आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page
===
जगात वेगवेगळ्या स्तरातील लोकं राहतात. कुणी गरीब, कुणी श्रीमंत… जगात जशे गरीब लोकांची कमी नाही तसेच श्रीमंत लोकांचीही कमी नाही. पण काही श्रीमंत लोक त्यांची संपत्ती ही केवळ त्यांच्या एशोआरामासाठीच वापरतात, जे बरोबरही आहे.. त्यांचा पैसा त्यांना वाटेल तसा ते खर्च करतील. पण या जगात काही असे लोकं देखील आहेत ज्यांनी यशाच्या उंच शिखरावर पोहोचून देखील आपले पाय जमिनीत रोवून ठेवले. त्यांच्या सभोवताली वावरणाऱ्या समाजाची जाण ठेवली, त्यांनी समाजासाठी आपल्या संपत्तीचा काही भाग दान करत सामाजिक आपुलकी जपली.
जगातील तीन नंबरची श्रीमंत व्यक्ती म्हणून ओळख असलेल्या वॉरन बफेट यांनी पुढाकार घेऊन बिल व मिलींडा गेटस फौंडेशनच्या सहाय्याने “गिव्हिंग प्लेज” हे कँपेन सुरू करून अब्जाधीशांनी त्यांची किमान अर्धी संपत्ती दान करावी असे आवाहन केले होते. या मोहिमेत तब्ब्ल ११२ अब्जाधीश सामील झाले आहेत…!
आज आपण अशाच ११ दानशूर व्यक्तींबद्दल जाणून घेणार आहोत…!
१) बिल गेट्स : संपत्ती – 88.7 billion $
जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींच्या पंक्तीत स्वतःची एक वेगळीच ओळख निर्माण केलेले मायक्रोसॉफ्टचे सहसंस्थापक बिल गेट्स यांनी निवृत्तीनंतर ‘बिल व मेलिंदा गेट्स फौंडेशन’ची स्थापना करून जगभरातील अनेक देशांना शिक्षण, गरीबी निर्मूलन, आरोग्य यासाठी सढळ मदत केली आहे. जगभरातील नागरिकांचे जीवनमान सुधारणे व जेथे आरोग्य, वैद्यकीय सेवा नाहीत अथवा तोकड्या आहेत तेथे त्या उपलब्ध करून देणे यासाठी ते प्रयत्नशील आहेत. गरीबी हाच जगाचा भयंकर रोग असून त्याचे निर्मूलन करण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत असे त्यांना वाटते. एवढचं नाही तर २०१४ साली जगातील सर्वाधिक दानशूर व्यक्ती म्हणून त्यांची नोंद करण्यात आली आहे.
२) वॉरेन बफे : संपत्ती – 80.1 billion $
जगमान्य गुंतवणूकदार अशी ओळख असलेल्या वॉरेन बफे यांनीच ‘गिव्हींग प्लेज’ या संस्थेची स्थापना केली आहे. ६३ अब्ज डॉलर्स मालमत्ता असलेले वॉरेन जगातील ३ नंबरची श्रीमंत व्यक्ती आहेत. त्यांनी जून २००६ मध्येच त्यांच्या संपत्तीतील ८३ टक्के भाग हा ‘बिल व मेलिंडा गेट्स फौंडेशन’ला दिला असून एकाच व्यक्तीने दिलेली डोनेशनची आतापर्यंतची ही सर्वात मोठी रक्कम आहे.
३) मार्क झुकेरबर्ग : संपत्ती – 71.5 billion $
फेसबुकचे सहसंस्थापक मार्क झुकेरबर्ग गिव्हींग प्लेजच्या यादीत यावर्षी नव्यानेच सामील झाले असून या यादीतील ते तरूण अब्जाधीश उद्योजक आहे. त्यांनीही त्यांची संपत्ती चॅरीटीसाठी देण्याचा संकल्प केला असून त्याच्या मॅक्झिमा या मुलीच्या जन्मानंतर त्याने त्याच्या वाट्याचे फेसबुक शेअर ९९ टक्के दान देणार असल्याचे जाहीर केले आहे. आज या शेअर्सची किंमत ४५ अब्ज डॉलर्स एवढी आहे.
