Site icon InMarathi

शर्ट-टाय घालून रोज कचरा उचलणाऱ्या ७९ वर्षीय आजोबांची डोळे उघडणारी कथा…

आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page

===

संपूर्ण देशात मोदी सरकारने ‘स्वच्छ भारत अभियाना’चा पाया रोवला. या अभियानातून भारत स्वच्छ आणि समृद्ध व्हावा, यासाठी वेगवेगळ्या पातळीवर प्रयत्न करण्यात येत आहेत. पण हे अभियान आतापर्यंत किती यशस्वी झाले आहे, हे आपल्याला देखील माहित आहे. या अभियानामधून स्वच्छतेविषयी जनजागृती करून देखील लोकांनी आपल्या स्वभावात काही जास्त बदल केला नाही. एखाद्या सार्वजनिक ठिकाणी किंवा पर्यटनस्थळावर गेल्यानंतर देखील आपल्या देशातील काही लोक कचरा कचराकुंडीमध्ये न टाकता असाच बाहेर फेकतात. त्यामुळे हा कचरा पाहून भारतात आलेल्या परदेशी पर्यटकांचे भारताकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदलतो आणि त्यामुळे निसर्गावर देखील तेवढाच विपरीत परिणाम होतो. आज आम्ही तुम्हाला अश्या एका माणसाची गोष्ट सांगणार आहोत, जो खूप चांगल्या घरातील असूनही भारताच्या इंडिया गेटच्या आसपास पडलेला कचरा उचलतो आणि दुसऱ्या लोकांना पण उचलायला सांगतो. चला तर मग जाणून घेऊया या माणसाबद्दल..

 

 

या आजोबांचे नाव सतीश कपूर आहे आणि त्यांचे वय ७९ वर्ष आहे. पण ते या वयात देखील तरुणांना लाज वाटेल, असे काम करत आहेत. सूट – बूट घालून, गळ्यात टाय आणि डोक्यावर टोपी घालून हा माणूस आपल्या स्कूटीवरून रुबाबात उतरतो आणि कोणतीही लाज न बाळगता इंडिया गेट परिसरात पडलेला कचरा उचलतो. कचरा उचलणे हे त्यांचे काम नाही, पण आपला भारत देश स्वच्छ राहावा असे त्यांना मनापासून वाटते.

सतीश कपूर यांना कचरा उचलताना पाहून लोक त्यांना हसतात, पण ते त्याकडे लक्ष न देता हळूहळू कचरा उचलण्याचे आपले काम सुरू ठेवतात. या वयामध्ये सहसा वृद्ध माणसे घरात बसून आराम करू इच्छितात. मग सतीश कपूर सफाई करण्यासाठी इंडिया गेटवर का येतात ? या प्रश्नाचे उत्तर देताना ते म्हणाले की,

“ गेल्यावर्षी १७ सप्टेंबरला मी माझा वाढदिवस साजरा करण्यासाठी इंडिया गेटला आलो होतो, माझी इच्छा होती की, शहिदांच्या या मंदिरात मी आपला वाढदिवस साजरा करावा. पण येथील घाण पाहून माझे मन खूप दु:खी झाले आणि मी विचार केला की, मीच हे ठिकाण स्वच्छ करीन.”

 

 

सतीश हे दररोज ग्रेटर कैलाश येथून संध्याकाळी ४ वाजता इंडिया गेटला पोहचतात आणि ६ वाजता होणारी आरती होईपर्यंत तिथेच राहतात. ते म्हणतात की,

“ जर मी या कामासाठी कोणाची मदत मागितली असती तर त्यात खूप वेळ गेला असता. त्यामुळे मी विचार केला की, मी एकट्यानेच हे काम सुरू करतो. मी संध्याकाळी ६ वाजता होणाऱ्या आरतीपर्यंत येथे कचरा उचलण्याचे काम करत असतो.”

