Site icon InMarathi

हीच वाईट सवय मराठी माणसाला श्रीमंत होण्यापासून थांबवते!

me shivaji raje bhosle boltoy shopping scene marathipizza

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

===

लेखक – ओंकार दाभाडकर

“गुज्जू लोक” कसे बिझनेस माइंडेड असतात, ह्यावर आपण नेहेमी चर्चा करतो. त्यात असूया, आकर्षण, कौतुक ह्या सर्व भावनांचं मिश्रण असतं. परंतु त्या चर्चा चर्चाच रहातात. आपण त्यांतून शिकत नाही, आपण श्रीमंत होण्यासाठी त्यांचे फॉर्म्युले वापरत नाही.

मराठी माणूस प्रचंड श्रीमंत होऊ न शकण्यामागे अनेक कारणं असतील. त्यांतील प्रमुख कारण म्हणजे “स्वतःचं घर घेण्याचा अट्टाहास”.

गुज्जू लोक मोठ्या अभिमानाने सांगतात की “आम्ही असं घर बिर घेण्याच्या फंदात पडत नाही, भाड्याच्याच घरात रहातो” असं का करत असावे ते लोक?

त्या मागे एक मोठं आर्थिक तत्व आहे.

श्रीमंत होण्याचे २ मार्ग असतात. खर्च कमी करणे आणि उत्पन्न वाढवत नेणे. हे दोन्हीही मार्ग म्युच्युअली एक्सक्लुजीव ठेवता येत नाहीत. श्रीमंत होण्यासाठी दोन्ही मार्ग एकमेकांसोबत वापरावे लागतात. ह्या दोन्हींच्या मुळावर येणारं संकट म्हणजे होम लोन.

 

 

महिना पन्नास हजार पगार हातात येणाऱ्या मुलाचे ३०-३५,००० रूपये emi मध्ये जात असतील तर काटकसरीची शक्यताच संपली.

पगार जास्त असलेला माणूस “अधिक मोठं”, “अधिक स्पेशियस”, “अधिक चांगल्या परिसरात” अश्या विविध कारणांनी आणखी महागडं घर घेऊन आपला emi वाढवतो. उरला पगार लाईफ स्टाईल मेन्टेन करण्यासाठी कसाबसा पुरतो! काटकसर करणार कशी?!

 

 

ही काटकसर केली नाही की दुसरा मार्ग – उत्पन्न वाढवणे – अशक्य होतं. कारण उत्पन्न हवेतून वाढत नाही. त्यासाठी भांडवलाची गुंतवणूक करावीच लागते. उत्पन्न वाढवण्याच्या कोणत्याही मार्गावर व्यवस्थित गुंतवणूक केल्याशिवाय पुढे जाताच येत नाही.

स्टॉक असो वा फ्लॅट खरेदी (इन्व्हेस्टमेंट म्हणून! रहाण्यासाठी नव्हे!), कुठे ही इन्व्हेस्ट करायला पैसे लागतात. शेअर्स १०० रुपयांचेही घेता येतात. पण त्यावर मिळणारा नफा दोन आकडी असेल. त्याने कुणाची संपत्ती वाढत नाही. ५-६ आकडी नफा कमवायला त्या प्रमाणात इन्व्हेस्ट करावे लागतात. त्यातील रिस्क फॅक्टर हाताळायला बॅकअप पण लागतं!

इन्व्हेस्टमेंट म्हणून फ्लॅट घ्यावा का – हा वेगळाच विषय. त्यावर नंतर कधीतरी चर्चा करू. सध्या पुरतं गृहीत धरू की तो सुद्धा गुंतवणूक करण्याचा चांगला पर्याय आहे. परवडेल आणि सहज मॅनेज होईल एवढ्याच emi चा फ्लॅट घेता येऊ शकतो. तो भाड्याने देणे, संधी मिळताच विकून टाकणे अश्या मार्गांनी उत्पन्न मिळवता येऊ शकतं.

पण तेवढी मोठी (किमान डाऊन पेमेंट एवढी) रक्कम गोळा करण्यासाठीसुद्धा पगाराचा मोठा भाग बाजूला टाकता आला पाहिजे!

खरं तर – स्वतःचा पार्ट टाइम उद्योग करणे किंवा कुणा विश्वासार्ह परिचिताच्या धंद्यात इन्व्हॉल्व होऊन आपले पैसे गुंतवणे – हे समृद्धीचे सर्वोत्तम मार्ग आहेत. ह्यांत यशापयशात तुमचा बऱ्यापैकी रोल असतो, कंट्रोल असतो. ह्या दोन्हींत नोकरी सांभाळून मेहनत घेण्याची तयारी तर लागतेच. पण पैसेही लागतातच!

