फक्त मसूद अझर नव्हे, भारताच्या ‘मोस्ट वॉन्टेड’ यादीतील हे अतिरेकी आजही मोकाट आहेत!
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर
===
देशविरोधी कारवाया करून लोकांमध्ये दहशत माजवणाऱ्या वृत्ती आज मोठ्या प्रमाणावर बोकाळल्या आहेत. जगभरातील इतर देश ज्या प्रमाणे अश्या वृत्तींनी त्रस्त आहेत, त्याच प्रमाणे भारत देखील ह्याला अपवाद नाही.
कित्येक नराधमांची भारतावर नजर आहे. त्यांना भारताचे भलं झालेलं पाहावत नाहीये.
पण प्रत्येक वेळेस आपल्या संरक्षण खात्याने अश्या नराधममांना तोडीस तोड प्रत्युत्तर दिले आहे. त्यांचे बरेचसे मनसुबे उधळून लावून देशाचे रक्षण केले आहे.
पण अजूनही सगळ्यात मोठी कामगिरी म्हणजे ह्या नराधमांना बेड्या ठोकणे आणि कडक शिक्षा देणे होय. मात्र अजूनही ही कामगिरी आपल्याला बजावता आलेली नाही.
मोस्ट वॉन्टेड म्हणून प्रत्येक देशाने एक हिट लिस्ट जाहीर केलेली असते. ज्यात अश्या नराधमांच्या नावांचा समावेश असतो. आज आपण भारताच्या मोस्ट वॉन्टेड लिस्टमध्ये असणाऱ्या नाराधमांबद्दल जाणून घेऊया…
दाऊद इब्राहीम :

‘डी’ कंपनीचा म्होरक्या ५८ वर्षीय दाऊद भारताचा सर्वात मोठा मोस्ट वॉन्टेड आहे. त्याच्यावर १९९३ मध्ये झालेल्या बॉम्बस्फोटात सहभागी असल्याचा आरोप आहे.
या हल्ल्यांमध्ये ३५० लोकांचा मृत्यू झाला होता, तर १२०० हून अधिक लोक जखमी झाले होते. दाऊदवर २००८ मधील मुंबई स्फोटांमध्ये सहभागी असल्याचा आरोपही आहे. सध्या तो पाकिस्तानात लपून असल्याची चर्चा आहे.
सय्यद सलाऊद्दीन :

दाऊद नंतर सलाउद्दीन भारतासाठी सर्वात मोठा मोस्ट वॉन्टेड आहे. त्याचे नाव नॅशनल इनव्हेस्टीगेशन एजंसी (एनआयए) च्या यादीतही आहे. एकेकाळी पाकिस्तानचा लाडका असलेला हा फुटीरतावादी नेता सध्या गुमनाम आहे.
तो पाकव्याप्त काश्मीरमध्ये लपला असल्याची शंका आहे. सलाउद्दीनला भारतात परतायचे होते असा खुलासा रॉच्या कार्यकर्त्यांनी केला होता. तेव्हापासून तो चर्चेत आहे.
झकी उर रेहमान लखवी :

लखवी हा लष्कराचा ऑपरेशनल कमांडर आहे. २६/११ हल्ल्याचा तो मास्टरमाइंड आहे. मुंबईवर २००८ मध्ये झालेल्या या हल्ल्यात १६६ जण ठार झाले होते.
भारतातील गुप्तचर संस्थांनी केलेल्या दाव्यानुसार या दहशतवाद्याला लाहोरजवळ एका सेफ हाऊसमध्ये लपवून ठेवण्यात आले आहे. तसेच त्याच्या सुरक्षेसाठी पाकिस्तानच्या लष्कराने साध्या वेशातील कमांडो त्याच्या घराजवळ तैनात केले आहेत.
मौलाना मसूद अजहर :

नुकतेच संयुक्त राष्ट्रसंघाने या अतिरेक्याला अंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित केले आहे.
१९९९ मध्ये विमान अपहरणानंतर भारत सरकारला मौलाना मसूद अजहरला सोडावे लागले होते. तेव्हापासून हा दहशतवादी पाकव्याप्त काश्मीर (पीओके) मध्ये राहतो, असे मानले जात आहे.
मात्र, सुटकेनंतर अद्याप त्याला कोणीही पाहिलेले नाही. जानेवारी २०१४ मध्ये त्याने हजारो लोकांसमोर फोनद्वारे भाषण केले होते. तेव्हापासून मसूद अंडरग्राऊंड आहे.
हाफीज मोहम्मद सईद :

NIA च्या मोस्ट वाँटेड यादीत हाफीज मोहम्मद सईदचे नाव आघाडीवर आहे. २००८ च्या मुंबई हल्ल्याचा तो मास्टरमाइंड आहे. या प्रकरणी तो मोस्ट वॉन्टेड आहे. हाफीज नेहमीच भारताविरुद्ध वादग्रस्त वक्तव्ये करत असतो. कराचीत तो अनेकदा भाषणे करतो. त्याला पाकिस्तानी लष्कराने संरक्षण दिले असल्याची चर्चा आहे.
या अतिरेक्यांनी केलेल्या कारवायांत अनेक निष्पाप भारतीय नागरिक धारातीर्थी पडले आहेत. या नराधमांना शिक्षा होण्याची प्रत्येक भारतीय नागरिक वाट पाहत आहे.
===
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | Copyright © InMarathi.com | All rights reserved.