Site icon InMarathi

चित्त शुद्ध केले तर हे शत्रू मित्र होतील : जाऊ तुकोबांच्या गावा : भाग ४३

आमच्या इतर लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page

===

मागील भागाची लिंक : पांडुरंग आपल्या मनी असेल ते करीलच: जाऊ तुकोबांच्या गावा : भाग ४२

===

रात्र खूप झालेली असल्याने रामभटाची पत्नी काशीबाईच्या घरी राहिली व सूर्योदयापूर्वीच बैलगाडीने परत निघाली, त्वरेने आपल्या घरी पोहोचली आणि शरीरमनाने विकलांग झालेल्या आपल्या पतीच्या हाती तुकोबांच्या पत्राचा प्रसाद तिने अधीर मनाने सुपूर्द केला. तुकोबांनी त्यांच्या ह्या अवस्थेतही आपल्यासाठी चार शब्द लिहून पाठविले ह्याने रामभटाच्या मनात विलक्षण कृतज्ञता दाटून आली. ते पत्र त्यांनी आधी कपाळाला लावले आणि थरथरत्या हातांनी पहिली ओळ वाचली –

चित्त शुद्ध तरी शत्रु मित्र होती । व्याघ्र हे न खाती सर्प तया ॥

आपले चित्त शुद्ध असेल तर शत्रूही मित्र बनतील. कोण मित्र होतील? वाघसर्पादि प्राणीही! तेही त्यास खाणार नाहीत!

रामभटाचे लक्ष त्या व्याघ्रसर्पांच्या दाखल्याकडे गेले नाही पण पहिला चरण त्याला उमगेना. वाटू लागले, आपल्याला कोण शत्रू आहे? आपण कधी कुणाचे वाईट चिंतिले नाही की कुणी आपले. आजवरच्या आयुष्यात आपल्याला कुणी त्रास दिला नाही आणि आपणही कुणाला! हे वाक्य मनात आले आणि रामभट चपापला! आपण कुणाला त्रास दिला नाही हे आत्ता आत्तापर्यंत खरे असेल पण हा प्रसंग आपल्यामुळेच ना उभा राहिला आहे? मग हे तरी आपल्याकडून कसे घडले? तुकोबांना आपण इकडे बोलाविले हे त्रास देणेच नव्हते काय? ते आपल्याकडून कसे घडले? आपण तुकोबांना संकटात पाडले, आपणही संकटात पडलो आणि देहूत जमलेले वारकरी स्वतःहून त्या संकटाचा स्वीकार करते झाले आहेत.

दुसऱ्याला संकटात टाकण्याची आपली वृत्ती नाही असे आपल्याला आपल्याबद्दल वाटते पण प्रसंग आला तेव्हा कुठेतरी आंत असलेला हा आपला दोष बाहेर आला हेच खरे.

शत्रू म्हणजे तरी कोण? जो आपल्याला संकटात टाकतो तो शत्रू! आपल्यातील कोणत्या तरी दोषाने हे संकट आणले म्हणजे आपल्याला शत्रू आहे! शत्रू देहरूपीच असला पाहिजे असे थोडेच आहे? नदीला कधीतरी अफाट पूर येतो, कधी मोठे वादळ येते, कधी दुष्काळ, कधी अतिवृष्टी. ती आपल्याला संकटेच वाटतात. अन्यथा जो आपल्याला जगवीत असतो तो निसर्गच त्यावेळी शत्रू बनलेला असतो. आपला शत्रू असाच आहे. आत लपलेला. तो सारखा सारखा दर्शन देत नसेल पण ह्या प्रसंगात त्याने आपले पुरते वस्त्रहरण केले नाही काय? हा प्रसंग झाला म्हणून आपल्यातील दोषरूपी एक शत्रू आपल्याला कळला. अजून किती असतील? ते कसे जातील? तुकोबा खात्री देत आहेत की

चित्त शुद्ध तरी शत्रु मित्र होती …..

चित्त शुद्ध केले तर हे शत्रू मित्र होतील. संबंध चित्ताचा आहे. ते शुद्ध नाही, करायला हवे आहे. ते कसे होईल? होईल का?

विष तें अमृत आघात ते हित । अकर्तव्य नीत होय त्यासी ॥

आपल्याला विषाची परीक्षा नको वाटते, आघात सोसवत नाहीत. पण रामभटा, हा तुकाराम तुला सांगत आहे की त्या प्राशिलेल्या विषाचे अमृत होईल, पडलेले आघात अंतिमतः हितकारक होतील. आणि हे कुणाबाबत होईल तर ज्याची नीती अकर्तव्य करणे हीच होती त्याच्याबाबतही होईल.

