' दिवाळीत फटाके उडवावेत की नकोत ह्यावर वाद घालताय? आधी हे वाचून बघा! – InMarathi

दिवाळीत फटाके उडवावेत की नकोत ह्यावर वाद घालताय? आधी हे वाचून बघा!

आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/MarathiPizza

===

दरवर्षी दिवाळी आली की, फटाक्यांचा विषय पेटून उठतो. दरवर्षी चर्चा झडतात. पर्यावरणवादी विरुद्ध (तथाकथित) हिंदू धर्मप्रेमी असं युद्ध पेटतं.

ह्या विषयावर दोन छोट्याश्या फेसबुक पोस्ट्स वाचकांसाठी प्रसिद्ध करत आहोत.

===

 

सौरभ गणपत्ये –

====

कट्टर हिंदू असणं हा तुमचा हक्क मी मान्य केला तर माझा शांततामय हिंदू असण्याचा हक्क तुम्हाला मान्य आहे काय? माझ्या बिल्डिंगच्या आवारात दाणदाण फटाके वाजले तर माझ्या किंवा अनेक घरांमधल्या लहान बाळांना किंवा म्हाताऱ्या कोताऱ्या माणसांना आणि त्याचबरोबर कुत्र्या मांजरांनाही आवाजाचा तसंच श्वसनाचा त्रास होतो, संपूर्ण विभागात कचरा साचतो, हवा प्रदूषित होते. मग या कारणांसाठी मी फटाक्यांना विरोध केला तर मी हिंदू राहत नाही का?

diwali02-marathipizza
indiandefence.com

प्राचीन हिंदु धर्मात कोठेही फटाक्यांचा उल्लेख नाही. पोर्तुगीजांनी व इंग्रजांनी फटाके भारतात आणले. आपल्या संस्कृतीशी त्याचा काहीही संबंध नाही. फटाके उडवण्याचा व न उडवण्याचा धर्माशी शून्य संबंध आहे. फटाक्यांसारख्या माजोरड्या गोष्टींचा संबंध धर्माशी लावला तर पोर्तुगीजांनीचं हिंदू धर्माला नवी झळाळी दिली असं म्हणायचंय काय?

आणि हो, ते पाश्चात्य देशात फटाके लावून ख्रिसमस साजरा करतात म्हणून सांगू नका. त्यांच्या देशात असलेली स्वच्छता, आरोग्याबद्दलची आस्था, हवेच्या प्रदूषणाबद्दलची काळजी यात ते लोक आपल्यापेक्षा शेकडो मैल पुढे आहेत. आपल्या या प्राचीन परंपरा असलेल्या वैभवशाली देशात लोकांना उघड्यावर हागायला बसू नका हेही ओरडून सांगावं लागतं, कचरा कुठेही फेकू नका अशी विनंती करावी लागते आणि अमेरिका धरून पाश्चात्य देशांची लोकसंख्या मोजली तर आपले केवळ यूपी, बिहार, महाराष्ट्र आणि बंगाल भरतात.

सतत तुलना होते म्हणून…

eid-marathipizza.
alarabiya.net

एक बोकड जास्तीत जास्त एक लाखाला धरला तरीपण एक कोटी रुपयांच्या बोकडांची हत्या जास्त प्रदुषणकारी की एक कोटी रुपयांचे फटाके?? बरं बोकड तर सगळेच खातात. फटाक्यांचं काय? पाचशे हजार रुपयांचे फटाके आणून त्याची वात पेटवून भूमsssकन त्याचा नाश होताना बघणं ही कसली मानसिकता?

सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाला माझा तरी पूर्ण पाठींबा आणि भाजप सत्तेत असताना हा निर्णय येतो या गोष्टीचा मला एक सेक्युलर म्हणून अभिमान वाटतो.

डंके की चोट पर…

(ताजा कलम, तू हिंदू आहेस म्हणूनच हे बोलतोयस हाच हिंदू धर्माचा फायदा आहे, इतर धर्मांबद्दल असं बोलशील काय वगैरे मला कोणी शिकवू नये. इतर धर्म म्हणजे इस्लाम धर्म. हिंदू जर कट्टरतेत मुसलमानांच्या पातळीवर उतरणार असतील तर हिंदू धर्माची उतरती कळा सुरु झालीये हे मानून चाला. साला पुढे जायचं की मागे?)

