आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page
===
अनुभव हा माणसाला बरंच काही शिकवत असतो म्हणतात. अर्थात; शिकण्याची तयारी मात्र हवी. २००६ साली स्थापन झालेल्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने गेल्या काहीकाळात बराच धडा शिकल्याचे जाणवत आहे. विशेषतः पक्ष संस्थापक-अध्यक्ष राज ठाकरे यांच्या देहबोलीत लक्षणीय फरक पडल्याचे दिसत आहे. हे बदल लोकांपर्यंत पोहचवलेदेखील जात आहेत मात्र त्याची शैली ही राज ठाकरे यांच्या आजवरच्या शैलीपेक्षा भिन्न आहे. मनसे आणि मनसे अध्यक्ष यांच्यात सध्या नेमकं काय वेगळं दिसतंय त्याचा थोडक्यात आढावा घेऊया.
राज यांची सोशल मीडियावर एंट्री :
सोशल मीडिया हे राजकारणातही अत्यंत प्रभावी माध्यम ठरू शकते, हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आजवर दाखवून दिले आहे. राज ठाकरे मात्र या माध्यमापासून बरेच अलिप्त होते. किंबहुना तसे असण्यातच त्यांना अधिक स्वारस्य वाटत होते. मात्र बहुधा या माध्यमाचे महत्व पटल्याने व त्यांच्याच मतानुसार वर्तमानपत्र काढण्याचे त्यांचे स्वप्न, हे एकंदर अडचणी लक्षात घेता तूर्त व्यवहार्य नसल्याचे लक्षात आल्याने राज यांची ऑफिशियल पेजच्या निमित्ताने फेसबूकवर एंट्री झाली. केवळ राजकारण इतकेच या पेजचे स्वरूप न ठेवता अन्यही कित्येक गोष्टी इथे शेयर केल्या जातील असे राज यांनी सांगितले व त्याप्रमाणे काही व्हिडीओ वगैरे शेयर देखील केले. मात्र; या पेजचे प्रमुख आकर्षण राहिले ती राज यांची व्यंगचित्रे.
राज यांच्या भाषणशैलीप्रमाणेच व्यंगचित्रांवरही स्व. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे संस्कार आहेत. त्यांचे ब्रश स्ट्रोक्स तर हमखास बाळासाहेबांची आठवण करून देतात.
नव्या पेजवर शेयर केलेली दाऊद, एसटी संप, परतीचा पाऊस अशी सगळीच व्यंगचित्रे गाजली. याव्यतिरिक्त हलक्या फुलक्या अंदाजात गानसम्राज्ञी लता मंगेशकर व महानायक अमिताभ बच्चन यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांनी काढलेली अर्कचित्रेही लोकांच्या पसंतीस उतरली. केवळ राजकीय घणाघातच न करता अशा अनोख्या शुभेच्छांची पखरण ही निश्चितच सुखावणारी होती.
मी ज्या बदलाचा उल्लेख केला तो हाच. हे बदल जनमानसात आपली प्रतिमा सकारात्मक करण्यास उपयुक्त असतात. अर्थात; ही चित्रे प्रतिमा सकारात्मक करण्यासाठी काढली गेली असा माझा मुळीच दावा नाही. मात्र राज यांच्यात उपजत असलेला दिलदारपणा यानिमित्ताने लोकांसमोर आला हे महत्वाचे.
नवा मुद्दा… नवे आंदोलन.
राज ठाकरे यांना योग्य मुद्दा कोणता हे ओळखण्याची जाण आहे, असे कित्येक राजकीय तज्ञ म्हणतात. एल्फिन्स्टन रोड पुलावरील चेंगराचेंगरीची दुर्घटना घडल्यावर अन्य कोणत्याही राजकीय पक्षाला याबाबत काही दिशा सुचण्याआधीच राज यांनी धडक मोर्चा हातात घेतला. ही दुर्घटना घडण्यामागे रेल्वे प्रशासनाचा गलथानपणा मोठ्या प्रमाणात कारणीभूत होता. असे असूनही राज यांच्या टार्गेटवर रेल्वे प्रशासन न राहता अनधिकृत फेरीवाले आले. अनधिकृत फेरीवाल्यांचा प्रश्नही या मुद्याशी संबंधित व सुसंगत असल्याने मूळ रेल्वे प्रशासनाचा मुद्दा बाजूलाच पडला हे फारसे कोणाच्या लक्षातही आले नाही.
