आमच्या इतर लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page
===
लेखिका : प्रिया प्रभुदेसाई
===
१२ मार्च चा नेहेमी सारखाच कामाचा दिवस. दुपारी दोन वाजता आईचा फोन आला
प्रिया, बाबा स्टॉक एक्स्चेंज मध्ये जाणार होते. ते घरी नाही आले आहेत. ऑफिसचा फोन लागत नाही. बॉम्ब फुटल्याची बातमी आली आहे.
तेव्हा ऑन लाईन ट्रेडिंग नसायचे. शनिवारी मार्केट बंद. व्यवहार करायला बाबा लंच टाइम मध्ये जायचे ते माहित होते.
बाँम्ब काय फुटणार. काहीतरी अफवा असेल ग..
मी फोन ठेवला आणि काही वेळानी बिल्डिंगमधले जमनालाल बजाज मध्ये शिकवणारे काका आले. नरिमन पॉईंट आणि स्टॉक एक्सचेंजला ब्लास्ट झालेत. रस्त्यावर पळापळ. कारण कळत नव्हते नेमके काय झालय. लोकांचे शर्ट पेटले होते. काही गडाबडा लोळत होते. पोटात गोळा आला. आईला सांगण्यात काही अर्थ नव्हता, पण तेवढ्यात आईचा फोन आला, गडबड झालीय पण बाबा सुखरूप आहेत. टॅक्सीने येतायत. तू काळजी करू नकोस म्हणेपर्यंत फोन डेड.
परत प्रयत्न केला पण लागोपाठ दोन आवाज. साधारण दुरून फटाके फुटण्याचा येईल तसा. तेव्हा मोबाईल नव्हते हे बरेच, कारण सेना भवन आणि प्लाझा जवळ बॉम्ब स्पॉट झालाय ही बातमी सिटीलाईट ला पोचेपर्यंत दहा मिनिटे गेली. माझे माहेर तिथून पाच मिनिटावर, चालत . सेनाभवन जवळ पेट्रोल पम्प. त्याला आग लागली अश्या अफवा. आईकडे जाऊ का म्हणून चपला घालतेय तोपर्यंत वरळी च्या बसस्टॉप जवळ प्रेतांचा खच पडला आहे ही बातमी घेऊन स्टेट बँकेत नोकरी करणारी शेजारीण आली. वरळीला ब्रांच. बाबा पोचले नव्हते तोपर्यंत घरी.
मरण डोळ्याने पाहिले त्या दिवशी. मुंबईत अनेक घरात ही स्थिती असेल.
इथून मुंबईकर बदलला.
मुंबईत मारामाऱ्या होत होत्या. टोळी युद्धे होती, लहान सहान दंगली होत होत्या.दगडफेक वगैरे. पण पद्धतशीर पणे मुंबई पेटवण्याचा प्रयत्न पहिलाच. नंतर यात गुंतलेले धागे जेव्हा बाहेर आले तेव्हा लक्षात आले यात केवढी मोठी माणसे गुंतली असतील… पैसे खाणे वेगळे.. पण पैसे घेऊन या अशा गोष्टीकडे दुर्लक्ष करणे… कारणे काहीही असोत, बाहेर येवोत किंवा नाही बाहेर येवोत… लक्षात आले, मुंबईला वाली नाही. अफाट पैसे आहे इथे. अफाट बजेट… विकून खातील.
ह्या नंतर गेलेला माणूस सुरक्षित परत येईल याची खात्री राहिली नाही. परप्रातीयांना कसलीही चौकशी न करता आत घेणे, झोपडपट्यां कायदेशीर करणे.. त्यात अनेक बेकायदेशीर गोष्टी घडत आहेत तरीही सोयीस्कर कानाडोळा करणे यात सामान्य माणसाची मनोवृत्ती अशी झाली की आपण वाचतो आहोत न… सुटलो. २६ जुलै च्या पावसातली दैना… प्रत्यक्ष सहन केली आहे. चेंबूरला दहा तास नवरा पुलावर अडकला होता. सकाळी गाडी एके ठिकाणी पार्क करून ३ तास चालत घरी आला. येताना गाडीत मृत पावलेले देह पाहिले तेव्हा आपण वाचलो हा सुस्कारा जास्त असणार. ते निसर्ग कोपला म्हणून आलेले संकट मानले तरी या वर्षी बळी गेलेच. कालच पंधरा मिनिटे पाऊस पडला तेव्हा लेडी जमशेटजी रोड तुंबला… ते डॉक्टर गटारात पडल्यापासून आता जवळ जायची भीती वाटते.. त्यापेक्षा रस्त्यावरून येत असलेल्या मोटारीने उडवले तर बरे.
