' इटली दर्शन : आजीची आठवण करून देणारं, आपले मनःचक्षू उघडणारं – InMarathi

इटली दर्शन : आजीची आठवण करून देणारं, आपले मनःचक्षू उघडणारं

आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page

===

इटलीचा सर्वात समृद्ध आणि सुंदर प्रदेश म्हणजे टस्कनी रिजन. माझ्या युरोप प्रवासात मला या प्रदेशात मनसोप्त फिरण्याची संधी मिळाली.

पॅरिस वरून मी भल्या पहाटे पोहोचलो ते फ्लोरेंसला. फ्लोरेंसच्या टुमदार आणि सुबक रेलवे स्थानकावरून जेंव्हा मी हॉटेलला पोहोचलो तेंव्हा मला फक्त झीट यायची बाकी होती. हॉटेल मध्ये फक्त एक माणूस तो ही सकाळी ७ ते १०. त्याने मला माझ्या खोलीच्या आणि मुख्य दरवाजाच्या किल्ल्या दिल्या आणि ग्रात्झी म्हणत निघून गेला. नाश्ता पण सकाळी आपल्या हातानीच घ्यायचा. माझी खोली आणि हॉटेलचा मुख्य दरवाजा बंद करून मी फ़्लोरेस दर्शनाला निघालो.

 

harshad barve itali 06

 

फ्लोरेंस हे इटालियन कलाकारांचे माहेरघरच. इटलीचा कोणताही कलाकार घ्या त्याची पाळेमुळे तुम्हाला फ्लोरेंसमध्ये सापडतील. शहर टुमदार आणि मोठ्या मनानी स्वागत करण्याऱ्या लोकांचे. तसे बघितला तर संपूर्ण इटलीला इंग्लिशचा तिटकारा पण पर्यटकांना मदत करतांना मात्र हा द्वेष हे लोक बाजूला ठेवतात.

फ़्लोरेस बघितल्या वर मला माझ्या आजीची प्रचंड आठवण आली. माझ्या आजीकडे तिच्या आईच्या दोन बांगड्या होत्या त्या तिनी माझ्या आईला दिल्या, मग माझ्या आईनी माझ्या बहिणीला दिल्या आणि माझी बहिण ती तिच्या मुलीला देणार आहे. या चारही पिढ्यांमध्ये बांगड्यांचे स्वरूप काही बदलले नाही.

एका पिढीनी द्यावे आणि पुढच्या पिढीनी ती चीज आपण विश्वस्त आहोत समजुन वापरावी आणि येणाऱ्या पिढीला द्यावी.

फ्लोरेंस अगदी असंच आहे.

पिढ्या नी पिढ्या फ्लोरेंसवासियांनी मीकेल अन्जेलोच्या या शहराला जसं च्या तसं ठेवले आहे. त्याच जुन्या इमारती, खिडक्या, बारीक बोळी आणि मीकेल अन्जेलोच्या अप्रतिम कलाकृती. मीकेल अन्जेलोच्या पुतळ्यापासून रात्रीच्या झगमगाटात हे छोटेसे शहर सगळ्या प्रेक्षकांची अक्षरशः नजरबंदी करत.

फोरेन्सला पैरिस किंवा रोमा सारखी भव्यता नाही पण नजाकत मात्र सगळीकडे ठासून भरली आहे. जुनं शहर असून सगळ्या आधुनिकतम सुविधा पण आहेत. अतिशय भव्य असा फ्लोरेंसचा डोमो मनात कुठे तरी आदराची भावना निर्माण करून जात. फ्लोरेंसच्या पुलावरून या शहराचे जे दर्शन होते ते खरंच मनाचा ठाव घेऊन जाते.

 

harshad barve itali 08 inmarathi

टीपीकल इटालियन माणूस तुम्हाला फ्लोरेंस मध्ये बघायला मिळेल. फ्लोरेंस मध्ये इटालियन जेवण पण फारच सुंदर मिळत. खवय्याची खरी मेजवानी होते इथे. रोमामध्ये इटालियन जेवणात सरमिसळ झाली आहे. आपण नाही का चायनिज खाद्य पदार्थ गरम मसाला आणि चाट मसाला टाकून खातो तसे. निव्वळ साठ प्रकारचे व्हेज पिझ्झा बघून मी केवळ वेडा व्हायचा राहिलो होतो.

सैन मार्को, डेविडचा पुतळा, उफिझी गैलरी ऐतिहासिक फ़्लोरेसचा केंद्रबिंदू अश्या अनेक ठिकाणी जाऊन आल्यावर मी रात्री ८ वाजता मिकेल अंजेलोला आलो आणि तेथून होणारया फ्लोरेंस दर्शनानी माझी नजरबंदी झाली. रात्री ११ वाजता शेवटची सिटी बस होती आणि इच्छा नसूनही फ़्लोरेसच्या त्या नजाऱ्याचा निरोप घेऊन मला हॉटेलला परतावं लागलं.

 

harshad barve itali 01 inmarathi

 

दुसऱ्या दिवशी भल्या पहाटे माझी बस निघाली ती पिसा, सैन गिमिअनो आणि सिएन्ना साठी. फ्लोरेंस शहरातून बाहेर पडताच दर्शन होते ते अतिसुंदर आणि अतिशय टापटिपीत ठेवलेल्या इटलीचे. तासाभराच्या प्रवासानंतर आम्ही पिसाला पोहोचलो. पिसाचा झुकता मनोरा खरंच अचंबित करणारा आहे. या मनोऱ्यावर चढतांना आपल्याला नेहमी असे वाटत राहता कि हा मनोरा आत्ता पडणार आहे. अतिशय कठीण आणि अरुंद पायरया चढून आल्यावर जे पिसा शहराचे दर्शन होते त्याला तोड नाही.

 

harshad barve itali 04 inmarathi

 

तसे बघितले तर हा मनोरा म्हणजे आर्किटेक्ट चूक आहे. पाया गंडला म्हणून मनोरा तिरपा झाला. पण त्याचे भांडवल केले इटालियन लोकांनी. आपण मात्र कुतुबमिनारवर, आर्चे आय ल्ब्यू असे लिहून येतो. इथलं कॅथेड्रल देखील अतिशय सुंदर आहे. पिसाच्या मनोऱ्यावरून घेतेलेला फोटो बघून आपणास याची कल्पना येईल.

 

harshad barve itali 02 inmarathi

 

 

 

पिसाला टाटा करत आम्ही निघालो ते जगप्रसिद्ध इटालियन वायनरीला भेट द्यायला पंधरा वीस प्रकारच्या वाइन आणि वर्जिन ओलिव ऑइल मध्ये बनवलेले जेवण सगळ्यांनी मनसोप्त हाणल. जपून प्या असे पन्नास वेळा सांगून देखील काही बहादारांनी आपले वायनिश रंग दाखवलेच. वायनरीची संपूर्ण माहिती आणि काही खरेदी करून आमची बस निघाली ती सैन गिमिअनोला. अख्खं च्या अख्खं गाव कसा काय वर्ल्ड हेरीटेज साइट असू शकते हे बघण्यासाठी मी प्रचंड उत्सुक होतो.

क्षेत्रफळात ७० व्या क्रमांकावर असलेला इटली वर्ल्ड हेरीटेज साइटसच्या बाबतीत मात्र जगात प्रथम क्रमांकावर आहे. इतिहासातला दगड आणि दगड या लोकांनी सांभाळून ठेवला आहे. त्यांनी दगडाचे सोने केले आणि आपण मात्र सोन्यासारखे गड आहेत त्याची माती कशी करता येईल याची काळजी घेतली. आता परिस्थिती बरीच सुधारली आहे यात वाद नाही पण सुधारणेला अजून बराच वाव आहे.

जुन्या काळात जेंव्हा श्रीमंती आणि समृद्धी दाखवण्यासाठी मोठ्या कार्स, विदेश यात्रा अश्या गोष्टी नव्हत्या तेव्हा या लोकांनी उंचच उंच इमारती बांधायला सुरुवात केली. आजही जवळपास सगळ्या उंच इमारती या वैयतिक मालमत्ता आहेत. चर्चचा आसमान दाखवणारा जिना चढून वर आलो आणि चारी बाजूनी टस्कनीच्या समृद्धीची दर्शन झाले. अप्रतिम ही एकच उपमा मला या प्रदेशसाठी योग्य वाटली. खाली आल्यावर जगप्रसिद्ध इटालियन आइसक्रीम खात खात आम्ही निघालो ते सिएन्नाला.

 

 

सिएन्नाला बघितला ते जगप्रसिद्ध ऐतिहासिक सुपर मार्केट. सिएन्नाचे चर्चेस म्हणजे युरोपियन कलाकृतींचे नमुनेच. अस म्हणतात की सगळ्याच चांगल्या गोष्टी लवकर संपतात. टस्कनी प्रवासाचे देखील असेच झाले.

टस्कनी सोडतांना पण मनात हीच आशा होती की परत एकदातरी या भागात यायला मिळावा. इटलीची रोमा आणि वेनिस हि शहर पण मी पुढील टप्प्यात बघितली पण त्यावर पुन्हा कधितरी !!!!!

===

InMarathi.com वर विविध लेखकांनी व्यक्त केलेले विचार ही त्यांची वैयक्तिक मतं असतात. InMarathi.com त्या मतांशी सहमत असेलच असं नाही. | आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page । Copyright (c) 2017  InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?