व्यवसायात यशस्वी व्हायच असेल तर सायकलवर दूध विकून कोट्यावधींचा मालक बनलेल्या उद्योजकाची कथा वाचा
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम
===
कोणत्याही व्यवसायात कुणीही झटपट यशस्वी होत नाही. त्यासाठी जिद्द, चिकाटी आणि खूप मेहनतीची गरज असते. तुम्ही जर एखादा व्यवसाय कर ठरवत असाल, तर तुम्हाला त्या व्यवसायाबद्दल पूर्ण माहिती असणे गरजेचे आहे.
आपल्याला त्या व्यवसायाला पुढे कसे न्यायचे आहे, याबद्दल पूर्वतयारी करणे देखील आवश्यक आहे. त्यामुळे प्रत्येक गोष्ट काळजीपूर्वक केली पाहिजे.
आज आम्ही तुम्हाला अशाच एका यशस्वी व्यवसायिकाबद्दल सांगणार आहोत. ज्यांनी सायकलवरून दूध विकत आपल्या व्यवसायाची सुरुवात केली आणि आज ते कोट्यावधींचे मालक आहेत.
चला तर मग जाणून घेऊया, या यशस्वी व्यवसायिकाबद्दल…
या यशस्वी व्यवसायिकाचे नाव नारायण मजुमदार आहे. १९९७ मध्ये नारायण मजुमदार यांनी शेतकऱ्यांकडून आपल्या सायकलवरून दुध गोळा करत आपला डेअरीचा व्यवसाय सुरू केला.
दोन दशकांहून अधिक वर्षांंच्या संघर्षानंतर त्यांनी आपला व्यवसाय एवढा वाढवला आहे की आज त्यांचे वार्षिक उत्पादन २२५ कोटी आहे.
पश्चिम बंगाल राज्यातील ८ जिह्यांत त्यांचे तीन दूध प्रक्रिया प्रकल्प आणि २२ दूध शितकरण प्रकल्प आहेत.
त्यांच्या कंपनीचे नाव रेड काऊ डेअरी प्रायव्हेट लिमिटेड हे आहे. यांची ही कंपनी पूर्व भारतामध्ये सर्वात जास्त दूध आणि दुग्धजन्य पदार्थांचा पुरवठा करणाऱ्या कंपन्यांपैकी एक आहे. कंपनी नवीन असताना नारायण स्वतः शेतकऱ्यांकडून दूध गोळा करण्याचे काम करत होते.
आज मात्र त्यांची रेड काऊ कंपनी पाच प्रकारचे दूध विकते आणि या शिवाय दही, तूप, पनीर आणि रसगुल्ले देखील बनवते.
त्यांची ही कंपनी दररोज – १.८ लाख लिटर पॅक केलेले दूध, १.२ मॅट्रिक टन पनीर, १० मॅट्रिक टन दही, १० ते १२ मॅट्रिक टन घी, १५०० कॅन्स रसगुल्ला आणि ५०० कॅन्स गुलाबजाम विकते.
नारायण हे एवढे मोठे व्यवसायिक असूनही साधे जीवन जगतात. नारायण यांचा जन्म २५ जुलै १९५८ रोजी पश्चिम बंगालमधील नादिया जिल्ह्यात फुलिया गावामध्ये झाला होता. त्यांचे वडील बिमालेंडू हे शेतकरी होते आणि त्यांची आई बसंती मजुमदार ही गृहिणी होती. बिमालेंडू आणि बसंती यांना एकूण पाच आपत्य त्यात दोन मुली आहेत.
नारायण म्हणतात की,
माझ्या वडिलांची गावामध्ये एक एकर जमीन होती, पण कुटुंब चालवण्यासाठी ती पुरेशी नव्हती. कधीकधी ते उत्पन्न वाढवण्यासाठी वेगवेगळ्या नोकऱ्या करत असत. पण तरीही माझ्या जन्माच्या वेळेपर्यंत त्यांना १०० रुपयांच्या वर मिळवता येत नव्हते. त्यामुळे आमची आर्थिक परिस्थिती खूप तणावग्रस्त होती.