Diwali-faraal-marathipizza
whatshelikes.in

अरे पहाटे मस्त लवकर उठा, झकास कंदील लावा, भरपूर कपडे आणा, दणकून फराळ खा, सुंदर दागिने घाला, औक्षण करा. करण्यासारख्या किती गोष्टी आहेत…

———-

आदित्य कोरडे

व्यक्तीशः मी फटाके उडवत नव्हतो आणि आजही उडवत नाही. गेली काही वर्षे मुलगी लहान असल्याने ती हट्ट करते म्हणून जुजबी प्रमाणात फटके आणले जातात. हल्ली म्हणे सर्वोच्च न्यायालयाने आणि सरकारने (पुण्याच्या नाही दिल्लीच्या) फटक्याच्या विक्रीवरच बंदी घातली आहे. मी फटाक्याच्या विक्री मनाई हुकुमाच्या विरुद्ध आहे. समाज मन हे लहान मुलासारखे असते. एखादी गोष्ट करू नको म्हणाले की, आवर्जून करते. विवेकी, सज्जन, सुशिक्षित वाटणारे (म्हणजे ते तसे नाहीत असे नाही…पण) अनेकजण ह्याचा आताच विरोध करू लागले आहेत. बंदी दिल्लीत असूनही ते केवळ विरोधासाठी म्हणून आपल्या ठिकाणी ह्यावर्षी फटाके उडवतीलही कदाचित… काय उपयोग? (ह्यांच्या शहाणपणाचा आणि न्यायालयाच्या असल्या निर्बुद्ध निर्णयांचाही…)

Diwali-faraal03-marathipizza
youtube.com

अगदी नाव घेऊन सांगतो, जयंत कुलकर्णी, राहुल जोशी, विजय कर्वे, प्रसाद देशपांडे असे अनेक माझे मित्र दिवाळी आणि गणपतीला प्रदूषणापासून दूर जायचे म्हणून पुणे सोडतात. हे सगळे हिंदूच आहेत आणि हिंदू धर्माचे अभिमानीही, पण बहुधा प्रदूषणाला ते कळत नसावे किंवा प्रदूषण फक्त हिंदुना त्रास देत असावे. (उगाच बहुसंख्य हिंदू असलेल्या देशात बहुसंख्याना त्रास म्हणजे आपोआप हिंदुना त्रास असे काही म्हणू नका हा…)

diwali01-marathipizza
thesun.co.uk

मागील वर्षी दिवाळी नाही पण संक्रांतीला, ते नवीन काय तरी कंदील सोडतात हवेत, ते अनेक जण सोडत होते. त्यातला एक खाली येऊन आमच्या बागेतल्या ३२ वर्षे जुन्या नारळाच्या झाडावर (जवळपास ३०-३५ फूट उंच आहे ते झाड) अडकला आणि ते झाड वरून पेटले. आगीचा बंब येई पर्यंत अर्धातास गेला. आमच्या आणि समोरच्या सोसायटीच्या लोकांनी मिळून खूप प्रयत्न केले पण आमचे घरगुती पंप इतक्या उंच पाणी फेकू शकत नव्हते. नंतर बंब आला त्यांनी आग विझवली. पण उशीर झाला होता. नारळाचे ३०-३५ फुट उंच झाड पेटून वरून जळते फाटे खाली पडतात तेव्हा छातीत कशी धडकी भरते हे स्वत: अनुभवल्याशिवाय नाही कळणार.

असे म्हणतात, शहरी भागात माणशी ६ झाडे (वृक्ष, कुंडीतली रोपटी नाही) लागतात, आपण निरनिराळ्या कारणाने संपवलेला ऑक्सिजन भरून काढायला. माणसाच्या मूर्खपणाने ३५ वर्षे जुने झाड जाळून खाक होते, हे नुकसान कसे मोजणार? ह्यावर्षी आमच्याकडे एक झाड कमी असेल दिवाळीत आम्हीच जाळलेला ऑक्सिजन भरून काढायला. नवीन झाड लावले आहे पण ते पुरेसे मोठे व्हायला ५-६ वर्षे तरी जातील. शिवाय आता दिवाळीत दहशत आहेच, बाकीची जुनी झाडे पेटतात की काय ह्याची. म्हणून स्वत:वर तरी अजिबात फटाके न उडवण्याचे बंधन घालून घेतले आहे. मुलीला समजावले आणि तिला ते समजले– लहान आहे न ती बुद्धिमान, सुशिक्षित, समंजस नागरिक वगैरे व्हायचय तिला अजून वेळ आहे.

 

 

InMarathi.com वर विविध लेखकांनी व्यक्त केलेले विचार ही त्यांची वैयक्तिक मतं असतात. InMarathi.com त्या मतांशी सहमत असेलच असे नाही. | आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page । Copyright (c) 2017 InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?