जेव्हा तब्बल ३०० हून अधिक भारतीयांचा जीव कॅनडा सरकारच्या निष्काळजीपणामुळे गेला
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम
===
कनिष्क विमान अपघाताबद्दल आपल्यापैकी फारच कमी लोकांना माहिती असेल. हि एक अशी घटना होती ज्याने संपूर्ण जग त्या काळी हादरले होते. खरतरं या अपघातामागचे मुख्य कारण दहशतवादी हल्ला होता.
हा इतिहासातील एक मोठा विमान अपघात मानला जातो. २३ जून, १९८५ ला बॉम्बस्फोटामध्ये हे विमान उडवण्यात आले होते.
१९८४ मध्ये सुवर्ण मंदिरातील दहशतवाद्यांना बाहेर काढण्यासाठी करण्यात आलेल्या लष्करी कारवाई (ऑपरेशन ब्लू स्टार) च्या विरोधात शीख दहशतवाद्यांनी हा हल्ला केला होता. हा हल्ला रोखण्यात अपयशी होण्यामागे कॅनडा सरकारलाही जबाबदार ठरवण्यात आले होते.
एअर इंडियाची फ्लाइट १८२ ने २२ जूनला कॅनडाच्या मॉन्ट्रियल एअरपोर्टहून दिल्लीकडे उड्डाण घेतले होते. दुसऱ्या दिवशी आयरीश हवाई क्षेत्रात हवेतच विमानाचा स्फोट झाला होता.
विमानाचे तुकडे-तुकडे होऊन ते अटलांटिक महासागरात पडले होते. हा स्फोट झाला त्यावेळी विमान समुद्र सपाटीपासून ९,४०० मीटर उंचीवर होते. विमानात असलेल्या २२ क्रू मेंबरसह सर्व ३०७ प्रवासी मारले गेले होते.
प्रवाशांमध्ये बहुतांश भारतीय वंशाने कॅनडाचे नागरिक होते.
स्फोटाच्या वेळी विमान लंडनच्या हिथ्रो विमानतळापासून ४५ मिनिटे लांब होते. कनिष्क विमान ब्रिटनच्या वेळेनुसार सकाळी ८ वाजून १६ मिनिटांनी अचानक रडारवरून गायब झाले होते.
स्फोटानंतर विमानाचे अवशेष साऊथ आयरलंडच्या किनारी भागात आढळले होते. त्यानंतर अटलांटिक महासागरातून प्रवाशांचे मृतदेह आणि विमानाचा ढिगारा मिळाला.
काही प्रवाशांच्या मृतदेहाची तपासणी आणि वैद्यकीय तपासणीत समोर आले की, त्यांचा मृत्यू स्फोटामुळे नव्हे तर समुद्रात बुडाल्याने झाला होता.
कॅनडा सरकार, इंटलिजेंस आणि सुरक्षा संस्थांनी अलर्टवर गांभीर्याने चर्चा केली असती तर हा अपघात थांबवता आला असता. याबाबत भारतीय गुप्तचर संस्था आणि सरकारने कॅनडाच्या प्रशासनाला सतर्क केले होते.
ऑपरेशन ब्लू स्टारचा बदला घेण्यासाठी शीख बंडखोर एअर इंडियाच्या फ्लाइटला लक्ष्य करू शकतात. असा इशारा देण्यात आला होता.
पीटीआयच्या एका जुन्या रिपोर्टनुसार या अपघातांची चौकशी करणारे कॅनडा सुप्रीम कोर्टचे माजी जस्टिस जॉन मेजर यांनी या अपघातासाठी कॅनाडा सरकार, रॉयल कॅनडियन माऊंटेड पोलिस आणि कॅनडियन सेक्युरिटी इंटेलजन्स सर्व्हीसला जबाबदार ठरवले होते.
भारताकडून मिळालेले अलर्ट पाहता कॅनडा सरकारने टोरंटो आणि मॉन्ट्रियलमध्ये चोख सुरक्षा व्यवस्था तैनात करायला हवी होती. तसे पाहता दोन्ही एअरपोर्टवर पोलिस तैनात होते. पण तरीही कॅनडाला दहशतवाद्यांना रोखण्यात अपयश आले. चौकशीनुसार सुरक्षा व्यवस्थेतील चुकीमुळे दहशतवाद्यांना विमानात बॉम्ब ठेण्यात यश आले होते.
या अपघातामध्ये बब्बर खालसा चीफ तलविंदर सिंग परमार आणि बॉम्ब बनवणाऱ्या इंदरजित सिंग रेयात सह अनेकांची नावे जोडली गेली होती. त्यापैकी परमारला १९९२ मध्ये पंजाब पोलिसांनी अमृतसरमध्ये ठार केले होते.
तर या प्रकरणात कॅनडामध्ये राहणा-या केवळ इंदरजित सिंग रेयातलाच दोषी ठरवण्यात आले आणि त्याला १५ वर्षाच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली.
त्याला हत्या आणि दोघांच्या विरोधात खोटी साक्ष दिल्याप्रकरणी दोषी ठरवण्यात आले आणि ह्या अपघाताचा न्यायनिवडा करण्यात आला.
===
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम Copyright © InMarathi.com | All rights reserved.