महासत्तांच्या संघर्षामुळे झालेल्या कोरियाच्या करुण वाताहतीचा इतिहास!
आमचे इतर आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi
===
१८५० नंतर पूर्व चीनी सागरात जपानचा वाढता प्रभाव जगाला स्पष्ट जाणवत होता. त्यातच १९०४-०५ च्या दरम्यान ‘पोर्ट आर्थर’वरुन वाढलेली रशिया-जपानची नाराजी थेट युद्धात परिवर्तीत झाली आणि चिमुकल्या जपानने प्रचंड शक्तीशाली, विस्तीर्ण आणि अहंकारी रशियाचा, आश्चर्यकारकरित्या पराभव केला. पुढे हा ‘पिवळा ताप’ इतका पसरला की १९१० मध्ये जपानने थेट कोरियावर ताबा मिळवला. १८५० पासून कोरियन शासकांना कटपुतळीप्रमाणे वापरणार्या जपानने, १९४५ पर्यंत कोरियाला आपली वसाहत बनवून ठेवली होती.
१९०५ च्या युद्धात जपानकडून झालेला पराभव रशियाला जिव्हारी लागला होता, ज्याचा वचपा काढण्यास रशिया आतुर होताच. द्वितीय महायुद्ध सुरू असताना ६ ऑगस्ट १९४५ ला अमेरिकेने, जपानच्या हिरोशिमावर अणुबॉम्ब टाकला. जपानचा पराभव निश्चित केलेल्या या घटनेनंतरही, जपानने अजून समर्पण केले नव्हते. अवघ्या जगाचे लक्ष युरोप आणि त्यातही विशेषतः जर्मनी जवळ एकवटले असल्याने, सोव्हिएट रशियासाठी एक आयतीच संधि चालून आली होती. या संधीचा फायदा घेण्याचे ठरवुन सोव्हिएत रशियाने, कोरियन पेनिन्सुला भागातील मंचुरियाच्या खालील भाग बळकावला. ९ ऑगस्ट ला हिरोशिमावर अणुबॉम्ब तर पडला पण त्याच्या आदल्या दिवशीच सोव्हिएत रशियाने जपानसोबत युद्ध जाहीर केले होते. नागासाकीवर झालेल्या हल्ल्यानंतर जपानने आत्मसमर्पण करताच, उत्तर कोरियातील जपानी फौजांनी देखील सोव्हिएत रशियासमोर आणि दक्षिण कोरियातील जपानी फौजांनी अमेरिकेपुढे शरणागती पत्करली.
शांतता प्रस्थापित झाल्यावर १९४८ ला संपूर्ण कोरियात निवडणूक घेणे अपेक्षित होते, ज्यामुळे २ वेगवेगळ्या फौजांच्या आधिपत्याखाली असलेला कोरिया एकसंध बनेल. घडले मात्र विपरीतच. अमेरिकेला संपूर्ण कोरिया ‘लोकशाहीवादी व भांडवलशाही देश’ म्हणुन तर रशियाला संपूर्ण कोरिया, ‘कम्युनिस्ट’ म्हणून बघायचा होता. अशातच जपानी समर्पणाच्या केवळ ५ दिवस आधी, अमेरिकन अधिकारी ‘डीन रस्क’ व ‘चार्ल्स बोनस्टील’, यांवर विभाजनाची जबाबदारी सोपवण्यात आली. ‘सेऊल” हे सर्वात महत्वाचे शहर अमेरिकेच्या ताब्यात असणार्या कोरियातील दक्षिण भागात राहील, एवढीच मुख्य कामगिरी त्यांना पार पाडावयाची होती. त्यामुळे बारकाईने अभ्यास न करता, कोरियन लोकांचे मत विचारात न घेता त्यांनी घाईघाईने “38 वी समांतर रेषा” ओढली. जसे घाईने आणि चुकीच्या पद्धतीने झालेल्या भारत-पाकिस्तानच्या फाळणीने लाखो लोकांचे प्राण गेले व दोन्ही नवनिर्मित राष्ट्रांत कायमचा तणाव निर्माण झाला, जो उत्तरोत्तर वाढतच गेला; हाच प्रकार उत्तर व दक्षिण कोरियाबाबतही घडला.
