Site icon InMarathi

२६ नोव्हेम्बर, संविधान दिना निमित्त पुण्यात एका अप्रतिम कार्यक्रमाचं आयोजन!

आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page

===

सोशल मीडियाचा वापर वाढला आणि छोट्यातली छोटी बातमी आपल्यापर्यंत सहजपणे पोहचायला लागली. माध्यमांना आलेल्या व्यावसायिक स्वरूपामुळे बातम्याही परिणामांचा आणि मूल्यांचा विचार न करता खपवल्या जाऊ लागल्या आहेत. यामुळे होतंय असं की आपण बातम्या घेऊन जातील तिथं आपल्या विचारांना वाट दाखवत आहोत. त्यामुळे जे विषय चर्चेच्या केंद्रस्थानी असायला हवे ते विषय मागे पडून तात्कालिक गोंधळावर आपण वेळ घालवतो. आणि त्यातून साध्य काहीच होत नाही.

 

 

माणसाच्या वैचारिक प्रगतीच्या पायरीवर मूळ संदर्भ, मूलभूत संकल्पना यांचा अभ्यास करून येणारी प्रगल्भता दुर्मिळ होत गेली. साहित्य, सिनेमे, माध्यमं, चर्चा यांतून सुमारांची सद्दी निर्माण झालीय. एकंदर, उथळपणा वाढत चालल्याचे हे चित्र आहे. अशा परिस्थितीत मूळ दुर्लक्षित विषयांना हात घालणे, अभ्यासणे, त्याबद्दल लिहिणे, कार्यक्रम आयोजित करणे यातून वैचरिक विश्वात एक पर्याय उभा करणे हे आम्हला महत्वाचं वाटतं.

धर्म, जात, समूह, इतिहास या बद्दल आदर असावा, पण अस्मिता ठेवल्या की वाद होतात. यातून जमाववाद वाढतो, दडपशाही होते आणि सुरक्षेच्या कारणाने व्यक्तीस्वातंत्र्यावर गदा येते. म्हणून ‘देश’ या व्यापक संदर्भात राष्ट्रवादी आणि वैयक्तिक पातळीवर मानवतावादी राहणं गरजेचं आहे.

“क्रिटिकात्मक” आधी ब्लॉग, फेसबुक पेज म्हणून सुरू झालं आणि आता ग्रुप म्हणून मल्टिडायमेंशनल होण्याचा आमचा प्रयत्न आहे.

संविधान साक्षरता, विचारकलह, स्त्रीवाद, लैंगिक साक्षरता, चित्रपट साक्षरता, आर्थिक साक्षरता, साहित्य या आणि अशा विषयांवर मूलभूत पातळीवर अभ्यास, लिखाण आणि चर्चासत्र, व्याख्यान आयोजित करणे ही आमची प्रमुख कार्य. वैचारिक भूमिका या ठाम न ठेवता विषयानुसार समाजहित बघून त्या सुधारणे गरजेचं असत. विषयांशी असणारी बांधिलकी आणि आपल्या अस्मिता आपली दृष्टी संकुचित करतात. म्हणून यापलीकडे जाऊन फक्त संविधान आणि संविधानिक मूल्य एवढाच संदर्भ मानणे, हेच खऱ्या अर्थाने पुरोगामीपणाचे लक्षण आहे असं आम्हाला वाटतं.

नैतीकतेच्या व्याख्या धर्म, संस्कृती, परंपरा, जमाववाद या जोखडातून काढून मानवी पातळीवर अधिक व्यावहारिक बनणे गरजेचे आहे. समाज हे केंद्र मानुन त्यानुसार नैतिकता ठराव्यात. पोथीनिष्ठ तत्ववादी दृष्टिकोन आणि ‘पाश्चिमात्य ते चुकीचं’ हा दृष्टिकोन आपल्याला अजूनही जागतिक स्पर्धेत सामाजिक मागासच ठरवतो. सोबतच आधुनिकता, वैज्ञानिक दृष्टिकोन या मूल्यांचा अधिक प्रकार होणे आवश्यक आहे.

प्रस्थापित वैचारिक प्रवाह, विचारवंत, त्यांचं साहित्य, चळवळी यांच्या भूमिका प्रचलित व्याख्येनुसार पुरोगामी वाटतात म्हणून अंधपणे न स्वीकारता त्यांनाही चिकित्सेच्या कसोटीवर तपासावे. विचारप्रवाह अंधपणाने स्वीकारण्याची प्रवृत्ती संपवल्याशिवाय पुरोगामी मूल्य व्यवहारात येणार नाही.

