' इंदिरा गांधींचा निर्णय, आत्महत्या करणाऱ्या बेगम अन दागिने विकून कुत्र्यांना पोसणारे नवाब – InMarathi

इंदिरा गांधींचा निर्णय, आत्महत्या करणाऱ्या बेगम अन दागिने विकून कुत्र्यांना पोसणारे नवाब

आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page

===

स्वतःला “अवधचा शेवटचा नवाब” म्हणवणारे “प्रिंस अली रजा उर्फ सायरस” हे आता आपल्यात नाहीत. त्यांनी आपलं संपूर्ण आयुष्य हे अज्ञातवासात घालवलं आणि आता त्यांचा मृत्यू देखील अश्याच परिस्थितीत झाला आहे. त्यांचा मृत्यू एक महिन्याआधी झाल्याचं सांगण्यात येत आहे.

 

prince-avadh-inmarathi05
bbc.com

जाणकारांच्या मते प्रिन्स अली रजा हे राजकुमारी सकीना महल यांच्यासोबत दिल्ली येथील ‘मालचा महाला’त मागील २८ वर्षांपासून राहत होते.  त्यांच्यासोबत त्यांची आई ‘बेगम विलायत महल’ या देखील राहायच्या. पण त्यांनी १० सप्टेंबर १९९३ ला आत्महत्या केली.

 

prince-avadh-inmarathi06
bbc.com

आता हा महाल भग्नावस्थेत आहे. अली रजा याचं जीवन किती वाईट होतं हे जणू या महालाच्या स्थितीवरून स्पष्ट होतं. मोडकळीस झालेल्या या महालात ना पाण्याची व्यवस्था आहे ना वीजेची.

 

prince-avadh-inmarathi02
bbc.com

गरिबीतील दिवस

अली रजा हे एवढ्या तंगीत दिवस काढत होते की “प्रिन्स” असून त्यांच्याजवळ एक गाडी देखील नव्हती. नवाब सायकल चालवत असे. एवढंच काय तर हे प्रिन्स राजकुमारी सकीना यांचे दागिने विकून कुत्र्यांसाठी आणि स्वतःसाठी जेवण आणत होते. प्रिन्स अली रजा एवढे गरीब असून देखील त्यांना शुद्ध तुपात बनलेलं जेवण लागायचं. भलेही त्याचं नावापुढे प्रिन्स लागलेलं होतं तरी त्यांच्याकडे झोपायला एक पलंग देखील नव्हता. ते जमिनीवर कार्पेट टाकून झोपायचे.

 

prince-avadh-inmarathi07
bbc.com

प्रिन्स अली रजा हे ‘मालचा महाल’ येथे राजकुमारी सकीना आणि १२ कुत्र्यांसोबत राहत होते. “मालचा महाल” हे सेन्ट्रल रिजच्या दाट जंगलाच्या मधोमध आहे. ‘मालचा महाल’ हा मुस्लीम शासक फिरोजशाह तुगलक यांनी ७०० वर्षांआधी बनवला होता. इतिहासकार सांगतात की, तेव्हा मुगल शासक या महालला शिकारीचे ठिकाण म्हणून वापरत असत.

दिल्लीतील दिवस

भारतात साम्राज्यांच्या विलयानंतर अवध राजघराण्याच्या बेगम विलायत महाल १९७५ मध्ये त्यांचे १२ कुत्रे, नेपाळी नौकर, त्यांची मुलगी सकीना आणि मुलगा अली रजा यांचासोबत नवी दिल्लीच्या रेल्वे स्टेशनवर आल्या.

 

prince-avadh-inmarathi03
bbc.com

बेगम जेव्हा दिल्ली येथे आल्या तेव्हा त्या १० वर्षांपर्यंत नवी दिल्ली रेल्वे स्टेशनच्या व्हीआयपी लाउंज मध्ये राहिल्या. यादरम्यान त्यांनी भारत सरकारकडे कित्येक सुविधांची मागणी केली आणि त्यासाठी त्या धरणे देऊन बसल्या. जेव्हाही त्यांना कोणी समजूत काढण्यासाठी भेटायला जात, धरण्यावरून उठविण्याचा प्रयत्न करत तेव्हा त्या त्यांच्यावर कुत्रे सोडत असत. शिवाय विष घेऊन जीव देण्याची धमकीही देत.

इंदिरा पर्व!

इंदिरा गांधी पंतप्रधान होण्याच्याआधी भारतातील सर्व राजा-महाराजांना सरकारतर्फे पेन्शन मिळायची. पण इंदिरा गांधींनी पंतप्रधान पद सांभाळल्यानंतर त्यांनी ही पेन्शन बंद केली. यामुळे ज्यांच्याकडे वडिलोपार्जित संपत्ती होती किंवा पैसा कमविण्याचे दुसरे स्त्रोत होते त्या राजांना फारसा फरक नाही पडला. पण ज्यांच्याकडे यापैकी काहीही नव्हते ते रस्त्यावर आले. कारण त्यांच्याजवळ त्यांची उपजीविका भागविण्याच दुसरा कुठलाही स्त्रोत नव्हता. या पैकीच एक होत्या बेगम विलायत महाल, ज्यांच्या पतीच्या मृत्युनंतर त्यांच्याकडे पोटाची खळगी भरण्याचा कुठलाही स्त्रोत नव्हता.

इंदिरा गांधींच्या या निर्णयामुळे बेगम विलायत महाल आणि त्यांच्या मुलांना खूप हलाखीच्या परिस्थितीचा सामना कराव लागला.

 

prince-avadh-inmarathi04
intoday.in

ज्यावर्षी इंदिरा गांधीची मृत्यू झाली त्या वर्षीची एक घटना.

जेव्हा इंदिरा गांधी या बेगम विलायत महाल यांना भेटायला गेल्या तेव्हा बेगम विलायत महाल त्यांच्यावर खूप चिडल्या. त्यांना समजवून शांत करण्यात आले. तेव्हा इंदिरा गांधी यांनी त्यांना राहण्यासाठी घराचा बंदोबस्त करून देण्यात येईल असे आश्वासन दिले. पण बेगम विलायत महाल यांनी अशी मागणी केली की, त्यांना राहण्यासाठी एक असं ठिकाण हवं जिथे त्यांच्या वैयक्तिक आयुष्यात इतर लोकं डोकावू शकणार नाहीत. त्यामुळेच त्यांना सरदार पटेल मार्गावर असणाऱ्या सेन्ट्रल रिज एरियाच्या जंगलातील ‘मालचा महाल’ देण्यात आला.

इंदिरा गांधींच्या मृत्यू नंतर १९८५ साली राजीव गांधींनी बेगम विलायत महालला मालचा महाल येथे राहण्याचे स्वीकृती पत्र दिले ज्यात त्यांना नवाब वाजिद अली शाह यांच्या वारस दर्शविण्यात आले.

पुढे जाऊन बेगम जींनी आत्महत्या केली आणि त्यांच्या प्रिन्स वर अश्या अज्ञातवासातील मृत्यू ला सामोरं जावं लागलं.

हा संपूर्ण घटनाक्रम पाहून आपण विचारात पडतो. हलाखीच्या परिस्थितीतही कुत्रे पाळण्याची हौस मोडू नं शकणाऱ्या नवाब आणि बेगमांना काय म्हणावं कळत नाही. राजकीय विरोध पत्करून ह्या राजघराणांच्या “तन्ख्वाह” रद्द करण्याचा इंदिरा गांधींचा निर्णय किती धाडसाचा अन तरीही योग्य होता हे पटल्याशिवाय रहात नाही.

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page । Copyright (c) 2017  InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?