Site icon InMarathi

चंद्रावर व्यवसाय करू बघणारा माणूस सांगतोय, या बिझिनेसच्या खास गोष्टी!

business-on-moon-inmarathi

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

अपयशी होणं म्हणजे शेवट नव्हे. आज हार पत्करावी लागल्यामुळे तुमच्या लक्षात येईल की पुढचा मार्ग कसा उभारावा आणि कंपनी कशी वाढवावी. जर तुम्ही इतिहास पहिला तर तुमच्या लक्षात येईल की प्रत्येक यशस्वी कंपनीला अतिशय प्रतिकूल परिस्थितीचा सामना करावा लागतो.

हे बोलताहेत नवीन चंद्र जैन.

उत्तर प्रदेशामधील शामली जिल्ह्यामध्ये जन्माला आलेला मुलगा आता चंद्राला गवसणी घालण्यासाठी सज्ज झाला आहे. नवीन चंद्र जैन हे सहसंस्थापक असलेली “मून एक्सप्रेस” कंपनी चंद्रावर आपलं रोबोट यान उतरवणार आहे…!

असं झालं तर, खाजगी कंपनीने चंद्रावर ‘पाय’ ठेवण्याची ही पहिलीच वेळ ठरेल!

अमेरिकन सरकारने यासाठी कंपनीला लायसन्स देखील जारी करून दिलं आहे. अर्थात, २०१८मध्ये मात्र ही मोहीम यशस्वी करणं ‘मून एक्सप्रेस’ला शक्य झालेलं नाही. २०२० पर्यंत चंद्रावर स्वारी करण्याचं स्वप्न भंगलं असलं, तरीही त्यांनी हार मानलेली नाही.

 

 

चंद्रावर व्यवसाय करण्याची इच्छा अजूनही कायम आहे. त्यांच्या या कामगिरीबद्दल त्यांना विचारण्यात आलं होतं, तेव्हा त्यांनी हा कंपनीसाठी मैलाचा दगड ठरणार आहे असं सांगितलं.

त्यांच्या या मुलाखती दरम्यान त्यांना एक प्रश्न विचारण्यात आला:

“तुमच्या मते सर्वात यशस्वी उद्योजक कोण आहे?”

त्यांनी दिलेले उत्तर एकदम वेगळ्या धाटणीचं होते.

ईलॉन मस्क, रिचर्ड ब्रॅनसन, बिल गेट्स आणि मार्क झुकर्बर्ग ही सर्व अशी व्यक्तिमत्वं आहेत जी भविष्याची निर्मिती करत आहेत. त्यांच्यासारखे यशस्वी होण्याकरिता उद्योजकाला “परमेश्वर गंड” हवा. म्हणजेच परमेश्वरापेक्षा स्वत:वर विश्वास ठेवा. यशस्वी उद्योजक कधीच देवाचा धावा करीत नाही. त्यांना असं कधीच वाटत नाही की ‘आपण अपयशी झालो आहोत’, ते कधीही हार पत्करत नाही.

अश्या आत्मविश्वासी, धाडसी नवीन जैनजींच्या चंद्र-मोहिमेबद्दल थोडंसं जणू घेऊ या:

 

 

मून एक्स्प्रेस.  २०१० साली, Bob Richards (अंतराळ उद्योजक) आणि Barney Pell (पूर्वाश्रमीचे NASA चे शास्त्रज्ञ!) ह्यांच्यासोबत स्थापन केलेली कंपनी.

ह्याच कंपनीतर्फे त्यांनी चंद्रावर बिझनेस सुरू करण्याची मोहीम आखली आहे.

मोहिमेचा खर्च : अंदाजे ५० मिलियन – म्हणजे ५ कोटी डॉलर्स.

म्हणजे, साधारण ३३५ कोटी रुपये.

कशाला करायचा एवढा खर्च?

ह्याचं उत्तर मोठं रोचक आहे.