४) लॅरी एलिसन : संपत्ती – 59.3 billion $
ओरॅकल कॉर्पोरेशन या तंत्रक्षेत्रातील नामवंत कंपनीचे हे मालक आहेत. जगप्रसिद्ध जावा प्रोग्रॅमचे ते डेव्हलपर देखील आहेत. ही एक computer programming language असून ती जभगरात वापरली जाते. ५१ अब्ज डॉलर्स संपत्तीचे मालक असलेल्या एलिसन यांनी गिव्हींग प्लेजमध्ये ९५ टक्के संपत्ती चॅरिटीसाठी दान करणार असल्याचे जाहीर केले आहे. त्यावर वॉरेन बफेट यांनी त्यांना वैयक्तिक पत्र लिहून तुम्ही जगासमोर फारच चांगला आदर्श ठेवला आहे. त्यामुळे अनेकांना प्रेरणा मिळेल असे म्हटले होते. त्यांनी त्यांच्या संपत्तीचा वापर शिक्षण व वैद्यकीय क्षेत्रासाठी केला जावा अशी अपेक्षाही व्यक्त केली.
५) मायकेल ब्लूमबर्ग : संपत्ती – 47.1 billion $
न्यूयार्कचे माजी लोकप्रिय मेअर म्हणून ओळखले जाणारे बुमबर्ग दीर्घकाळ चॅरिटी करत आहेत. त्यांच्याकडे प्रचंड संपत्ती आहे. प्लेजमध्ये ते म्हणतात, प्रचंड संपत्ती आपण खर्चही करू शकत नाही आणि बरोबरही नेऊ शकत नाही. त्यामुळे गेली अनेक वर्षे त्या संपत्तीतला मोठा हिस्सा मी माझ्या आवडीच्या व मदतीची गरज असलेल्या क्षेत्रांना दान देत आहे. त्यासाठी ब्लूमबर्ग फिलाँथ्राफीची स्थापना केली गेली आहे व त्यातून कला, शिक्षण, आरोग्य, पर्यावरण व सरकारी इनोव्हेशन कार्यक्रमांसाठी निधी उपलब्ध करून दिला जातो.
६) पॉल अॅलन : संपत्ती – 20.7 billion $
मायक्रोसॉफटचे सहसंस्थापक असलेले पॉल अॅलन बिल गेट्स इतके प्रसिद्ध तर नाहीत. मात्र चॅरिटी करण्यासंदर्भात ते बिलच्या तोडीस तोड आहेत. ‘द पॉल जी अॅलन फॅमिली फौंडेशन’ नावाची त्यांची चॅरिटी संस्था असून ते या माध्यमातून मेंदूच्या संशोधनासाठी भरीव मदत करत आहेत. सध्या इबोलाच्या संशोधनासाठीही त्यांनी आर्थिक पाठबळ उभे केले आहे. अॅलन इन्स्टिट्यूट ऑफ ब्रेन सायन्स या पॅसिफीक नॉर्थवेस्ट भागात मेंदूवरील संशेाधन केले जात आहे.
७) अझीम प्रेमजी : संपत्ती – 18.7 billion $
भारतीय आयटी कंपनी विप्रोचे अध्यक्ष अझीझ प्रेमजी. २००१ मध्ये अझीझ प्रेमजी फौंडेशनची स्थापना करण्यात आली असून त्यांनी सार्वजनिक शिक्षण क्षेत्रात मोलाचे योगदान दिले आहे. भारतातील शिक्षण क्षेत्रासाठीच ते नेहमी प्रयत्नशील आहेत. ते गिव्हींज प्लेजमध्ये म्हणतात, आमच्यापैकी ज्यांच्याकडे संपत्ती आहे ती त्यांनी जगाच्या कल्याणासाठी दान द्यावी. चांगले जग निर्माण करण्यासाठीच्या या प्रयत्नात सर्वांचे योगदान हवे ज्यामुळे कमी भाग्यवान असलेल्या लक्षावधी लोकांचे कल्याण करता येईल.
