Site icon InMarathi

एल्फिन्स्टन रोड अपघात : शासन-प्रशासनाचा हलगर्जीपणा, माध्यमांचं दुर्लक्ष, ‘आपली’ हतबलता

आमच्या इतर लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page

===

सध्या सर्वत्र एलफिन्स्टन रोड स्टेशन वरील ब्रिजवर झालेल्या अपघाताबद्दल हळहळ व्यक्त होत आहे. नागरिकांमध्ये संताप, उद्वेग, हतबलता…ह्या सर्व भावना आहेत. समाज माध्यमांवर, नेहेमीप्रमाणे, पक्षीय राजकारण सुरू झालंय. परंतु सर्वत्र शेअर होत असलेल्या अनेक छायाचित्रांवरून एक गोष्ट सूर्यप्रकाशाइतकी स्पष्ट आहे की वर्तमान केंद्रीय सरकार द्वारे अधिकाऱ्यांकडून काम करवून घेण्यात प्रचंड कुचराई होत आहे. हे म्हणण्यामागे आधार आहेत पुढील फोटोज.

पहिला आहे, सतत केल्या गेलेल्या तक्रार-सूचनांचा.

 

 

 

दुसरा आधार आहे खुद्द रेल्वे मंत्रालयातर्फे ह्या पुलाच्या दुरुस्तुसाठी मंजूर केलेल्या निधीचा. निधी मंजूर होऊन ही अधिकारी तसेच बसून राहिले…आणि ही दुर्घटना घडली.

 

वरील छायाचित्रात तारीख स्पष्ट दिसत आहे. २८ ऑक्टोबर २०१५. २०१५ ते २०१७ हा निधी तसाच पडून राहीला…सदर विषयावर अनेक तक्रारी होत राहिल्या तरीही रेल्वे मंत्रालयातर्फे संबंधित अधिकाऱ्यांवर कार्यवाहीचा चाबूक फिरला नाही. फळं निष्पाप प्रवाश्यांना भोगावी लागली.

पुढे – आणखी एक पत्र आहे…ज्यात माजी रेल्वे मंत्री खुद्द निधीच्या भावाची सबब सांगत आहेत…!

 

हे पत्र आहे २०१६ मधलं.

एकूणच सर्वत्र सावळा गोंधळ आहे असं दिसतंय.

सदर विषयावर, एकूणच शासन प्रशासनाचा गलथान कारभार, माध्यमांनी ह्या प्रकरणात केलेली घोड चूक आणि सामान्य जनता म्हणून आपली हतबलता व्यक्त करणारे ३ फेसबुक स्टेटस वाचकांसाठी पुढे प्रसिद्ध करत आहोत. आपल्या सर्वांच्या भावना काही वेगळ्या नसाव्यात…

१ –

गोरखपूर आणि मुंबई पूर. दोन्हीही व्यवस्था निर्मितच होते. आजची दुर्घटनासुद्धा अशीच व्यवस्था निर्मित आहे. आणि ह्या समस्या पूर्वापार आहेत. सर्वच पक्षांनी निपजू दिलेल्या आहेत – सत्ताधारी आणि विरोधक, सर्वच. त्यामुळे आज सत्ताधारी सरकार “कोणतं” हा दुय्यम मुद्दा आहे. त्याचं राजकारण करू नये.

मुंबईत पूर होतो त्याचा दोष पावसाचा असतो, मनपाचा नसतो पण रेल्वे पूलवर चेंगराचेंगरी झाली तर लोकांच्या गर्दीचा दोष नसतो, रेल्वे प्रशासनाचा ही नसतो पण सरळ रेल्वे मंत्र्यांचा आणि पर्यायाने भाजपचाच असतो असे तर्क लढवू नये. तसंच, मुंबईतील अनिर्बंध लोकसंख्या वाढ आणि बेशिस्त बांधकामांसाठी फक्त मनपा जबाबदार आहे, राज्य-केंद्र नामानिराळे राहू शकतात असे ही तर्क लावू नये.

