१२ वर्षाच्या मुलाची किमया – आदिवासी पाड्यातील मुलां- मुलींचे जीवन पालटले
आमच्या इतर लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi
===
शिक्षण हे सर्वांसाठीच खूप महत्त्वाचे असते, कारण शिक्षणामुळेच माणसाला पुढे जाण्यासाठी प्रेरणा मिळते. शिक्षणामुळे आपण नवीन गोष्टी करण्यास शिकतो, त्याचबरोबर जीवनात यशस्वी होण्यासाठी शिक्षण आपल्याला नेहमीच सहकार्य करते. जर तुम्ही अशिक्षित राहिलात, तर कोणीही तुमचा गैरफायदा घेऊ शकतो. तरीही आज भारतामध्ये अशी कितीतरी ठिकाणे आहेत, जिथे मुलांना योग्य ते शिक्षण मिळत नाही. पण सरकार आपल्या परीने लहानातील लहान गावामध्ये शिक्षण व्यवस्था पोहचवण्याचा पूर्णपणे प्रयत्न करत आहे. आज आम्ही तुम्हाला एका अशा लहान मुलाची गोष्ट सांगणार आहोत, ज्याने स्वतःच्या जीवनातील अशिक्षितपणाचा अंधकार तर दूर केला, पण त्याचबरोबर इतर मुलांना देखील शिक्षण घेण्यासाठी प्रेरित केले. चला तर मग जाणून घेऊया या लहानग्या मुलाच्या जिद्दीची गोष्ट..
महात्मा गांधीनी सांगितले होते की, तुमचे एक छोटेसे पाऊल जग बदलू शकते. असेच काहीतरी एका १२ वर्षाच्या मुलाने केले आहे. त्याने २५ मुलांचे जीवन आपल्या प्रयत्नाने बदलून टाकले. या मुलाचे नाव शक्ती आहे, शक्ती हा तामिळनाडूच्या तिरुवान्नामलाई जिल्ह्यामध्ये नरीकुरीवर जातीमध्ये जन्माला होता. या जातीचे लोक खऱ्या जगापासून खूप लांब आहेत आणि आपल्या आजूबाजूच्या परिसरातच जगत आहेत, त्यांना तेवढेच जग माहीत आहे. शक्ती या मानसिकतेला तोडून शाळेत गेला आणि त्यानी स्वतः बरोबर इतर २५ मुलांना देखील शाळेत जाण्यासाठी तयार केले.
शक्तीच्या या कामासाठी त्याला ‘इंटरनेशनल पीस प्राइज़ फॉर चिल्ड्रन २०१७’ साठी नामांकन दिले गेले आहे, याआधी हा पुरस्कार बाल अधिकारासाठी काम करणाऱ्या आणि नोबेल पुरस्कार मिळालेला मलाला यूसिफज़ाई देखील जिंकली आहे.
शक्तीची शाळेत जाण्याची गोष्ट थोडी रंजक आहे. शक्ती ८ वर्षाचा असताना शिक्षकांच्या शिव्यांमुळे आणि मारामुळे त्याने सरकारी शाळा सोडली आणि तो आपल्या कुटुंबियांसोबत राहू लागला.
२०१४ मध्ये हँड – इन – हँड नावाची एक एनजीओ तामिळनाडूमध्ये आदिवासी समूहांसाठी काम करण्यासाठी आली होती, जिथे ते शक्तीच्या गावी पोचले. येथे त्यांनी मुलांना एका ट्रेनिंग सेशनमध्ये येण्यास सांगितले. या सेशनचा हेतू सर्व शिक्षा अभियानातून मुलांना शाळेत जाण्यासाठी प्रेरित करणे हा होता. हे जेवढे वाटले होते, तेवढे सोपे नव्हते. गावातील काहीच कुटुंबांनी काही अटींवर हे मान्य केले होते, त्यातील शक्ती एक होता.
याबद्दल शक्तीने सांगितले आहे की, ‘माझ्या व्यतिरिक्त गावातील इतर चार मुलांना देखील तिथे पाठवण्यात आले होते. सुरुवातीला मला जेव्हा तिथे पाठवण्यात आले, तेव्हा मी खूप रडलो होतो. मला समजत नव्हते की, माझ्या बरोबर ही जबरदस्ती का करण्यात येत आहे?’
शक्तीने अजून सांगितले की, ‘सुरुवातीला हे सेंटर आमच्या गावजवळ होते, पण त्यानंतर आम्हाला पौंगवणमच्या रेसिडेंशियल स्पेशल ट्रेनिंग सेंटर पाठवण्यात आले. येथे शिक्षक आम्हाला शिकवत असत आणि ते समजून घेण्यासाठी मदत करत असत. येथे आम्हाला स्वच्छ कपडे घालण्यासाठी देण्यात आले आणि वसतीगृहामध्ये जाऊन आम्ही त्याच गोष्टीची प्रॅक्टिस करत असू.’
दिवाळी आणि पोंगलच्या वेळी जेव्हा शक्ती आपल्या घरी येत असे, तेव्हा आजूबाजूचे लोक त्याला पाहून खूप प्रभावित होत असत. कितीतरी वेळा दुसऱ्या मुलांचे आई – वडील शक्तीच्या या बदललेल्या रूपाचे कारण त्याला विचारात असत, तेव्हा शक्ती त्यांना सांगत असे की, जर, आपण चांगले शिकलो, तर आपल्याला चांगली नोकरी मिळेल आणि त्यांना शेतामध्ये काम करण्याची गरज भासणार नाही. हळूहळू ह्या लोकांना शक्तीचे म्हणणे पटू लागले आणि आपल्या मुलांना शाळेत पाठवण्यासाठी ते तयार व्हायला लागले. मुलांव्यतिरिक्त मुली देखील आता या मोहिमेमध्ये सहभागी होऊ लागल्या आणि आज ह्या शाळेमध्ये जवळपास ७ मुली देखील आहेत.
हँड – इन – हँडच्या को-फाउंडर डॉ. कल्पना शंकर यांचे म्हणणे आहे की, ‘ हे काही सोपे काम नव्हते, कारण आम्ही स्वतः बघितले आहे की, या लोकांना समजावणे खूपच कठीण होते.’ शक्तीच्या या कामासाठी त्याला या पुरस्कारासाठी नामांकन मिळाले आहे, या पुरस्कारासाठी आलेल्या १६९ नावांमध्ये शक्ती हा वयाने सर्वात लहान आहे.
अशा या शक्तीने आपल्या प्रयत्नाने आपल्याबरोबर इतर मुलांना देखील शाळेत जाण्यासाठी तयार केले आणि शाळेमधून आपण कसे पुढे जाऊ शकतो, हे पटवून दिले. आज आपल्या भारताला शक्तीसारख्या अजून खूप मुलांची गरज आहे, जे आपल्याबरोबर दुसऱ्यांचेही भलं करतील.
—
लेख वाचण्यासाठी क्लिक करा:InMarathi.com. तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi