आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
===
सध्या आपल्या समाजामध्ये स्त्रियांवर होणाऱ्या अत्याचारांचे प्रमाण वाढल्याचे दिसत आहे. छेडछाड, विनयभंग या गोष्टी खूप होताना दिसून येत आहेत. त्यामुळे आपल्या समाजातील स्त्रियांच्या सुरक्षिततेवर प्रश्न निर्माण झालेला आहे.
अश्याच प्रकारच्या काही घटना मुंबईची लाईफलाईन समजली जाणाऱ्या लोकलमध्ये देखील होताना आपल्याला दिसून येत आहेत. त्यामुळे स्त्रियांना त्यांच्या या प्रवासामध्ये खूप त्रास सहन करावा लागत आहे.
पण आता हे सर्व होण्यापासून थांबू शकते, कारण यावर एका तरुणाने एक वेगळी युक्ती शोधून काढली आहे आणि त्या युक्तीच्या आधारे लोकल ट्रेनमधून प्रवास करणाऱ्या स्त्रियांना दिलासा मिळणार आहे. चला तर मग जाणून घेऊया, त्या तरुणाबद्दल आणि त्याने यावर काढलेल्या युक्तीबद्दल..
या तरुणाचे नाव दिपेश टंक हे आहे. ज्याने विशेष प्रकारचा चष्मा वापरून, पोलिसांना स्त्रियांशी छेडछाड करणाऱ्या टवाळखोरांना पकडण्यास मदत केली.
दिपेश हा मुंबईतील झोपडपट्टीच्या परिसरात लहानाचा मोठा झाला. त्याच्या आईने त्याच्यासाठी आणि घरासाठी खूप कष्ट घेतले आहेत. त्याचे वडील आजारी राहू लागल्यानंतर त्याच्या आईनेच घरातील सर्व जबाबदारी उचलली.
घराबाहेर १२ तास कॅटरिंगचे काम केल्यानंतर ती थकून घरी यायची आणि घरातील सर्व काम करायची. तिचे कधीही घरी येणे आणि बाहेर जाणे, शेजारच्या लोकांना आवडत नसे. पण दिपेशला तिच्याबद्दल खूप आदर होता.
वयाच्या १६ व्या वर्षी त्याने आपले शिक्षण सोडले आणि आपल्या आईला घरखर्चात मदत करायला सुरुवात केली. त्याने मुंबईतील नामांकित जाहिरात कंपनीबरोबर काम करण्यास सुरुवात केली.
एकेदिवशी कामावरून घरी जात असताना, त्याने पाहिले की, एक मुलांचा ग्रुप लोकल ट्रेनमध्ये एका बाईला त्रास देत होता. या घटनेबद्दल त्याने ह्युमन ऑफ बॉम्बेशी मुलाखत देताना सांगितले की, “ मी पाहिले की, एक मुलांचा ग्रुप एका बाईला त्रास देत होता, जी महिलांच्या डब्यात चढण्याचा प्रयत्न करत होती.
मी एकटा त्यांच्याशी लढू शकत नव्हतो. त्यामुळे मी रेल्वे पोलिसांकडे गेलो. सुरुवातीला त्यांनी माझे काही ऐकून घेतले नाही, पण मी अडून बसलो. त्यांच्यातील एक पोलीस माझ्याबरोबर आला.
पण आम्ही तिथे पोहचण्याच्या अगोदरच ती मुले पसार झाली होती. या प्रसंगामुळे मला खूप वाईट वाटले. मी विचार केला की, माझी आई रात्री उशीरा कामावरून घरी परत येत असेल आणि कोणी तिला अश्याप्रकारचा त्रास दिला तर? त्यामुळे मला यासाठी काहीतरी करावेसे वाटले. मी ती घटना तिथेच सोडून दिली नाही तर त्यावर तोडगा काढण्याचा निश्चय केला.”
त्याने या घटनेबाबत आपल्या मित्रांशी चर्चा केली आणि यावर उपाय शोधून काढण्यासाठी रिसर्च करण्यास सुरुवात केली. त्यांना कळले की, अश्या घटना लोकलमध्ये रोजच होतात. त्यामुळे दिपेशने एक लपलेला एचडी कॅमेरा असलेल्या चष्म्याची एक जोडी विकत घेण्यासाठी पैसे गुंतवले.
त्याने लोकलमध्ये घडणाऱ्या सर्व गोष्टींचे रेकॉर्डिंग करणे सुरू केले. प्रामुख्याने स्त्रियांना कोणत्याही प्रकारे त्रास देणाऱ्या पुरुषांना त्याने रेकॉर्ड केले.
२०१३ मध्ये दिपेश टंक आणि त्याच्या ९ मित्रांनी एक मोहीम चालू केली, ज्या मोहिमेला वॉर अगेन्स रेल्वे रावडिज (WARR) असे नाव देण्यात आले. WARR ने सर्व पुरावे गोळा केले आणि पोलीस निरीक्षकाला सादर केले. लवकरच, ४० पोलीस अधिकाऱ्यांची एक टीम दिपेशसोबत काम करू लागली.
रेकॉर्डिंगच्या लाइव्ह फिडमुळे गुन्हेगारांना कॅमेऱ्यामध्ये पकडले गेले आणि पुढील स्थानकावर पोहचल्यावर पोलीस अधिकारी अश्या गुन्हेगारांना थांबवून त्यांना जेलची हवा खायला लावत असत. सहा महिन्यांच्या आत, पोलिसांनी १४० अश्या भामट्यांना कैदेत टाकले.
तरी देखील दिपेश स्वतःला हिरो समजत नाही. तो म्हणतो की, “ मला सर्व स्त्रियांचा प्रचंड आदर आहे. माझ्या आईने मला चांगली शिकवण दिली. यावरून मी असा संदेश देतो की, तुम्ही देखील तुमच्या मुलांना चांगली शिकवण द्या, त्यामुळे जग पुरुषांना देखील आदरयुक्त समजेल”
पहिल्यांदा वॉर सुरू झाल्यानंतर दिपेशने पुढाकार घेऊन या मोहिमेबद्दल लोकांना माहिती दिली आणि त्यांना या मोहिमेत सामील होण्यास प्रोत्साहन दिले. अमूलने देखील त्यांच्या या प्रयत्नांबद्दल प्रशंसा केली आहे.
स्त्रियांना हा भयावह अनुभव दररोज येतो. त्यांचा हा लढा अजूनही सुरू आहे. दिपेशचा हा लढा पाहून आणि त्यामुळे आलेल्या बदलाने आपण हे नक्कीच म्हणू शकतो की, जंग अभी जारी है.
===
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम | Copyright © InMarathi.com | All rights reserved.