१९४८ ला दक्षिण कोरियाने स्वत:स स्वतंत्र राष्ट्र म्हणून घोषित केले व नवनिर्वाचित कम्युनिस्ट विरोधी नेते ‘सिंगमान र्ही’ हे पहिल्या राष्ट्रपतीच्या रूपाने, अमेरिकेच्या हातातील बाहुले बनून गादीवर बसले. लागलीच 1949 ला यू.एस.एस.आर. ने लष्करी अधिकारी ‘किम इल संग’ ला सर्वोच्च नेता घोषित केले. त्याने आजही दिसणार्या कम्युनिस्ट परंपरे नुसार दिन-दुबळ्याचे नाव घेऊन, मुखवट्यासारखा धारण केलेला ‘कम्युनिजम’ व ‘हुकुमशाही’ चे मिश्रण करत स्वत:ला महान नेता म्हणून दाखवण्यास सुरवात केली. त्यासाठी स्वत:च्या मुर्त्या, पुतळे, मोठाले चित्र बनवले. उत्तरे प्रमाणेच दक्षिण कोरियासुद्धा कम्युनिस्ट करण्याच्या उद्देशाने, या हुकुमशहाने दक्षिण कोरियावर हल्ला केला: ज्याचा निर्णय काहीच लागला नाही. पुढे ‘किम इल संग’चा मुलगा ‘किम जोंग इल’ हा सत्ताधीश बनला, ज्याच्या मृत्युनंतर त्याचा लहान मुलगा आणि सध्याचा सनकी तांनाशाह ‘किम जोंग ऊन’ सार्वभौम झाला. ‘किम इल संग’ चा फोटो आजही उत्तर कोरियन नोटेवर आहे, ज्यावरून त्यांची आजची परिस्थिति अशी का आहे; याचा अंदाज लावला जाऊ शकतो.
सोव्हिएत रशियाच्या विघटनानंतर जरी शीतयुद्ध संपले तरीही ‘अमेरिका’जगातील एकध्रुवीय सत्ता बनली होती, जिच्या पाठिंब्याने दक्षिण कोरियाचा विकास वेगाने होत होता. दुसर्या बाजूला उत्तर कोरियाला पाठींबा असणार्या सोव्हिएत रशियाचेच १५ देशांत तुकडे पडल्याने, नवीन रशिया प्रचंड कमजोर ठरत होता. यामुळे साहजिकच उत्तर कोरियाला मिळणारा पाठींबा कमी झाला व असुरक्षिततेपोटी त्यांनी सर्वाधिक खर्च लष्करावर सुरू केला, जो आजच्या घडीला राष्ट्रीय उत्पन्नाच्या २५% आहे. प्रकरणातील सर्वोच्च बिंदू म्हणजे उत्तरेने केलेल्या अणुचाचण्या, ज्यातील सहावी नुकतीच ३ सप्टेंबर २०१७ ला पार पडली. या बॉम्बची क्षमता जपानच्या नागासाकीवर टाकण्यात आलेल्या बॉम्बच्या चार ते पाच पट असून, यानंतर जगाने उत्तर कोरियावरील निर्बंध अधिकच कडक केलेले आहे.
उत्तर कोरिया :
सर्वबाजुने बंदिस्त, लोकांना आत-बाहेर करणे कठीण, बाहेरील पत्रकार नाही, कुठलेच स्वातंत्र्य नाही; तरीही अतिशय गरीब असलले, हलाखीचे आयूष्य जगत असलेली जनता न्यूक्लियर बाँब व इतर मोठ्या हत्यारांना गर्व म्हणून बाळगते व इतर सर्व गोष्टींकडे दुर्लक्ष करते; ज्याने जनता उठाव करण्याची शक्यताही कमी होते.
