' लक्ष्मीपूजनाचं सांस्कृतिक महत्त्व सांगणारी ही कथा नक्की वाचा – InMarathi

लक्ष्मीपूजनाचं सांस्कृतिक महत्त्व सांगणारी ही कथा नक्की वाचा

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

लक्ष्मीपूजन हा दिवाळीचा तिसरा दिवस… वसुबारसपासून दिवाळीची लगबग सुरु होते, दुस-या दिवशी धनत्रयोदशीलाही घराघरात पुजेसाठी धांदल असते, मात्र दिवाळीची ती पहाट काही औरच!

पहाटे लवकर उठण्याची घाई, उटण्याचा सुगंध, सुवासिक तेलाचं मालिश, अभ्यंग स्नानाचा थाट पार पडल्यानंतर कुटुंबासह खमंग फराळाचा आस्वाद घेण्याचा आनंद प्रत्येकानेच अनुभवला असेल.

मात्र प्रत्येकाला उत्सुकता असते, ती सायंकाळी साज-या होणा-या लक्ष्मीपुजनाची…

पारंपरिक पोषाख परिधान करून कुटुंबियांसह मनोभावे केलेले लक्ष्मीपुजन, त्यानंतर रोषणाई पाहण्याची गंमत अनुभवल्याशिवाय दिवाळीचा उत्साह जाणवत नाही.

मात्र हे लक्ष्मीपुजन आपण नेमके का करतो? त्याचं पौराणिक आणि सांस्कृतिक महत्व काय? यांचा कधी विचार केला आहे का?

आज याच विषयाची माहिती आम्ही देणार आहोत.

अश्विन अमावास्येला लक्ष्मीपूजन केले जाते. या दिवशी स्वच्छता करण्यासाठी लागणारी नवी केरसुणी विकत घेतात. तिलाच लक्ष्मी मानून तिच्यावर पाणी घालून हळद-कुंकू वाहून घरात वापरण्यास सुरुवात करतात.

 

lakshmi-puja-inmarathi

 

लक्ष्मीपूजनाच्या दिवशी श्रीविष्णूने लक्ष्मीसह सर्व देवांना बळीच्या कारागृहातून मुक्त केले अशी कथा आहे. प्रातःकाळी मंगलस्नान करून देवपूजा, दुपारी पार्वणश्राद्ध अन् ब्राह्मणभोजन आणि संध्याकाळी लतापल्लवींनी सुशोभित केलेल्या मंडपात लक्ष्मी, श्रीविष्णु इत्यादी देवता आणि कुबेर यांची पूजा, असा लक्ष्मीपूजन या दिवसाचा विधी असतो.

श्री लक्ष्मीपूजनाच्या वेळी अक्षतांनी बनवलेले अष्टदल कमल किंवा स्वस्तिक यांवरच श्री लक्ष्मीची स्थापना केली जाते. त्यानंतर लक्ष्मी व इतर देवतांना लवंग, वेलची आणि साखर घालून तयार केलेल्या गायीच्या दुधाच्या खव्याचा नैवेद्य दाखवतात. धने, गूळ, साळीच्या लाह्या, बत्तासे इत्यादी पदार्थ लक्ष्मीला वाहून नंतर ते आप्तेष्टांना वाटतात.

 

lakshmi-puja01-marathipizza

 

आश्विन अमावास्येच्या रात्री लक्ष्मी सर्वत्र संचार करते आणि आपल्या निवासासाठी योग्य असे स्थान शोधू लागते. जेथे चारित्र्यवान, कर्तव्यदक्ष, संयमी, धर्मानिष्ठ, देवभक्त आणि क्षमाशील पुरुष आणि गुणवती आणि पतीव्रता स्त्रिया असतात, त्या घरी वास्तव्य करणे लक्ष्मीला आवडते.

 

lakshmipujan-marathipizza

आश्विन अमावास्येला सूक्ष्म स्वरूपात गतीमान होणारी त्रासदायक स्पंदने जागृत होतात आणि पुन्हा पूर्ण वायूमंडलात गतीमान होण्यास सुरुवात होते.

केर काढल्यामुळे घरात शिरलेले त्रासदायक घटक आणि वायूमंडलात गतीमान असणारी त्रासदायक स्पंदने घराच्या बाहेर फेकले जातात. त्यामुळे घराचे पावित्र्यही टिकून रहाते. म्हणून, अश्विन अमावास्येच्या रात्री अलक्ष्मी निःसारण, म्हणजेच रात्री १२ वाजता घरात केर काढतात.

 

goddess Lakshmi-inmarathi

 

या दिवशी संध्याकाळी लक्ष्मीचे पूजन केले जाते. लक्ष्मी ही फार चंचल असते असा समज आहे. त्यामुळे, हिंदू शास्त्राप्रमाणे लक्ष्मीपूजन हे स्थिर लग्नावर करतात. त्याने लक्ष्मी स्थिर राहते असा समज आहे. अनेक घरांत श्रीसूक्तपठणही केले जाते.

व्यापारी लोकांचे हिशोबाचे नवीन वर्ष लक्ष्मीपूजनानंतर सुरू होते. या दिवशी सर्व अभ्यंगस्नान करतात. पाटावर रांगोळी काढून तांदुळ ठेवतात. त्यावर वाटी किंवा तबक ठेवतात. त्यात सोन्याचे दागिने, चांदीचा रुपया, दागिने ठेवून त्यांची पूजा करतात. हा दिवस व्यापारी लोक फार उत्साहात साजरा करतात.

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?