‘ओखी’ चक्रीवादळाचं नाव कसं पडलं? वाचा
आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page
===
सध्या ओखी वादळ हा सगळीकडेच चर्चेचा विषय बनला आहे. अवकाळी पाऊस घेऊन आलेल्या या वादळामुळे महाराष्ट्राच्या जनतेने जनजीवन थोड्याफार प्रमाणात का होई ना, पण विस्कळीत झाले. त्यामुळे सगळेच लोक या वादळाविषयी चर्चा करत आहेत. मुंबईमध्ये हे वादळ येणार असल्याचे दोन दिवसापूर्वी बातम्यांद्वारे सांगण्यात आले होते. या वादळामुळे केरळ, तामिळनाडू, लक्षद्वीप आणि कोकण किनारपट्टीवर खूप नुकसान झाले आहे. मुंबईमध्ये काल शाळा, महाविद्यालय आणि शासकीय कार्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली होती. तसेच, लोकांना सतर्क राहण्याचा तसेच किनारपट्टीपासून दूर राहण्याचा इशारा प्रशासनाकडून देण्यात आला होता.
पण आता हा ओखी वादळाचा धोका मुंबईवरून टाळला असून, हे ओखी वादळ आता गुजरातच्या दिशेने वळले आहे. जेव्हा ही प्रसार माध्यमांकडून सांगण्यात आली तेव्हा मुंबईतील लोकांनी सुटकेचा निश्वास सोडला. तसे तर मुंबईने आतापर्यंत कितीतरी संकटांचा सामना केला आहे आणि त्यातून मुंबई परत उभी राहिली आहे. असो, पण तुम्हाला हे माहीत आहे का ? की, या ओखी वादळाला ‘ओखी’ हे नाव कसे पडले ? कदाचित तुम्हाला माहित नसेल. आज आम्ही तुम्हाला याचबद्दल काही माहिती देणार आहोत. चला तर मग जाणून घेऊया, या वादळाला आणि इतर काही वादळांना नाव कसे दिले जाते, त्याबद्दल..
ओखीचा अर्थ बंगाली भाषेत डोळा असा होतो. बांग्लादेशने या चक्रीवादळाला ओखी असे नाव दिले आहे. जागतिक हवामान संघटना (WMO) आणि युनायटेड नेशन्स इकॉनोमिक अँड सोशल कमिशन फॉर एशियन अँड द पॅसिफिक (ESCAP) यांनी २००० मध्ये उष्णकटिबंधीय चक्रीवादळांना नाव देणारी प्रणाली सुरु केली होती. उष्णकटिबंधीय चक्रीवादळांना अंदाजपत्रक आणि सामान्य जनतेवर होणारे त्याचे अंदाज आणि इशारे यावर ठरवली जातात. बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यानं त्याचं रुपांतर ओखी चक्रीवादळात झालं आहे.
जगातील चक्री वादळांना ९ विभागांद्वारे नावे दिली जातात, उत्तर अटलांटिक, पूर्व उत्तर पॅसिफिक, मध्य उत्तर प्रशांत, वेस्टर्न नॉर्थ पॅसिफिक, नॉर्थ इंडियन ओशन, साउथ वेस्ट हिंद महासागर, ऑस्ट्रेलियन, दक्षिण पॅसिफिक, साउथ अटलांटिक ही ती विभागे आहेत.
जसे हे वादळ जागा बदलेलं तसं या चक्रीवादळांना वेगवेगळे नाव दिले जाते. भारतीय उपखंडातील वादळांसाठी भारत, बांगलादेश, पाकिस्तान, मालदीव, ओमान, श्रीलंका, म्यानमार आणि थायलंड या आठ देशांनी वादळांची नावं ठरवली आहेत. भारताकडून ‘अग्नी’, ‘आकाश’, ‘बिजली’, ‘जल’, ‘लहर’, ‘मेघ’, ‘सागर’ आणि ‘वायू’ अशी आठ नावं सुचवली गेली. इतर राष्ट्रांकडूनही प्रत्येकी आठ अशी ६४ नावं देण्यात आली. ही नावं ओळीनं देण्यात येतात. याच पद्धतीनं पृथ्वीवरच्या इतर भागातील वादळांची नावं ठरवली जातात. विशिष्ट भागात निर्माण झालेल्या चक्रीवादळाचा धोका ज्या ज्या देशांना बसण्याची शक्यता असते ते सर्व देश एकत्र येऊन वादळांच्या नावांची यादी तयार करतात.
ओखी वादळाप्रमाणेच यापूर्वी फयान वादळाने भारताला तडाखा दिला होता, फयानने भारताच्या किनारपट्टीचे आणि इतर गोष्टींचे देखील खूप नुकसान केले होते. त्यावेळी देखील मुंबई फयानच्या तडाख्यातून वाचली होती आणि आताही तसेच काहीसे झाले आहे. यापूर्वी ओखी या चक्रीवादळाचं नाव ‘मोरा’ होतं. हे नाव थायलंडकडून देण्यात आलं होतं. ओखीचं पुढचं नाव हे ‘सागर’ असेल. हे नाव भारताकडून या चक्रीवादळाला देण्यात येईल.
आता हे ओखी वादळ गुजरातकडे सरकले असल्याने तेथील लोकांना त्याचा तडाखा बसण्याची चिंता भेडसावत आहे. भारत अजूनही ओखी चक्रीवादळापासून पूर्णपणे सुरक्षित नाही. पण प्रशासन यातून जास्त नुकसान होऊ नये, यासाठी योग्य ती काळजी घेत आहे.
===
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page । Copyright (c) 2017 InMarathi.com | All rights reserved.