प्रिय अजिंक्य, सूर्य मावळतो तो पुन्हा उगवण्यासाठीच…! : द्वारकानाथ संझगिरी
आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page
===
अजिंक्य रहाणे नावाच्या क्रिकेट मधील नव्या दमाच्या सूर्याला सध्या ग्रहण लागलंय. त्यावरून सर्वत्र चर्चा होत आहेच. परंतु अनेक फॅन्सनी अजूनही आशा सोडलेली नाही. अजिंक्य पुन्हा तळपेल, नक्कीच तळपेल असा विश्वास अनेकांच्या मनात आहे. ह्याच विषयावर क्रीडा क्षेत्रात आपल्या लेखणीचा ठसा उमटवणारे प्रसिद्ध विश्लेषक द्वारकानाथ संझगिरी ह्यांनी फेसबुकवर एक पोस्ट लिहिली आहे. ही पोस्ट अजिंक्य रहाणेसाठी – अजिंक्य रहाणे वर आहेच — पण ती तुमच्या-आमच्यातील प्रत्येक व्यक्त अव्यक्त “अजिंक्य” साठी आहे.
इनमराठी.कॉम च्या वाचकांसाठी ही अप्रतिम पोस्ट पुढे प्रसिद्ध करत आहोत. संपूर्ण श्रेय, अर्थातच, द्वारकानाथ संझगिरी सरांचंच!
===
सूर्य मावळतो तो पुन्हा उगवण्यासाठी….
प्रिय अजिंक्य,
सध्या तुझ्या नावाला साजेसं तुझ्याकडून काहीही होत नाहीए. तू चिंतेत आहेसच, आम्हीही आहोत. अर्थात संघाचा, कर्णधाराचा, ‘सोनू तुझ्यावर भरवसा हाय!’ म्हणून तर तू दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यावर आहेस आणि उपकर्णधारही आहेस.
पण नैतिक वगैरे पाठिंबा तुला कितीही असला, तरी मैदानावर केलेल्या धावांचा पाठिंबा हा खरा पाठिंबा असतो. तो दिल्ली कसोटीच्या दुसऱ्या डावात तुला मिळाला नाही. तो मिळावा म्हणून विराट कोहलीने तुला तिसऱ्या क्रमांकावर पाठवलं. पण तुझी बॅट एकेका धावेसाठी झगडत होती.
मॅरेथॉन जिंकलेल्या खेळाडूला फर्लांगभर धावल्यावर दम लागावा तशी तुझ्या बॅटची अवस्था होती. त्यातून बाहेर पडण्यासाठी तू आत्मघाती फटका मारलास. तुझ्या चांगल्या दिवसांत कदाचित तो फटका प्रेक्षकांत जाऊन पडला असता. इथे क्षेत्ररक्षकाला तुझा ‘बुरुज’ ढासळवायला कष्टही पडले नाहीत.
मी तुझ्यासारखं कसोटी क्रिकेट खेळलेलो नाही. अगदी पहिल्या दर्जाचं क्रिकेटही नाही. पण गेली चाळीस वर्षे क्रिकेट जवळून पाहिल्यावर जो अनुभव गाठीशी आला त्या आधारावर दोन गोष्टी सांगाव्याशा वाटतात.
सध्या श्रीलंका पुरस्कृत धावांचा ‘सेव्हन कोर्स बुफे’ लागला होता. विराट भीमासारखा जेवला. पुजारा-मुरली विजयने धर्म – अर्जुनासारखा ताव मारला. तुझ्या वाटय़ाला नकुल-सहदेवाचा जाऊ दे, शंभराव्या कौरवाचा घासही आला नाही. तुझी अवस्था ‘रोझा’ ठेवणाऱ्या श्रद्धाळू मुसलमानी माणसासारखी होती. पण तुला तुझा ईदचा चंद्र कदाचित दक्षिण आफ्रिकेत दिसेल.
‘‘रातभर का है मेहमा अंधेरा, किस के रोके रुका है सवेरा’’ या ओळी लक्षात ठेव. आमच्या साहिर लुधियानवीच्या आहेत त्या. खूप मानसिक दडपण येईल तेव्हा गुणगुण. संगीत कधी कधी नैराश्याच्या गर्तेतून बाहेर काढतं आणि कुणी सांगावं एकवेळ अशी येईल की, इतर फलंदाज संघासाठी धावांची माधुकरी मागत फिरत असतील आणि माधुकरी देणारे हात तुझे असतील.
एक लक्षात ठेव, सर डॉन ब्रॅडमन सोडले तर इतर सर्व फलंदाजांना धावांच्या दुष्काळातून जावं लागलं. सर डॉनचं सर्वच वेगळं होतं. ते देव कोटीतले होते. पण इतर यक्ष, किन्नर, मानव त्यातून गेलेच गेले. यक्षांच्या आयुष्यात असा दुष्काळ क्वचित आला, पण आला नक्की! मला सुनील गावसकरचा एक किस्सा आठवतोय.
