Site icon InMarathi

भारत एक “राष्ट्र” नाही असं वक्तव्य करणाऱ्यांनी तर हे वाचाच – कदाचित डोळे उघडतील!

india 2

shoutout UK

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम |

===

लेखक : महेश मोहन वैद्य

===

अनेकदा चर्चांत मत देतांना, अनेक लोक भारताला एक “राष्ट्र” म्हणवून घेण्यास तयार नसतात. विशेषत: “डाव्या विचारसरणीचे” लोक.

त्यांनी केलेल्या “राष्ट्र” या व्याख्येच्या संकल्पनेत “भारत” एक “राष्ट्र” म्हणून बसत नाही असे यांचे म्हणणे आहे. हे तर अजून हास्यास्पद आहे आणि त्याची “पोथीनिष्ठता” अधोरेखित करणारे आहे.

हे खरं आहे की १५ ऑगस्ट १९४७ ला भारत स्वतंत्र झाला तेव्हा भारतात ३०० च्या वर वेगवेगळी संस्थानं होती.

हे ही खरं आहे की त्यांना भारतात विलीन करून घेतांना स्व. वल्लभभाई पटेल यांना बराच आटापिटा करावा लागला. त्याच बरोबर भारताची फक्त “धार्मिक” कारणावर फाळणीसुद्धा झाली.

 

 

शिवाय भारतामध्ये अनेक भाषा, विचारधारा, मान्यता, खाद्यसंस्कृती याच बरोबर परंपरेच्या जोखडाखाली पिचलेला एक खूप मोठा जनसमुदाय होता किंवा अजूनही आहे.

तरीसुद्धा भारत एक “राष्ट्र” म्हणून उभे तर राहिलेच. केवळ उभेच नाही राहिले तर निरंतर प्रगती पण करत राहिले. हे कसे घडले?

याचा विचार विदेशी किवा आधुनिक “राष्ट्र” संकल्पने प्रमाणे विचार करणार्यांना पडत नाही याचे वाईट वाटते.

प्रथम एक नजर यावर टाकू की जगातील इतर कोणकोणते देश कोणकोणत्या कारणाने “राष्ट्र” म्हणून पुढे आलेत.

जगात मुख्यत: भौगोलिक समानता, वंश, भाषा, धर्म अशा मुद्यांवर समूह एकत्र येऊन कालांतराने त्याचे “राष्ट्र” बनले आहे. वेगवेगळ्या काळात वेगवेगळे मुद्दे “राष्ट्र” निर्मिती वर प्रभाव टाकत राहिले.

अश्या देशांची काही उदाहरणे पाहू या, जी “राष्ट्र” म्हणून एकत्र आली आणि जगावर राज्य करणारी, प्रभाव पाडणारी झाली.

युनायटेड किंगडम

भारतावर १५० वर्षे राज्य करणारा हा देश -वा राष्ट्र – पण मुख्यत: चार छोटे देश/राज्य किवा संस्थाने मिळून बनला आहे.

 

BBC

इंग्लंड, स्कॉटलंड, वेल्स, नॉर्थ आयर्लन्ड या चार देशांचे एकत्रीकरण होऊन UK तयार झाले.

पण त्या ही अगोदर इ.स. ५०० पूर्वी हे राष्ट्र ७ वेगवेगळ्या राज्यात विभागलेले होते आणि त्यांची पण आपसात धमासान युद्धे होत.

एव्हडेच नव्हे, तर आधुनिक काळात “स्कॉटलंड” पण या देशातून फुटण्याची हिंसक चळवळ अगदी ९० पर्यंत चालवत होता. भौगोलिक एकसंधता आणि धर्म या तत्वावर एक झालेले हे “राष्ट्र” होत.

 

जर्मनी

 

DW

 

जर्मनी राष्ट्र देखील ३०० वेगवेगळे “जर्मन” भाषिक संस्थाने एकत्र करून बनला आहे. यातील बरीचशी संस्थाने नंतर प्राशिया, बेव्होरीया या संस्थानांत गेली होती.

ओटोमान बिस्मार्क याने १६७१ पर्यंत आता दिसणाऱ्या एकत्रित जर्मनीचा पाया तयार केला. विशेष म्हणजे आधुनिक युगात पण जर्मनी दोन वेळा तुटला आणि पुन्हा एकत्रित झाला.