दादर, ठाणे, डोंबिवली अशा कित्येक ठिकाणी मनसेने खळ्ळ खट्याक केले आणि हा मुद्दा मीडियाच्या रडारवर आला. या मुद्यावरून रोजच त्रास सहन करणाऱ्या सामान्य नागरिकांचा पाठिंबा मनसेला मिळाला. पर्यायाने गेले काही महिने प्रसिद्धी झोतापासून दूर असलेल्या राज ठाकरे यांच्याकडे मीडियाचे लक्ष पुन्हा आकर्षिले गेले आणि त्यांचे या पटलावर कमबॅक झाले.
प्रतिमा बदल:
राजकारणात असलेल्या व्यक्तींची जनसामान्यांच्या मनात काय प्रतिमा आहे, ही अत्यंत महत्वाची बाब असते. कळत-नकळत ही प्रतिमा नकारात्मक होत गेल्यास दीर्घकाळ फटका बसू शकतो. कित्येकदा तर असा फटका बसावा म्हणून या ना त्या कारणाने आपल्या राजकीय प्रतिस्पर्ध्याची प्रतिमा नकारात्मक बनवण्याचे कार्य कित्येकजण करत असतात. तर कित्येकजण छोट्या- छोट्या गोष्टींतूनही स्वतःची प्रतिमा उजळ बनवत असतात. निवडणूक प्रचारात दूरदर्शनचा उपयोग होण्यास सुरुवात झाल्यावर या प्रतिमेच्या खेळला अनन्यसाधारण महत्व आले.
अमेरिकेचे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष रोनाल्ड रिगन यांनी तर आपली प्रतिमा उत्तम रहावी याची काळजी घेण्यासाठी मायकल डेवर नामक सल्लागाराची नेमणूक केली होती. राज ठाकरे यांच्यातील सध्याचे काही बदल पाहता; त्यांनीही आपल्या प्रतिमेबाबत काळजी घेण्यास सुरू केले आहे असे जाणवते.
खालील प्रसंग पहा;
१. राज ठाकरे हे सतत गंभीर वा चिडलेले दिसतात असा बऱ्याच जणांचा आक्षेप असतो. फेसबुक पेज प्रसिद्धीच्या कार्यक्रमात भाषण करताना ‘आपण हसत असतो.’ असा राज यांनी उल्लेख केला. भाषणादरम्यान त्यांचा माईक बंद पडला. मात्र असे झाल्यावर एरव्ही हमखास डाफरणाऱ्या राज यांनी चक्क हसत हसतच ‘काय झालं?’ अशी विचारणा केली!!
२. बारीक निरीक्षण केल्यास मनसेच्या विविध फलकांवरही राज यांचे पूर्वी करारी मुद्रेत असलेले फोटो जाऊन तिथेही स्मितहास्य करतानाचे फोटो आले आहेत.
३. शिवसेनेच्या दसरा मेळाव्यानंतर काही शिवसैनिकांना परतताना कृष्णकुंजमध्ये बसलेले राजसाहेब दिसले. त्यांना हाका मारून बाहेर बोलावल्यावर ते चक्क बाहेरही आले आणि शिवसैनिकांशी हस्तांदोलन केले. यावेळची काही छायाचित्रे बरीच व्हायरल झाली.
४. आपल्या कार्यकर्त्यांवर केस पडल्या तर राज ठाकरे रसद पुरवत नाहीत असा आरोप त्यांच्यावर लावला जातो. मात्र फेरीवाल्यांच्या आंदोलनानंतर ते स्वतः पोलीस स्टेशनवर गेले आणि तिथल्या कार्यकर्त्यांनाही ‘बिनधास्त रहा; मी आहे सोबत’ हा संदेश दिला. अर्थातच या प्रसंगाची क्लिपदेखील व्हायरल झाली.