८) रोनाल्ड पेरलमन : संपत्ती – 12 billion $
व्यवसायाने उद्योजक असलेल्या रोनाल्ड पेरलमन यांची एकूण संपत्ती १४ अब्ज डॉलर्स एवढी आहे . मॅक अँड्रूज व फोर्ब्स होल्डिंग इंक या कंपन्यांबरोबरच ते न्यूयॉर्कच्या प्रसिद्ध कॉन्सर्ट व्हेन्यू कार्नेज हॉलचे अध्यक्ष देखील आहेत. त्यांनी त्यांची संपत्ती शिक्षण व वैद्यकीय क्षेत्रासाठी दान करण्याची प्रतिज्ञा घेतली असून गेली २० वर्षे ते ब्रेस्ट कॅन्सर व त्यावरील संशोधन व उपचारांसाठी चॅरिटी करत आहेत.
९) जॉर्ज लुकास : संपत्ती – 5.1 billion $
स्टार वॉर मुव्हीज व सिरीजमुळे प्रसिद्धीच्या झोतात आलेले लुकास सार्वजनिक कार्यक्रमात फार क्वचितचं दिसतात. मात्र एज्युटोपिया या संस्थेच्या माध्यमातून ते शिक्षण क्षेत्रातील सुधारणांसाठी निरंतर कार्यरत आहेत. तेही प्लेजचे सदस्य असून त्यांनी ‘जॉर्ज लुकास एज्युकेशन फौंडेशन’च्या माध्यमातून नवीन पिढीच्या शिक्षणासाठी मोठे दान उपलब्ध करून दिले आहे. पुढील पिढीला यश हवे असेल तर त्यासाठी योग्य शिक्षण हवे असे त्यांचे म्हणणे आहे.
१०) जेफ स्कोल : संपत्ती – 4.4 billion $
ईबे या ऑक्शन साईटचे पहिले अध्यक्ष असलेले जेफ स्कोल यांचे चित्रपटसृष्टीतील योगदान खूप मोठे आहे. त्यांनी १९९९ मध्ये स्कोल फौंडेशनची स्थापना केली असून त्याच्या माध्यमातून अनेक समाजोपयोगी कार्यांसाठी मदत दिली जात आहे. त्याचबरोबर नवीन उद्योजकांना व्यवसाय स्थिर करता यावा यासाठीही सहाय्य केले जाते. २००९ साली त्यांनी ‘स्कोल ग्लोबल थ्रेट फंड’ स्थापन केला आहे. त्यातून मानव जातीला थ्रेट म्हणजे धोका निर्माण करणारे हवामानबदल, अशांतता, अण्वस्त्रे यासारख्या धोक्यांसाठी अर्धी संपत्ती दान करणार असल्याची घोषणा त्यांनी केली आहे.
११) टेड टर्नर : संपत्ती – 2.2 billion $
केबल न्यूज नेटवर्क संस्थेमुळे प्रसिद्धीच्या झोतात आलेल्या या अब्जाधीशाने युनायटेड नेशन्स फौंडेशनची स्थापना करून त्यांना १ अब्ज डॉलर्स दान केले आहे. ते म्हणतात जगापुढील महत्त्वाचे प्रश्न सोडविण्यासाठी मी माझी संपत्ती आणि उर्जा देऊ इच्छीतो. त्यात अणुधोका, हवामान बदल व लोकसंख्या वाढ या जगाला धोकादायक ठरणार्या प्रश्नांचा प्रामुख्याने समावेश आहे.
पैसा कमावला पण सामाजिक जाण विसरले नाहीत, असेच आहेत हे जगातील काही श्रीमंत दानशूर व्यक्ती.
अनेक लोक यांच्यापासून प्रेरणा घेतात, त्यांची मुल्ये आत्मसात करतात. पण त्यासोबतच त्यांचा हा गुण देखील आत्मसात करण्यासारखाच आहे… नाही का!
===
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page । Copyright (c) 2017 InMarathi.com | All rights reserved.