पण “राष्ट्र” म्हणून ते अबाधित राहिले.

 

इटली

इटली पण असेच अनेक राज्य एकत्र करून बनलेला देश आहे.

 

contact weebly

 

“गरीबल्डी” हे नाव आपण इतिहासाच्या पुस्तकात वाचले आहे. या माणसाच्याच पुढाकाराने १८६० साली इटली या “राष्ट्राची” पायाभरणी झाली. पुढे अनेक वर्षे ती सुरु राहिली आणि आजचं इटली हे “राष्ट्र” आपल्याला दिसत आहे.

जगातील प्रत्येक “राष्ट्र”, कधी ना कधी कोणत्या ना कोणत्या कारणांनी छोट्या छोट्या देश/प्रदेश/समूहांच्या एकत्र येऊन तयार झाली आणि नंतर मजबूत होऊन “राष्ट्र” म्हणून जगासमोर आली. मग भारतालाच वेगळा न्याय का?

मुळातच “राष्ट्र” एका रात्रीतून उदयाला येत नाही. संघर्षाशिवाय तर नाहीच नाही. हा संघर्ष कधी रक्तलांच्छित असतो, कधी भावनिक तर कधी वैचारिक.

अश्या अनेक आंदोलनातून गेल्यावर “राष्ट्र निर्मिती” होत असते. यात राजकीय, सामाजिक, वांशिक, सांस्कृतिक, धार्मिक असे अनेक घटक काम करत असतात. 

भारताच्या दृष्टीने विचार केल्यास इथे “धार्मिक किवा सांस्कृतिक” घटकाने अधिक काम केलेले आहे.

कोणाला आवडो अथवा न आवडो, भारताच्या इतिहासाचे कोणी काहीही अर्थ लावो – वरील सत्य स्थिती कोणीही नाकारू शकत नाही.

तुम्ही याला “वैदिक” म्हणा, “सनातन” नाही तर “हिंदू” पण या “धार्मिक किवा सांस्कृतिक” घटकांमुळेच “भारतीय उपमहाद्वीप” मधील सगळी जनता एकमेकांना बांधल्या गेलेली होती.

भारताचा मुद्देसूद लिखित इतिहास जरी “अलेक्झांडर” च्या नंतरच्या काळापासून असला तरी त्या अगोदर भारताला इतिहासच नव्हता/नाही असे नाही…!

भारताच्या खात्यावर अनेक अश्या गोष्टी आहेत ज्याचा प्रत्येक भारतीयाला अभिमान हवा. गणिताचे अनेक नियम हे भारतीयांनी बनवले, भारताने जगाला “शून्य” देऊन एक नवी क्रांती केली.

याच बरोबर “शुश्रुत ऋषी” नी “शल्य चिकित्सा” याचा शोध लावला आणि “भारतीय आयुर्वेदात” नवीन शाखा सुरु केली.

भारतीयांना “खगोलशास्त्र” पण उत्तमरीत्या अवगत होते आणि हे सगळे “अलेक्झांडर” च्या आक्रमणाच्या अगोदर पासून होते. भारतातील हजारो वर्षे अगोदरची प्राचीन मंदिरे आपण बघतो.

ती नक्की कुणी बांधली याची जरी नोंद नसली तरी त्याची डागडुजी केव्हा, कोणी केली याची नोंद आपल्याला जरूर सापडते.

ही मंदिरं तेव्हा बांधल्या गेली याचाच अर्थ असा की तेव्हाही भारतीय लोक त्या देवतेवर आस्था ठेऊन होते. अगदी रामायण – महाभारतात पण भारताचा उल्लेख “भारतवर्ष” असा आला आहे. 

इथे राज्य करणाऱ्या प्रत्येक राजाच्या मनात संपूर्ण भारत पादाक्रांत करून “चक्रवर्ती” बनण्याची अभिलाषा राहिली आहे.

मौर्य, गुप्त यांच्या कार्यकाळात तर आज दिसणाऱ्या भारताच्या ९०% भाग त्यांच्या साम्राज्याला जोडलेलाच होता. यातूनच हा संपूर्ण भू-भाग एक “राष्ट्र” म्हणून उदयास येण्याच्या तयारीत नक्कीच होता असे दिसते.