इंडिया गेटवर साफ-सफाई करण्याचे काम सुरू करून सतीश कपूर यांना एक वर्षापेक्षा जास्त काळ उलटून गेला आहे. ते आपल्या सोबत एक काठी देखील ठेवतात. जेव्हा कोणी कचराकुंडीमध्ये कचरा टाकत नाही, त्यावेळी सतीश त्यांना काठीचा धाक दाखवतात.

इंडिया गेटवर रोलिंग ट्रॅक लावणारे लोक देखील त्यांना आता ओळखू लागले आहेत. ते म्हणतात की,

काठीवाले काका रोज संध्याकाळी येथे येतात आणि सर्वांना कचरा कचराकुंडीत टाकण्यास सांगतात. सतीश यांना बघून आता आसपासचे कचरा गोळा करणारे देखील त्यांची मदत करतात आणि ठिकठिकाणी पडलेला कचरा उचलून त्यांच्या गाडीमध्ये ठेवण्यात आलेल्या पॉलीबॅगमध्ये टाकतात.

 

 

सतीश सांगतात की, भारताला स्वातंत्र्य मिळण्याआधी त्यांचे कुटुंब पाकिस्तानात राहत होते. पण फाळणीच्या वेळी त्यांचे कुटुंब भारतात आले. येथे त्यांच्या वडिलांनी विटांची भट्टी सुरू केली. सुरुवातीला ते पहाडगंज भागामध्ये राहत होते. त्यांचे वडील रोज सायकलवरून भट्टीपर्यंत जात असत. त्यांच्या वडिलांनी केलेल्या मेहनतीमुळेच आज ते आरामात जीवन जगत आहेत. त्यामुळे ते देखील शेवटच्या श्वासापर्यंत चांगले काम करणार आहेत.

ज्या स्कुटीवरून सतीश रोज इंडिया गेटला येतात, ती खूप खास आहे. त्यांनी तिला थ्री-व्हीलर मध्ये बदलले आहे. ज्याच्यावर एक सोलर पॅनल लावण्यात आलेला आहे. या स्कुटीला मॉडिफाय करण्यासाठी त्यांचे जवळपास दीड लाख रुपये खर्च झाले.

सतीश आपल्याबरोबर हात धुण्यासाठी सॅनिटायझर आणि पाणी देखील ठेवतात. स्कुटीच्या पुढील भागामध्ये त्यांनी एक छोटासा टॉवेल देखील लावला आहे. जेव्हा कोणी कचरा उचलून त्यांच्या पॉलीबॅगमध्ये टाकतात. तेव्हा त्यांचे हात धुण्याचे ते कधीही विसरत नाही. हिवाळ्यामध्ये स्कुटी चार्ज करणे कठीण होईल, त्यामुळे ते लवकरच इलेक्ट्रिक चार्जवाली स्कुटी घेणार आहेत.

 

 

त्यांच्या स्कुटीमध्ये एक माईक आणि लाऊडस्पीकर देखील आहे आणि त्याचबरोबर एक पेनड्राइव्हमध्ये रेकॉर्ड असलेला त्यांचा आवाज देखील सारखा चालू असतो. याबद्दल त्यांचे म्हणणे आहे की, या वयामध्ये जोरात बोलणे जमत नसल्याने ते माईक आणि लाऊडस्पीकरवरून आवाज देत लोकांना स्वच्छतेबद्दल जागरूक करतात.

असे हे सतीश कपूर, भारताच्या तरुण पिढीला एक प्रेरणा देण्याचे काम करत आहेत. जर सर्वांनी कचरा असाच रस्त्यावर किंवा कुठेही न फेकता कचराकुंडीत टाकला तर काही काळाने आपल्या सरकारने चालू केलेले ‘स्वच्छ भारत अभियान’ नक्कीच यशस्वी होईल आणि आपला भारत कचरामुक्त होईल.

स्त्रोत : bbc.com

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page । Copyright (c) 2017  InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version