' मराठी मालिकांमधील चुकीचं संस्कृती दर्शन थांबायला हवं – InMarathi

मराठी मालिकांमधील चुकीचं संस्कृती दर्शन थांबायला हवं

आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page

===

1982 साली भारतात टीव्ही आला. तेव्हापासून ही वस्तू आपल्या घरातला अविभाज्य घटक झाली आहे. ‘आमच्या काळात फक्त दुरदर्शन होते’ म्हणून हमलोग, बुनियाद ची आठवण काढून भुतकाळात रममाण होणारे लोक राष्ट्रीय आणि मुख्यत: प्रादेशिक वाहिन्यांचे हक्काचे प्रेक्षक झाले आहेत.

1982 ते 2016 या काळात करमणुकीच्या क्षेत्रात भयंकर बदल झाले. प्रादेशिक वाहिन्यांचे पेव फुटले आणि करमणुकीच्या नावावर काहीही खपवणार्यांचे देखील चांगलेच फोफावले

मराठी वाहिन्या म्हटलं की सर्वात प्रथम नाव येते ते ‘झी मराठीचे’. या वाहिनीनी महाराष्ट्रातील प्रेक्षकवर्ग जोडला. ‘नक्षत्रांचे देणे’, ‘पिंपळपान’, ‘श्रीयुत गंगाधर टिपरे’, ‘अनुबंध’ सारख्या दर्जेदार मालिका प्रेक्षकांना दिल्या.या मालिकांमधील पात्र, प्रसंग अनेकांच्या मनावर कोरलेेले आहे. पण सध्या वेगवेगळ्या मालिकांमधून विविध विभागाची संस्कृती दाखवतांना जो पोरखेळ चालवलाय तो संतापजनक आणि समाजमनावर दुरगामी परिणाम करणारा आहे.

सध्या प्रचंड लोकप्रिय झालेली ‘काहे दिया परदेस’ ही मालिका हे त्यातले उदाहरण. मध्यमवर्गीय मराठी मुलगी परप्रांतिय मुलाच्या प्रेमात पडते आणि कायम या लोकांचा तिरस्कार करणार्या बाबांची ती जीव की प्राण आहे.

मुलगा जोपर्यंत बापाला हिंदी शिकवत होता, त्यांच्या मुलीला पावसात वाचवायला गेला तेव्हापर्यंत तो परप्रांतीय असूनसुद्धा असून गुणी आणि सज्ज्न होता. पण आता हे लफडं उघडकीला आल्यावर बापाची अस्मिता जागृत झाली आहे.

अशा प्रसंगी मुलीच्या पाठीशी उभे रहायचे सोडून आपली टिमकी वाजवण्यात बापाने धन्यता मानली आहे.लगोलग मुलीचे लग्न ठरवून देखील तो मोकळा झाला आहे.

 

sayali-sanjeev-rishi-saxena-kahe-diya-pardes-serialmarathipizza

स्त्रोत

परप्रांतिय लोकांना फक्त शिव्या घालणे हा काही लोकांचा अत्यंत जिव्हाळ्याचा विषय असतो. तेव्हा या मालिकेने त्यांचा इगो नक्कीच सुखावला आहे.

पण महाराष्ट्राबाहेर विशेषत ‘आॅन साईट’ वर आपण परप्रांतीयच आहोत याचा कोणीही विचार करत नाही. भारतीय लोक जगभर आपला डंका पिटत आहे आणि त्यात मराठी लोकांचा लक्षणीय वाटा आहे. तेव्हा जागतिक पातळीवर एक होऊ पाहणार्या समाजाचे असे ध्रुवीकरण दाखवून काय साध्य करायचे आहे?

आज आॅल्मिपिक मध्ये पदक मिळवणार्या मुलींवर कौतूकाचा वर्षाव होतोय पण वधुपरीक्षा म्हणून गंगाजळाने शुद्धी करणे, नणंदेचे प्रेमप्रकरण लपवण्यासाठी लाच म्हणून सासुच्या सोन्याच्या बांगड्या घेणे यातून स्त्रीयांचे असे चित्र समाजासमोर उभे करणे नक्कीच निषेधार्ह आहे.

नुकतीच सुरू झालेली आहे ‘माझ्या नवर्याची बायको’ ही मालिका पण त्यातलीच एक.

नागपूरहून मुंबईला स्थायिक झालेल्या कुटुंबाची ही गोष्ट आहे. त्यात नवरा हा एकदम माॅडर्न झाला आहे. त्यामुळे त्याची नागपूरची बायको गावंढळ आणि युजलेस वाटतेय.

तो तिला सारखा तू नागपूरला जाऊन रहा, तुझी खरी लायकी तिथेच आहे असे म्हणतो. म्हणजे नागपूरला काय गावंढळ लोक राहतात का? की तिथल्या लोकांना आधुनिकता काय ते माहिती नाही.

