नाही ! स्त्री पुरूष समान नाहीतच !
आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page
===
राहुल गांधींनी “राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शाखेत शॉर्ट्स घातलेल्या स्त्रिया कधी दिसत नाहीत” असं म्हणून नवं वादळ निर्माण केलंय. “संघ आणि महिला” हा विषय चांगलाच चर्चेत आला आहे. परंतु सगळा मुद्दा समतेचा चाललेला आहे. मुख्य प्रश्न हा की स्त्री आणि पुरुष समान आहेत का?
संघ स्त्री पुरुष समता मानतो किंवा मानत नाही याने काहीही फरक पडत नाही. संघ ही काही संविधानिक संस्था नाही. कोणतीही स्वायत्त संस्था स्त्री पुरुष समता मानते किंवा नाही यावरून आपण अकांडतांडव करण्याचे कारण नाही. आपली बांधिलकी समाजाशी आहे की संघाशी? जर संघ प्रतिगामी असेल तर तो कालबाह्य होऊन जाईल. संघात स्त्री पुरुष समान आहेत की नाही या चर्चेचा विषय ‘पॉलिटिकल’ झाला आहे. आपण तो सोडून देऊ.
माझा मुद्दा आहे –
मुळात स्त्री पुरुष समान नाहीतच!
सगळ्यात बेसिक हे मान्य करायला पाहिजे की निसर्गाने स्त्रियांना पुरुषांपेक्षा वेगळे अधिक महत्वाचे अधिकार दिलेले आहेत. पुरुषांना मुल होऊ देण्याचा अधिकार निसर्गाने दिला आहे का? नाही दिलेला. याचा अर्थ पुरुष वेगळा स्त्री वेगळी. समान अधिकाराच्या चर्चाच होऊ शकत नाहीत.
स्त्री शरीरावर महिन्याचे किमान ३-४ दिवस अपरिहार्य अशी बंधनं येतात. पुरुषाला अशी कोणतीही बंधनं नाहीत. स्त्री ही जास्त भावनिक आहे, पुरुष जास्त व्यवहारी आहे. ‘स्त्री’ हे सहज दुखावणारं आहे. जास्त भावनिक असल्यामुळे स्त्री ही पुरुषापेक्षा जास्त व्हल्नरेबल ठरते. कोणत्याही ‘स्त्री’ला एका बलात्काराच्या भीतीने नमवता येतं. यातलं कशाचाही मी समर्थन करत नाही, पण ह्या facts आपण नाकारून कशा चालतील? सावरकर, रधों. कर्वे, धोंडो केशव कर्वे, महात्मा गांधी यांनी कोणीही स्त्री आणि पुरुष समान आहेत, असं मत मांडलेलं नाही. स्त्री आणि पुरुष मुळात वेगळेच आहेत.
या कारणासाठी स्त्री आणि पुरुषाला एकाच प्रकारचे शिक्षण देऊन चालणार नाही. आता चूल आणि मुल या शब्दाला खूप संकुचित अर्थ प्राप्त झाला आहे. पण वर नावं घेतलेल्या सर्व समाजसुधारकांनी स्त्रीचे मुख्य आणि राष्ट्रीय कर्तव्य हे चूल आणि मुल हेच सांगितले आहे.
“स्त्रीने आधी हे कार्य आधी करावे, देशासाठी उत्तम संतती निर्माण करावी. त्यातून जर शक्ती शिल्लक राहिली तर इतर विद्या शिकाव्यात.”
महर्षी कर्वे यांनी स्त्री शिक्षण संस्था सुरु केली तेव्हा कोणता अभ्यास क्रम ठेवला होता याचा आपण कधी विचार केला का? या कशातही स्त्री जातीचा अपमान असण्याची गरज नाही. अस्तित्वाचा सन्मान केला की विषय संपला पाहिजे. कुसुमाग्रज म्हणतात तसं ‘दासी म्हणुनी पिटू नका, वा देवी म्हणुनी भजू नका‘.
हा सगळा परंपरावादी विचार झाला. यात व्यक्तीच्या आधी राष्ट्राचा विचार केला गेलेला आहे. म्हणून हा टिपिकल हिंदू विचार आहे. ज्यात व्यक्तीच्या सार्वभौमत्वाचा विचार केला गेलेलाच नाही.
त्यामुळे आता ‘व्यक्ती’ ही एन्टीटी समोर ठेऊन विचार करा ना.
स्त्री आणि पुरुष समान आहेत का? तर नाहीत! ते समान नाही. त्या दोन भिन्न प्रवृत्तीच्या संस्था आहेत.
तिला निर्णयाचा अधिकार द्या. बाकी कोणतेही समतेचे अधिकार देऊन तिचे प्रश्न सुटणारे नाहीत. सगळे निर्णय घेण्याचे अधिकार तिला पाहिजे. म्हणजे पुन्हा “फक्त तिला” नाही. पुरुषाप्रमाणे सर्व निर्णय घेण्यामध्ये तिच्या निर्णयाचा गांभीर्याने विचार केला गेला पाहिजे. वेश्येला ग्राहक नाकारण्याचा इथपासून रोजच्या जेवण्यातली भाजी कोणती घ्यावी इथपर्यंत!
‘तिचा निर्णय घेण्याचा अधिकार’ पुरुषांनी ग्रेसफुली मान्य केला तर तिला वेगळ्या कोणत्याही समतेच्या अधिकाराची गरज पडणार नाही, असा माझा अनुभव आहे.
सिमॉन सांगते ते ऐकलंय का? ‘स्त्री ही घडवली जाते, ती जन्माला येत नाही’. स्त्रीला “स्त्री” म्हणून नं वागवता “माणूस” म्हणून वागवले पाहिजे, हे कितीही वापरून बोथट झालेलं वाक्य असलं तरीही तेच एकमेव सत्य आहे. तिला स्त्री म्हणून वागवता कामा नये.
‘संघ समता मानतो कि नाही’ ही चर्चा महत्वाची नसून, एकूण समाजात तिच्या निर्णय घेण्याच्या अधिकाराला पुरुषांचे समर्थन आहे का हा आहे.
मी काही कोणत्याही मुलीला समान वागणूक देत नाही. याचा अर्थ तिला कमीपणाची वागणूक देतो असा घेऊ नका. पण समान वागणूक मी देत नसलो तिला सुद्धा इतर कोणाही प्रमाणे आदरानेच वागवतो.
“आदराने वागणे” आणि “समान वागणे” – एकच नव्हे.
===
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page । Copyright (c) 2017 InMarathi.com | All rights reserved.