आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम
===
प्रत्येक देशाच्या राष्ट्राध्यक्षांना काही खास सुविधा असतात. यात सुरक्षेपासून त्यांच्या गाड्या आणि भोजनापर्यंतच्या सर्व सुविधांचा समावेश असतो. यापैकीच आहे प्रवासासाठी वापरण्यात येणारे विमाने.
बहुतेक देशांत तिथल्या राष्ट्राध्यक्षांसाठी खास विमानांची व्यवस्था केलेली असते. ही विमानं जणू आपण ज्या व्यक्तीच्या सेवेत आहोत, तो व्यक्ती आणि ते राष्ट्र किती बलशाली आहे ह्याचे प्रतीकचं असतात.
चला तर आज जाणून घेऊया जगातील काही महत्त्वाच्या राष्ट्रांच्या राष्ट्र प्रमुखांच्या सेवेत कोणती विमाने आहेत!
डोनाल्ड ट्रम्प, राष्ट्राध्यक्ष, अमेरिका – एअरफोर्स वन
इतर देशांच्या राष्ट्र प्रमुखांच्या तुलनेत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्पचे विमान सर्वात जास्त आकर्षक आणि पॉवरफुल आहे. एअरफोर्स वन फक्त अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांच्या प्रवासासाठीच वापरले जाते.
त्याच्या निर्मिती करिता १ हजार ९५० कोटी रुपये खर्च आलेला आहे. या विमानात अनेक खास वैशिष्ट्ये असून त्यापैकी प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे इंधनाची मोठी टाकी. यामुळे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष संपूर्ण जगाचा प्रवास करु शकतात.
शिंझो अॅबे, पंतप्रधान, जपान – सायगनस वन/सायगनस टू
छायाचित्रात दिसत असलेले हे विमान जपानी एअरफोर्स वन व्हर्जन आहे. जपानमध्ये दोन बोइंग 747-400 देशाचे पंतप्रधान आणि राजासाठी ठेवण्यात आले आहे. जपानमध्ये या विमानांना सायगनस वन आणि सायगनस टू या नावाने ओळखले जाते.
शी जिनपिंग, राष्ट्राध्यक्ष, चीन – बोइंग-777-400
चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग एअर चायनाचे पॅसेंजर विमान बोइंग-777-400 चा वापर करतात. जिनपिंग यांच्यासाठी खास विमान डिझाइन करण्यात आलेले नाही. पॅसेंजर विमानाला रिडिझाइन करण्यात आले आहे. अमेरिकेच्या ‘एअरफोर्स-1’ प्रमाणे लक्झर्रीयस सुविधा नाहीत. पण सुरक्षा मात्र चोख आहे.
नरेंद्र मोदी, पंतप्रधान, भारत – एअर इंडिया वन
भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी विदेश दौऱ्यासाठी बोइंग 747-400 विमानाचा वापर करतात. याचे संचालन करण्याची जबाबदारी एअरलाइन्स ‘एअर इंडिया’ वर आहे. या विमानाला ‘एअर इंडिया वन’ असे कोड देण्यात आले आहे. विविध सुविधांबरोबरच हे विमान आण्विक हल्ल्याचा प्रतिकार करु शकते.
व्लादिमीर पुतीन, राष्ट्राध्यक्ष, रशिया – ल्युशिन II-76
रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतीन ल्युशिन II-76 या विमानाचा वापर करतात. मात्र अशा प्रकारच्या विमानांने इतर राष्ट्राध्यक्षांचे प्रमुखही प्रवास करतात. पण पुतीन यांचे विमान जरा हटके आहे. याचे डिझाइन रशियन एअरफोर्सने केले आहे. या विमानातील हायटेक वैशिष्ट्ये अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांच्या विमान एअरफोर्स वन प्रमाणे आहे.
इमॅन्यूल मार्कोन, राष्ट्राध्यक्ष, फ्रान्स – ए-340 एअरक्राफ्ट
फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्यूल मार्कोन याबाबत खूप देशभक्त दिसतात. मार्कोन नेहमी आपल्यासाठी स्वदेशी ए-340 एअरक्राफ्टचा वापर करतात. त्यांच्यासाठी अमेरिकेच्या बोइंग विमानाची शिफारस करण्यात आली होती. पण त्यांनी त्यास नकार दिला.
म्युन जे इन , राष्ट्राध्यक्ष, दक्षिण कोरिया – बोइंग 747-400
दक्षिण कोरियाचे राष्ट्राध्यक्ष म्युन जे इन परदेश दौऱ्यासाठी बोइंग 747-400 चा वापर करतात. या विमानाचा जगातील हायटेक विमानांमध्ये समावेश्ा होतो.
एन्रिक पेना, राष्ट्राध्यक्ष, मेक्सिको – बोइंग 757
मेक्सिकोचे राष्ट्राध्यक्ष एन्रिक पेना बोइंग 757 या विमानाचा वापर करतात. या विमानाचे खास वैशिष्ट्य म्हणजे याला असलेले पंख. ती विमानाची इंधन क्षमता वाढवतात. जगात जवळजवळ 1 हजार बोइंग-757 विमान आहेत. हे विमान अमेरिकन एअरलाइन्समध्ये खूप लोकप्रिय आहे.
सलमान बिन अब्दुल अझीझ, राजा, सौदी अरेबिया
सौदी अरेबियाचे राजा सलमान बिन अब्दुल अझीझ बोइंग- 747 चा प्रवासासाठी उपयोग करतात.
जॅकब झुमा, राष्ट्राध्यक्ष, दक्षिण आफ्रिका – बोइंग-727
दक्षिण आफ्रिकेचे राष्ट्राध्यक्ष जॅकब झुमा बोइंग-727 चा वापर करतात. बोइंग-727 चा पहिल्यांदा वापर १९६४ मध्ये करण्यात आला होता. दुसरीकडे १९७० मध्ये बोइंग-727 खूप लोकप्रिय होते आणि बहुतेक नेते त्याचा वापर करत होते. सध्या जगभरात 200 बोइंग-727 विमाने आहेत.
तर अशी आहेत ही शक्तिशाली देशांच्या राष्ट्रपतींची शक्तिशाली विमाने!
===
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | Copyright © InMarathi.com | All rights reserved.