आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page
===
फुटबॉल नंतर जगातील सर्वात जास्त लोकप्रिय असणारा खेळ क्रिकेट आहे! या खेळात पैसा आहे आणि प्रसिद्धी सुद्धा आहे. हेच कारण आहे ज्यामुळे भारतातील बहुतांश तरुण क्रिकेटमध्ये आपले करियर करू इच्छितात. भारतीय क्रिकेट कंट्रोल बोर्ड प्रत्येक खेळाडूला त्याच्या कामगिरीनुसार मानधन देते. हे मानधन यासाठी दिले जाते जेणेकरून खेळाडू क्रिकेटच्या मैदानात चांगले प्रदर्शन करतील आणि भारतीय क्रिकेटला यशाच्या शिखरावर घेऊन जातील.
मुंबई मिररमधील बातमीनुसार, बीसीसीआयकडून २०१७–१८ या वर्षासाठी एक नवीन करार तयार करण्यात आलेला आहे. ज्यामध्ये भारतीय क्रिकेट संघाच्या खेळाडूंचा पगारवाढ करण्यात आली आहे. सध्याचा भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली, महेंद्र सिंग धोनी आणि कोच रवी शास्त्रीची बीसीसीआयच्या कमेटी ऑफ अॅडमिनिस्ट्रेटर्स (COA) बरोबर पगाराच्या विषयाला धरून बैठक झाली होती, ज्याचा परिणाम सकारात्मक झाला आहे.
BCCI ने आपल्या खेळाडूंना तीन श्रेणींमध्ये विभागले आहे. या श्रेणी पुढीलप्रमाणे – A, B आणि C, या श्रेणींनुसार भारतीय खेळाडूंना मानधन दिले जाते. जो खेळाडू सर्वात उत्तम प्रदर्शन करत असेल त्याला A श्रेणीमध्ये स्थान दिले जाते आणि सर्वात जास्त मानधन दिले जाते.
बीसीसीआयच्या ३० सप्टेंबर २०१७ पर्यंतच्या करारानुसार श्रेणी – A मध्ये विराट कोहली, महेंद्रसिंग धोनी, रविचंद्रन अश्विन, अजिंक्य रहाणे, चेतेश्वर पुजारा, रविंद्र जडेजा आणि मुरली विजय यांची नावे समाविष्ट आहेत.
श्रेणी – B मध्ये रोहित शर्मा, लोकेश राहुल, भुवनेश्वर कुमार, मोहम्मद शमी, ईशांत शर्मा, उमेश यादव, रिद्धीमान साहा, जसप्रीत बुमराहा आणि युवराज सिंग यांची नावे समाविष्ट आहेत.
श्रेणी – C मध्ये शिखर धवन, अंबाती रायडू, अमित मिश्रा, मनीष पांडे, अक्षर पटेल, करूण नायर, हार्दिक पांड्या, केदार जाधव, यजुर्वेद्र चहल यांच्या नावांचा समावेश आहे.
बीसीसीआयच्या ऑक्टोबर २०१६ च्या करारानुसार, A – श्रेणी च्या खेळाडूंना दरवर्षी २ कोटी रुपये फी दिली जात असे. तोच पगार आता बीसीसीआयच्या नवीन करारानुसार १२ कोटी रुपये झाला आहे, म्हणजे A -श्रेणी च्या खेळाडूंच्या पगारामध्ये सरळ सरळ १० कोटींची वाढ झाली आहे.
बीसीसीआयच्या जुन्या करारानुसार B – श्रेणी च्या खेळाडूंना दरवर्षी १ कोटी रुपये फी दिली जात असे. तोच पगार आता बीसीसीआयच्या नवीन करारानुसार ८ कोटी रुपये झाला आहे, म्हणजे B – श्रेणी च्या खेळाडूंच्या पगारामध्ये ७ कोटींची वाढ झाली आहे.
बीसीसीआयच्या जुन्या करारानुसार C – श्रेणी च्या खेळाडूंना दरवर्षी ५० लाख रुपये फी दिली जात असे. तोच पगार आता बीसीसीआयच्या नवीन करारानुसार ४ कोटी रुपये झाला आहे, म्हणजे C – श्रेणी च्या खेळाडूंच्या पगारामध्ये साडेतीन कोटींची वाढ झाली आहे.
रिपोर्टनुसार, कमेटी ऑफ अॅडमिनिस्ट्रेटर्स (COA) ला बैठकी दरम्यान सांगण्यात आले होते की, ऑस्ट्रेलियन आणि इंग्लिश क्रिकेटर्सना त्यांच्या बोर्डाकडून जवळपास १२ कोटी रुपये एवढी फी मिळते. त्यामुळे त्यांच्याबरोबर आपले खेळाडू यावेत, यासाठी बीसीसीआयने खेळाडूंचे पगार वाढवण्याचा निर्णय घेतला.
आता तुम्हाला नक्कीच कळले असेल की, भारतामध्ये तरुण वर्ग दुसऱ्या खेळापेक्षा क्रिकेटकडेच का आकर्षला जातो. आज क्रिकेटला एवढी प्रसिद्धी मिळाली आहे की, त्यामुळे इतर खेळांकडे दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येते.
===
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page । Copyright (c) 2017 InMarathi.com | All rights reserved.