आणि घनदाट जंगलात चक्क वाघ आमच्या समोर आला…
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम |
===
काही गोष्टी या डीएनएत असाव्या लागतात. भटकंती हा त्यातलाच एक प्रकार आहे. तुम्हाला भटकायला मिळणे आणि आवडणे यातला फरक कळायला हवा. मला भटकायला आवडते आणि भटकायला मिळाले देखील. हा गुण मी माझ्या आईकडून घेतला आहे.
माझ्या आईला प्रवास करण्याची आणि अनेक नवीन ठिकाणे बघण्याची प्रचंड आवड होती. बाबांनी तिला तिच्यासाठी म्हणून दिलेल्या पैशातून सबंध भारत अनेक छोट्या मोठ्या यात्रा कंपनी सोबत प्रवास करून बघितला आहे. मी देखील असाच खूप भटकलो.
आपला देश लेंथ ब्रेड्थ मध्ये बघितला आहे. अनेक परदेशवारी झाल्यात, सतरा-अठरा वेळा हिमालयात लावून आलो, टायगर रिझर्व्ह तर माझे फर्स्ट होम अनेकवेळा झाले आहे. याच भटकंतीच्या काही कथा इथे देण्याचा प्रयत्न करतो आहे.
सुरवात कुठून करावी हा मोठा प्रश्न होता. या प्रश्नाचे उत्तर सोपे केले वाघाने. माझा वाघावर जीव आहे आणि माझे वाघ सायटिंग नशीब ही जोरदार आहे. मी जंगलात वाघ बघायला गेलो आणि वाघ दिसला नाही असे आज पर्यंत तरी झालेले नाही. वाघावर असलेले प्रेम आणि त्या बद्दलचे आकर्षण एकदम स्वाभाविक आहे.
मी मुळचा परतवाडा, जि. अमरावतीचा. हे गाव मेळघाट टायगर रिझर्वच्या पायथ्याशी आहे. तसेही संपूर्ण शिक्षण आणि बराच काळ विदर्भात गेल्यामुळे जंगलात जावून वाघ बघणे हा नित्यक्रमाचा भाग वाटतो.
प्रचंड थंडीचा दिवस होता कान्हाला. मध्य प्रदेशात असलेले कान्हा. भारतातल्या सर्वात सुंदर जंगलापैकी एक. काय नाही आहे इथे. बांबूची बने आहेत. सदा हिरवेगार राहणारे जंगल आहे.
जिवंत पाण्याचा स्त्रोत आहे. गवताची मोठीच्या मोठी कुरणे आहेत. पण कान्हाचे आणि इथल्या अधिकाऱ्यांचे कौतुक व्हायला पाहिजे बारासिंघा साठी.
१९७४ साली कान्हा जेंव्हा प्रोजेक्ट टायगरमध्ये सामील झाले तेव्हा बारासिंघा जवळपास नामशेष होण्याच्या मार्गावर होते. पण कान्हाच्या जंगलाने आणि येथील अधिकारी वर्गाने महात्प्रयासाने बारासिंघाचे जतन केले, त्यांना संरक्षण दिले, वाढवले.
आज बारासिंघा इथे डौलाने राहतो आहे. त्यांची संख्या योग्य प्रमाणात वाढली आहे. भारतात बारासिंघा बघायचा असेल तर कान्हाला भेट देणे या एकच पर्याय आहे. बारासिंघा इथली इंडेमिक प्रजाती आहे.
कान्हाची खासियत काय असेल तर इथे असलेली व्हरायटी. बांधवगड नावाच्या आपल्या भावंडाला चिडवतांना कान्हाचे गाईड म्हणतात, बांधवगड में बाघ और मोर देख के हो जाओगे बोर. कान्हाचे मात्र तसे नाही.
इथे गौर आहे, ढोल (जंगली कुत्री) आहेत, बिबट्या आहे आणि तो दिसतो देखील, बारासिंघा आहे, चितळ आणि सांबार तर आहेतच. कान्हात जबरदस्त व्हेरायटी बघायला मिळते. त्यामुळे हे जंगल तुम्हाला सफरीत कधीही बोर होवू देत नाही. काही न काही सारखे दृष्टीस पडतच असते.
