Site icon InMarathi

फोटोफोन, व्हिजिबल स्पीच आणि टेलिफोनचा शोध लावणाऱ्या माणसाचा रंजक जीवन प्रवास

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम

===

टेलिफोनचे जनक अलेक्झांडर ग्रॅहम बेल यांनी टेलिफोनचा शोध लावला तेव्हा कदाचित भविष्यात मोबाईल फोनद्वारे संवाद साधण्याबरोबरच सेल्फी, इंटरनेटच्या जगात भ्रमण करणे शक्य होईल याचा अंदाज त्यांना नसेल.

पण या क्रांतिकारी शोधाने जगामध्ये विकासाची दारे उघडली गेली यात शंका नाही. त्याच ग्रॅहम बेल बद्दल काही रंजक माहिती आपण आज जाणून घेऊया.

scotsman.com

स्कॉटलंडच्या एडीनबर्गमध्ये ग्रॅहम बेल यांचा जन्म झाला होता. अलेक्झांडर मेलविले आणि एलिझा सायमंड्स बेल हे त्यांचे आई वडील. अगदी लहान असल्यापासूनच त्यांनी विविध प्रकारचे शोध लावायला सुरुवात केली होती.

त्यांच्या सुरुवातीच्या पहिल्या प्रकल्पांपैकी एक प्रकल्प हा गव्हापासून त्याचा भुसा वेगळा करण्यासंदर्भातील होता. पण त्यांना आवाजाबाबत विशेष प्रेम होते. तोंडातून बाहेर पडणारा आणि कानाला ऐकू येणारा आवाज याबाबत बेल यांना प्रचंड आकर्षण होते.

वडीलांनी दिलेल्या प्रेरणेतून त्यांनी भाऊ मेलविले याच्यासह टॉकिंग मशीन तयार करण्याचा प्रयत्नही केला होता. यात त्यांना यश आले आणि नाही आले असेही म्हणता येईल. कारण हा प्रोजेक्ट मागे पडला.

पण त्यानंतर बेल यांनी जो शोध लावला त्या जोरावर आज संपूर्ण जगाने कुठल्या कुठे मजल मारली आहे. हा शोध म्हणजे टेलिफोनचा. हेही एक टॉकिंग मशीनच म्हणायला हवे ना.

वयाच्या ११ व्या वर्षी अलेक्झांडर बेल यांनी ग्रॅहम हे नाव धारण केले. तेव्हा ते बनले अलेक्झांडर ग्रॅहम बेल.

त्यांचे वडील आणि आजोबा या दोघांचीही पहिली नावे अलेक्झांडर अशीच होती. त्यामुळे या नावाचा कंटाळा आल्याने त्यांनी हे नाव निवडले होते. त्यांच्या वडिलांच्या एका विद्यार्थ्याचे नाव अलेक्झांडर ग्रॅहम असे होते.

त्यामुळे त्यांनी स्वतःच्या नावात ग्रॅहम अॅड केले. बेल हे रिंगशी संबंधित असल्याने त्यांनी ते तसेच ठेवले असेल. पण काहीही असले तरी त्यांच्या कुटुंबासाठी मात्र कायम अॅलेस किंवा अॅलेक हेच त्यांचे नाव होते.

वयाच्या अवघ्या १६ व्या वर्षी ग्रॅहम बेल यांनी एका मुलांच्या निवासी शाळेत शिकवण्यास सुरुवात केली होती. त्यांच्या वडिलांनी व्हिजिबल स्पीच ही पद्धत तयार केली होती. एखादा शब्द तयार होण्यासाठी आवाज कसे तयार होतात त्यासाठी ओठांच्या हालचाली कशा होतात, याचा त्यात समावेश होता.

हीच पद्धत बेल यांनी कर्णबधीर मुलांना बोलायला शिकवण्यासाठी आणि त्यांचे उच्चार अधिक स्पष्ट करण्यासाठी वापरली. त्यांनी स्वतःच्या काही पद्धतीही तयार केल्या. त्यांच्या आईला कमी ऐकू येत होते. त्यामुळे ते लहानपणीपासूनच आईशी वेगळ्या प्रकारे बोलायचे. कर्णबधीर मुलांना शिकवण्यात त्यांनी अगदी प्रावीण्य मिळवले होते.