पूर असो वा आजची दुर्घटना…दोष संपूर्ण यंत्रणेचाच आहे. स्थानिक, राज्य, केंद्र…सर्वांचाच. पाणी तुंबण्यापासून ब्रिजची दुरुस्ती नं होण्यापर्यंत.
मुंबईची लोकसंख्या आणि बांधकामांची तुंबई होणं, त्या अनुषंगाने इन्फ्रा तकलादू पडणं हीच मूळ समस्या आहे. त्यात पक्षीय अभिनिवेश आणून आपलीच एकमुठ फोडून घेऊ नये. (हे “राजकारण करू नका”, “मूळ समस्या ओळखा” असं म्हणणाऱ्यांच्या निष्पक्षतेवर प्रश्न उपस्थित होणारच. २०१४ च्या आधीही व्हायचे, आजही होतात, २०१९ नंतर ही होत रहातील. प्रश्न उपस्थित करणारे बदलत जातात फक्त. असो.)

एकीकडे देवावर टीका करणे हा हक्क वाटणारा, ठाकरे सिनियर ज्युनियर मात्र होलियर दॅन काऊ ठरवून काहीही झालं तरी मुंबई मनपा वर भरवसा ठेवलाच पायजे असा बाणा बजावतो. दुसरीकडे, मुंबईतील गर्दीच्या नावाने बोटं मोडणारा, खुद्द फडणवीसांच्या कित्येक योजना ह्याच मुंबईत आणखी उद्योग, आणखी गर्दी वाढवणाऱ्या आहेत – हे सांगितलं तर भडकून उठतो.

सतत घडत असणारे दुःखद प्रसंग फक्त एकमेकांना टपल्या टोमणे मारण्यासाठी वापरण्याचे, खी खी हसण्यासाठीचे विषय होऊन बसलेत. राजकीय पक्षांना आणखी वेगळं काय हवंय? असा गोंगाट त्यांच्या पथ्यावर पडणारा असतो. ह्या गोंगाटात, प्रश्नाच्या मुळाशी जाऊन इश्यू स्पेसिफिक विचार करणारे आणि त्यावरील उपायांवर अंमलबजावणी करू पहाणारे, त्या दिशेने किमान विचार करणारे मोजकेच आवाज अधिकाधिक बुलंद होणं गरजेचं आहे. भविष्यात कधीतरी ही अभिनिवेशी भक्तगिरी कमी होऊन भारतीयत्व केंद्रित राजकारण व्हायचं असेल तर आजच्या ह्या क्षीण आवाजांनी टिकून रहाणं, बलवान होत जाणं भाग आहे.

: ओंकार दाभाडकर

===

२ –

आम्हीही आहोत एल्फिस्टनचे गुन्हेगार..आमचे प्रयत्न कमी पडले.. जमल्यास आम्हालाही माफ करा..

मराठीतील 4 चॅनेल्स, इंग्रजीतील 3 चॅनेल्स, हिंदीतील 3 चॅनेल्सचे ब्युरो, 2 मराठी वृत्तपत्रं, एका रेडिओ वाहिनीचं ऑफीस.. परळ-लालबाग-वरळी भागात मराठी-इंग्रजीतील बहुतांश वृत्तवाहिन्यांची हेडक्वार्टर्स आहेत. मराठीतील 4 वृत्तवाहिन्यांची कार्यालयं याच परिसरात आहेत. आम्ही बहुतांश माध्यमकर्मी त्याच पुलावरुन प्रवास करतो ज्यावर काल डोळ्यात पाणी आणणारा-ह्रदयाचे ठोके अजूनही वाढवणारा अपघात घडला. या पुलावरुन खाली उतरल्यावर वरळी नाक्यापर्यंत टॅक्सी मिळते. मध्ये रेल्वेवरुन प्रवास करणारे तर रोज दोनदा या पुलावरुन प्रवास करतात. खरं तर जिथे अपघात घडला त्या पुलावर इतकी गर्दी होत नाही कधी. पण पाऊस आणि अफवा या दोन्हीमुळे मुख्य पुलावर गर्दी झाली.