दुःख तें देईल सर्व सुख फळ । होतील शीतळ अग्निज्वाळा ॥

रामभटा, तुम्हाला आज पराकोटीचे दुःख होऊन अंगदाह होत आहे, पण हेच दुःख तुमच्या पुढील सुखाचे कारण ठरणार आहे आणि तुमच्या अंगच्या अग्निज्वाला शीतल करणार आहे.

आवडेल जीवां जीवाचिये परी । सकळां अंतरीं एक भाव ॥

ह्या जगात अनंत प्रकारचे जीव आहेत, तुमच्या आता ध्यानात येईल की सर्व जीवांचा अंतरीचा भाव एक आहे. हे ध्यानात आले की सर्व जीव तुम्हाला सारखेच आवडू लागतील, समान वाटू लागतील.

तुका ह्मणे कृपा केली नारायणें । जाणि जेते येणें अनुभवे ॥

रामभटा, तुमच्यावर जे सहन करायची वेळ आली ती तुमच्यावर नारायणाने केलेली कृपाच होती असे समजा, जो अनुभव तुम्ही घेतलात तो असा जाणा. त्या अनुभवाचा हा तुका सांगतो आहे तसा अर्थ लावा. ह्या अभंगरूपी निरोपाचा सरळसरळ अर्थ असा होता की तुकोबांनी रामभटाला क्षमा केली होती आणि सूचक आज्ञाही केली होती. ती आज्ञा अशी की झाल्या प्रसंगाचा उपयोग करून घ्यावा व चित्तशुद्धीकडे जीवन वळवावे. तुकोबांचा हा अक्षरप्रसाद प्राशन करताच चमत्कार झाल्याप्रमाणे रामभटाचा अंगदाह थांबला आणि त्यांना एकदम तरतरी आली. तुकोबांना भेटण्याची इच्छा तीव्र झाली आणि गावातील एका घोडेस्वारास बोलावून ते घोड्यावर स्वार झाले व दौडत देहूस निघाले!

देहू जवळ आले तसे रामभटांस रस्त्यातच कळले की तुकोबा घरातून निघाले आहेत व नदीवर पोहोचत आहेत. रामभट घोड्यावरून खाली उतरले, घोडेस्वारास परत जाण्यास सांगितले. बरोबर पत्नीस निरोप दिला की वाट पाहू नये, योग्य वेळी परत येईन, काळजी करू नये. आता रामभट नदीकडे चालले. बाजूनेही अनेकजण तिकडेच निघाले होते. रामभटाला देहूत कोण कशाला ओळखणार?अनेकांमधील एक होऊन त्यांची पावले नदीच्या दिशेने वेगात पडू लागली.

जसे जसे ते नदीचे ठिकाण जवळ येऊ लागले तशी गर्दी वाढत चालली. रामभट जरा दूरवर दृष्टी टाकतात तो किंचित कृश झालेले तुकोबा कान्होबांचा हात धरून नदीच्या काठाच्या दिशेने येताना दिसले. त्यांना पाहून मार्ग करून दिला जात होता. तुकोबा जसे पारावर पोहोचले तसा गर्दीत चालत असलेला गजरटाळघोष थांबला आणि एक चमत्कारिक शांतता तेथे पसरली. तुकोबांनी गाथा नदीत बुडविली त्याचा आजचा तेरावा दिवस होता. हे तेरा दिवस पारावरची गर्दी हटली नव्हती. त्यात पाच दिवस तुकोबांनी निद्रा करून नंतर उपोषण आरंभले त्यामुळे वारकऱ्यांचे चक्री उपोषणही सुरू होते. पण त्या दिवसापासून अखंड उपोषण करीत बसलेले काही महाभागही तेथे होते. अशा स्थितीत तुकोबा आता काय भूमिका घेतात हाच प्रश्न सर्वांच्या मनात होता.

कान्होबांच्या मनात ह्याहूनही गंभीर प्रश्न होता. पूर्वी असे लोक जमलेले दिसले की तुकोबा सहज कवित्व करू लागत. तुकोबांनी गाथा बुडविली हे खरे पण ते आता यापुढे कवित्व करणार की नाही?