१९८० च्या आसपासचा काळ होता. अचानक धावा सुनीलच्या बॅटवर रुसल्या. यशवंत सिन्हा मोदींवर रुसले तसं ते रुसणं होतं. तो एकदा उमाकांत प्रभू या मुंबईतल्या एका स्थानिक गोलंदाजाला बाद झाला. तेव्हा म्हणे तो माझ्या एका मित्राजवळ म्हणाला, ‘‘काय वेळ आलीय बघ, मी उमाकांतला बाद झालो.’’
आणखी एक उदाहरण देतो.
१९९६ च्या सुमारास अझरुद्दीन अत्यंत भीषण फॉर्मात होता. इंग्लंडमध्ये तो एकटा सराव करताना अझरला मी विचारलं, ‘‘मी तुला गोलंदाजी टाकू का?’’ तो हसला आणि म्हणाला, ‘‘माझी विकेट घ्यायची इच्छा तुझीही असेल ना? चल पुरी करून टाक.’’ त्याच्या हास्याला जी दुःखाची झालर होती ना, ती माझ्या हृदयाला एक टाचणी टोचून गेली.
अरे, अशी अनेक उदाहरणे मी तुला देऊ शकतो, ती ऐकताना, त्यातून ते पुढे उभे राहिले आणि महानपण त्यांनी टिकवलं ही गोष्ट अधोरेखित करून ठेवायची.
विव्ह रिचर्डस् म्हणतो की, अपयश हे बॅटपेक्षा डोक्यातल्या दोन कानांच्या मधल्या भागात जास्त असतं. त्याला तिथून हाकलणं हे सर्वात महत्त्वाचं. तेव्हा मानसोपचारतज्ञ, प्राणायाम, योग या गोष्टी उपयोगी पडू शकतात. माणसात जिद्द, लढाऊ वृत्ती असेल तर ती अचानक घटस्फोट घेत नाही. फार फार तर ती चिडून बायकोसारखी माहेरी जाते. तुझ्यात या गोष्टी आहेत. म्हणून तर तू परदेशात, कठीण प्रसंगात, कठीण वातावरणात धावा केल्यास.
तुझं ते लॉर्डस्वरचं शतक आठवलं की, आजही अंगावर रोमांच उठतात. या चांगल्या गोष्टी आठव, मळभ दूर व्हायला मदत होईल.
तुझी माहेरी गेलेली जिद्द, लढाऊ वृत्ती परत येईल. तुझी शरीराची भाषाही या कठीण प्रसंगात कधी मवाळ, बापुडवाणी होऊ देऊ नकोस. एकदा संजय मांजरेकर मला म्हणाला होता, ‘‘विनोद कांबळीची एक गोष्ट मला आवडते. तो आधीच्या दोन सामन्यांत शून्यावर बाद झाला तरी असा फलंदाजीला येतो की, दोन शतकांच्या नंतर तिसरं झळकवण्याच्या मनसुब्याने येतोय.’’ शरीराची भाषाही आजच्या जगात फार महत्त्वाची ठरते.
आणि सगळय़ात महत्त्वाची गोष्ट म्हणजे, ‘‘फॉर्म नाही, दिवस चांगले नाहीत’’ असं म्हणून स्वतःच्या अपयशाला ‘दैवाचं’ लेबल लावू नकोस.
तुझ्या तंत्राच्या मुळाशी जा. प्रवीण अमरे तुझा व्यक्तिगत प्रशिक्षक आहे. त्याच्याबरोबर बोलून फलंदाजीत अनाहूतपणे घुसलेले दोष घालव. वाटलं तर सुनील गावसकर, सचिन तेंडुलकर यांचे दरवाजे ठोठाव. इंग्लंडमधून अपयशी होऊन परतल्यावर विराट कोहलीने नाही का सचिनचा दरवाजा ठोठावला होता? एक मोठी खेळी तुझ्या फलंदाजीवर घोंघावणारं ‘ओखी’ वादळ शमवेल. पण तुझ्याकडून प्रयत्न हवा.
लवकरच तो दिवस उजाडेल जेव्हा तू सकाळचा सूर्य पाहत उठशील आणि त्यावेळी तुझ्या उशाखाली भरपूर धावा असतील. नेहमी सूर्याचं उदाहरण डोळय़ासमोर ठेव. मेणबत्ती मेण संपलं की विझते. टंगस्टन वायर जळली की दिवा विझतो. सूर्य कधी विझत नाही. तो मावळतो, पुन्हा उगवण्यासाठी!
अपयशातून बाहेर पडण्यासाठी सूर्याहून तुला अधिक कोण शिकवणार?
द्वारकानाथ संझगिरी
dsanzgiri@hotmail.com
(फेसबुकवरील मूळ पोस्ट इथे क्लिक करून वाचू शकता.)
===
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page । Copyright (c) 2017 InMarathi.com | All rights reserved.