खरं तर या पुलापेक्षाही जास्त धोका आहे तो परळच्या पुलाचा.. जिथे अपघात घडला तो एल्फिस्टनचा पूल होता.. ना की परळ स्थानकावरचा पूल. तरीही परळ-एल्फिस्टन स्थानकांवरचे पूल, दोन्ही स्थानकांवरील प्लॅटफॉर्मची कमी असलेली उंची, या पुलावरील पाय-यांची उंची याविषयी बहुतांश माध्यमांनी स्पेशल रिपोर्ट केलेत. यावर आवाज उठवलाय. अगदी मंत्र्यांपर्यंत या पुलाची अवस्था पोहचवली ती माध्यमांनीच. पण यात सातत्य राहिलं नाही हे मान्य करावंच लागेल. फक्त हा पूल नाही तर कुर्ल्याचा हार्बरला जोडणारा पूल, कल्याणचा मोठ्या ब्रिजवरुन लहान ब्रिजवर उतरणारा, 3 आणि 4 क्रमांकाच्या फलाटाला जोडणारा अरुंद पूल आणि त्याच्या भयानक पाय-या याविषयी सविस्तर वृत्तांत प्रसिद्ध झाले..बातमी दाखवली, पाठपुरावा केला पण जितकी तीव्रता हवी होती ती दाखवण्यात कमी पडलो.

मनाला हुरहुर यासाठी लागलीय कारण रोज इथून प्रवास करतो. काल जिना उतरताना पडलेला चपलांचा खच, कपड्यांच्या चिंध्या आणि “पाणी मारुन साफ केलेले जिने” पाहून वाटलं की आरे आपण ही समस्या इतक्यांदा मांडूनही काहीच कसा काय फरक का पडला नाही ? हे आपलं अपयश नाही म्हणून इगो satisfy करायचा की आपणही कुठेतरी कमी पडलो अशी समजूत घालायची ? रोज गर्दी फेस करतो आपण, रोज शिव्या घालतो, अगदी बातम्या करतो-नेत्यांचे-मंत्र्यांचे फोनो घेतो-प्रतिक्रिया घेतो-आश्वासनं मिळतात, काही प्रमाणात पूर्णही होतात.. पण तरीही कमी कुठे पडलो ? आपलीही जबाबदारी होती-आहे कारण आपण सरकार आणि जनतेतला दुवा आहोत. आपण स्वत:ही जनताच आहोत. मग नेमकं कमी कुठे पडलो ? असे अनेक प्रश्न सतावत आहेत. मनाला हुरहुर लावून जात आहेत.

आणखी एक गोष्ट लक्षात ठेवायला हवी की परळ स्थानकावर बाहेर पडायला एकच पूल आहे जो अपघात घडलेल्या पूलापेक्षा जास्त खतरनाक आहे. कारण हा पूल प्लॅटफॉर्मवर इतका थेट उतरतो की गर्दीच्या वेळी जराजरी ढकलाढकली झाली तर 20-22 लोकं डायरेक्ट रुळांवर पडतील. आजपर्यंत निव्वळ नशिबामुळे असा काही प्रकार घडला नाहीये. या ठिकाणी पुलाची विभागाणीही बावळटप्रकारे केली आहे. 20-80 टक्के अशी ही विभागणी आहे. गर्दीच्या वेळी नेमकं कोणी कोणत्या बाजूने उतरायचं हा नेम नसतो. कारण 20 टक्के भागातही डावीकडून आणि उजवीक़डून प्रवास होतो आणि 80 टक्के भागातही. त्यात या पुलाच्या पाय-या इतक्या उंच आहेत की तरुणही भिंतीचा आधार घेऊन चालतात. पावसात हा पूल घसरडा होतो. काल अपघात या ठिकाणी झाला नाही. अपघात एल्फिस्टनच्या पुलावर झाला हे लक्षात घ्यायला हवं. अपघात अनपेक्षित होता. पण अपघात झाला त्या पुलापेक्षाही जास्त धोकादायक काही मीटरवर असणारा परळचा पूल आहे. हा धोका दुर्लक्षून चालणार नाही. जे फोटो शेअर होत आहेत ते परळ पुलाचे आहेत, एल्फिस्टन पुलाचे क्वचित फोटो शेअर झालेत. अपघात झाला त्या पुलावर खरं तर इतकी गर्दी होत नाही कारण एल्फिस्टनच्या तिकिटघराची जागा मोकळी असते. खाली उतरल्यावर रस्ता मोकळा असतो. परळ पुलावर तो स्कोप नाही कारण मध्य रेल्वेवरील लाखो प्रवाशांना बाहेर पडायला तोच एक मार्ग आहे.

