परिवर्तनाचा आणखी एक दुवा निखळला!
आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page
===
आशिष नेहरा एकदाचा निवृत्त झाला. एकदाचा म्हटलं कारण तो भारतीय गोलंदाजीचा ए के हंगल होता अशी माझी ठाम समजूत आहे. ए के हंगल जन्मालाच म्हतारे आले की काय अशी शंका यावी इतपत ते म्हातारे वाटायचे, तसा नेहरा जन्मालाच अनफिट आला की काय असा प्रश्न पडतो. ए के हंगलशिवाय काही सिनेमे पूर्ण होऊ शकत नाहीत. त्या सिनेमांमधून ए के हंगलना काढलं तर अत्यंत दुःख होईल. उदाहरणार्थ ‘शोले’चा रहिमचाचा, ‘शौकिन’चा रती अग्निहोत्रीच्या भरदार छातीकडे एकटक भान हरपून बघणारा आंबट शौकीन म्हातारा, मोजक्या शब्दांमध्ये संवाद म्हणत ‘लगान’ मध्ये ऐसपैस स्वतःला राखणारा गावातला सर्वात अनुभवी माणूस.
आपल्या मर्यादेत ए के हंगलनी सिनेमासृष्टीला खूप काही दिलं. तसं आपल्या मर्यादेत आशिष नेहराने भारतीय क्रिकेटला खूप काही दिलं.
निव्वळ १७ कसोटी सामने आणि काही एकदिवसीय सामने यावर नेहराची कारकीर्द जोखणं चूकच आहे. पण त्याच वेळी त्याला इंग्लंडविरुद्धच्या त्याच्या स्पेल साठी (कोणता हे नमूदही करायची गरज नाही इतका तो भन्नाट आणि निव्वळ भन्नाट होता) आठवत बसणं हेही योग्य नाही. महान तो कधी होणारच नव्हता. सगळं असूनही तो अंडर अचिव्हरच राहणार होता. ‘सगळं असूनही’, कारण त्याच्याकडे डावखुरा खेळ होता.
डावखुरी माणसं सामान्य नसतात हे अनेकजण मान्य करतील. भन्नाट वेग, हातभर स्विंग, मैदानात झोकून देण्याची वृत्ती आणि खेळाशिवाय दुसरं काहीच न करणं ह्या चांगल्या खेळाडूच्या गोष्टी त्याच्याकडे होत्या. पण निवड समितीला जेंव्हा जेंव्हा याची आठवण यायची तेंव्हा तेंव्हा याला डॉक्टरची आठवण आलेली असायची. त्यामुळे याच्यापेक्षा कमी कुवतीचा आणि लहान चणीचा अजित आगरकर याच्या कित्येक मैल पुढे निघून गेला. २०११ च्या आफ्रिकेविरुद्धच्या सामन्यात शेवटच्या षटकात तो डुप्लेसीला रोखू शकला नाही. पण आधी त्याच्याकडे दोनदा तशी कामगिरी आली होती आणि याने सहा धावाही ना देता सामने जिंकून दिले होते. २०११ च्याच विश्वचषकात त्याने पाकिस्तानविरुद्ध मस्त कामगिरी केली होती आणि आफ्रिदीचा झेल घेताना जखमीही झाला. कसोटी आणि वनडे मिळून त्याच्याएवढ्या विकेट्स सचिन तेंडुलकरच्या आहेत.
पण तरीही नेहरा मोठाच.
आशिष नेहरा निवृत्त होणं हे परिवर्तनाच्या शेवटून तिसऱ्या दुव्याचं निखळणं आहे. युवराज सिंग आणि हरभजसिंगच्याच्या निवृत्तीनंतर हे वर्तुळ पूर्ण होईल. नव्व्दच्या दशकात ज्या पिढीला क्रिकेट समजायला लागलं त्यापिढीने एक मोठं परिवर्तन आनंदाने अनुभवलं. या दशकात भारतीय क्रिकेटमध्ये गुणवत्ता तर नक्कीच होती पण मनोवृत्ती नव्हती. एखादा मनोज प्रभाकर, कधीतरी वेंकटेश प्रसाद, यांनी आपली आक्रमक मनोवृत्ती दाखवली. भारत पाकिस्तान सामन्यांमध्ये तर हे प्रकर्षाने दिसायचं. ऑस्ट्रेलियासारख्या श्रेष्ठ संघाला धूळ चारणारा भारतीय संघ पाकिस्तानसमोर नांगी टाकायचा. भारतीय खेळाडूच गळपटलेले वाटायचे. ‘अजहर अजहर’ असं गमतीने म्हटलं जायचं.
जावेद मियांदाद म्हणायचा “पाकिस्तानतली शेळीसुद्धा भारतासमोर वाघ होते”
इम्रान खान म्हणायचा “भारताला आम्हाला असंच युद्धाच्या मैदानातही हरवायचंय”.
आधी सर्फराझ नवाझ नंतर वसिम अक्रम, मग पुढे शोएब अख्तर, मध्येच नेहमीचा अकिब जावेद हे भारतीय संघाचे कर्दनकाळ तर होतेच पण जवागल श्रीनाथ, वगैरे ह्यांचे खांदे तर नेहमीच झुकलेले असायचे. अकिब जावेदने तर श्रीनाथला “आक्रमक होण्यासाठी नॉनव्हेज खायला लाग” असा सल्ला देण्याइतपत वेळ आली. संपूर्ण शतकात भारताने पाकिस्तानात एकही कसोटी सामान जिंकला नाही. शुक्रवार असेल तर पाकिस्तानला अल्ला मदत करतो आणि त्यातही शारजा असेल तर मक्का मदिना दोन्हीकडून पाकिस्तानला मदत मिळते हा भारतीयांचा ठाम विश्वास होता. पाकिस्तानचा भारतावरचा विजय हा इस्लामचा विजय म्हणून साजरा व्हायचा (मग अझरने काय पाप केलं? तोही मुसलमानच ना, मग त्याला कृपाशिर्वाद का नाही, वगैरे विचारायचं नाही).
२००० साली एक चिडका बिब्बा वाटणारा मर्यादित गुणवत्तेचा माणूस कर्णधार झाला. सौरभ गांगुली त्याचं नाव. आधीच्या महंमद अझरुद्दीन आणि तेंडुलकर यांच्या तुलनेत गांगुलीची बॉडी लँग्वेजच वेगळी होती. स्वतः गांगुलीचं फलंदाजीचं तंत्र संशयास्पद होतं, फिटनेस यथातथा होता. गांगुली धावण्यात आळशी होता आणि क्षेत्ररक्षणात तर बोगदा होता. पण गांगुलीला एक छान जमायचं. भावनेवर तो स्वार व्हायचा.
मैदानात एखादा माणूस चुकला की गांगुली त्याची खरडपट्टी काढायचा. समोरच्या संघाच्या खेळाडूने काही शिवीगाळी केली की हा दुप्पट बोलायचा. राग, लोभ, आनंद, चीड, दुःख, हताशपणा, आणि सुटकेचा निश्वास गांगुली मैदानात सहज व्यक्त करायचा. तव्यावरच्या तेलासारखा तो तडतडायचा. पण तरीही नॉन्सेन्स त्याला माहीतच नव्हता. पहिल्यांदाच संघाला कोणीतरी मध्यमवर्गीय मानसिकता नसलेला कर्णधार मिळाला जो आपली खात्रीने यश देऊ शकणारी धोरणे राबवायला इतरांना दुखावूही शकेल. यामुळे भारतीय खेळाडूही व्यक्त व्हायला लागले. अशी व्यक्त होणारी मंडळी बचावात्मक नक्कीच नसतात. भारतीय खेळाडूंची मानसिकता बदलली. आणि या बदललेल्या मानसिकतेमुळे भारतीय संघाला जिंकायची सवय लागली.
खऱ्या अर्थाने याची सुरवात २००१ च्या कलकत्ता कसोटीपासून झाली. त्या दीड वर्षात तीन घटनांनी देशाला आमूलाग्र वळण मिळालं. भूजचा भूकंप, कोलकाता कसोटी सामना आणि गुजरातच्या दंगली. देशाच्या मानसिकतेत घुसळण झाली. याच शतकाच्या सुरवातीला भारतात लोकसंख्या नियंत्रणाच्या जाहिराती बंद झाल्या. भारत एक लोकसंख्येची अडगळ ना राहता शंभर कोटींची बाजारपेठ बनला. या देशाच्या आर्थिक, सामाजिक, धार्मिक, राजकीय, औद्योगिक, साहित्यिक आणि मानसिक जडणघडणीतच फरक पडला. २००३ चा विश्वचषक ही त्याची नांदी ठरली.
क्रिकेट हा भारतीय माणसाचा प्राणवायू आहे. देश बदलला आणि सौरभ गांगुलीच्या नेतृत्वाखाली क्रिकेट बदललं.
सचिन तेंडुलकर, स्वतः गांगुली, वीरेंद्र सेहवाग, व्हीव्हीएस लक्ष्मण, युवराज सिंग, राहुल द्रविड हे फलंदाज तर श्रीनाथ, झहीर खान, अनिल कुंबळे, हरभजन सिंग हे गोलंदाज, हे सगळेच जिनियस ठरले ते या काळात आणि आशिष नेहरा मोठा झाला तोही याच काळात. याच सुमारास युवराज सिंग आणि महंमद कैफ सारखी क्षेत्ररक्षण मनापासून आनंदाने करणारी मुलं मिळाली. त्या वर्ल्डकपच्या अंतिम सामान्यांपर्यंत हेच घेऊन गेले.