ग्रॅहम बेल यांनी टेलिफोनच्या शोधासाठी अनेक वर्षे संशोधन केले. त्या जोरावर त्यांनी १४ फेब्रुवारी १८७६ रोजी पेटंटसाठी अर्ज दिला. त्याच दिवशी एलिशा ग्रे यांच्यासाठी काम करणाऱ्या एका वकिलानेही अशाच संशोधनासाठी अर्ज सादर केला.

बेल यांनी वडिलांना लिहिलेल्या पत्रानुसार कोणीतरी आपल्या सारखाच शोध लावत असल्याचा अंदाज त्यांना आला होता. त्यामुळे त्यांनी लवकरात लवकर अर्ज केला होता. त्यामुळे काही तासांच्या फरकामुळे बेल यांना या शोधाचे क्रेडीट मिळू शकले.

मार्च १८७६ मध्ये बेल यांना टेलिफोनचे पेटंट मिळाले. त्यांनी सासरे गार्डीनर ग्रीन हबर्ड यांच्या मदतीने बेल टेलिफोन कंपनीची सुरुवात केली. त्यात गुंतवणूकदारांमध्ये बेल यांचे स्पर्धक एलिशा ग्रे यांचाही समावेश होता. त्यानंतर त्यांच्यामध्ये वादही झाला होता.

बेल यांनी फोटोफोनचा शोधही लावला. त्यात प्रकाशाला आवाजामध्ये परावर्तीत करण्यात येत होते. बेल यांच्यामते त्यांच्या महत्त्वाच्या शोधापैकी हा एक होता. त्यांना मिळालेल्या गिफ्टचा वापरही ते शोध लावण्यासाठी करायचे. आपल्या समस्या सोडवताना ते नवीन शोधाची निर्मिती करायचे.

स्वतःच्या नवजात बाळाच्या मृत्यूनंतर त्यांनी मेटल व्हॅक्क्यूम जॅकेट तयार केले. त्यामुळे श्वासोछ्च्वासाला मदत होत होती. याच कल्पनेतून पुढे पोलिओच्या रुग्णांच्या उपचारात कामी येणारे उपकरण तयार केले गेले होते.

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जेम्स गारफिल्ड यांच्यावर १८८१ मध्ये हल्ला झाला त्यावेळी ग्रॅहम बेल यांची मदत घेण्यात आली होती. शरिरात गोळी कुठे आहे हे शोधण्यासाठी त्यांनी इलेक्ट्रोमॅग्नेट मशिन वापरले होते. गारफिल्ड यांना वाचवण्यात यश आले नाही. मात्र याच मशीनमध्ये सुधारणा करून सध्याच्या मेटल डिटेक्टरचा शोध लावण्यात आला होता.

ग्रॅहम बेल यांनी १८९० मध्ये पंतंगांच्या मदतीने काही प्रयोग सुरू केले होते. त्यासाठी त्यांनी काही खास इमारती खरेदी केल्या होत्या. अनेक प्रयोग केल्यानतंर बऱ्याच संशोधनानंतर बेल यांनी टेट्राहेड्रोन तंत्रावर आधारित एक खास पतंगाचे डिझाइन तयार केले होते.

१९०७ मध्ये त्यांनी एरियल एक्सप्रिमेंट असोसीएशनची स्थापना केली.  त्यानंतर त्यांनी काही फ्लाइंग मशीन तयार करण्याचा प्रयत्न केला. त्यातील सर्वात यशस्नी ठरले ते सिल्व्हर डार्ट. हेच सिल्व्हर डार्ट पुढे कॅनडामध्ये पॉवर्ड फ्लाइटमध्ये वापरले गेले.

अश्या ह्या महान शास्त्रज्ञाला मानाचा मुजरा !!!

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version