तुकोबा आज पारावर चढून उभे राहिले. गर्दीमुळे त्यांना तसे करावे लागले. त्यांनी सर्वांवर एक दृष्टी टाकली. आपल्यासाठी जमलेली ही गर्दी पाहून त्यांना गहिवरून आले. काय हे प्रेम! किती हे प्रेम! याची उतराई आपण कसे होणार? त्यांनी त्या गर्दीस हात जोडले, पण शब्द चटकन बाहेर पडे ना. कंठ दाटून आला, भावना उचंबळून आल्या. मात्र काही क्षणांनी ‘अंतरीचे धावे स्वभावे बाहेरी’ ह्या त्यांच्याच वचनाला खरे ठरविण्यासाठीच की काय त्यांची वैखरी नेहमीप्रमाणे प्रकट झाली आणि शब्द निघाले –

श्रीसंतांचिया माथा चरणांवरी । साष्टांग हे करी दंडवत ॥
विश्रांती पावलो सांभाळउत्तरी । वाढले अंतरी प्रेमसुख ॥
डौरली हे काया कृपेच्या वोरसें । नव्हे अनारिसें उद्धरिलो ॥
तुका ह्मणे मज न घडता सेवा । पूर्वपुण्यठेवा वोढवला ॥

 

संतजनहो, मी आपल्या चरणांवर माझा माथा टेकवितो, आपल्याला साष्टांग दंडवत घालतो. गेले काही दिवस माझ्या कृतीला जणू उत्तर म्हणून आपणच माझा सांभाळ केलात. त्यामुळे झाले असे की माझ्या अंतरातील प्रेमसुख वाढले! तुमचे हे प्रेम पाहता प्रसंग कठीण असूनही मी हा प्रसंग तरून गेलो व माझी काया टिकली ती तुमच्या कृपेमुळेच ह्यांत संशय नाही. त्यास दुसरे काही कारणच नाही. वास्तविक माझ्याकडून आपली काही फारशी सेवा झालेली नाही, तरी आपले हे प्रेम हा माझ्या पूर्वपुण्याचाच काही विषय असावा असे मी मानतो. आज वाटते की माझ्याकडून आपली खूप सेवा घडली पाहिजे. इतके दिवस कवित्व केले ते मीच माझ्या हातांनी बुडविले. मला वाटले होते, ह्या कवित्व प्रकरणातून मी त्यामुळे मुक्त होईन. परंतु, आपले हे सारे तेरा दिवसांचे अतिशय प्रेमळ वर्तन पाहता मी आपला आता अंकित झालो आहे. अशा स्थितीत आता यापुढे मी काय करावे हे श्रीपांडुरंगानेच ठरवावे. त्याला मी म्हणतो –

 

पांडुरंगा काही आईकावी मात । न करावे मुक्त आतां मज ॥
जन्मांतरे मज देई ऐसीं सेवा । जेणें चरणसेवा घडे तुझी ॥
वाखाणीन कीर्ती आपुलिया मुखें । नाचेन मी सुखें तुजपुढें ॥
करूनि कामारी दास दीनाहुनी । आपुला अंगणी ठाव मज ॥
तुका ह्मणे आह्मी मृत्युलोकीं भले । तुझे चि अंकिले पांडुरंगा ॥

 

हे पांडुरंगा, माझे एक ऐक, मला मुक्त व्हायचे होते खरे पण तू आता तसे करू नकोस!

तुकोबा हे म्हणत असताना, त्यांना लांबून काही तरूण मुले धावत येताना दिसली. त्यांच्या डोक्यावर काहीतरी होते आणि त्यांनी तुकोबांची, गर्दीची पर्वा न करता तोंडून ‘जय जय रामकृष्णहरी’ हा गजर मोठ्याने चालविलेला ऐकू येत होता.
ती जवळ आली तशी त्यांना लोकांनी मार्ग करून दिला आणि ती मुले अजूनच धावत पुढे झाली… एकाने ती डोईवरची वस्तू तुकोबांचे पायी ठेविली आणि बाकीचे ओरडले –

गाथा सापडली…..गाथा वर आली….

हे शब्द ऐकताच तेथे काय घडले हे सांगण्यास कोणाचे शब्द पुरे पडतील?

===

(साताऱ्यातील दैनिक ऐक्यच्या सौजन्याने त्यांच्या रविवार पुरवणी ‘झुंबर’ ह्यात प्रकाशित होणारी ‘जाऊ तुकोबांच्या गावा’ ही लेखमाला पुन:प्रकाशित करत आहोत.)

लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page

Exit mobile version