कान्हात वाघांची संख्या देखील भरपूर आहे. पण घनदाट जंगल असल्यामुळे इथे वाघ शोधायला जरा जास्त कष्ट घ्यावे लागतात. पण एकादा का वाघ दिसला की त्यासारखे अलौकिक काही नाही.
जानेवारी महिन्याची अशीच एक थंड्वार सकाळ होती. थंडी नाका कानाच्या मार्फत हाडात शिरली होती. कान्हाच्या गेटवर एक मोठे डिजिटल थर्मामीटर लावलेले आहे. त्या दिवशी ते तापमान शून्य डिग्री आहे असे दाखवत होते. पण थंडी असली म्हणून काय झाले, आम्हाला जंगलात जायचे होतेच. गरम कपड्यांच्या सुरक्षा व्यवस्थेत आम्ही किसली गेटने आत प्रवेश केला.
अंदाजे पंधरा वीस मिनिटे झाली असतील. आम्ही एक मोठे गवताचे कुरण पार करून एक उंच चढाव चढून घाटमाथ्यावर आलो होतो. थंडी आता नाकातून वाहायला लागली होती.
त्या दिवशी वाघ सोडा, साधे माकड किंवा चितळ देखील दिसले नव्हते. झक मारली आणि या थंडीत जंगलात ओपन जीपमध्ये बसून शिरलो असे बाजूला बसलेल्या मित्रांना वाटत होते. पण तसे नव्हते.
माकडाने एक अलार्म कॉल दिला आणि एकाएकी मरगळलेल्या त्या वातावरणात चेतना जागृत झाली. अचानक दोन चार माकडे झाडाच्या या फांदीवरून त्या फांदीवर उड्या मारायला लागली. आत्तापर्यंत डोळ्यास न दिसणारी हरणे शेपूट अटेन्शन मोड मध्ये ठेवून दिसायला लागली.
आम्ही पण आता गाडी थांबवून राजाची वाट बघायला लागलो होतो. एका वळणावर आम्ही त्याची गाठ घेण्यास उत्सुक होतो. दहा मिनिटांच्या प्रतीक्षेनंतर त्याचे जंगलाच्या मंचावर आगमन झाले.
वाघाची दमदार चाल त्याच्या सौंदर्यात आणि रुबाबात नेहमीच भर घालते. थंडीचा पीक सीझन होता. वाघाच्या अंगावर असलेला फरकोट त्याच्या बेस्ट पॉसीबल रंगात आणि टेक्सचर्डला होता. थंडीची त्याला पर्वा नव्हती. वाघ त्या मऊशार मातीवर चालायला लागला.
वाघाचे आमच्यावर हेडऑन येणे हे काही माझ्यासाठी नवे नव्हते. हातात कॅमेरा तयार होता. तो सरळ चालत येत होता आणि आम्ही आमची जीप रिव्हर्स घेत होतो. त्याने पानांचा वास घेतला, कधी थांबून मार्किंग केले, तर कधी उगाच आमच्यावर नाराज रोखली. त्या थंडीत तो ओढ्याचे थंडगार पाणी देखील प्यायला.
बघता बघता अर्धा तास संपला आणि राजे एका जाळीतून आत जंगलात निघून गेले. जीप माढेल सगळे लोक उत्साहानी नाचायचे शिल्लक राहिले होते. गेल्या आठ सफारीत आम्हाला वाघ दिसला नव्हता.
जंगलाचे असेच असते, कधी देईल ते माहीत नाही. पण ती मोमेंट तुमच्या नशिबी कधीतरी येईल यावर तुमचा विश्वास असणे गरजेचे असते. पण तेव्हा मात्र तुम्ही योग्य वेळी योग्य जागे हजार असणे गरजेचे असते.
===
InMarathi.com वर विविध लेखकांनी व्यक्त केलेले विचार ही त्यांची वैयक्तिक मतं असतात. InMarathi.com त्या मतांशी सहमत असेलच असं नाही. | आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | Copyright © InMarathi.com | All rights reserved.