आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम |
===
आपल्या पृथ्वीवर चार सर्वात मोठे महासागर आहेत. त्यातीलच एक आहे प्रशांत महासागर. प्रशांत महासागर हा जगातील सर्वात मोठा महासागर आहे. त्याचा अथांगपणा पाहून डोळे दिपतात.
सगळीकडे शांतता आणि त्याच्या लाटांचा मोठ्याने होणारा आवाज शरीरावर शहारे आणणारे असते.
या अथांग सागरामध्ये उतरण्याची कल्पना करणे देखील आपल्यासाठी अवघड आहे. पण जगात काही असे लोक देखील आहेत, ज्यांना अश्या अथांग सागराची सैर करायला आवडते.
त्यात पण एक वेगळीच मज्जा असते, असे त्यांचे म्हणणे असते. जाऊ दे प्रत्येकाचे आपापले काही छंद असतात आणि ते जोपासायला प्रत्येकालाच आवडते.
पण आज आम्ही तुम्हाला अश्या दोन मुलींबद्दल सांगणार आहोत, ज्या तब्बल पाच महिने या प्रशांत महासागरात अडकून होत्या.
मग आता तुम्हाला विचार पडला असेल की, त्यांनी हे पाच महिने कसे काढले असेल या अथांग प्रशांत महासागरामध्ये…?!
चला तर मग जाणून घेऊया त्यांचा हा प्रवास आणि त्यांच्या सुटकेची गोष्ट.
३ मे २०१७ मध्ये होनोलुलू हार्बर ह्या अमेरिकेच्या हवाईमध्ये असलेल्या ठिकाणावरून २ स्त्रिया हवाई ते तहिती हा प्रवास समुद्रमार्गाने करण्यासाठी निघाल्या.
त्यातील एकीचे नाव जेनिफर अपेल, तर दुसरीचे नाव ताशा फुईवा हे होते. हवाई ते ताहिती हा प्रवास तब्बल ३ हजार ५०० किलोमीटर एवढा आहे.
त्यांनी एक सेलिंग बोट घेऊन आपल्या प्रवासाची सुरुवात केली.
३ मे ला निघालेल्या या दोघींना खूपच चांगले रमणीय वातावरण पहावयास मिळाले. या अथांग प्रशांत महासागरामध्ये या रोमांचकारी प्रवासात त्यांची साथ देण्यासाठी निळेभोर आकाश होते.
पण प्रवास सुरु झाल्यानंतर पहिल्याच आठवड्यात प्रशांत महासागरामध्ये वादळ उठले आणि त्यांचा हा रम्य प्रवासाने रौद्र रूप धारण केले.
या दोघींसोबत दोन कुत्रे देखील होते, जे त्यांना या प्रवासामध्ये साथ देत होते.
दक्षिणेकडील ताहिती बेटाकडे जाणारी बोट या वादळामुळे अचानक तब्बल १००० किलोमीटर दूर असलेल्या जपानच्या दिशेने वाहू लागली.
जिकडे नजर जाईल तिकडे पाणी, बंद पडलेली बोट आणि सोबतीला दोन कुत्रे होते. पण एक गोष्ट चांगली होती, ती म्हणजे त्यांच्या या बोटीवर किमान ६ महिने पुरेल एवढे अन्न होते.
त्यामुळे थोडासा दिलासा त्यांना होता.
बंद पडलेली ही सिलिंग बोट एखाद्या किनाऱ्यावर नेणे देखील शक्य नव्हते. त्यामुळे जिकडे वारा नेईल, तिकडे जाण्याशिवाय आता कोणताही पर्याय त्यांच्या त्यांच्याकडे उरला नव्हता.
मदतीची वाट पाहत राहणे, हेच फक्त आता करायचं होते. त्यात अजून एक भर म्हणजे खारट पाणी शुद्ध करणारे प्युरीफायर देखील आता बंद पडले होते.
पण ही संकटं इथेच थांबली नाहीत, तर एका शार्कच्या अख्या कुटुंबानेच त्यांच्यावर हल्ला चढवला.
पण नशीब बलवत्तर म्हणून त्या या हल्ल्यातून बचावल्या.
त्यांच्यासाठी प्रत्येक मिनिट तासासारखा झाला होता आणि दिवस महिन्यासारखा, आपण येणारा दिवस पाहू की नाही याची चिंता सारखी त्यांना सतवत होती.
त्यांची सिग्नल यंत्रणा देखील आता बंद पडली होती. त्यामुळे क्षितिजावर एखादी बोट दिसल्यास त्या फ्लेयर्स उडवायच्या पण त्याचा काही फायदा होत नव्हता.
कारण काही वेळाने ती बोट या अथांग महासागरात अदृश्य होत असे.
पण तब्बल ५ महिन्यांनी त्यांना एक आशेचं किरण दिसलं!
या दोघींना वाचवण्यासाठी चक्क नेव्हीची एक बोट आली आणि एवढे दिवस मृत्यूशी चालू असलेला या दोघींचा संघर्ष अखेर संपला आणि त्यांनी मृत्यूवर विजय मिळवला.
या दोघींनी या नेव्हीच्या जवानांचे मनभरून आभार मानले. या दोघींचा हा प्रवास काही प्रश्न देखील उपस्थित करतो.
ते म्हणजे, वादळ येणार आहे, याची शक्यता असताना देखील त्यांनी त्यांचा प्रवास का सुरु केला?! बोटींवरची उपकरणे पूर्णपणे खराब झालेली नव्हती, तरीदेखील त्यांनी संपर्क साधण्याचा प्रयत्न का नाही केला?
असो, पण त्यांच्या येणाऱ्या संकटाला मात देण्याची वृत्ती वाखाणण्याजोगी आहे. त्या अथांग प्रशांत महासागरामधील त्यांचा हा प्रवास त्यांना खूप काही शिकवून गेला हे मात्र नक्की…!
===
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | Copyright © InMarathi.com | All rights reserved.