हिंदू मनाला भावलेला, कायमचा वसलेला ध्रुवतारा : बाळासाहेब ठाकरे
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
===
लेखक – सौरभ गणपत्ये
===
भारतापासून पाकिस्तान वेगळा झाला आणि भारतातील हिंदू मुस्लिम संबंध कायमचे दुरावले.
भारतात राज्यकर्ती जमात असलेला मुस्लिम समाज एकदम अल्पसंख्याक झाला आणि जागोजागी ghetto मानसिकता ठेवत आपापल्या बस्त्यांमध्ये राहू लागला.
अनेकांनी आपल्या आयुष्यात मुस्लिम माणूस मित्र म्हणून बघितलेलाही नसतो. हिंदी सिनेमांमध्ये परंपरागत पद्धतीने एखादं अत्यंत प्रेमळ, सहृदयी मुस्लिम पात्र असतं – तेवढीच मुस्लिमांची ओळख गेली पहिली साडे तीन दशकं चित्रपटसृष्टीला होती.
रूढ अर्थाने पहिला सुपरस्टार दिलीप कुमार. सिनेमात त्याने एकवेळ ‘यहुदी’ पात्र उभं केलं परंतु, त्याचं एखादं गाजलेलं मुस्लिम पात्र आठवणार नाही.
सलीम हे पात्र ऐतिहासिक होतं – आजच्या युगातलं ऐहिक नव्हतं.
भारतातल्या सेक्युलर पुरोगामी काळाला गुटगुटीतपण येण्याचा हाच काळ.
बाळासाहेब ठाकरे ही व्यक्ती, एकाचवेळी अत्यंत वरच्या वर्तुळातल्या पुरोगामी, सेक्युलर समाजात अत्यंत बदनाम का? आणि त्याचवेळेला, तळागाळातल्या खासकरून शहरी नागरी समाजात जबरदस्त लोकप्रिय का?
– ह्या दोन्ही प्रश्नांचं उत्तर ह्याच समीकरणात दडलंय.
मुंबईमध्ये तशी अनेक सामाजिक वर्तुळं दिसतील. परंतु खास मार्क्सिस्ट भाषेत – “आहे रे” आणि “नाही रे” – असा विचार केला तर फिल्म इंडस्ट्रीपण मुंबईतलीच आणि कामगारवर्ग पण मुंबईतलाच.
चित्रपट सृष्टीमध्ये काही प्रमाणात मुस्लिमांचं वास्तव्य होतं. आणि त्यांचं योगदानही मोठं होतं. भारतातला सेक्युलॅरिझम काय आहे हे दाखवण्यासाठी सर्वात मोठा दाखला सिनेमाचा दिला जातो.
युसूफ खान हे मूळ नाव असलेला अभिनेता पडद्यावर गाणं म्हणतोय. त्याची नायिका आहे सायरा बानो. गाणं म्हणणारा आवाज आहे मोहम्मद रफी ह्या नावाचा. आणि गाणं आहे श्रीकृष्णापुढे!
किंवा…नायक शाहरुख खान / आमिर खान, संगीतकार ए आर रहमान, गीतकार जावेद अख्तर – आणि हे ही गाणं राम किंवा कृष्णाचं !
ह्या अश्या उदाहरणांमधून भारताचा सेक्युलॅरिझम किंवा त्याचा सर्वधर्मसमभाव मांडला जातो. भारतातल्या पुरोगाम्यांना ह्या बाबतीत हिंदी सिनेमाने अफाट बळ दिलं आहे.
ह्या वर्गाचा उर्वरित समाजाकडे बघायचा दृष्टिकोन अतिशय तुच्छ असतो. ह्या “तुच्छ” समाजामध्ये बाळासाहेबांसारखा माणूस मोठा का होतो ह्याची कारणं कधीच पुरोगामी वर्गाला तपासावीशी वाटत नाहीत.
शिवसेनेची स्थापना, तिच्या पहिल्या सभा, तिच्यामागची विचारधारा ह्याबद्दल चर्चाही करायची गरज नाही इतका तो विषय सर्वमान्य आहे. पण शिवसेना ‘वयात’ आली ह्याला त्या काळचा एक फार मोठा आयाम आहे.