 

एकदा का माणूस गृह कर्जाच्या emi च्या फेऱ्यात अडकला, की अश्या संधी समोर आल्या तरी हताश नजरेने त्या चुकताना बघत बसावं लागतं. थोडक्यात, होम लोन म्हणजे माणसाची रिस्क टेकिंगची शक्ती एका फटक्यात संपवून टाकणारा प्रकार असतो.

प्रश्न असा पडतो की हे असं अनेकांबरोबर घडत आलंय…आज ही घडत आहे. तरी इतर लोक ह्यातून सुधारत का नाहीत? पुढच्यास ठेच मागचा शहाणा असं का होत नाही?

इथे खरी समस्या समोर येते – आपली अर्थ निरक्षरता आणि ही अर्थ निरक्षरता जपणारं कौटुंबिक वातावरण.

कोणता मराठी बाप आपल्या मुलाला “श्रीमंत कसं व्हायचं” ह्याचे धडे देतो? कोणता लहान भाऊ मोठ्या भावाला “तुझी सॅलरी – कर्ज – इन्व्हेस्टमेंट्स हे सगळं कसं मॅनेज करतोस?” असे प्रश्न विचारतो?

लाईफ इन्श्युरन्समधून असा नेमका किती रिटर्न मिळतो, ज्यामुळे आपण साधे टर्म इन्श्युरन्स नं काढता इतर मोठाल्या पॉलिसीज विकत घेतो – हा प्रश्न कोणती बायको आपल्या नवऱ्याला विचारत असावी?!

ज्या घरांत “पैसा सर्व नाही” हे सारखं घोकलं जाईल, तिथे पैसा “वाढवणं” ची मानसिकता तयारच कशी होईल?! हा लेख वाचतानासुद्धा अनेकांच्या मनात “पण पैश्यांच्या मागे धावणं वाईटच!” सारखे विचार तरळून गेले असणारच. कारण आपल्याकडे “श्रीमंत, समृद्ध होण्याची आकांक्षा” नकारात्मकरित्याच घेतली जाते.

असं का व्हावं? ती एक जीवनात आनंद निर्माण करणारी गोष्ट असू शकत नाही का? असे प्रयत्न करणं म्हणजे कुटुंबापासून दूर होणं हा नैसर्गिक नियम नव्हे.

 

 

ज्या गुज्जूंच्या “मनी माइंडेड” असण्याचा संदर्भ लेखाच्या सुरूवातीस आलाय, ते जीवन जगताना फार अरसिक, दुःखी असतात का? फॅमिली बरोबर सिनेमे बघतात, मित्रांबरोबर हॉटेलिंग करतात, महागडे कपडे घेतात…!

मस्तच जगतात ना! पण हे करताना त्यांना “टेन्शन” येत नाही…कारण ह्या सर्व खर्चापेक्षा त्यांची कमाई कितीतरी पट मोठी असते! त्यांचे पाय भरपूर पसरू शकतात…कारण ते त्यांचं अंथरूण सारखं वाढतं ठेवतात.

आपण मात्र अंथरुणाची साईज फिक्स समजून चालतो. ती वाढवण्यासाठी आवश्यक असणारी वैचारिक मोकळीक…जुन्यांच्या चुकांचा नव्यांना फायदा मिळावा हा दृष्टिकोन आपल्याकडे आढळत नाही.

हा लेख पटला असेल तर आजच आपल्या कुटुंबाबरोबर बसा. आपल्या इन्कम-एकस्पेन्सचा हिशेब करा. जीवनाची क्वालिटी कमी नं करता, कोणते खर्च टाळता येतात हे पहा. वाचवलेले पैसे साठवून कुठे गुंतवता येतील ह्याची चाचपणी सुरू करा. होम लोनच्या तुरुंगात न अडकण्याचा निर्णय घ्या… इतरांना तो पटवून द्या. घराचा प्रेसटीज इश्यू करू नका.

भाड्याच्या घराचे पैसे “वाया जातात” असा विचार नं करता, “डाऊनपेमेंट चे पैसे कुठेतरी गुंतवून भाड्या एवढं उत्पन्न मिळवू” असा विचार करा. घर घ्यायचंच असेल तर हळूहळू संपत्ती वाढवून जास्तीत जास्त रोख अन कमीत कमी होम-लोन अश्या फॉर्म्युलात घ्या. पण आधीच ह्या emi च्या तुरुंगात सापडले असाल तर लवकरात लवकर बाहेर पडण्यासाठी काय करता येईल ह्याचा विचार करा.

शेवटी एक नेहेमी लक्षात ठेवा – आधीच्या एका लेखात म्हटल्याप्रमाणे –

पैसा सब कुछ नहीं है…लेकिन बहोत कुछ है!

(हा आधीचा लेख वाचण्यासाठी इथे क्लिक करा.)

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version