गोमांस बंदीवरून भारताला नावं ठेवण्याआधी हे जाणून घ्या!
आमच्या इतर लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page
===
सध्या भारतात सर्वात गाजत असलेल्या मुद्द्यांपैकी एक मुद्दा म्हणजे – गोहत्या आणि गोमांस बंदी! हिंदू धर्मात गायीला पवित्र मानले गेले आहे आणि आपल्या भारत देशामध्ये हिंदू संस्कृतीला प्राधान्य असल्याने गोहत्या आणि गोमांस बंदी सक्तीची करावी ही मागणी कित्येक वर्षांपासून जोर धरून होती. पण तुम्हाला माहितच आहे वाद म्हंटल की त्यात दोन गट असतातच. ह्या वादामध्येही दोन गट आहेत. एक गट आहे जो गोमांस बंदीच्या विरोधी आहे ज्यांना वाटतं की कोणाच्याही खाण्यापिण्यावर मर्यादा आणण्याचा हक्क कोणालाही नाही, तर दुसरा गट आहे ज्यांच्या पवित्र मानल्या जाणाऱ्या गोमाते विषयी भावना जोडल्या गेल्या आहेत. असो आपला आजचा विषय ह्या वादावर भाष्य करणारा नाहीये.
तुमच्या माहितीसाठी म्हणून सांगतो प्राण्यांच्या मांसावर बंदी लादणारा भारत हा एकमेव देश नाही. जगातील इतरही काही देशांत प्राण्यांचे मांस खाण्याबाबत धार्मिक मुद्याला धरून काही वाद आहेत. त्यामुळे जगभरातील विविध भागांत तेथील प्रथांनुसार विविध प्राण्यांचे मांस खाण्याबाबात विवाद आहेत.
मांजर
यहुदी धर्म आणि इस्लाममध्ये मांजरीचे मांस खाण्यावर बंदी आहे. तसेच पाश्चिमात्य देशांतही मांजरीचे मांस खाण्याचा विरोध केला जातो. पश्चिमात्य देशांकडून केल्या जाणाऱ्या विरोधामागे काही धार्मिक कारण नाही. पण येथे मांजर हा पाळीव प्राणी आहे, त्यामुळे ते मांजरीच्या हत्येचा विरोध करतात. चीनच्या अनेक भागांमध्ये मांजरीचे मांस आवडीने खाल्ले जाते.
रेपटाइल्स (मगर आणि साप)
यहुदींमध्ये मगर आणि साप अशी सरपटणाऱ्या प्राण्यांचे मांस खाण्यावर बंदी आहे. त्याशिवाय बेडकीचे मांस खाण्यावरही यहुदी धर्मात बंदी आहे.
कुत्रा
काही देशांमध्ये असलेल्या धार्मिक प्रथांमुळे कुत्र्याचे मांस खाण्यावर बंदी अाहे. इस्लाम आणि बौद्ध धर्माच्या मान्यतेनुसार येथे कुत्र्याच्या मांसावर बंदी असते. इंडोनेशियातही कुत्र्याचे मांस खाण्याबाबात वाद आहेत. मात्र, व्हिएतनाम, चीन तसेच उत्तर आणि दक्षिण कोरियातही हे मांस चांगलेच पसंत केले जाते.
डुक्कर
डुकराचे मांस (पोर्क) खाणे इस्लाम आणि यहुदी धर्माच्या प्रथेविरोधात आहे. हिब्रु बायबल मध्येही पोर्क खाऊ नये असे सांगण्यात आले आहे. तर पवित्र कुरआनमध्येही डुकराचे मांस खाणे हराम असल्याचे सांगण्यात आले आहे. ईराण, ओमान, कतार, सौदी अरब, कुवेत, पाकिस्तान, इंडोनेशिया, मलेशिया, लेबनान, तुर्कस्तान, सिरिया, युएई आणि दुबईमध्ये पोर्कच्या आयातीवर बंदी आहे.
वटवाघूळ
यहूदी धर्माच्या वेगवेगळ्या संहितांनुसार वटवाघूळ हे अपवित्र मानले गेले आहे. त्यामुळे त्याचे मांस खाण्याचा विरोध केला जातो. त्याचप्रमाणे मुस्लिम देशांमध्येही त्याचे मांस खाण्याच्या मुद्यावरून काही वाद आहेत. इंडोनेशियामध्ये मात्र त्याचे मांस खाल्ले जाते.
तर असं आहे हे…
संपूर्ण जगभरात धर्म आणि संस्कृतीनुसार प्राण्यांचे मांस खाण्यावरून बंदी आहे किंवा वाद सुरु आहे. पण दुर्दैव की केवळ भारतातच अश्या मागासलेल्या गोष्टी होतात असा विचार करून पुरोगामी आपल्याच देशाला नावे ठेवतात.
ह्या संपुर्ण लेखाचा हेतू “बंदीचं समर्थन” असा अजिबातच नाही. “धिस हॅपन्स ओन्ली इन इंडिया” ह्या अपप्रचारावर उत्तर देणे – बस्स, इतकाच आणि एवढाच ह्या लेखाचा हेतू आहे.
—
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page Copyright (c) 2017 InMarathi.com | All rights reserved.