त्ये न्हाई समजलं. तुका येक झाला म्हंजे न्येमकं काय झालं?”

आबाचा प्रश्न इतका नेमका कसा असतो याचे रामभटांना प्रत्येक वेळी नवल वाटत असे, तसेच आताही झाले. असे प्रश्न विचारणारा शिष्य मिळाला की गुरुला हुरूप येतो. आबाच्या प्रत्येक प्रश्नाला रामभटांचे आता तसेच होऊ लागले होते.

आबाचा प्रश्न बरोबर होता. सृष्टीची गोष्ट छान होती. कल्पाची कल्पना करणे छान होते. पण आपला हा देह असाच राहणार असताना सृष्टीचा कल्पांत, लाकडाचा अग्नी होणे ह्याची सांगड आपल्या जीवनाशी कशी लागणार होती?

हे सारे जाणून रामभट म्हणाले, “आबा, तुमचा प्रश्न अवघड आहे. मी जमेल तसे उत्तर देईन. पण तुम्हीही ह्या प्रश्नाचे उत्तर मिळविण्यासाठी मननचिंतन केले पाहिजे.

एक जुनेच सूत्र सांगतो ते सतत लक्षात ठेवा. पिंडी ते ब्रह्मांडी ही म्हण तुम्ही ऐकली असेल. ब्रह्मांडी ते पिंडी हे ही तसेच लक्षात ठेवा. हे इतके मोठे विश्व एका क्षणी एकरूपी होते तसे आपल्या छोट्या विश्वातही घडणे शक्य आहे काय असा विचार करा.

आपल्याला कळते की आपलेही एक विश्व आहे. बाह्यदर्शनी आपण समाजात राहतो, कुटुंबात राहतो. म्हणा की ह्या अनंत सृष्टीतील ती आपली एक सृष्टीच आहे. तसाच विचार अजून करीत गेले की आपल्या लक्षात येते की आपले म्हणून अजून एक विश्व आहे. असे विश्व की त्यात आपल्याशिवाय दुसरे कुणीच नाही! म्हटले तर आपण सर्वांमध्ये राहात आहो म्हटले तर एकटेच जगत आहो.

इतके ठरले की आता आपल्या ह्या अगदी लहानशा विश्वात थोडे डोकावून पाहा. जर त्या विश्वात आपण एकलेच आहो तर ते विश्व कसे हवे? ते विश्व आज कसे आहे? ते पूर्वी कसे होते? पुढे कसे असेल?

आबा, तुमचा हा देह आहे, त्याला काही रूप आहे. ती त्याची पहिली ओळख आहे. त्या रूपाला लोक आबा ह्या नामाने ओळखतात. मात्र कुणी विचारले, आबा हा माणूस कसा आहे? तर त्याचे उत्तर देताना लोक केवळ रूपाची गोष्ट सांगत नाहीत. ते तुमच्या स्वभावाचे, वागण्याचे, विचारांचे वर्णन करतात. किंबहुना, रूपाची गोष्ट क्षणात सांगून होते आणि बाकी वर्णन पूर्ण होतच नाही.

तुकोबांसारख्या संतांचे सांगणे असे की ही जी आपली ओळख आहे तिच्यावर लक्ष केंद्रीत करा. ती ओळख कशी असावी ह्यावर विचार करा.

नासदीय सूक्त विश्वाच्या ज्या क्षणाचे वर्णन करते त्या क्षणी सारे विश्व एकजिनसी, एकरूप झाले होते. ती निर्मलतेची परिसीमा होय. आपले जीवन तितके निर्मल झाले पाहिजे असा हा संतांचा सांगावा आहे.

आज आपण आपल्या मनात नीट पाहिले तर त्यात अनेक अमंगल गोष्टी दिसतील. त्या दूर झाल्या पाहिजेत ह्यावर वाद होणार नाही. तसे व्हायचे असेल तर त्याचा मार्ग काय ह्याचे उत्तर तुकोबांनी ह्याच अभंगात दिले आहे. ते म्हणतात,

काय उरलें तया पण । मागील तें नाम गुण ॥

थोडक्यात काय तर मनोमन आपली ओळख पुसून टाका. लोक तुम्हाला आबाच म्हणतील कारण त्या देहाचे तेच नाम आहे. पण तुम्हाला त्या नामाशी आणि रूपाशी काय कर्तव्य? तुमचे विचारवागणे हीच तुमची ओळख. धीर करा आणि ती ओळख पुसून टाका! ती ओळख पुसलीत की अंतर्बाह्य एक झाल्याचा अनुभव येईल, तो आपल्या विश्वाचा कल्पांत!

संत म्हणतात, तसा क्षण प्रत्येकाच्या जीवनात यावा. त्यासाठी प्रत्येकाने प्रयत्न करावा. अर्थात ते सोपे नाही. त्यासाठी साधनेच्या अग्नीत शिरायला हवे. तुकोबांसारखा परिस भेटला तर साधनेला गती येत असते.

आबा, नारायणा, तुम्ही आम्ही भाग्यवंत म्हणून ही तुकोबांची वाणी आपल्या कानावर पडते आहे. ते म्हणतात,

तुका जडला संतापायी । दुजेपणा ठाव नाही ॥

आपलेही असेच व्हावे म्हणून आपण प्रयत्न करू या.

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page । Copyright (c) 2017  InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version