२६ नोव्हेंबर ला कसाब प्रकरण झाले तेव्हा मुलगा झेविअर्स ला गिग्स ला होता.. तो साडे नऊला CST वरून घरी आला. २५ किलोचा कि बोर्ड घेऊन… आणि थोडा वेळ असता तर कदाचित मेला असता. मी हे तीनच प्रसंग लिहितेय कारण त्यात माझ्या घरच्या लोकांचा संबंध आल्याने त्याची तीव्रता जास्त जाणवली.
हे तिन्ही तशा अर्थाने प्रशासनाची, नोकरशाहीची हलगर्जी.
एकूणच माणसात उद्वेग व्यक्त करायची ताकद नाही. हिम्मत नाही. आजचा दिवस गेला… सुटलो .
कालची दुर्घटना झाली तेव्हा लोकांनी शिस्त पाळायला हवी हे लिहायला सोपे आहे. जिथे पावसात, बॉम्ब स्फोटात, बिल्डिंग पडून आणि काय काय माणसे किड्या-मुंगीसारखी मरतात, तेव्हा माणसे जीव घेऊन पळतात. कसली शिस्त आणि काय!
ब्रीज काय, आज जे एकमेकांवर दोषारोप चालू आहेत, मृण्मयी रानडे गेली कित्येक वर्षे दादर स्टेशनची हालत लिहिते आहे… याही ब्रीज बाबत पत्रे गेली होती . प्रज्ञा खेडेकर च्या प्रतिक्रिया वाचल्या तर लक्षात येईल दर दिवशी लोकल म्हणजे घरी आल्यावर वाचल्याचा सुस्कारा सोडणे आहे. काही हलत नाही हे ढळढळीत सत्य आहे.
१९७० मध्ये माझे सासरे मुंबईला आले. त्या आधी ते कुएत ला होते. रिटायर्ड झाल्यावर त्यांना राहता येत नाही. मिडल इस्ट मध्ये पगार मिळतो.. पण तुम्हाला तुमची मालमत्ता घेता येत नाही. गोव्यापेक्षा मुंबईत तेव्हा संधी जास्त.. तशा आताही जास्तच. बाबा इथे स्थायिक झाले. आता वाटते, इथेही मालमत्ता घेता आली नसती, तर कदाचित मुलांची शिक्षणे वगैरे आटपून गोव्याला गेले असते. इथे राहायचे तर भाड्याची जागा आणि मग परत आपले गाव असे काही केले तर जरी संधीसाठी माणूस राहिला तरी परत जाणे भाग होईल. स्वतःच्या प्रदेशात तो संधी शोधेल, मार्ग काढेल, कदाचित स्थायिक नेतृत्व संधी, रोजगार उपलब्ध करून द्यायला मजबूर होतील.. तिथूनची इकॉनॉमी विकसित होईल .
प्रत्येक भागाची एक मानसिकता असते. विस्थापित झालेली माणसे इथे मजबुरीने राहतात. त्यांना या मुंबईचे प्रेम वाटतही नाही. पैसे कमावतात पण मुंबईविषयी आस्था नाही…
जसे मला मुंबई सोडून कोणत्याही भागात राहता येणे शक्य नाही… मनातून शिव्याच देईन.. तसेच इतरांचे होत असेलही. जो जो, ज्या प्रदेशाचा, तो तो तिथे फुलेदे, मोठा होउदे… असे काही केले तर महानगरे वाचतील …
मुंबईत येणारा लोंढा थांबवणे हे प्रत्येक मुख्यमंत्र्यांच्या हातात आहे. जर आपल्या राज्याचा विकास करणे शक्य नाही तर राजीनामा द्या असे घटनेत केल्याशिवाय काहीही निष्पन्न होणार नाही.
( एका सर्व सामान्य नागरिकांच्या नजरेतून लिहिले आहे. त्यात पार्टी बिर्टी चा कसलाही संबंध नाही )
—
InMarathi.com वर विविध लेखकांनी व्यक्त केलेले विचार ही त्यांची वैयक्तिक मतं असतात. InMarathi.com त्या मतांशी सहमत असेलच असे नाही. । आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page Copyright (c) 2017 InMarathi.com | All rights reserved.