मुंबई महानगरपालिकेचं हे पाऊल स्त्रियांचं आपल्या समाजातील स्थान अधिकच उंचावणार आहे
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम |
===
भारत हा तसा पुरुष प्रधान देश. आज आपण अनेक क्षेत्रात प्रगती केली असली तरी भारतात- महाराष्ट्रात स्त्रीभ्रुण हत्या काही केल्या थांबत नाही. त्याकरता सरकार आणि इतर सामाजिक संस्था स्त्री भ्रूण हत्येबाबत जनजागृती करत आहेत.
तरीही फारसा फरक पडताना दिसत नाही. लोक सोनोग्राफी सारख्या आधुनिक यंत्राचा वापर मुलगा आहे की मुलगी हे बघण्यासाठी करतात. अनेक महिलांची इच्छा नसताना त्यांना सासरच्या किंवा पतीच्या दबावाला बळी पडून स्त्रीभ्रुण हत्या करावी लागते.
याबाबत माध्यमांत अनेकदा बातम्या देखील आल्या आहेत. परंतू, पालथ्या घड्यावर पाणी. आजही ग्रामीण भागात मुलींची नावं नकुसा, नकुशी अशी ठेवली जातात. तर शहरी सुशिक्षित लोकं गुप्तपणे स्त्री भ्रूण हत्या करतात.
तर दुसरीकडे महिला त्यांच्या कर्तुत्वाचा ठसा उमटवत आहेत. दंगल हा या विषयावर आलेला चित्रपट अतिशय बोलका आहे. त्यामध्ये गिता व बबिताचे वडिल म्हणतात …
“म्हारी छोरींया क्या छोरोंसे कम हे के” हा डायलॉग आपण सिनेमा थिएटर मध्ये एकल्यावर टाळ्यांचा कडकडाट केला असेल. ऐकला असेल.
स्वातंत्र्यपूर्व काळात महिलांना शिकायला, राज गादीवर बसायला अनेक संघर्ष केल्याचे आपण इतिहासात वाचले आहेच. झाशीच्या राणी पासून सावित्रीबाई फुलें पर्यंत अनेक नावं घेता येतील.
तसंच महात्मा फुलेंपासून महर्षी कर्वें पर्यंत अनेक महापुरुषांनी स्त्री शिक्षणासाठी श्रम घेतले. प्रवाहा विरुद्ध उभे राहिले. आज त्याची फळं म्हणजे सर्वक्षेत्रात यशस्वी होणाऱ्या महिला.
किरण बेदी या पहिल्या महिला IPS ऑफिसर झाल्या. कल्पना चावला पहिली भारतीय वंशाची महिला होती जिने अंतराळात झेप घेतली. ICICI बँकेच्या मुख्य अधिकारी चंदा कोचर आणि पेप्सी को कंपनीच्या मुख्य अधिकारी इंद्रा नुई यांची जगभर एक यशस्वी मुख्य अधिकारी म्हणून ओळख आहे.
तर रजनी पंडित यांनी पुरुषांचे वर्चस्व असलेल्या आणि अत्यंत जोखमीच्या समजल्या जाणाऱ्या हेरगिरीच्या क्षेत्रात नाव केलं आहे. तसंच आज भारतीय लष्करात आणि निमलष्करात महिलांची कमांडो म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
तसंच रेल्वे, मेट्रो विमान चालवणाऱ्या अनेक महिलांची नावं आपल्या परिचयाची आहेत. महिला आज सर्वच क्षेत्रात आघाडीवर आहेत.
मुंबई महानगरपालिकेने पारंपारिक नियमांना छेद देत तब्बल ९७ महिलांची अग्ऩिशमन दलात भरती केली आहे. हा नवा इतिहास रचणारी मुंबई महापालिका भारतातील पहिली महापालिका आहे. याआधी पालिकेने १८ महिलांची भरती केली होती. आता नव्याने ९७ महिला भरती झाल्याने पालिकेच्या अग्निशमन दलात ११८ महिला कर्मचारी आहेत.
या महिलांना पालिकेच्या ३४ फायर स्टेशनमध्ये नियुक्त करण्यात येणार आहे. यातील अनेक महिला या खेडेगावातून आलेल्या आहेत. या नव्यादमाच्या महिलांची तुकडी सध्या वडाळा येथे फायर फायटींगची ट्रेनिंग घेत आहे. ते पूर्ण झाल्यावर त्यांना पुरुषांप्रमाणेच मुंबईतील फायर स्टेशनवर ड्युटी देण्यात येणार आहे.
या संदर्भात मुख्य अग्निशमन अधिकारी पी. रहांगदाळे यांनी टाइम्सला दिलेल्या माहितीनुसार
या महिला वडाळा येथील ट्रेनिंग सेंटरमध्ये ट्रेनिंग घेत आहेत. त्यानंतर त्यांना मुंबईतील फायर स्टेशनवर नियुक्त करण्यात येणार आहे. महिलांची ही बॅच त्यांच्या ट्रेनिंगच्या शेवटच्या टप्प्यात आहे. महिलांचा उत्साह बघून आनंद वाटतो. त्या भविष्यातील आव्हानं स्विकारायला तयार आहेत.
===
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | Copyright © InMarathi.com | All rights reserved.