सिनेमाच्या पडद्यावर अमिताभ बच्चन मोठा होणे आणि राजकीय पटलावर बाळासाहेब मोठे होणं ह्या गोष्टी एकत्रच घडल्या.
जंजीर, दिवार, त्रिशूल, काळ पथ्थर, खून पसीना हे सिनेमे करत अमिताभ मोठा झाला. आणि मराठी माणसाला चॅनलाईज करत बाळासाहेबांना मोठेपण मिळालं.
संयुक्त महाराष्ट्र लढून तर मिळाला, पण चालवायचा कसा ह्याची कोणतीही कल्पना आचार्य अत्रे वगळता कोणत्याही नेत्याकडे नव्हती.
१९६२ च्या निवडणुकांनंतर संयुक्त महाराष्ट्र समिती संपली आणि राजकीय व सामाजिक दृष्ट्या भरकटलेला तरुण बाळासाहेबांनी एकत्र आणला. कम्युनिस्टांचं प्राबल्य होतंच. पण कामगार संघटनांपुरतंच.
७० च्या दशकामध्ये, “वसंतसेना” असं नाव पडल्यावर, बाळासाहेबांनी लागलीच स्वतःमध्ये आणि संघटनेमध्ये बदल घडवायला सुरूवात केली. ८५ साली, विधानसभेमध्ये, शिवसेनेचा १ च आमदार होता.
पण छगन भुजबळ नावाचे ते आमदार, विधानसभेला भारी होते. त्याचे श्रेय भुजबळ आजही बाळासाहेबांना देतात (जेलमधून!). बाळासाहेबांच्या राजकारणाला बहर आला पुढच्या ७ वर्षांमध्ये.
आडवाणींची रथयात्रा (ज्यात आजचे पंतप्रधान नरेंद्र मोदी सारथी होते) संपूर्णपणे भाजप अन संघ परिवाराची होती.
ती अयोध्येपर्यंत पोहोचली, ९२ साली बाबरी मशीद पडली, आणि तोपर्यंत पूर्णपणे क्रियाशील असलेल्या संघ परिवारात एकच पळापळ सुरू झाली.
ज्या वेळेला, चौकशी सुरू झाली त्यावेळेला अनेक मोठ्या नेत्यांनी एकतर ‘मी तिथे नव्हतो’ किंवा ‘कुणी केलं माहित नाही’ किंवा ‘”पाडा” असं मी बोललोच नाही’ अशी भूमिका घेतली.
अचानक कुणीतरी कुजबुज सुरु केली की “मशीद पाडण्यामध्ये शिवसैनिक होते असे आम्हाला वाटते”. ही कुजबुज बाळासाहेबांपर्यंत पोहोचली. आणि –
“जर ही मशीद पाडण्यात शिवसैनिक असतील तर मला त्यांचा अभिमान आहे”
अशी भूमिका बाळासाहेबांनी घेतली.
ज्यांनी बांधकाम पाडलं, ते तोंड लपवून पळापळ करताहेत – आणि – ज्याच्यावर आरोप झाला तो मात्र छातीठोकपणे त्याला समर्थन देऊन जबाबदारी घेतोय. अशी विचित्र परिस्थिती निर्माण झाली.
“बाळासाहेब” हा फेनामेना झाला तो तेव्हापासून.
सुरुवातीला नमूद केल्याप्रमाणे, मुंबईत अंधेरी, बांद्रा कुलाबा, नरिमन पॉईंट हे भाग आहेत जिथून मुंबईतला लेखक, दिग्दर्शक, कलावंत, पत्रकार (इंग्रजी आणि प्रस्थापित), असा वर्ग येतो.
ह्यांनी वैयक्तिक आयुष्यात मुसलमानांशी शेजार, अन्नाची देवाणघेवाण, एकूणच वैयक्तिक संबंध फारसे बघितलेले नसतात. क्वचित असतीलच तर तो मुसलमान खानदानी असतो.
पण मुस्लिम समाजात मध्यम वर्ग जेमतेम काही टक्के आहे. उर्वरित समाज कनिष्ठ वर्गातून येतो. तो मुंबईतल्या बेहरामपाडा, डोंगरी, परळ, शिवडी, लाल बाग, भायखळा, मस्जिद बंदर (मोहम्मद अली रोड), कुर्ला ह्या भागात रहातो.
बाबरी मशीद पडल्यावर पहिली प्रतिक्रिया उमटली ती ह्याच भागांमध्ये. एव्हाना कारसेवेला नैतिक आणि काहीप्रमाणात आर्थिक पाठिंबा देणारे आता घरातनं बाहर पडणं मुश्किल झालं. अश्या वेळेला मुंबईतला शिवसैनिक रस्त्यावर उतरला.
घराला बाहेरून कडी लावलीये, दंगेखोर घर जाळायच्या बेतात आहेत आणि घरातल्या एखाद्या सदस्याचे तरुण शिवसैनिक मित्र दंगेखोरांना फटकावायला धावून येताहेत – हे चित्र माहीत नसणारा मुंबईतला माणूस विरळाच.
त्यामुळे ज्या भागात मुंबईतला मध्यम आणि कनिष्ठ मध्यमवर्ग रहातो त्या भागात शिवसेनेबद्दल प्रेम, आदर आणि माया असेल तर योग्यच म्हणायला हवी. अभिजन वर्गातल्या पुरोगाम्याला ह्या प्रसंगाशी देणंघेणं कधीच नव्हतं.
–
- हिंदू मनाला भावलेला ध्रुव तारा : बाळासाहेब ठाकरे
- संजय दत्तवर बाळासाहेब ठाकरेंचे अनंत उपकार आहेत, ज्याखाली सुनील दत्तदेखील दबले गेले होते
–
त्याला ह्या गोष्टी कधीच समजणारही नाहीत. १९९३ च्या बॉम्बस्फोटात प्लाझा सिनेमाजवळ एक बॉम्ब फुटला. त्याची मूळ शिकार होती जवळचा पेट्रोल पंप आणि त्यायोगे त्याच्याच बाजूचं सेनाभवन हे त्याच खरं लक्ष्य होतं.
बाळासाहेबांचा जनसंपर्क अफाट होता. मिरझा गालिबच्या अनेक रचना बाळासाहेबांना तोंडपाठ होत्या.
व्यंग चित्रकार असल्यामुळे ती पत्रकाराची भन्नाट दृष्टी त्यांच्याकडे होती. पक्षाच्याही पलीकडे अनेक राजकारणी, कलावंत, साहित्यिक, उद्योजक असा बाळासाहेबांचा न संपणारा गोतावळा होता.
१९९५ साली ६९ वर्षांच्या बाळासाहेबांनी राज्यभर झंझावाती दौरे करत युतीला एकहाती सत्ता आणून दिली. त्या वेळेला भाजप महाराष्ट्रामध्ये बाळासाहेबांच्या कृपेने जगत होता.
भाजपची त्या वेळची अवस्था विकास सबनीसांनी एका अप्रतिम व्यंगचित्राद्वारे मांडली होती. भाजपने त्यावेळेस “शत प्रतिशत” चा नारा दिला होता.
भाजपचा एक मोठा नेता, तोंडात खेळण्यातलं निप्पल घेऊन, हातात शत प्रतिशतचा बोर्ड घेऊन एका बाबागाडीत बसलाय…आणि…बाबागाडी बाळासाहेब चालवताहेत…असं ते व्यंग चित्र होतं!
१९९५ ची सत्ता १९९९ ला का गेली ह्याचं उत्तर बाळासाहेबांच्या भाबडेपणातून आलेल्या दिलदारपणामध्ये दडलेलं आहे.
एकटी सगळ्या जागा लढवून काँग्रेस ७५, सगळ्या जागा लढवत राष्ट्रवादी काँग्रेस ५८ आणि युतीमध्ये लढवून शिवसेना आणि भाजप १२५.
प्रमोद महाजनांना हा जनादेश “आपल्या विरुद्ध” असल्याचा साक्षात्कार झाला. त्यांनी तसे घोषितही केले. आणि शिवसेना भाजपकडून सत्ता लाथाडण्याची चूक झाली.
केंद्रामधे वाजपेयी सरकार होतंच. मग राज्यातलं सरकार आपल्याकडे नसलं तर कुठे बिघडलं असा विचारही बाळासाहेबांना कुणीतरी पटवून दिला असेल.