 

wikipedia.org

 

त्या काळात प्राथमिक दळणवळणाची साधन आणि जलद संदेश वहनाचा अभाव या मुळे प्रत्येक वेळेस इतक्या मोठ्या भूभागावर सारखे नियंत्रण ठेवणे हे कोणत्याही राज्यकर्त्यासाठी चांगलीच कठीण गोष्ट आसेल.

त्याचमुळे कदाचित आजच्या नकाशातील “भारत” तंतोतंत तिथे दिसत नाही. पण एक गोष्ट लक्षात घ्या की या भूभागावरील सामान्य लोक “धार्मिक यात्रा” करत आणि एकमेकांसोबत सुख-दु:ख पण वाटत.

उगाच भारताच्या दक्षिण टोकावर रामेश्वरम येथील हिंदू भक्तीभावाने पार उत्तर भागातील मानस सरोवर यात्राकरत नसतो!

तर उत्तरे कडील हिंदू त्याच अपार भक्तीने रामेश्वरमला उगाच शरण जात नसतो!

अगदी पूर्वीपासूनच, पार पूर्वे कडील “आसाम” मधील हिंदू – पश्चिम किनार्यावर असलेल्या “सोमनाथ” वर भक्तीभाव अर्पण करतो – तर पश्चिमी भागातील हिंदू त्याच श्रद्धेने “कामाख्या देवीच्या” मंदिरात नतमस्तक होतो.

भौगोलिक स्थितीनुसार खानपान आणि मान्यता यात काहीही आणि कितीही फरक पडत असला तरी हिंदू धर्माचे सामान्य नियम-अनियम संपूर्ण भारतात सारखेच दिसून येतात.

हीच गोष्ट भारतीयांना एक करणारी मोठी कडी आहे आणि भारताला “राष्ट्र” म्हणून एक करणारी सुद्धा.

 

विवेकानंद स्मारक, कन्याकुमारी । wikipedia.org

 

“इंग्रज” आले म्हणून भारताचा जन्म झाला म्हणणारे वरील सगळ्या बाबींकडे दुर्लक्ष करतात. इंग्रज नसते आले तरी येणाऱ्या काळात होणाऱ्या आधुनिक बदलात भारत एक “राष्ट्र” म्हणून उभा झालाच असता.

कदाचित थोडा वेळ गेला असता, पण या स्थित्यांतराला कोणीही अडवू शकले नसते.

आणि हो – इंग्रजाने भारत नक्कीच “एक” केला नाही. तसे असते तर इंग्रज सोडून जातांना ३०० च्या वर संस्थाने भारतात राहिलीच नसती. इंग्रजांनी भारत तोडण्याचाच मोठा प्रयत्न केला आहे.

त्याचीच फळं भारताला ७० वर्षा नंतर पण “राष्ट्र” नं मानणाऱ्या लोकांच्या रूपानी आपल्याला दिसत आहे.

हे मान्य करायला काहीच हरकत नाही की भारत आज अनेक सामाजिक आणि सांस्कृतिक समस्यांना तोंड देत आहे, ज्या मुळे अनेकदा नको त्या भावना समोर येतात.

पण म्हणूनच भारतीयांचं आपल्या देशावर प्रेम अजिबात नाही, भारतात “राष्ट्र भावना” नाही – हे खचितच सिद्ध होत नाही. या समस्यांमध्ये पण इतर अनेक कंगोरे आहेत. पण तो या लेखाचा विषय नाही.

म्हणून आपण त्याच इंग्रजांच्या देशाचे उदाहरण पहावे.

त्यांच्या आणि आपल्या विचारसरणी मधील मुलभूत फरक हाच आहे कि ते सतत सांगतात की, “आम्ही कसे घडलो.” आणि आम्ही मात्र सतत सांगत असतो की, “आम्ही कसे घडू शकत नाही.”

===

InMarathi.com वर विविध लेखकांनी व्यक्त केलेले विचार ही त्यांची वैयक्तिक मतं असतात. InMarathi.com त्या मतांशी सहमत असेलच असं नाही. | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटरइंस्टाग्राम | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version