नवीन म्हणतात :

आम्ही चंद्रावर जातो आहोत कारण तिथून भरपूर नफा मिळणार आहे…!

चंद्रावर सोनं, platinum च्या खाणी सुरू होऊ शकतात.

चंद्रावर हेलिअम-३ आहे, जो ऊर्जेचा स्वच्छ स्त्रोत आहे.

चंद्रावर पाणी आहे…जे अंतराळ सफरींसाठी अत्यंत आवश्यक असतं. आपण अंतराळयान, रॉकेट्स इ साठी इंधनचा साठा म्हणून चंद्राच्या किंवा चंद्राजवळ पृथ्वीच्या कक्षेचा (orbit चा) वापर करू शकतो. (ज्यामुळे इंधन, पैसा, वेळ ह्या सगळ्याचीच प्रचंड बचत होईल.

हे झालं बिझनेस लॉजिक – पण ह्या मागे एक मोठं आंतरराष्ट्रीय गणित आहे.

चंद्रावरील साधन-संपत्तीवर खाजगी हक्क दाखवता येऊ शकतो का?

उत्तर आहे – होय!

१९६७ च्या आंतरराष्ट्रीय करारानुसार, चंद्रावर कुठल्याही देशाचा हक्क नाहीये. पण – अमेरिकेने बनवलेल्या एका कायद्यानुसार, तुम्हाला चंद्रावर जे काही सापडेल – ते तुमचं असेल…!

ह्याचा आधार घेत नवीन म्हणतात –

चंद्र हा पृथ्वीचा आठवा खंड किंवा आंतरराष्ट्रीय सागरी क्षेत्र असणार आहे. जिथे खाजगी उद्योजक तेल शोधतील किंवा मासेमारी करतील.

ह्या व्हिडिओमधे ह्या प्रोजेक्टची भव्यता कळते:

 

 

या सगळ्याच गोष्टींचा वेगळ्या पद्धतीने विचार करायचा झाल्यास, काही गोष्टी लक्षात घ्यायला हव्या. मुळात ‘चांद-तारे तोड लाऊंगा’ वगैरे फिल्मी संवाद, ही झाली या सगळ्याची एक बाजू.

पण, चंद्राशी निगडित संशोधन आजही सुरू आहेच. भारताने सुद्धा चांद्रयानच्या माध्यमातून चंद्रावर स्वारी करण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र एखादे अपयश म्हणजे सारं काही संपलं असं नसतंच. दुसऱ्या मोहिमेची तयारी जोरात सुरु आहे.

नुकतीच चीनने सुद्धा त्यांची चंद्रमोहीम यशस्वी करून दाखवली आहे. त्यांचं चांद्रयान, तेथील जमिनीवर उतरून नवे संशोधन करत आहे. या यानाने काढलेले फोटो सुद्धा आता प्रसिद्ध झाले आहेत.

 

 

थोडक्यात काय, तर चंद्राविषयी अधिकाधिक माहिती मिळवणं आणि नवीन चंद्र जैन यांच्यासारख्या उद्योजकांची स्वप्नं पुरी करणं, यासाठी प्रत्येक देश झटत आहे, असं म्हणायला वाव आहे.

अर्थात चंद्रावर व्यवसाय थाटण्याचं स्वप्नं, पूर्ण होईल तेव्हा होईल, पण चंद्राविषयीचं गूढ उकलण्याची सगळ्याच देशांची धडपड वाखाणण्याजोगी आहे. भारताला सुद्धा चांद्रयान – २ मध्ये मोठे यश मिळावे, अशी अपेक्षा नक्कीच करूयात!

 

 

नवीन चंद्र जैन यांच्यासारखे खाजगी व्यावसायिक सुद्धा, अशा चंद्रमोहिमा यशस्वी करू शकतील, आणि अवकाश संशोधनात नवं पर्व सुरु होईल, अशी अपेक्षा करायलाही हरकत नाही.

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version