काहीही करून सत्ता मिळवणं आणि मिळवल्यावर ती टिकवणं, राबवणं आणि त्यातून पुढे पुन्हा सत्ता येईल अशी तजवीज करणं – हे जर कोणत्याही मुरलेल्या राजकारण्याचं लक्षण असेल तर त्या अर्थाने बाळासाहेब ठाकरे राजकारणी नव्हते.
मनोहर जोशींनी सांगितलेला हा किस्सा महत्वाचा होता. जे जे हॉस्पिटलच्या डीनना शिवसैनिकांनी उचललं. बाळासाहेबांना फोन गेला. फोन ठेऊन बाळासाहेब नाराजीनेच जोशींना म्हणाले “विचारल्याशिवाय ही मुलं हे का करतात?”.
पण पुढे मीडिया आला आणि मीडियासमोर बाळासाहेबांनी माझ्या सैनिकांनी जे केलं ते योग्यच केलं अशी भूमिका घेतली. आपल्या मागे आपला सर्वोच्च नेता आहे ही बाबच कार्यकर्त्याला तेंव्हा आत्मिक बळ द्यायची आणि सैनिक व्हायचा.
युतीच्या सत्ताकालखंडात महाराष्ट्रामधे आणि पुढे देशामधे उड्डाणपूल संस्कृती आली. मुंबई पुणे एक्स्प्रेस हायवे तयार झाला. आज नितीन गडकरी रस्ते बांधणी क्षेत्रामधे जो देशाचा चेहरामोहरा बदलून टाकण्याच्या प्रयत्नात आहेत, त्याची पायाभरणी ह्याच काळातली.
ह्याच महामार्गातून प्रेरणा घेऊन देशभर वेगवान महामार्ग उभे राहिले. युतीची महाराष्ट्रातून सत्ता गेल्यावर महाराष्ट्रामधे संभाजी ब्रिगेड, छावा आणि इतर संघटना फोफावल्या हे सत्य कुणीही नाकारू शकत नाही.
बाळासाहेबांकडे दिलदारपणा खूपच होता. पण त्यांच्या आसपास अत्यंत भाबडी किंवा कमालीची बनेल माणसं होती. त्यांच्यापैकी कुणीही शिवसेना मोठी करण्यासाठी बाळासाहेबांच्या पावपट देखील कष्ट घेतले नाही, हे सत्य आहे.
बाळासाहेबांना एका विशिष्ट वर्तुळामधे कमालीचा द्वेष मिळाला. पण त्याच वेळेला, मध्यमवर्गीय वर्तुळामधे बाळासाहेबांची लोकप्रियता नेपाळ आणि मलेशिया पर्यंत पसरली होती. कट्टर नेपाळी हिंदू आणि मलेशियामधले अल्पसंख्याक हिंदू ह्या सर्वांना बाळासाहेबांबद्दल आकर्षण होतं.
महाराष्ट्रातलं राजकारण गेली ३५ वर्ष बाळासाहेब ठाकरे आणि शरद पवार ह्या दोघांभोवती फिरत राहिलं.
६० च्या दशकात मुंबईच्या राजकारणात आचार्य अत्रे, कॉ डांगे आणि जॉर्ज फर्नांडिस ह्यांच्यात बाळासाहेबांनी आपली जागा तयार केली. ती शेवटपर्यंत टिकवली. पुढे ८० च्या दशकापासून शरद पवार हा दुसरा ध्रुव तयार झाला.
आताच्या कोणत्याच राजकारण्यामधे तेवढी शक्ती दिसत नाही. ह्या दोन्ही नेत्यांच्या समर्थकांच्या भक्तीचा हाच लसावि आहे.
–
- ठाकरे ते अक्सिडेंटल प्राईम मिनिस्टर : राजकारण आणि चित्रपटांचं अदृश्य परंतु भेदक वास्तव
- बाळ ठाकरे : आधुनिक महाराष्ट्राचा मानबिंदू… आणि शोकांतिका पण !
===
इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
InMarathi.com वर विविध लेखकांनी व्यक्त केलेले विचार ही त्यांची वैयक्तिक मतं असतात. InMarathi.com त्या मतांशी सहमत असेलच असं नाही. | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर । इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.