इस्लाम चिकित्सा, इहवाद, संविधान जागर या विषयांना असणारे महत्व अधोरेखित करण्याची आमची भूमिका आहे. परिवर्तन या मखमली पडद्याआड आजतागायत फक्त अव्यवहारिक समाजहिताची स्वप्न दाखवण्यात आली.

अस्तित्वात येऊ न शकणाऱ्या आर्थिक व्यवस्थांची भरपूर वाहवा झाली. यातून साध्य काहीच झालं नाही कारण व्यक्ती, स्वातंत्र्य, संविधानाला अभिप्रेत धर्मनिरपेक्षता, या घटकांचा विचारच झालेला नाही.

विचारवंतही याच मार्गाने गेल्याने यांची चिकित्सा करणारे सर्वजण यांचे विरोधक आपोआपच प्रतिगामी म्हणून गणले गेले. विचारांच्या बाबतीत व्यवहारिकतेचा हट्ट धरल्याशिवाय सामाजिक चळवळी पूर्णत्वास जाऊ शकणार नाहीत.

 

 

विचारांतून प्रेरणा घेऊन कामे उभी राहतात. विचारकलहातून समाज प्रगल्भ होतो. म्हणून एकच एक विचारप्रवाह नव्हे तर परस्पर पूरक असणाऱ्या विचारकलहाचा प्रसार आवश्यक वाटतो.

अस्मिताबाजी, राजकीय वादांचे ग्लोरिफिकेशन, माध्यमांनी गरज नसलेल्या गोष्टींना दिलेलं अवास्तव महत्व यातून मूळ सामाजिक समस्यांकडे आपलं दुर्लक्ष्य होत आहे. कमी महत्वाच्या गोष्टींवर जास्त महत्वाचा वेळ वाया जातोय, आणि विचार शक्तीही. पण मूळ ज्या गोष्टींवर डावं आणि उजवं या संकल्पना आधारित आहेत त्या आर्थिक मुद्द्यांवर चर्चाच होत नाही.

नेहमी काहीतरी तात्कालिक कारण घेऊन एखादी विचारसरणी कळालेली नसताना होणारा विरोध आपल्याही वैचारिक वर्तुळात अस्पष्टतेचा गराडा घालतो. JNU त काहीतरी झालं की डावे देशद्रोहीच आणि गोमांस बंदी घातली की उजवे प्रतिगामीच असं बऱ्याचदा ढोबळमानाने ठरवून आपण मोकळे होतो. कामगार चळवळी, स्त्रीवाद, लैंगिक शिक्षण यावर बोलणारे डावे आणि उद्योजकता, राष्ट्रवाद, ऐतिहासिक वारसा यावर बोलणारे उजवे हा ठोकताळा पाळलेला दिसतो. यातून होतं असं की एक विचारसरणी म्हणून मूलभूत पातळीवर असणारा फरक आणि त्याचे परिणाम हे कधीच चर्चिले जात नाहीत. अंधश्रद्धेप्राणे अंधविचार पसरतो आहे.

म्हणून “कुठला विचार बरोबर आहे?” हे समजून घेण्याआधी “तो विचार नेमका काय आहे?” हे समजून घेण्याची गरज आहे.

म्हणून या विषयावर सखोल अभ्यास असणाऱ्या अभ्यासकांचा परिसंवाद आयोजित केलाय. विचारांतील स्पष्टता, संकल्पनांमधील मूलभूत फरक, व्यवहारिकता, विचारांचे भवितव्य या गोष्टींवर तज्ञ मंडळी प्रकाश टाकतील, “समकालीन विचारकलह- दशा आणि दिशा” या सत्रामध्ये. त्याचबरोबर भारतीय संघराज्य, त्याची रचना आणि संघराज्य ही संकल्पना नक्की काय असते हे जाणून घेता येईल “संविधान आणि भारतीय संघराज्य पद्धती” या विषयावरील व्याख्यानातून.

‎संविधानिक मूल्य, समाजातील प्रत्येक घटकाला समृद्धतेकडे नेणारे मार्ग, व्यावहारिक आर्थिक सुधारणा, यांच महत्व सामाजिक परिप्रेक्षात प्राथमिकतेवर आणण्यासाठी प्रयत्न व्हावेत म्हणून हा खटाटोप.

संविधान दिवसाचं औचित्य साधून संविधानिक मूल्यांचं आकलन व्हावं या हेतूने हा कार्यक्रम आयोजित करत आहोत.

कार्यक्रम पत्रिका पुढे जोडत आहोत…सर्वांनी आवर्जून यावं ही विनंती!

टीम क्रिटिकात्मक

कार्यक्रम पत्रिका :

 

 

 

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page । Copyright (c) 2017  InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version