Site icon InMarathi

अस्तित्वात “नसलेले” तारे आपण बघतो तेव्हा…!

आमच्या इतर लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi

===

जेव्हा आपण कधीतरी रात्री निरभ्र आकाशाकडे बघतो, अनेक तारकांनी भरलेला आपला आसमंत एक निराळीच उर्जा आपल्याला देत असतो. हजारो वर्षांपासून तारकांचा हा रात्रीचा सहवास सर्वांनाच हवाहवासा वाटत आला आहे. ग्रह तारकांची नीट माहित नसलेल्या एखाद्या व्यक्तीसाठी रात्रीचा आसमंत त्याला न बदलणारा आणि शाश्वत वाटत असतो.

खगोलशास्त्रावर जगभरातून अनेक संस्था विश्र्वाचा सतत शोध घेत आहेत आणि आता तर आपण उपग्रहांच्या माध्यमातून ग्रहांच्या जवळ जावून त्यांना समजावून घेण्याचा प्रयत्न करतो आहोत. तार्‍यांमध्ये आणि आपल्यामध्ये खूप समानता आहेत. ते जन्माला येतात, काही काळ जगतात आणि कालांतराने ते मरण पावतात. काहींची धग कमी होते तर काही तार्‍यांमध्ये स्फोट होतात. थोडक्यात आपल्यासारखेच तारे हे मरण पावतात.

जेव्हा तुम्ही तारांगण बघत असता, खरंतर तुम्ही भूतकाळ बघत असता. बरेचसे तारे जे रात्री आपण अवकाशात चमकतांना बघतो ते मरण पावलेले आहेत. : A Twitter Post.

Internet वर वरील आशयाची ट्वीट बघायला मिळाली. अर्थात हे अर्धसत्य आहे. यातील पहिले वाक्य शास्त्रीय सत्य – scientific truth – आहे परंतू दुसर्‍या वाक्यातले ‘बरेचसे’ हा शब्द पूर्णसत्य नाही.

जेव्हा तुम्ही तार्‍यांकडे बघत असतात तेव्हा ते पुर्वी कसे होते ते बघत असतात. प्रकाशाची गती ही जगातली आजपर्यंत आपणास माहित असलेली सर्वात जास्त गती आहे. तीन लाख किलोमिटर प्रती सेकंद ही प्रकाशाची गती आहे. तरी देखील सुर्य सकाळी जेव्हा उगवतो तेव्हा त्याचा प्रकाश पृथ्वीवर येण्यासाठी आठ मिनिटे लागतात. (8 मिनिटे X 60 सेकंद X 300000 किमी) = 14 कोटी ४० लाख किलोमिटर हे अंतर सूर्य आणि पृथ्वी यांच्यामध्ये आहे. सुर्यासारखा एक तारा ‘अल्फा सेंटोरी’ जो सूर्यापासून सर्वात जवळचा तारा म्हणून आपल्याला ज्ञात आहे, त्या तार्‍याचा प्रकाश आपल्या पर्यंत पोहचण्यास चार वर्ष लागतात.

रात्रीच्या आकाशात सुमारे ६००० तारे आपण उघड्या डोळ्याने बघु शकतो. त्यातील बर्‍याचश्या तार्‍यांचे अंतर 1000 प्रकाशवर्षांपेक्षा कमी आहे. बरेचसे तारे कमी अंतरावरूनच अंधूक दिसू लागतात. ६० प्रकाशवर्षे (प्रकाशवर्षे, light years – म्हणजे प्रकाश एका वर्षात जितकं अंतर कापू शकतो – तेवढं अंतर. एक प्रकाशवर्ष म्हणजे – 9.4607 × 1012 किलोमीटर !) दूर गेल्यानंतर आपला सूर्य देखील दिसेनासा होतो. आपल्या प्रभावशाली प्रकाशामुळे Deneb – 1500 ते 2500 प्रकाशवर्षे आणि Eta Carinae – 7500 प्रकाशवर्षे इतके दूर असूनही केवळ त्यांच्यामधील प्रकाशाच्या तीव्रतेमुळे दूरपर्यंत दिसू शकतात. सूर्यापेक्षा दोन लाख पट जास्त या तार्‍यांची luminosity प्रकाशतीव्रता आहे. अशा प्रकारचे अगदी बोटावर मोजण्याइतके तारे आज आपणांस माहित आहे.

अजून काही अब्ज वर्षे सूर्य असाच आपल्याला प्रकाश देणार आहे. इतरही अनेक जीवंत तारे असेच आपल्याला दिसत रहाणार आहे. विश्र्वाच्या परिभाषेत काही हजार वर्षे म्हणजे फक्त निमिषार्ध आहेत. त्या मानाने आपले आयुष्य अगदीच कमी असणार आहे. तसेच एखादा तारा आपण जीवंत असलेल्या कालखंडात मरण्याची शक्यतादेखील खूपच कमी असणार आहे.

1840 मध्ये Eta Carinae या तार्‍यामध्ये (सुपरनोवा) स्फोट झाला. 1840 पर्यंत आकाशात सर्वसामान्य दिसणारा ह्या तार्‍याचा प्रकाश 1848 पर्यंत हळुहळु वाढत जाऊन पृथ्वीवरून दिसणारा दुसरा सर्वात जास्त चमकणारा तारा मानला जाऊ लागला. त्यानंतरच्या काळात मात्र तो हळूहळू अंधूक होऊ लागला. Eta Carinae ह्या तार्‍याचा भूतकाळ जेवढा रहस्यमय आहे तेवढाच त्याचा भविष्यकाळ देखील पृथ्वीवासीयांसाठी रंजक असणार आहे.

 

 

 

या सगळ्या घटनांकडे आपण कसे बघतो हे जास्त महत्वाचे आहे. आकाशातले सगळेच तारे मृत झालेले नाही. Eta Carinae सारखा एखादा अपवाद वगळता जवळपास सगळेच तारे आकाशात जीवंत आहेत त्यामुळे रात्रीच्या निरभ्र आकाशात बघतांना मोकळा श्र्वास घ्या. मिणमिणत्या तार्‍यांच्या प्रकाशात आंतरबाह्य उजळू द्या !

श्रीनिवास गर्गे

InMarathi.com वर विविध लेखकांनी व्यक्त केलेले विचार ही त्यांची वैयक्तिक मतं असतात. InMarathi.com त्या मतांशी सहमत असेलच असे नाही. । आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi

Exit mobile version