५. नुकत्याच झालेल्या त्यांच्या दोन भाषणांत ‘राज ठाकरेने हे केलंय’ याऐवजी ‘हे करायला माझा महाराष्ट्र सैनिकच होता’ हे वाक्य ऐकायला मिळालं. महाराष्ट्र सैनिक हा शब्दप्रयोगही ते सध्या विशेष ठासून वापरत आहेत. त्यांना आत्मकेंद्रित ठरवणाऱ्यांसाठी हे बदल पोटदुखीचे ठरू शकतात.
६. मुंबईतल्या पदाधिकारी मेळाव्यानंतर एका चिमुरडीने ‘राजसाहेब अंगार है; बाकी सब भंगार है।’ अशी घोषणा दिली. तिला मंचावर बोलवून राज यांनी कडेवर उचलून घेत माईकवर बोलायला दिलं. मनसेच्या कित्येक कार्यकर्त्यांसाठी देखील हे त्यांचं नवीन रूप होतं.
७. नाशिकला झालेल्या पदाधिकारी भेटीदरम्यान राज चक्क मांडी घालून जमिनीवर बसले होते!! या प्रसंगचाही व्हिडीओ व्हायरल झाला.
आता एक व्यक्तिगत अनुभव :
काही दिवसांपूर्वी डोंबिवली येथे राज ठाकरे आले असता त्यांना ओझरते भेटण्याचा योग आला. ‘ते फारसं कोणाकडे लक्ष देत नाहीत’ इथपासून ‘त्यांना कोणी टोकलेलं आवडत नाही.’ इथपर्यंतची मतं / काहींचे प्रत्यक्ष अनुभव मी ऐकून झाले होते. चिकित्सालयात रुग्ण वाट पाहत असल्याने मला पूर्णवेळ थांबणे शक्य नव्हते. पत्रकार परिषद घेऊन ते भाषण देण्यासाठी जात असतानाच कल्याण डोंबिवली महानगरपालिकेतील मनसेचे नगरसेवक मंदार हळबे यांनी त्यांना हाक मारल्यावर ते थांबले. मी माझे पुस्तक आणि महाराष्ट्रातल्या वैद्यकीय सेवेच्या बोजवाऱ्याबाबतचा माझा एक लेख त्यांच्या हाती दिला.
त्यावर ‘याच्या पहिल्या पानावर जरा तुमचा फोन नंबर लिहून द्या.’ असं त्यांनी अगदी अदबीने सांगितले आणि पुस्तक देऊन ठेवण्यासही सांगितले.
पोटनिवडणूक न लढवणे, उद्धव ठाकरे यांच्या शस्त्रक्रियेनंतर त्यांना स्वतःच्या गाडीतून मातोश्री वर सोडण्यास येणे अशा कित्येक प्रसंगांतून राज ठाकरे यांचा दिलदारपणा दिसून येतो. मात्र काही चुकलेले निर्णय आणि निष्काळजीपणा याचा फटका त्यांना आजवर बसला आहे. मुंबई महानगरपालिकेतील नगरसेवक फुटल्यावर तर ‘एक पक्षप्रमुख – एक आमदार – एक नगरसेवक’ असे म्हणत कित्येकांनी त्यांची खिल्ली उडवली. मात्र असे असूनही नीट च्या प्रश्नासंबंधी वा एसटीच्या संपबाबत लोकांना राज ठाकरे यांचीच भेट घ्यावीशी वाटते याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही.
राज ठाकरे यांनी सध्या काळजीपूर्वक बदलाच्या दिशेने वाटचाल सुरू केलेली आहे. ही वाटचाल कायम राहून त्यांना यश प्राप्त करून देईल का नाही हे येणारा काळच सांगेल!
===
InMarathi.com वर विविध लेखकांनी व्यक्त केलेले विचार ही त्यांची वैयक्तिक मतं असतात. InMarathi.com त्या मतांशी सहमत असेलच असं नाही. | आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page । Copyright (c) 2017 InMarathi.com | All rights reserved.