१९७५ मध्ये त्यांनी हरियाणातील कर्नाल येथील नॅशनल डेअरी इंस्टीट्यूटमध्ये डेअरी टेक्नॉलॉजीमध्ये बी.टेक केले. हा पाच वर्षाचा कोर्स करत असताना, त्यांना स्वतःचा खर्च भागवण्यासाठी दुग्ध शाळेमध्ये दररोज सकाळी ५ ते ७ काम करावे लागत असे.
त्यांच्या वडिलांनी या त्यांच्या कोर्ससाठी जमिनीचा एक भाग विकून पैसे उभे केले होते.
१९७९ मध्ये त्यांनी बी.टेक कोर्स पूर्ण केला आणि काम करण्यास सुरुवात केली.
महिन्याला ६१२ रुपये पगारामध्ये ते कोलकात्यामधील आईस्क्रीम कंपनीमध्ये डेअरी केमिस्ट म्हणून कामाला लागले. पण लवकरच ते आणखी एका सहकारी दुग्धशाळेत उत्तम पद आणि पगार मिळाला. तेव्हा ते उत्तर बंगालच्या सिलीगुडी मध्ये डेअरी सुपरवायझर होते.
१९८२ मध्ये त्यांनी काकली मजुमदार यांच्याशी विवाह केला आणि दोन वर्षानंतर त्यांना मुलगा झाला. त्याचे नाव नंदन मजुमदार ठेवण्यात आले. जुलै १९८५ मध्ये नारायण यांनी संयुक्त अरब अमिरातमध्ये डॅनिश डेअरीसोबत काम केले. तिथे त्यांना १८००० रुपये एवढा मोठा पगार होता, पण त्यांचा फॅमिली व्हिसा नाकारल्याने ते परत आले.
१९९७ मध्ये जेव्हा ते ४० वर्षाचे होते, त्यावेळी त्यांनी उद्योजक बनण्याचे ठरवले. त्यांनी आपल्या सायकलवरून घरोघरी जाऊन गावकऱ्यांकडून दूध गोळा केले. त्यांनी पहिल्याच दिवशी ३२० लिटर दूध गोळा केले होते. १९९९ मध्ये हुगळी जिल्ह्यातील आरम्बाघ येथे पहिले दूध शीतकरण प्लांट सुरू केले. त्याचे भाडे दर महा १०००० रू. इतके होते.
२००० मध्ये त्यांनी कच्च्या दुधाचे संकलन वाढवून ३०००० – ३५०००० लिटरपर्यंत नेले आणि त्यांच्या कंपनीची वार्षिक उलाढाल ४ कोटींपर्यंत वाढली. त्याचवर्षी त्यांनी आपल्या पत्नीसोबत समान भागीदारीत कंपनी सुरू केली आणि तिला नाव दिले, रेड काऊ डेअरी पार्टनरशिप कंपनी. २००३ मध्ये या कंपनीचे रेड काऊ डेअरी प्रायव्हेट लिमिटेड कंपनीमध्ये रुपांतरण झाले. त्यामध्ये ते आणि त्यांची पत्नी समान भागीदार होते.
आज रेड काऊ डेअरी ही कंपनी पश्चिम बंगालमधील सर्वात मोठी खाजगी दुग्धशाळा असलेली कंपनी आहे. ज्यामध्ये ४०० पेक्षा अधिक कर्मचारी आणि राज्यभरात २२५ वितरक आहेत.
नारायण म्हणतात –
आमचे ४०० कोटींचे वार्षिक उत्पन्न करण्याचे लक्ष आहे. आम्ही पॅक असलेले पाणी आणि डेअरी क्रीमर हे उत्पादन अजून आमच्या उत्पादनामध्ये वाढवण्याचा विचार करत आहोत.
६० वर्ष वय असलेल्या या नारायण यांनी आपल्या जीवनात खूप कष्ट घेतले आणि आपल्या हुशारीने ह्या यशाच्या पदारावर पोहोचले. आपण देखील यांच्याकडून काही तरी शिकले पाहिजे आणि स्वप्न पूर्ण करण्यासाठी झटले पाहिजे.
===
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | Copyright © InMarathi.com | All rights reserved.