दोन उदाहरणं या बाबतीत खूपच बोलकी आहेत.
ऑस्ट्रेलियात इरफान पठाण नावाच्या एका १९ वर्षाच्या मुलाने टाकलेला चेंडू झिम्बाबवेच्या मार्क मार्व्ह्यूलान नावाच्या फलंदाजाच्या हेल्मेटमध्ये बेमुर्वतखोरपणे घुसला आणि त्याला मैदान सोडावं लागलं. पूर्वी वेगवान गोलंदाजीला घाबरून असणं ही भारतीयांची मक्तेदारी वाटे. या पार्श्वभूमीवर हा संदेश वेगळाच होता.
दुसरं उदाहरण पाकिस्तानातलं आहे. ऑस्ट्रेलियाला जवळपास लोळवून (सिडनी कसोटीनंतर स्टीव्ह बकनर आणि बिली बावडन यांची तेंव्हा चौकशी व्हायला हवी होती) भारतीय संघ पाकिस्तानात गेला. “हिस्टरी मीन्स लिटील फॉर मी” ह्या एकाच वाक्यात गांगुलीने भारतीय संघाची पाकिस्तानातली आत्तापर्यंतची खराब कामगिरी फेकून दिली. मोहम्मद सामी नावाचा एक वादळी गोलंदाज युवराजने लेग ग्लान्स मारत थेट स्टेडियममध्ये फेकून दिला. पुढचा चेंडू युवराजने सोडला तो आपला नैतिक विजय मानत सामी हाफ पीच येऊन युवराजकडे रागाने बघत राहिला. युवराजने चढ्या आवाजात सरळ “क्या है?” म्हणून विचारलं, मर्सिडिझमधून भिकाऱ्याला हटकावं तसं युवराजने केलं. मान खाली घालून सामी निघून गेला.
हा बदललेल्या भारतीय मानसिकतेचा विजय होता.
या काळात देशात परकीय गुंतवणूक वाढली, मुंबई पुणे हा देशातला पहिला एक्सप्रेस हायवे पूर्ण झाला आणि इतरही शहरे मोठ्या वेगवान महामार्गांनी जोडण्याची प्रक्रिया सुरु झाली. ह्या सगळ्याचा परिणामही लोकांवर होत होता. खेळाडू त्यांच्यातलाच असतो. पाकिस्तानची पीछेहाट याच काळातली. त्याला जबाबदार ९/११ चा हल्ला आणि त्यावरून त्यांचं दुटप्पी धोरण. पाकिस्तानची पडझड आणि नवा जागतिकीकरणानंतरचा भारत ह्यातल्या फरकाचा काळ तो हाच.
या दौऱ्यात भारताने दोन कसोटी सामने डावाने जिंकले. तिसऱ्या कसोटीत पाकिस्तानच्या २२४ ला उत्तर देताना सगळेच बरे खेळले. शेवटचा नेहरा फलंदाजीला उतरताना कर्णधार गांगुली “आशिssssssष, छहsssसो, छहsssसो” असं आपली बोटं वर्तुळाकार फिरवत सांगत होता. अख्या दौऱ्यात भारताने दोन वेळा पाकिस्तानला चक्क शुक्रवारी हरवलं. अर्थव्यवस्थेचा भीती आणि अंधश्रद्धेवरचा हा अत्यंत सहज विजय दुर्लक्षित राहिला, कारण त्या अंधश्रद्धेला आठवतही बसायची कोणाचीच इच्छा नव्हती. चॅम्पियन्स ट्रॉफीमधला पराभव जो देशभर रागाची लाट आणून गेला त्याला कारण हेच आहे. असा पराभव येण्याचे दिवस आता राहिले नाहीत. वीस वर्षांपूर्वी अशी रागाची लाट आली नसती, कारण तेंव्हा पराभव सोबती असे.
या सगळ्या परिवर्तनाचा एक दुवा आशिष नेहरा आहे. प्रत्येक टप्प्यावर तो होता. आणि जेंव्हा होता, तेंव्हा प्रामाणिकपणे होता. आयुष्यातला शेवटचा बॉल त्याने टाकला आणि हा संपूर्ण काळ डोळ्यासमोरून गेला. पहिल्यांदा त्याचं हसू गोड वाटलं. त्याला शेवटच्या सामन्यात सन्मानाने खेळवलं गेलं.
आजची विशीतली पिढी खरंच नशीबवान आहे. यांना कुमार विश्वचषक फुटबॉल भारतात पहायला मिळतोय. ह्या सगळ्याची पायाभरणी ज्या काळात झाली त्या काळचा एक चांगला सैनिक सन्मानाने माघारी गेला.
===
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page । Copyright (c) 2017 InMarathi.com | All rights reserved.