पण खरंच काल सारंच विस्कटणार होतं. अघटित होतं.

खरंच त्या पुलावर असा अपघात घडेल अशी कल्पनाही नव्हती केली.

शेवटी गर्दीची मानसिकता आणि भीती ही अतर्क्य असते. गर्दी बेफान झाली आणि होत्याचं नव्हतं झालं. गर्दीला शिस्त इतक्या रोमांचकारी अवस्थेला आपण अजूनही पोहचलो नाहीयोत आणि म्हणूनच एक चाकरमानी म्हणून आणि त्याहीपेक्षा माध्यमांमध्ये काम करणारा एक कर्मचारी म्हणून (मी स्वत:ला पत्रकार म्हणवत नाही) मी अपयशी ठरलो हे मान्य करावंच लागेल.

(लेखामुळे कोणाच्या भावना किंवा इगो दुखावला गेला असेल तर माफ करा)

: अनिकेत पेंडसे

===

३ –

मला रडू येतंय …. I feel like crying !

ही काय माझी मुंबई आहे ? २०-२५ जण गुदमरून मेले. हे असे मरण ?

या मुंबईत माझा जन्म गेला. कळायला लागल्यापासून गेली ५० वर्षे लोकल ट्रेन्स माझ्या दैनंदिन जगण्याचा अविभाज्य भाग आहे. मी तरी अधून मधून हल्ली काली-पिली, उबर, ओलांने जातो येतो. पण ९० टक्के मुंबईकरांना तर लोकल शिवाय पर्यायच नाही. माझे मुंबईकर कष्टकरी भाऊ -बहीण. शेकडो शेळ्या-मेंढ्या एकमेकांना चिकटून गुमान चालतात तसे काहीसे. सकाळ पासून रात्री पर्यंत. कितीही त्रास झाला तरी सहन करणारे.

मुंबईच्या लोकल प्रणालीचे प्रश्न आहेत. प्रश्न असणारच.

मुद्दा आहे प्रश्न मर्यादेत आहेत कि हाताबाहेर गेलेत. आणि मर्यादा कोण ठरवणार ?

सर्व आलबेल सुरु आहे म्हणजे मर्यादेत आहे असे मानायचे ?

दररोज १० रेल्वे प्रवासी मुंबईत मरतात. दररोज किमान ४० लाख प्रवास करतात. म्हणजे शेकडा प्रमाण ०.०००००२५ %. ते प्रमाणात आहे असे मानायचे ?

डोंबिवलीवाले कल्याणवाल्यांचे, बोरिवलीवाले वसई-विरार वाल्यांचे शत्रू झाले ते मानवी स्वभावानुसार मानायचे ?

मानवी जीवनातील सर्वच घटनांना “दुर्घटना” असे लेबल लावता येतेच कि. कोणी अडवलंय ?

प्रत्येक घटनेला ती का घडली याचे स्पष्टीकरण असतेच कि. चार गाड्या एकदम आल्या, पाऊस जोरात आला, उद्या दसरा असल्यामुळे गर्दी होती. ब्रिज पडल्याची अफवा उठली. इत्यादी.

झाले गेले विसरून, उद्या नाही तर काही काळानंतर काहीच घडले नाही अशा रीतीने पूर्ववत जगायचे याला “मुंबई स्पिरिट” म्हणायचे ? कोणी अडवलंय ?

“मुंबईचे स्पिरिट” म्हणजे काय तर प्रत्येक नागरिकाने सुटा सुटा विचार करायचा? कधीही सामुदायिक कृती, सामुदायिक मागणी करायची नाही? मुबईच्या अपुऱ्या पायाभूत सुविधांमुळे होणारी ससेहोलपट चहा पिताना, गप्पा मारताना, प्रेशर कुकरच्या वाफे सारखी काढून टाकायची? सगळ्याला अपघात म्हणायचे ? पुढचे असेच काही हादरवणारे घडे पर्यंत…?

काही सुचत नाहीये…

: संजीव चांदोरकर

 

लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page

Exit mobile version