एखादं पात्र वेंधळे आहे असं दाखवा पण ते नागपूरचे आहे म्हणून ते वेंधळे आहे हे दाखवण्यात काय हशील? आणि म्हणे नागपूरी तिखट आणि तेलकट स्वयंपाक. म्हणजे नागपूरचे लोक काय सतत तेलकट खातात असं म्हणायचं आहे का? असं असतं तर नागपूरात ह्दयाच्या नळ्या साफ करणारा डाॅक्टरांचा कारखानाच तयार झाला असता ना.

 

mazya-navryachi-bayko-marathipizza

स्त्रोत

नागपुरी आणि एकूणच वऱ्हाडी बोलीभाषेची तर चित्रपटांतून आणि मालिकांमधून जी वाताहत झाली आहे त्याला सुमार नाही. येऊन राहिली, जाऊन राहिली, भैताड, बाप्पा यापलीकडे देखील वर्हाडी बोली आहे हे कोणाच्या खिजगिणतीत नाही.

साक्षात पु. ल यातून सुटले नाही तर बाकीच्यांची काय कथा?

महाराष्ट्र राज्यात प्रत्येक टप्प्यावर भाषा बदलते, त्या भाषेचा लहेजा, व्याकरण यांचा थोडा अभ्यास तरी करायला नको का ? रात्रीस खेळ चाले या मालिकेत पण कोकणी भाषेची अशी वाट लागल्यावर मोठा गहजब झाला होता.

पण विदर्भाच्या सामाजिक, आर्थिक प्रश्नांबाबतच इतकी अनास्था आहे की या फुटकळ सांस्कृतिक प्रश्नांकडे वेळ द्यायला कोणाला वेळ नाही.

करमणुकीचे क्षेत्र प्रचंड प्रमाणात विस्तारले आहे. रामायण, महाभारत मालिका सुरू असतांना रस्ते अोस पडायचे असा इतिहास अनेक जण सांगतात. आता एखादा भाग चुकला तर यु ट्यूब वर बघू शकतो.

मनोरंजन क्षेत्राला हे आणि असे अनेक आयाम प्राप्त झाले आहे पण त्यात प्रेक्षकांना नक्की काय हवे याचा विचार फारसा कोणी करतांना दिसत नाही. तेव्हा ताटात वाढले ते खाणे अन्यथा ताट भिरकावून देऊन आपल्या आवडीचा पदार्थ खाणे हे दोनच पर्याय प्रेक्षकांसमोर आहे.

वर उल्लेख केलेल्या श्रीयुत गंगाधर टिपरे मालिकेच्या एक भागात कुटुंबातली मुलगी एकटी परदेशात जायला निघते. तेव्हा बाप पैशाची जुळवाजुळव, कागदपत्रांची सोय करतो आई लोणची, पापड, सहा महिने चालेल असा खाऊ तयार करते.

भाऊ आता आपली हक्काची मैत्रिण जाणार म्हणून तो बावरला आहे, तरी भावना लपवून तो चेष्टामस्करी कर, टॅक्सी आण, असे काम करतोय आणि आबा हळूच आपली पुंजी मुलाची घालमेल बघून त्याला देतात.

शेवटी एअरपोर्ट वर जातांना आईच्या भावनांचा बांध फुटतो. पण मुलींनासुद्धा आपल्या पंखांवर झेप घेता यावी म्हणून ही आई आणि सारं घर तिच्यामागे उभं राहतं. हा प्रसंग 2003 सालातला आहे.

आज 13 वर्षानंतर या विचारसरणीत आणखीच प्रगती झाली आहे.

आजसुद्धा एखाद्या कुटुंबातील मुलगी किंवा मुलगा परदेशात जातांना कमी अधिक प्रमाणात असे प्रसंग घडत असतात. आणि तसेही उद्दिष्टांमागे धावता धावता आपली कौटुंबिक, सामाजिक आणि मुख्य म्हणजे सांस्कृतिक मुल्ये जपणे हे एक आव्हान होऊन बसले आहे.

तेव्हा असे काही प्रसंग किंवा या पद्धतीची मांडणी करून ही मुल्य जपण्यासाठी या मालिका सहाय्यभूत ठराव्यात ही रास्त अपेक्षा.

व्यवसाय, अर्थकारण आपल्या जागी आहेच. ते नाकारण्याचे कारण नाही.

पण अजुनही अनेक घरांत काहे दिया परदेस चे टायटल साॅंग सुरू झाल्यावर जेवणाची ताटं मांडली जातात. तेव्हा प्रेक्षकांच्या भावनांशी असा खेळ करू नये.

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page । Copyright (c) 2018  InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?