दक्षिण कोरिया :
विकासाला प्राधान्य व अमेरिकेचे पाठबळ यामुळे विकसीत देशात मोडतो. पण तिथेही एक विचित्र प्रश्न भेडसावत आहे, तो म्हणजे जगात सगळ्यात जास्त होणार्या तरुणांच्या आत्महत्या. भांडवलशाही अर्थव्यवस्थेमुळे सतत पैसा, यश मिळवण्याची जी जीवघेणी स्पर्धा लागली आहे त्यास कंटाळून ,पराभवाने हताश होऊन ३० वर्षांखालील युवक मोठ्या प्रमाणावर आत्महत्या करतात. हा एक मुद्दा सोडल्यास उत्तर कोरिया आणि दक्षिण कोरिया यांत कुठेच तुलनाही करणे शक्य नाही.
सोव्हिएत रशियाची जागा घेण्यास उत्सुक असणार्या चीनने, उत्तर कोरियाला न्यूक्लियर टेक्नॉलॉजी, मिसाईल टेक्नॉलॉजी देऊन सशक्त बनवण्याचा प्रयत्न केला तर गत काही वर्षांपासून सुरू असलेल्या अमेरिका-चीन सत्ता संघर्षाच्या स्पर्धेचा फायदा उचलून स्वत:स आर्थिक नव्हे तर निदान लष्करीदृष्ट्या तरी समृद्ध करून घ्यावे,हे उत्तर कोरियाचे प्रयत्न.
सद्य स्थितीत अमेरिकन राष्ट्रपती ‘डॉनल्ड ट्रंप’ व उत्तर कोरियाचा हुकूमशाह ‘किम जोंग ऊन ‘यांच्यात सहाव्या न्यूक्लियर टेस्टने प्रचंड तणाव वाढवला असून, शाब्दिक युद्ध तर केव्हाच मर्यादा सोडून पुढे गेले आहे. दोन्ही देश एकमेकांना संपवण्याच्या धमक्या देत असताना जग मात्र ज्याकारणाने सुन्न पडले आहे ते म्हणजे दोन्ही देशांकडे असणारी अण्वस्त्रे व आक्रमकवृत्ती.
जरी अमेरिका व उत्तर कोरिया यांच्यात कुठेच तुलना होऊ शकत नसली तरीही सनकी प्रवृत्तीचा हुकूमशहा व त्याकडे असणारी अतिप्रगत शस्त्रास्त्रे यामुळे,जगातील शांतता मात्र नक्कीच धोक्यात आली आहे.
आजच्या परिस्थितीत असे दिसते की,
जर अमेरिका, जपान व दक्षिण कोरिया ने उत्तर कोरियवर हला केला तर चीन व रशिया हे उत्तर कोरिया च्या मदतीसाठी युद्धात उतरतील: मात्र उत्तर कोरियाने लढाईची सुरवात केल्यास चीन व रशिया हे लढाईत सहभागी होण्याची शक्यता कमीच दिसतेय.
मुळात चीनची इच्छा ही उत्तर कोरियाला, अतिउष्ण किंवा अतिथंड न ठेवता गरम\कोमट ठेवण्याचीच दिसत आहे. चीनतर्फे उत्साही उत्तर कोरियाचा वापर जपान, अमेरिका व दक्षिण कोरिया यांना गुंतवून ठेवण्यासाठी अगदी तसाच होत आहे, जसा भारताला गुंतून ठेवण्यासाठी चीनकडून पाकिस्तानचा वापर सुरू आहे. अंततः अमेरीका व रशिया यांनी आपल्या शक्तिच्या वापरातून एकच गोष्ट अधोरेखित केली – power corrupts and absolute power corrupts absolutely!
—
लेख वाचण्यासाठी क्लिक करा:InMarathi.com. तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi